Login

प्रिया आज माझी भाग २७

Lovestory
प्रिया आज माझी भाग २७


डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


रुममध्ये येताच प्रियाला खोकला आला. तिच्या खोकण्याचा आवाज ऐकून शेखरने सिगारेट पायाखाली घेऊन विझवली आणि बेडरूम आणि बाल्कनीला विलग करणाऱ्या काचा सरकवून तो रुममध्ये गेला आणि त्याने बाल्कनी पूर्णपणे बंद केली.

"हे काय? सकाळीच सिगारेट?"

" का तुला त्रास होतो?"
शेखरने रागाने तिच्याकडे पाहिले.

आधीच त्याच्या मनाने आणि मेंदूने त्याची बिकट अवस्था केली होती आणि त्यात ती मुंबई बाहेर जॉब शोधित आहे हा विचारही खदखदत होता.

" हो तुम्हाला त्रास झाला तर तो मला होणारच."
प्रिया नेहमीप्रमाणे हसून म्हणाली.
त्याच्याबरोबरच्या दोन महिन्याच्या सहवासात त्याचा राग क्षणभंगुर असतो हे तिने जाणले होते.

समोर टेबलवर ठेवलेले सिगारेटचे पाकिट उचलून तिने डस्टबिनमध्ये टाकले. शेखर तिच्याकडे पाहतच राहिला . अजूनपर्यंत त्याच्या आईने सिगारेट सोडण्याबाबत त्याला कितीदा सांगितले होते. एकदोन वेळा सुधाकर आणि मनिषाने त्याचे सिगारेटचे पाकिट लपवूनही ठेवले होते . पण त्याला जेव्हा हे माहित पडले तेव्हा तो त्यांच्यावर उसळला होता. पण प्रियापुढे त्याने सर्व शस्त्र समर्पण केली होती. जणू तिचे त्याला रोखणे त्याला आवडत होते.


"उद्या माझ्या एका मैत्रिणीचे लग्न आहे. मी सकाळपासून जाणार आहे. तिथे मामा आणि मामी सुद्धा येणार आहेत. मुलाकडचे मामीच्या माहेरचे आहेत. आपल्या लग्नानंतर आपण दोघे एकत्र कुठे गेलो नाही. मामा मामीकडे सुद्धा गेलो नाही अशी तक्रार मामी आणि मावशी करत होत्या . तुम्ही आलात तर..."
प्रिया त्याच्याकडे आशेने पाहत म्हणाली.

"मला वेळ नसतो. फालतू गोष्टींसाठी तर मी मुळीच वेळ काढत नाही."

" मी फालतू का?" प्रिया दुखावली होती. तिला भरून आले. पुढे तिला खूप काही बोलायचे होते .....बोलायचे होते की....मी इथे राहते म्हणून मला काडीचीही किंमत नाही असे तुम्हाला वाटते का?... तुमच्यालेखी माझी हिच किंमत आहे का?...आणि अजून बरेच काही ...पण तिचा कंठ दाटून आला आणि ती बोलू शकली नाही.

शेखरने नकारार्थी मान हलविली... तो अस्वस्थ झाला.

" उगीच गैरसमज करून वेगळे अर्थ काढू नकोस. मला तसं म्हणायचं नव्हतं. "
पण त्याच्या चेहऱ्याकडे न पाहता ,रागावून ती तिथून निघून गेली.

मनीषाच्या घरी तिच्या नणंदेला पाहायला मुलाकडचे येणार होते म्हणून प्रियाला विचारूनच तिने सुट्टी घेतली होती. त्याच्यामुळे आज स्वयंपाक तिलाच करायचा होता .
चपाती करताना चुकून गरम तवा तिच्या हाताला लागला.

" आई ग sss ती कळवली. "
तसे जेवण बनवताना याआधी तिने असे चटके खाल्ले होते...पण हा चटका सहन होण्यापलिकडचा होता. तिचे डोळे वाहायला लागले.

तिचा आवाज ऐकून सुमन ताई किचनमध्ये आल्या.

" प्रिया काय झालं गं? बाई बाई बाई हात भाजून घेतलास... घाबरू नकोस..मलम लावल्यावर लगेच होईल ते ठीक... थांब मी कैलास जीवन आणते ...ते लावल्यावर तुला थंड वाटेल. कुठे आहे गं ते?"

"यांच्या पुस्तकाच्या कपाटावर औषधांचा डबा आहे." डोळे पुसत ती म्हणाली.

सुमनताई त्याच्या खोलीत गेल्या . तो टाय बांधत होता. "शेखर , तेवढा औषधांचा डबा काढून दे. त्यातले कैलास जीवन हवे होते."
पुस्तकांच्या कपाटावर हात दाखवीत त्या म्हणाल्या.

"काय झालं आहे? कुठे भाजलं का तुला ? "

"नाही. मला नाही, प्रियाला..."
प्रिया तेथे आली . शेखरने तिच्याकडे पाहिले व औषधांचा डबा काढून आईच्या हातात दिला व आपली ऑफिसची बॅग घेऊन तो रूमच्या बाहेर पडला.

"शेखर, तुझा टिफीन तरी घेऊन जा. "

"आई, मी बाहेर खाईन. "
जाता जाता तो म्हणाला.

******

रात्री त्याची एक महत्त्वाची मीटिंग संपवून तो उशीराच घरी आला. तो जेवायला येणार नव्हता असा निरोप त्याने आधीच दिला होता.

प्रिया झोपली होती.

फ्रेश होऊन तो बेडवर तिच्या बाजूला येऊन झोपला. तिने नेहमी दोघांमध्ये असणारे लोडचे विभाजन ठेवले नव्हते. त्याने ते ठेवले.

तिच्या गालांवर सुकलेले अश्रूथेंब त्याला दिसले.

"माझ्यामुळे दिवसभर रडत होती का? तुझ्यासारखे तुझे मनही इतके डेलिकेट कसे? "
तिच्या नाजूक चणीच्या देहाला पाहून तो म्हणाला.

"असे वाटतेय बेडवर बाहुलीच ठेवलेय....रडणारी बाहुली."

"या बायकांचे मन इतके नाजूक कसे....
मिहिकाबरोबर जेव्हा मी असायचो तेव्हा तिला कितीही टोकून बोललो तरी ती मनावर घ्यायची नाही....याउलट हिचे वागणे ....शब्द एकदम जपून वापरावे लागतात...तिच्या मराठी भावगीतांसारखीच हळवी आहे ही...कदाचित ही हळवी आहे म्हणून तिला ती भावगीते आवडतात.

त्याने लोड तिच्या चेहऱ्यापासून थोडा खाली सरकवला .
आणि तिच्या हातावर भाजल्यामुळे लालसर जे होते तिथे त्याने अलगद फुंकर घातली आणि तो पुटपुटला.

"आय ॲम सॉरी."

तिच्या चेहऱ्याकडे पाहत असताना "सखी मंद झाल्या तारका...गाणे त्याच्या मनात वाजू लागले...तिच्या हातावर हात ठेवून तिला बघतच तो झोपी गेला.



सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.