Login

प्रिया आज माझी भाग ३९

Lovestory
प्रिया आज माझी भाग ३९

डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


"अगं बाई प्रिया तू इतक्या सकाळीच? "

मामींनी दार उघडताच खोटे हसू आणून प्रश्न केला आणि तिच्यामागे कोण आहे याचा अंदाज घेऊ लागल्या. तिच्याबरोबर शेखर आला असेल असे त्यांना वाटले. प्रिया आपली लहान बॅग घेऊन आत आली.

"हे काय? तु एकटीच आलीस ?म्हणजे राहायला आलीस की काय? "

"वहिनी, तिला नीटसे आत तरी येऊ दे. लग्नानंतर ती पहिल्यांदाच इथे आली आहे. तिची विचारपूस करण्याऐवजी तिला प्रश्न विचारत बसलेस. "
सुधामावशी म्हणाली.

"अहो ताई मी त्येच तर करतेय. " मामी ठसक्यात म्हणाल्या.

"प्रिया तू बस. मी पाणी आणते. ".
सुधामावशींनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले व त्या किचनमध्ये गेल्या.

"वा प्रिया...आज खूप दिवसांनी तुला पाहून आनंद झाला. कशी आहेस बेटा?"
मामा हॉलमध्येच बसले होते प्रियाला पाहून ते खुश झाले.

"मी बरी आहे मामा. तुम्ही बरे आहात ना. "

"आमचे काय चालले आहे... बरे जावई मागून येत आहेत का ?"

"नाही मामा. त्यांना वर्कलोड आहे. खूप बिझी आहेत ते. मावशीला ...म्हणजे तुम्हा सगळ्यांना भेटावेसे वाटले म्हणून आले शिवाय मावशीला दवाखान्यात घेऊन जायचे होतेच आणि माझे काही डॉक्युमेंट्स सुद्धा घ्यायचे होते ते जरा अर्जंट हवे होते. म्हणून म्हटले आजच इथे आले तर सर्व कामे होतील."

"ते काय अर्ध्या दिवसात सुद्धा होईल. मग काय तू जायला मोकळी..."
मामी पटकन म्हणाल्या.

"वहिनी ती इथे राहणार आहे असे ती म्हणाली ना..."
सुधामावशी चिडली. तिने प्रियाला पाणी दिले.
.
"घ्या आता... ताई , तिचे लग्न झाले आहे..तिचा नवरा आहे तिथे.. म्हणून म्हटले...बाकी ज्यांचे लग्न झाले नाही त्यांना या गोष्टी कशा कळणार म्हणा. "

"मामी... प्लीज...कशाला असे म्हणता...मी इथे दोन चार दिवस राहायला आले आहे. कायमची नाही...तितके दिवस तर मी इथे राहू शकते ना....तितका तर हक्क आहे ना मला."

"प्रिया, हे तुझेच तर घर...
(मामांचे लक्ष मामींकडे गेले...त्यांचे वटारलेले डोळे पाहून त्यांनी आपले बोलणे फिरवले)
म्हणजे तू इथे जेवढे पाहिजे तेवढे राहा आम्ही सगळे तुझे आपलेच आहोत ना. "

"अहो, तेवढे चहा आणता का..."
त्यांनी मामीना सांगितले.

"मला नको आहे चहा. " प्रिया म्हणाली.

"प्रिया तू आत चल.."

सुधामावशी तिला घेऊन आत गेली.

तिने तिला बेडवर बसवले.

"आता सांग....तिथे सगळे कसे आहेत..म्हणजे शेखर..."

बोलताना सुधामावशी आपल्या डाव्या हाताला दाबत होती.

"ते सगळे ठीक आहेत पण मावशी..तुझ्या हाताला काय झाले गं?"

"काही नाही..बहुतेक काल डाव्या कुशीवर झोपले म्हणून
कालपासून थोडे दुखत आहे. माझे हातपायांचे दुखणे चालूच असते पण तू सांग..तुझे आणि शेखरचे कसे आहे...म्हणजे तसे सुमा मला सांगत असते अधूनमधून.. पण तुझ्या तोंडून ऐकायचे आहे. "
सुधामावशीचे डोळे आनंदाने चमकत होते.

प्रियाला नेमके काय बोलावे ते सुचत नव्हते. इतक्यात तिचा फोन वाजला.

एक अनोळखी नंबर होता.

"हॅलो."

"...."

समोरून कसलाच आवाज येत नव्हता फक्त श्वासांचा आवाज ऐकू येत होता.

"हॅलो...शेखर."

"माझ्या नुसत्या श्वासांवरून मला ओळखतेस...मग मला असे न सांगता निघून आलीस ते मला आवडणार नाही हे ही माहित असेल ना तुला ..."

"म.. मी... आईंना सांगितले होते. तुम्ही बिझी होता ना."
ती हडबडली.

"तुझ्याशी बोलायला वेळ नसावा इतका मी बिझी नव्हतो....आणि कधीच नसणार. आता सांग कधी येणार आहेस?"

"चार पाच दिवसांनी येईन. "

"इतके दिवस...तुझ्याशिवाय माझे कसे होईल... आय मीन... इतके दिवस तीच तर सर्व गोष्टी तयार ठेवतेस ना. "

खरेतर तिला बोलायचे होते..या पुढे तुम्हाला त्याची सवय करून घ्यावी लागेल कारण तिच्या लग्नाला सहा महिने होणार होते...आणि तिने त्याच्याकडे मागितलेली मुदत संपणार होती. पण तिला मावशीसमोर यातले काही बोलायचे नव्हते.

"मी आईना फोन करून सांगेन...आता मी फोन ठेवते मावशी...मावशीला दवाखान्यात घेऊन जायचे आहे ना. "

तिने पटकन फोन ठेवला.

"अगं असा कसा फोन ठेवला..त्याच्याशी बोलायचे ना. "

सुधामावशी हसत म्हणाली.

प्रियाचा फोन पुन्हा वाजला.

"हॅलो."

"माझे रुमाल कुठे ठेवलेस?"

"डाव्या वॉर्डरोबमध्ये उजव्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये. "

"ठीक आहे. "

ती पुन्हा सुधामावशीशी बोलणार होती इतक्यात तिचा फोन पुन्हा वाजला.

"माझे सॉक्स कुठे आहेत?"

"डाव्या वॉर्डरोबमध्ये तळाला. "

"आणि जिमचे नॅपकिन.."

"पण ते तर तुम्हाला संध्याकाळी लागतील ना."

"बरे ठीक आहे मग संध्याकाळी फोन करतो. "

त्याने फोन ठेवला.

सुधामावशीला त्यांच्यातली ही जुगलबंदी पाहून हसू येत होते.

"तुझ्या नवरोबाला अजिबात करमत नाही असे दिसतेय न"

"असे काही नाही मावशी..आधी सुमामावशी...म्हणजे आई करायच्या ...आता मी ठेवते... त्यांनी एकदम लाडोबा करून ठेवले आहे सर्व हातात पाहिजे. "


"चांगले आहे..
त्यानिमित्ताने बायकोची आठवण तरी येते ना. तुझे त्याच्यावर आधीपासूनच प्रेम होते, पण त्याचेही आता तुझ्यावर मन जडत चाललेय.
बहुत खुशनसिब होते है वो जिनके प्यार को प्यार मिलता है कुठल्यातरी हिंदी पिक्चर मध्ये हा डायलॉग ऐकला होता आणि खरंच तो एकदम खरा आहे. प्रत्येकाच्याच प्रेमाने मारलेल्या हाकेला प्रतिसाद मिळत नाही आणि ज्यांना प्रतिसाद मिळत नाही ते मग त्याची आठवण काढत आयुष्यभर तसेच झुरत राहतात माझ्यासारखे. "
प्रियाला सुधामावशीच्या आवाजातली वेदना जाणवली.

"मावशी."

"हो. अजूनपर्यंत मी कोणालाच सांगितले नाही.
मी कोणावरतरी खूप खूप प्रेम केले. पण ज्याच्यावर प्रेम केले त्याला कधी सांगितलेच नाही. असो...आता ती गोष्ट बोलण्यात काही अर्थ नाही."

"मावशी पण मला सांग ना . मला ऐकायचे आहे. "

मावशीच्या दडवून ठेवलेल्या आठवणींची सुगंधी कुपी प्रियाने उघडायला सांगितली.

"पुण्याला आम्ही एकाच कॉलनीत राहायचो. बैठी घरे होती आमची.... त्याचे आई-वडील माझ्या आई-वडिलांना चांगले ओळखायचे. तसे मी सुद्धा त्याला बऱ्याच वेळा पाहिले होते. तसे मी त्याला लहानपणापासूनच पाहिले होते. पण लहानपणी आपण निरागस असतो ना गं... बालपणातून तारुण्यात प्रवेश करतो ना तेव्हा या प्रेमबीम या गोष्टी मनात येतात...

त्याचे घर आमच्या घरापासून दहा मिनिटांवर होते.. तुला आठवते नानीआजीचे पुण्याचे घर ...."

प्रियाने होकारार्थी मान हलविली... नानीआजी म्हणजे तिच्या आईची आणि मावशीची आई तिथल्या तिच्या बऱ्याच आठवणी होत्या पण आता याक्षणाला त्या उजळून तिला मावशीच्या बोलण्यात व्यत्यय आणायचे नव्हते. कधीच न पाहिलेली तरुणपणाची मावशी तिला पहायची होती. तिची आई सावळी होती... त्याविरुद्धच सुधामावशी....दुधासारखी पांढरी शुभ्र...काळेभोर डोळे...नाजूक जिवणी...आजही मावशी तिच्या वयापेक्षा फारच लहान दिसते...मग त्याकाळी तर कहर दिसत असेल ...मावशी बोलत होती आणि प्रियाच्या डोळ्यासमोर तिची तरुणपणाची अल्लड मावशी समोर उभी राहिली.

"नानीआजीच्या घराच्या थोडे पुढे होते त्याचे घर. रोज आमच्या दारातून जाताना पाहायची मी त्याला. पण कधी विशेष काही वाटले नाही. त्यावेळेस साधारण सोळा वर्षांची होते मी. आमच्या घराच्या बाजूला कुमुद आजी रहायच्या. त्यांचे मिस्टर मिलेक्ट्रीमध्ये होते. ते देशासाठी शहीद झाले होते. तेंव्हापासून त्या एकट्याच रहायच्या. त्यांना मुलबाळ नव्हते...स्वतःची कामे स्वतःच करायच्या...त्यांना कधी बरे नसले की नानी आजी त्यांच्यासाठी जेवण घेऊन मला पाठवायची. रोज संध्याकाळी दिवेलागणी झाली की मी त्यांच्याकडे श्लोक पठण करायला जायची...तुझी आई
(प्रियाची आई ) तेंव्हा दहा वर्षांची होती. ती आणि तिच्या वयाची आजुबाजूची मुलेही त्यांच्याकडे जमायची. त्या सर्वांत मीच मोठी. श्लोक बोलून झाले की आजी सर्व मुलांना सुकामेवा आणि बताशे द्यायची...कधी कधी त्याबरोबर पाच दहा रुपये असायचे. मुलांची चंगळच व्हायची.... मग आजी आम्हा सगळ्यांना आपल्या आठवणीतल्या गोष्टी सांगायची कधी भुताची...कधी वाघाची कधी स्वातंत्रसैनिकांची तर कधी एकोणीसशे एकाहत्तरला झालेल्या लढाईची...त्यातच आजोबा शहीद झाले होते...कधींकधी तिचे डोळे भरून यायचे मग आम्ही सर्व मुले तिला बिलगायचो.

ही आजी आम्हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याची होती.
तिच्याबद्दल कुणी आत्मियता दाखवली तर त्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होणारच ना.

तर ही आजी सकाळीच परडीत फुले गोळा करून घरी परतत होती. आमच्या घराजवळ आली असताना ती तिचा पाय घसरला आणि ती पडली. परडीतली सर्व फुले विखुरली गेली...मी अंगणात सडा घालीत होती.. आजीला उठविण्यासाठी मी जाणारच होती इतक्यात तो आला..... तिला आधार देत तो तिला तिच्या घरी घेऊन गेला...पण पडल्याचे दुःख नव्हते तिला...फुले मातीत मिळाल्याचे भारी दुःख वाटत होते. घरी जाईपर्यंत तिच्या तोंडांत तेच होते..
सकाळी उठून इतक्या लांबून फुले आणली पण सर्व मातीत मिसळली.. आता मी देवपूजा कशी करू... श्रीरामा...कशाला हे म्हातारपण दिलेस...तुझ्या पूजेचे सुखही धड देत नाहीस. "

"आजी मी तर तुम्हाला मदत केली ना.."
तो गमतीने म्हणाला. आजी हे सर्व देवाला म्हणत आहे हे त्याला ठाऊक होते.

"अरे तुला नाही मी बोलत ...त्या वरच्या रामाला बोलतेय. तुझेही नाम श्रीराम आहे का?"

आजीला आश्चर्य वाटले.

"हो... श्रीराम आहे माझे नाव"

"तू ते मिलेक्ट्रीमध्ये होते त्या देशपांडेंचा नातू ना..."

"हो आजी. "

"गुणी आहेस हा तू...(त्याच्या पाठीवरची बॅग पाहून? )
कुठे बाहेर जात आहेस का?...आपले काम सोडून माझ्या मदतीस धावलास."

"हो... फर्ग्युसन कॉलेजला विज्ञान शाखेत आहे मी. सकाळी आठ वाजताचे कॉलेज असते. "

"हो का. बरे आता चहा पिऊन जा."

"नको आजी संध्याकाळी येईन तेंव्हा घेईन."
मी आजीच्या दाराआडून सर्व संभाषण ऐकले.
त्यानंतर तो आजीकडे येऊ जाऊ लागला. तो आला नाही की आजी मला विचारायची,

"अगं सुधे, तो देशपांडेंचा नातू तुला दिसला का गं? बरेच दिवस इकडे फिरला नाही.

मी नाही म्हणायचे. पण जाता येता त्याला रोज पहायचे. त्याची माझ्या घरासमोरून जायची वेळ मला माहित होती...मी मग काही न काही बहाणा करून त्याचवेळी बाहेर यायचे...कधी सडा रांगोळी घालायला तर कधी कुंपणाबाहेरचा केर काढायला.

कधी कधी तो बाजारात दिसायचा....त्याचे माझ्याकडे लक्ष नसायचे... त्याच्या खिजगणतीत सुद्धा नसेन मी....माझे मन पाखरू मात्र त्याच्या दिशेने उडत उडत त्याच्या अवतीभोवती घुटमळायचे.

त्याची आणि आजीची ओळख वाढत चालली. जमेल तेव्हा तो ही श्लोक पठणाला हजेरी लावू लागला. बहुतेक आजीच्या खिरापतीची त्यालाही चटक लागली होती. तो मला नावानिशी ओळखू लागला. वैयक्तिक बातचीत होईल असा प्रसंग काही आला नाही. पण त्याला जवळजवळ रोजच बघायला मिळायचे. माझ्यासाठी तितकेच खूप होते.


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

कसा वाटला भाग?