Login

प्रिया आज माझी भाग ३८

Lovestory
प्रिया आज माझी भाग ३८

डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

तो ऑफिसमधून लवकल आल्यामुळे त्याची सर्व कामे खोळंबली होती त्यामुळे घरी आल्यावरही तर लॅपटॉपवर काम करीत होते. तरी सुद्धा त्यातही वेळ काढून प्रियाबरोबर फोटो काढण्यासाठी तो बाहेर हॉलमध्ये आला.
सोसायटीच्या बायका आणि फोटोग्राफर सांगतील तसे ते दोघे फोटोसाठी उभे राहत होते.

"शेखर भावोजी...आता वहिनींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थोडे जवळ घ्या....नाहीतर कुणाला वाटेल कुणा दुसऱ्याचीच बायको उभी केली आहे. तसे लांब उभे राहू नका. "
आलेल्या बायकांपैकी एक म्हणाली.

"आता तुम्ही सांगत आहात तर हे बघा घेतले जवळ...आता ठीक आहे?"

त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढले . तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले...तो मात्र अगदी बिनधास्त वागत होता...जणू काही झालेच नाही.

असे कसे हे...मघाशी संकोचून निघून गेले आणि आता त्या गोष्टीचा पश्चाताप वाटणे तर दूरच उलट अधिकच मोकळेपणाने वागत आहेत. नक्की काय आहे यांच्या मनात ?

"वहिनी... दादांना नंतर आरामात पहा आता इथे कॅमेरात पहा. "

फोटो ग्राफरने तिची टेर खेचली.
ती सावरली आणि समोर कॅमेरात पाहू लागली.

"एक मिनिट... वहिनी हे घ्या माझा मोबाईल. एक फोटो याच्यातही घ्या."

त्याने आपला मोबाईल पुढे केला.
*****


संक्रांतीचा कार्यक्रम आटोपला. जेवणे आटोपली.
कामामुळे शेखर जेवून लगेच रुममध्ये गेला.

प्रियाने हॉलच्या गॅलरीत सुकायला टाकलेले तिचे कपडे आणले व तिने ते कॉमन वॉश रुममध्ये जाऊन चेंज केले. रुममध्ये जायचे तिचे धाडस होत नव्हते.

तीने सरळ सुमनताईंच्या रुममध्ये जायचे ठरविले.

ती मोठ्या विश्वासाने त्याला म्हणाली होती...की माझा तुमच्यावर विश्वास आहे. पण मघाशी झालेल्या त्या प्रसंगाने तिचे डोळे खाडकन उघडले होते...जर ते सर्व झाले असते तर.....तसे झाले असते तर फार चुकीचे झाले असते... ओह्...जे होते ते चांगल्यासाठीच होते त्यांनाही त्याच वेळेस भान आले आणि ते तिथून निघून गेले...पण या पुढे असे होता कामा नये.,पण मग आता यापुढे त्यांच्यासोबत त्या खोलीत रात्र कशी काढायची...विचार करूनच तिच्या छातीत धडधडू लागले.

ते जवळ आले आणि माझा माझ्या मनावर ताबा राहिला नाही तर...

छे छे...नकोच तसे.

तिला त्यावर एक उपाय सुचला.


"आई, "

"ये प्रिया"
सुमनताई आपली जपमाळ घेऊन बसल्या होत्या.

"आई...मी आज इथे झोपू का?"

"का गं...शेखरं काही बोलला का?"

"नाही... ते लॅपटॉपवर काम करीत आहेत.. आज त्यांना बरेच काम आहे असे दिसतेय...रात्री उशिरापर्यंत जागतील...माझी झोप पूर्ण होणार नाही... तसेपण उद्या मावशीला घेऊन दवाखान्यात जायचे आहे. डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या आहेत. त्यासाठी सकाळीच जावे लागेल
म्हणून म्हटले इथे जरा झोप तरी लागेल. "

"बरं बरं. तू झोप इथे? बरं पण त्याला सांगितलेस का?"

"नाही ते कामात आहेत ना. "

"हो ते ही खरेच..कामात असला तर त्याला कोणीही डिस्टर्ब केलेले आवडत नाही. ऑफिसमध्ये तर कुणाचे फोनही उचलत नाही. "

"आई अजून एक विचारायचे होते."

"अगं अशी काय करतेस...आई म्हणतेस ना मला.. मग बोलताना बिचकतेस कशाला...बिनधास्त बोल. "

"मी उद्या मावशीकडे जातच आहे तर तिथे काही दिवस राहेन असे म्हणते. "

"रहा ना मग.. तसेही तुझ्या लग्नानंतर बरेच सोपस्कार करायचे राहिलेत..खरे तर तुझे माघारपण करायला तुझ्या मामानी यायला हवे होते...पण त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार म्हणा त्यांचे तुझ्या मामी पुढे काही चालत नाही...पण म्हणून तू माहेरी जाण्यापासून स्वतःला रोखू नकोस...बिनधास्त जा... सुधाला तरी कोण आहे तुझ्याशिवाय. "

प्रियाला हायसे वाटले. आता पुढचे काही दिवस तरी शेखरना टाळता येईल. तसे मावशीला दवाखान्यात घेऊन जायचे आधीचे ठरले होते..पण ते उद्या नाही तर पुढल्या आठवड्यात जायचे होते....पण शेखरला टाळण्यासाठी हे कारण पुरेसे होते.
****

कामात वेळ कसा गेला ते शेखरला समजलेच नाही . रात्रीचा दीड वाजला होता. पण प्रिया अजूनही रुममध्ये आली नव्हती याचे त्याला आश्चर्य वाटले. तो बाहेर हॉलमध्ये गेला.
तिथे सुधाकर अंथरूण टाकून झोपला होता.

याचा अर्थ प्रिया आईच्या खोलीत गेली. त्याने अंदाज लावला.

""""

आज ती बाजूला नव्हती...बेडवर ज्या बाजूला ती झोपायची त्या जागेकडे पाहत पाहत त्याला झोप आली.

सकाळी डोळे उघडले...आठ वाजले होते...अजूनपर्यंत तिची चाहूल घेऊन उठायची सवय त्याला लागली होती...पण ती कुठे दिसली नाही...तो बाल्कनीत गेला..आज रोजच्यासारखा रेडिओ वाजत नव्हता...वॉश रूमचा दरवाजा देखील उघडाच होता.

तो बाहेर आला. सुमनताई बाहेर हॉलच्या गॅलरीत झाडाना खत टाकीत होत्या. सुधाकर त्यांना मदत करीत होता.

"गुडमॉर्निंग आई. "

"गुडमॉर्निंग.
सुधाकर ते आपण बनवलेले सेंद्रिय खत कुठे ठेवलेस..ते ही या गुलाबांच्या कुंड्यात टाकायला हवे...आणि त्या स्प्रे बॉटल मध्ये थोडे वॉशिंग पावडरचे पाणी भरून आण... कढीपत्त्याच्या झाडाला किड लागली आहे. "

"हो आणतो. "

सुधाकर आत निघून गेला.

"आई...प्रिया कुठे आहे?"

त्या हसल्या.

"मला वाटलेलेच तू सकाळी उठल्या उठल्या मला हाच प्रश्न विचारशील."

त्या पुन्हा कडीपत्याच्या पानांना निरखू लागल्या...जणू त्याने काही विचारलेच नव्हते त्यांना.

त्याच्या कपाळावर आठ्या आल्या.

"आई...झाले तुझे...मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेस ना..."

"नाही अरे...हा कडीपत्ता बघ ना किती बहार आला होता त्याला...अचानक कशी किड लागली ते माहित नाही. "

"आई...प्रिया कुठे आहे?" आता मात्र तो खरोखरच चिडला.

"ती आपल्या माहेरी गेली.
सुधाकर.. कितीवेळ आण लवकर."

"माहेरी...असे अचानक का...मला सांगितले पण नाही. "

"तू बिझी होतास ना...म्हणून नसेल सांगितले. मी सुद्धा तिला म्हटले की कामत असताना तुला distrub केलेले तुला आवडत नहीं "

"आई असे का सांगितलेस...म्हणून असे मला न सांगता निघून जायचे का तिने?"

"अरे..असा चिडतोस कशाला....येईल ती काही दिवसात.."

"म्हणजे ...नक्की किती दिवसासाठी गेली आहे ती?"

"ते तिलाच ठाऊक...तसेही लग्न झाल्यास ती माहेरी गेली नव्हती.. साडेचार महिने झाले...बाकीच्या मुली एव्हाना शंभर वेळा माहेरी जाऊन आल्या असत्या. "

बेचैन होऊन त्याने आपल्या केसांवरून हात फिरविला.
सुधाकर स्प्रे घेऊन आला . त्या कसेबसे आपले हसू रोखून धरत पुन्हा गार्डनिंग करू लागल्या.

शेखर आपल्या बेडरूममध्ये गेला आणि तसाच तडक परत आला.

"आई...मला तिचा नंबर दे. "

"तुझ्याकडे तिचा नंबर नाही."
त्यांनी उलट प्रश्न विचारला.

"असता तर तुझ्याकडे मागितला असता का?"

"बरे बरे...तो माझा मोबाईल ठेवलाय बघ डायनिंग टेबलवर...त्यात आहे .
सुधाकर अरे स्प्रे असा पानावर नको मारू..ही किड पानामागे लागली आहे..पाने उलटी करून मार. "

सुधाताईनी चोरट्या नजरेने त्याला पाहिले.

प्रेमाचा रंग हळू हळू चढायला लागला आहे तर.


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

कसा वाटला भाग?
0

🎭 Series Post

View all