Login

प्रिया आज माझी भाग ४०

Lovestory
प्रिया आज माझी भाग ४०


डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

मागील भागात


सुधामावशी आपली जीवन कथा सांगत आहे.


पुढे वाचा

हळूहळू मला उगाचच वाटू लागले की तो मला पाहत आहे...कदाचित माझी नजरचुक असू शकते. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीची इतकी इच्छा धरतो की आपला मेंदू आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीच दाखवतो...तो माझ्याकडे पाहत असावा असे वाटायचे आणि पुढच्याच क्षणी तो तिथे असलेल्या लहान मुलांबरोबर गप्पा मारताना दिसायचा. काय खरे आणि काय खोटे समजायचेच नाही.

एकदा त्याच्या बहिणीचे लग्न होते...तसे नानीआजीला आमंत्रण होते, पण आमच्या कुटुंबाकडून नाना आजोबा जाणार असे ठरले. पत्रिकेत अहेर स्वीकारणार नाही असे लिहिले होते...त्यामुळे अहेराशिवाय सर्व कुटुंबाला घेऊन जाणे त्यांना योग्य वाटत नव्हते. मी हिरमुसले. मलाही जायचे होते. मी तुझ्या आईला अनुला हळूच पिन मारली...लग्नात आमरस पुरीचा बेत असेल. अनु खुशीत नानाआजोबांकडे गेली. माझा प्लान सफल झाला पण अर्धवटच... अनुला सोबत नेण्यासाठी ते तयार झाले...मला नाही.

हे सांगताना मावशीला हसू येत होते.

"मग काय झाले मावशी? तू नाही गेलीस?"

प्रियाची उत्सुकता दुणावली पण मावशीबद्दल तिला वाईट वाटत होते...जणू मावशीच्या जागी तीच होती आणि श्रीरामच्या जागी शेखर!

"मी मनात प्रार्थना केली...हे महादेवा काहीही कर आणि मला लग्नाला जाऊ दे."

"मग... महादेवाने ऐकले?"

"हो... मला नेहमी वाटते देव आपल्या पुष्पक विमानात फिरून आपल्या सर्वांकडे आपली कृपादृष्टी टाकतो... सभोवार नजर फिरवताना तो तथास्तु तथास्तु म्हणत राहतो...म्हणून नेहमी चांगले बोलावे...न जाणो...सेकंदाच्या कुठच्या क्षणाला तो आपल्याकडे पाहील आणि तथास्तु म्हणेल....मी मागत होते तेंव्हा देवाची नजर माझ्याकडे होती....आता वाटते त्यावेळी महादेवाकडे श्रीरामला मागितले पाहिजे होते."

"मावशी...पुढे सांग ना.."

सध्यातरी मावशीचे तत्त्वज्ञान तिच्या प्रेमकथेत ,'रुकावट के लिये खेद है' चे काम करीत होती.

"हो हो सांगते. आमरसपूरी खायला मिळणार म्हणून अनु मला वेडावून दाखवत होती...पण माझ्यासाठी जिभेपेक्षा डोळ्यांची तृप्ती महत्त्वाची होती...तो लग्नात कसा दिसत असेल...आधीच राजबिंडा... उंचपुरा धिप्पाड होता...त्यात समारंभात चांगले कपडे घालून अजून खुलून दिसेल..कल्पना करून माझे मन उसासे टाकीत होते.
दुपार सरली. मी अंगणात केर काढीत होते. तेवढ्यात कुमुद आजीने मला बोलावले.

"अनु ...जरा इकडे ये. " अंगणात केरसुणी उभी ठेवून मी गेले. कुमुद आजी नावात गल्लत करायची...कधी मला अनु म्हणायची तर अनूला सुधे.....कधीतरीच बरोबर नावाने हाक मारायची. पण आम्हाला सवय झाली होती. आम्ही तिने बोलवल्यावर जायचो...मग कुठच्या का नावाने बोलावू दे.

"अगं...तो देशपांडेंचा मुलगा आहे ना...तो पत्रिका द्यायला आला होता. मला आग्रहाने यायला सांगितले आहे. पण इतक्या लांब मी कशी जाऊ...कोणी सोबत आले असते तर गेले असते. तू येशील...पण चार दिवसावर तुझी बारावीची परीक्षा आहे ना ..मग राहू दे.."

"माझा अभ्यास झालाय...आपण जाऊया. "
आजी बेत रद्द करायच्या आत मी पटकन म्हणाले.

"मग गेलात लग्नाला..पण नानाजोबांना काय सांगितलेस."प्रियाने विचारले.

"कुमुद आजीबरोबर मी जात आहे म्हटल्यावर त्यांनी आपले जाणे रद्द केले. अंजू हिरमुसली म्हणून तिला आमच्याबरोबर पाठवले. " सुधामावशी म्हणाली.

"मग?"

"मग काय! माझ्या आवडीचा पंजाबी ड्रेस घातला. श्रीदेवी सारखे आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचे डोळ्यांत काजळ घातले. बाकी सजण्याचे काही सामान नव्हतेच. नानीआजीने कधी लिपस्टिक लावली नाही..त्यामुळे ती असायचा प्रश्नच नव्हता. पण त्या दिवशी मी छान दिसत होते असे कुमुद आजी तर म्हणालीच शिवाय शेजारच्या एकदोन बायकाही म्हणाल्या.

लग्नाच्या हॉलमध्ये प्रवेश केला त्याक्षणापासून डोळे त्याचाच शोध घेऊ लागले आणि तो दिसला...मी कल्पना केली होती त्यापेक्षा अधिक सुंदर दिसत होता. कुमुदआजीला पाहून तो चटकन आमच्याजवळ आला. त्याने आजीला वाकून नमस्कार केला. माझ्याशी फक्त हसला. त्याक्षणी हृदयात प्रचंड खळबळ झाली ती मी शब्दात सांगू शकत नाही."
सुधामावशी हसली.

"नंतर तो लग्नात इतरांची विचारपूस करताना दिसला. मी आणि कुमुदआजी एका जागी बसून होतो...तुझ्या आईला मात्र संपूर्ण हॉलमध्ये आईसक्रीमचे काउंटर दिसत होते.
ती येऊन जाऊन आईसक्रीम खात होती...मी मधूनच तिला डोळे मोठे करून आमच्या बाजूला बसण्यास सांगत होते.
ती ऐकायला तयार कुठे होती. मग वैतागून मीच तिला आणायला गेले. तिथे काही बायका आइस्क्रीम खात होत्या.

"ए, हा देशपांडेंचा मुलगा काय करतो? "

"तो बारावीला आहे. खूप हुशार आहे तो. "

"दिसतोही रुबाबदार. ".

"अगं म्हणूनतर त्याच्या मामाने त्याला आधीच जावई म्हणून बुक करून ठेवलेय. सर्व लग्नात सांगत फिरत आहेत की श्रीराम माझा होणारा जावई आहे."

" त्यांची मुलगी अजून दहावीलाच आहे. "

"इतक्या लवकर कोण लग्न ठरवते?"

"देशपांडेंच्या दोन फॅक्टरी आहेत, बागायती शेती आहे.
मुलगा एकुलता एक आहे... पैसेवाला जावई कोणाला नको असणार. "

"तो बघ आता आपल्या होणाऱ्या बायकोबरोबर कसा मजा मस्करी करीत आहे. "

मी पाहिले समोर श्रीराम त्याच्या आत्येबहिणीबरोबर गप्पा मारत होता. माझे अवसान तेंव्हाच गळून गेले..... हातापायांतली शक्तीचं निघून गेली जणू...मी लटपटले .. अनुने मला सावरले. माझी अशी अवस्था का झाली हे तिला काहीच समजले नाही...ती घाबरली मात्र...

त्यानंतर माझ्या सांगण्यावरून कुमुदआजी मी आणि अंजू लगेचच निघालो.

"मग पुढे?"

"पुढे काही नाही. तो श्लोक पठणाला यायचा पण मी जाणे टाळायची. अभ्यासाचा बहाणा असायचाच. पण खिडकीतून येताजाता त्यालाच पाहायचे. नंतर त्याची बारावी झाल्यानं तो शिक्षणासाठी मुंबईला निघून गेल्याचे समजले. त्यानंतर आम्ही तिथे असेपर्यंत तो दिसलाच नाही. मग तुझ्या आईने तुझ्या बाबांशी लग्न केले... नानाआजोबांना ते आवडले नाही. पण त्यांचे लग्न व्हावे यासाठी मी मात्र फार प्रयत्न केले. नाना आजोबा माझ्याशी दोन वर्ष बोलत नव्हते...मग तू आलीस आणि सर्व रुसवे गेले. "

"मग आता पुण्याला नानीआजीच्या घरात कोण राहते?"

"कोणी नाही. तिथे बदनामी झाली म्हणून ते विकून आम्ही सोलापूरला गेलो. मलाही तिथे रहायची इच्छा नव्हतीच . आणि तुझी मामी सोलापूरचीच....तिलाही ते सोयीस्कर वाटले. "

"ते घर आता कोणी घेतले?"

"माहित नाही."

"तिथे तुला जावेसे वाटत नाही का?"

"नाही. पुन्हा त्या आठवणी येतील...मनाला त्रास होईल."

"तू लग्न केले नाहीस...त्याचे हे कारण आहे का?"

"प्रेम एकदाच होते ना गं...ज्याच्यावर आपले प्रेम नाही किंवा ज्याचे आपल्यावर प्रेम नाही अशा व्यक्तीसोबत संसार कसा करायचा?....म्हणून नाही केले.
त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता माझ्या दारापासूनच जायचा ...पण त्याच्या हृदयापर्यंतचा रस्ता मी गाठू शकले नाही."
मावशीने एक दीर्घ श्वास घेतला.


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

कसा वाटला भाग? सुधामावशीची कहाणी वाचून तुम्हाला काय वाटते?

0

🎭 Series Post

View all