Login

प्रिया आज माझी भाग २८

Lovestory
प्रिया आज माझी भाग २८


डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


सकाळी प्रिया उठायच्या आत शेखर ऑफिसला निघून गेला होता. काल रागावल्यामुळे तिने त्याच्याकडे पाहिले देखील नव्हते आणि रात्रीही तो उशीरा आला होता. रोज सकाळी उठल्यावर त्याला पहायची तिला सवय झाली होती आज तो दिसला नाही म्हणून ती हिरमुसली.

आज तिला लग्नाला जायचे होते. तिने सुमनताईना सोबत यायचा आग्रह केला पण सांधेदुखीमुळे त्या तिच्यासोबत जाऊ शकल्या नाहीत. प्रियाने मनिषाला त्यांच्यासाठी थालीपिठे बनवायला सांगितली तसेच डिंक तळून आणि सुकामेवा बारीक करून ठेवायला सांगितले कारण लग्नावरून आल्यावर ती मेथीचे लाडू बनवणार होती.

"प्रिया...आज लाडवाचा घाट नको घालू. दमून येशील. आल्यावर आराम कर. "

"आई थंडी असेपर्यंतच लाडू खाण्यात मजा आहे. मुंबईच्या थंडीचा काही भरोसा नाही...आज गार वाटतेय... न जाणो उद्या अचानक उकडायला लागेल...टाळत बसले तर उन्हाळा सुरू होईल."

"हो वहिनी तुम्ही हे अगदी खरे बोललात. नाहीतरी मुंबईत हिवाळा असतो कुठे ...उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच तर ऋतू असतात...या वर्षी थंडी पडली तर लाडू बनवायलाच पाहिजेत. "

"तुला बरे जाते गं बोलायला... संध्याकाळी सात वाजले की निघून जाशील...मग माझ्या सुनेवर सगळे काम पडेल. "

"मग सुधाकरकडून करून घ्या ."
मॉपने लादी पुसणाऱ्या सुधाकरकडे पाहत मनिषा म्हणाली तसे सुधाकर चिडला.

"हो..आता ते पण मलाच सांगा....तू काय जेवणाला फोडणी घालून निघून जातेस..मला .."

"अरे असे भांडू नका...तुम्हा दोघांचीही कामे तितकीच महत्त्वाची आहेत. "
प्रियाने मध्यस्ती करत मनिषाकडे पाहत नकारार्थी मान हलविली.
तशी ती खुदकन हसली.

"वहिनी...या सुधाकरला चिडवायला खूप मजा येते. "
ती कुजबुजली
पण सुधाकरने ते ऐकले व तो तिच्याकडे पुन्हा रागाने पाहू लागला.

"शु..."

"वहिनी तुम्ही आल्यापासून ही लई आराम करते...उद्यापासून तुम्ही किचनमध्ये जायचे नाही मग बघूया कशी हसते ती. "

प्रियाने त्याला तोंडावर बोट दाखवत गप्प केले व विषय बदलला.

"मनिषा मी काल डायनिंग टेबलावर पत्रिका ठेवली होती ती पाहिलीस का?"

"मघाशी डस्टिंग करताना ती पत्रिका मी तुमच्या रुममध्ये पाहिली. बहुतेक साहेबांनी तिथे ठेवली असावी. "
सुधाकर म्हणाला.

"शक्यच नाही...फालतू गोष्टी बघायला त्यांना वेळ कुठे असतो. " ती पुटपुटली.

***




झाले एकदाचे ...
लॅपटॉप बंद करीत शेखर म्हणाला व त्याने घड्याळात पाहिले.

"दहा वाजले आहेत. पत्रिकेत पाहिले तर साडे अकराचा मुहूर्त होता..म्हणजे अजून वेळ आहे. " त्याने त्याच्या सेक्रेटरीला बोलावले.

"येस सर. "

"वन पेप्सी. "

ती बाहेर जाऊन पेप्सीचे कॅन घेऊन परत आली. ती ते उघडणारच होती इतक्यात त्याने तिला थांबवले व तिला जायला सांगितलं.

पेप्सीचे कॅन उघडत असतानाच त्याला मिहिकाचा कॉल आलात.

"हाय बेबी उद्याचे लक्षात आहे ना...आय ॲम टू एक्साईटेड टू मीट यू . उद्या येशील ना. "

त्याने फोन कानाला लावला आणि तो कॅन खोलू लागला. पण ते घट्ट असल्यामुळे ते सहज उघडत नव्हते.

"तिला आणायला विसरू नकोस. "

त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. विचारांत हरवत त्याने कॅनचे झाकण जोरात ओढले तसे त्याच्या बोटाना .चीर गेला

"ओह् गॉश..."


"काय झाले हनी..."

"काही नाही. "
त्याने फोन ठेवला... व तिनेही पुन्हा कॉल केला नाही.

बरेच रक्त आले त्याने आपला रुमाल त्यावर दाबून धरला.


******



शेखरने गाडी पार्क केली आणि तो हॉलच्या मुख्य गेटपाशी आला. बाहेर सेल्फी पॉईंटवर बरेच जण सेल्फी आणि एकमेकांचे फोटो काढत होते.

समोर एक ओळखीचा चेहरा त्याला दिसला.

"हा समिर आहे का...आणि तो कोणाबरोबर बोलत आहे. जिच्याबरोबर बोलत आहे ती त्याला साईडने दिसत होती. जांभळी पैठणी..केसांचा नाजूक मेसी बन..त्यातले काही केसांच्या वलयाकृती जुड्या गालांवर सोडलेल्या होत्या. हातात हिरव्याकंच बांगड्या....खूप सुंदर आहे ही...ती त्याच्याबरोबर हसत बोलत होती. बोलता बोलता ती वळली आणि त्याच्या समोर तिचा चेहरा आला...प्रिया होती ती...इतकी सुंदर...लग्नाच्या पूजेला दिसत होती तशीच दिसत होती.. पाहत राहावे अशी. कपाळावरची चंद्रकोर तर अहाहा...त्या चंद्रावरून नजरच हटत नव्हती...मध्येच कोणीतरी ओळखीचे भेटले आणि समीरचा निरोप घेऊन ती इतर ओळखीच्या स्त्रियांबरोबर बोलू लागली.


समीरचे लांब उभ्या असलेल्या शेखरकडे लक्ष गेले.

"शेखर, वॉट अ प्लिझंट सरप्राईज! तू इथे कुठे?"
चेहऱ्यावर एक मोठी स्माईल घेऊन समीर शेखरजवळ आला.

"ज्यासाठी तू आला आहेस त्यासाठीच....(लग्नाच्या हॉलकडे इशारा करीत) लग्नाला."

कोणाशीतरी बोलत बोलत हॉलमध्ये जाणाऱ्या प्रियाकडे पाहत तो म्हणाला,

"काय रे इतका वेळ कोणाशी बोलत होतास?"

", ती...माझ्या कॉलेजमध्ये होती .... बारावी नंतर तू अहमदाबादला गेलास त्यानंतर मी कॉलेज बदलले..तिथे माझी ज्युनिअर होती. आता तिचं लग्न झालंय. आज जिचे लग्न होणार आहे ना ती ही माझ्याच कॉलेजमधली.

बघ ना ! सर्व सुंदर सुंदर मुलींची लग्न झाली आणि आम्ही फक्त पाहत बसलो.
ओह्...सॉरी आता तुला आमच्यात घेऊ शकत नाही ना..तुझेही तर लग्न झाले...यू आर नो लाँगर बॅचलर."

"तू कधी तिला तसे विचारले नाहीस?"
समीरच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या नंतर त्याला उलगडले की शेखर प्रियाबद्दल बोलत आहे.

"अच्छा ती...तेव्हा आवडायची. पण नात्याने बहिण लागते. माझ्या दूरच्या मावशीच्या नंदेची मुलगी. ती तर चक्क मला दादा बोलते. सुरुवातीला कसेसच वाटायचे. मग नंतर सवय झाली. तिच्यामुळे मुलांमध्ये मला भारी डिमांड होते. तिच्याशी संपर्क साधायचा असला की जो तो मला मस्का मारायचा . पण तिनं मान वर करून कधी कुणाकडे पाहिले नाही. माझी दूरची मावशी म्हणजे तिची मामी तिचा खूप छळ करायची...आईकडून एकदोन वेळा ऐकले होते ...जाम वाईट वाटायचे...पण ही सदा हसतमुख...खूप लाघवी स्वभाव आहे तिचा. "

"ओह्... इंटरेस्टिंग..."

"शेखर तुझे लग्न ऑक्टोबर मध्ये झाले ना?"

"हो."

"तिचं लग्नही दोन महिन्यांपूर्वीच झाले...म्हणजे तसे अचानकच झाले ....आय थिंक तुझ्या लग्नाच्या दिवशीच तिचे लग्न झाले. आईकडून समजले. तिचा नवरा खरोखरच लकी असणार ....तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते..."

"आणि हे तुला कसे माहित."

"अरे तिचे लग्न तिच्या मामीने जुळविले."

"नाही मावशीने."

"हो . बरोबर मावशीने.
मावशीने जमवले...मावशीच्या मैत्रिणीचा मुलगा ...तिच्या ऑफिसमध्ये आमचा एक कॉमन फ्रेंड आहे त्याने सांगितले..त्यानेच तिला त्या ऑफिसमध्ये जॉब दिला होता...लग्न जमल्यापासून खूप खुश असायची."

"अच्छा."

"बरे तू सांग मिहिका कशी आहे? सॉरी यार लग्नाच्या दिवशी मी बंगलोरला होतो म्हणून यायला जमले नाही. तुझ्या बायकोला ...मिहिकाला विचारले म्हणून सांग."

"नक्की कुणाला सांगू..बायकोला का मिहिकाला..."

"काय यार तू पण न कुठेही मस्करी करतोस...तुझी बायको म्हणजेच मिहिकाच न..."

"माझे मिहिकाशी लग्न झाले नाही..."

"व्हॉट...पण यू वेर कमीटेड. मग लग्न का नाही केले?"

"ते फुरसतीत सांगेन..."

"मग तुझ्या बायको..आय मीन वहिनींशी भेट तरी करून दे.न"

"माझ्यापेक्षा तुच तिला चांगला ओळखतोस. "

"यार शेखर सकाळी सकाळी ड्रिंक केलेस का काहीही काय..."

"आय ॲम सीरियस."

"मी कसा काय ओळखेन तुझ्या लग्नाच्या दिवशी तर मी नव्हतो ना..."
समीर विचार करू लागला. त्याला काहीसे आठवले तसे तो चटकन म्हणाला,

"वेट...वेट...तू मघाशी मला करेक्ट केलेस ...मी प्रियाच्या मामीने लग्न जमवले असे म्हटले तर तू म्हणाला मावशीने...याचा अर्थ... इफ आय ॲम नॉट राँग.. प्रिया... शी इज.."

मंद स्मित करीत शेखरने होकारार्थी मान हलविली.


क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.