Login

प्रिया आज माझी भाग ४४

Lovestory
प्रिया आज माझी भाग ४४


डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


दुसऱ्याच दिवशी सुधा आणि श्रीरामाचे एका गणपतीच्या मंदिरात वैदिक पद्धतीने लग्न झाले.

प्रिया आणि सुधा या दोघींनीही ठरविले की याबाबतीत मामा मामींना काहीही सांगायचे नाही कारण प्रियाला माहीत होते की मामींचे खोचक बोलणे मावशीच्या आनंदावर विरजण
आणेल.

सुमन परांजपेना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्या तर भलत्याच खुश झाल्या. त्या दोघी एकत्र कामाला होत्या. सुधाबद्दल त्यांना इत्यंभूत माहिती होती... श्रीरामचेही तिच्यावर प्रेम असणार असे त्यांनी तिच्याजवळ अनेकदा बोलून दाखवले होते. अखेरीस त्यांचे बोलणे खरे ठरले होते.

शेखर, प्रिया , सुमन, तसेच शांतिनिकेतनचे मॅनेजर दीक्षित यांच्या उपस्थितीत लग्न पार पडले.

मावशीच्या ट्रीटमेंटची काळजी करण्याचा प्रश्नच नव्हता शेवटी ती आता नॅचरोपॅथी डॉक्टर श्रीराम देशपांडे यांची ऑफिशियल बायको होते. प्रिया निर्धास्त झाली होती.

****

मामा मामीकडे राहण्याचा आता प्रश्न नव्हता कारण तिथे मावशी नव्हती.

प्रियाच्या बिल्डिंगजवळ कार थांबली.

"आता लगेच घरी येतेस ना?"
खरेतर तिने घरी यावे असे त्याला निग्रहाने वाटत होते पण ते तिला कसे सांगू...त्याला समजत नव्हते.

"आज नाही उद्या येते...माझे काही सामान तिथे आहे ते घ्यायचे आहे आणि आधी मी जिथे काम करीत होते तिथून एक्सपिरीयन्स लेटरही घ्यायचे आहे. ते ऑफिस इथून जवळ आहे. "
ती कारचा दरवाजा खोलून बाहेर आली.

"ओके...टेक केअर. "

"वर नाही येत? "

"उद्या सकाळीच येतो. तुला घ्यायला." तो उत्साहात म्हणाला.

ती हसली.

इकडे घरी आल्यावर ....

तिने चप्पल उचलून शु रॅक मध्ये ठेवली.

"वन्स आता सहा महिने तिथेच राहणार का?"
सोफ्यावर रेलुन बसलेल्या मामी म्हणाल्या. त्यांच्याशेजारी मामा बसले होते.

"हो..."
प्रिया तुटकच बोलली.

"अच्छा...मग तू ही आता जाशीलच ना."

आश्चर्यमिश्रित दुःखाने तिने मामींकडे पाहिले.

"अहो...तिला जितके राहायचे आहे तितके राहू द्या.,"
आपल्या बायकोचे अती आगाऊ बोलणे यावेळेस मामांनाही रुचले नाही.

"एकदा लग्न झाले की मुलीचे घर तिचे सासर असते. "

"अहो पण..."
दरवेळेप्रमाणे या ही वेळेस मामांचे त्यांच्यापुढे काहीही चालले नाही.

"प्रिया मी स्पष्टच बोलते...आता काही दिवसांनी इथे श्रेया येणार आहे....मला तो रुम ...म्हणजे वन्स आणि तू राहत होतीस तो रूम रेनोवेट करायचा आहे. तसेही इथे वन्स नाहीत..... आणि तू ही आपल्या सासरी जा.."
मामींनी इतक्या लवकर तिचे माहेर तिच्यासाठी परके केले होते...

हे घर माझ्या आईवडिलांचे आहे.
तिचे मन आक्रंदत होते.
तिने भरल्या डोळ्यांनी मामींकडे पाहिले.

"ए बाई...असे डोळे रोखून कशाला पाहतेस? तुला पाताळात जायला नाही सांगत आहे....तुझ्या सासरी जायला सांगत आहे.
हा... ज्या परिस्थितीत तुझे लग्न झाले त्यावरून तरी असेच वाटते की त्यांनाही तू नकोशीस असशील."

"मी घ्यायला आलोय तिला. आई तिची वाट पाहत आहे. "
त्याला पाहून डोळ्यांच्या काठांवर असलेले पाणी गालांवर ओघळले... या आधी इतके अगतिक तिला कधीच वाटले नव्हते. त्याने पाहू नये म्हणून तिने दुसरीकडे पाहत अश्रू पुसले.

"मी तिची मस्करी करत होते...हो ना गं प्रिया...आमच्यात अशी मस्करी चालते. "
कसेनुसे हसत मामी म्हणाल्या.

शेखरने त्यांच्याकडे रागाने पाहिले.
त्याला याच क्षणी त्यांना खूप काही सुनावेसे वाटत होते.

"प्रिया तुझे काय राहिले असेल तर घेऊन ये आपण जाऊ या."

ती आत गेली.

" अहो जावईबापू आत तरी या. "
मामी निर्लज्ज पणे म्हणाल्या.

"प्रिया मी खाली आहे. "

मामींकडे दुर्लक्ष करून तो खाली गेला.

मघाशी तो जायला निघाला खरा पण ती आपला फोन कारमध्येच विसरली होती , तो द्यायसाठी म्हणून तो वर आला होता पण इथे आल्यावर त्याला प्रियाच्या मामींचा खरा चेहरा दिसला.

तिने कपाटातून आपले काही कपडे आणि कागदपत्रे घेतली. पण तिथून निघताना तिला भरून आले. तिच्या आईबाबांच्या आठवणी होत्या त्या घरात....तिने खोलीच्या भिंतीला मिठी मारली आणि ती हमसून रडली. आता इथे येणे परत होणार नाही हे तिला माहीत होते.

आपली बॅग घेऊन ती बाहेर जाणार होती इतक्यात तिला काहीसे आठवले म्हणून ती मागे फिरली आणि तिने कपाटातील ड्रावर मधून एक फोटो काढला.
शेखरचा फोटो होता तो. सुमन मावशींनी तिला दिलेला.,..

"शेखर, माझ्या सर्वात जवळच्या दोन गोष्टी सोडून मी जाणार आहे....हे घर...आणि तुम्ही...
इतके चांगले वागू नका की निघताना माझी पाऊले जड पडतील."
*****


ती बिल्डिंगच्या खाली आली. तिला पाहताच त्याने सिगारेट विझविली आणि तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला.
ती यंत्रवत आत बसली. त्याने कार सुरू केली.

"तू ठीक आहेस ना...."

"हून."
तिने मान डोलावली.

"त्या मामी तुझ्याशी अशाच वागतात का...त्यांना स्वतःलाही एक मुलगी आहे ना..."
त्याच्या आवाजात चिड होती.

"तुला आता इथे परत यायची काही गरज नव्हती. तुझा असा कोणी अपमान केलेला मला आवडणार नाही..."

तिच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहू लागले.
आजपर्यंत मावशी सोडून तिच्या बाजूने बोलणारे कोणीही नव्हते... मामा कधी बाजू घेतील अशी तिने कधीच आशा केली नव्हती. पण आज शेखरमध्ये तिला तो आशेचा किरण दिसला.
आणि तिचा हा गैरसमज नक्कीच नव्हता. शेखरचे तिच्याबाबतीचे वागणे पूर्ण बदलले होते हे तिच्या लक्षात आले होते. तो तिला जपायला लागला होता. ज्याक्षणी तिला वाटायचे की त्याचे तिच्यावर प्रेम बसत चालले आहे त्या क्षणी तिला शेखरने घटस्फोटाचे पेपर दिल्याची रात्र आठवायची आणि तिचा असा विचार करणे किती चुकीचे आहे हे तिच्या लक्षात यायचे.

"हे....तू रडतेस का..."

तिने पटकन अश्रू पुसले .

"ते मावशीची आठवण आली.."

"त्यांना भेटायला आता जायचे का ....तू म्हणत असशील तर पटकन जाऊन येऊ. "

"आता तिच्या लग्नावरुन तर आपण आलो ना..."

"हो..पण तरीही तू रडतेस...तू अशी रडलेली मला नाही आवडत...मला तुला हॅप्पी पहायचे आहे. "

"तुमच्या सोबतीत मी हॅप्पीच असणार आहे. "

पण ठरल्या प्रमाणे सहा महिने पूर्ण झाल्यावर मी हॅप्पी कशी असेन? हे वाक्य ती मनात म्हणाली.

गेल्या काही दिवसात...सहा महिन्याचे बोलणे... डिव्होर्स... जणू तो विसरूनच गेला होता...तिच्या सोबतीत त्याला सर्व गोष्टींचा विसर पडला होता. त्याने तर मनोमन तिला आपली पत्नी मानले होते.

****

प्रियाला घरी सोडून शेखर ऑफिसला गेला.
ऑफिसमध्ये आल्यावर त्याने फोन चेक केला तर मिहिकाचे खूप मेसेजेस आले होते.
अलीकडच्या दिवसात त्याने तिला फोन किंवा मेसेज करणेही थांबवले होते.
तिने जरी फोन केला तरी तो तिचा फोन घ्यायचा नाही. या वेळेसही त्याने तिला फोन केला नसताच पण तिने त्यात लिहिले होते की तू जर मला कॉल केला नाहीस तर मी काही जीवाचे बरेवाईट करून घेईन. त्यामुळे त्याला कॉल करावा लागला.

"मिहिका... तसा मेसेज करण्याचे कारण काय?"

"ओह् बेबी...तू माझा कॉल का नाही उचलत होतास...मला काळजी वाटली...मला माहित आहे माझा हा मेसेज वाचून तू नक्की कॉल करशील."

"लग्नात मला सोडून जाताना ही काळजी कुठे गेली होती?"
तो चिडला.

"ते माझे अर्जंट..."

"मला त्यावर पुन्हा तेच बोलायचे नाही. आता सांग तू फोन का करत होतीस?"

"शेखर...आता लवकरच सहा महिने होतील... तुझ्या त्या सो कॉल्ड बायकोचा तुझ्या घरातून निघून जायचा विचार आहे की नाही? ती गावंढळ काकूबाई..."

"मिहिकाsssss ...ती माझी बायको आहे....तिच्याबद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही आणि या पुढे मला कॉल करू नकोस."

त्याने रागाने फोन ठेवला.
ती मात्र बिथरली होती.
या सर्व गोष्टीचे कारण ती गावंढळ मुलगीच असणार असा समज तिचा झाला आणि ते खरेही होते.
तिचे वडील एक मोठे बिजनेस टायकून होते त्याच्यामुळे प्रियाचा नंबर मिळवणे तिला फार कठीण गेले नाही.

तिने प्रियाला फोन लावला.

"हॅलो."

"हॅलो
..प्रिया करंदीकर का?"

"हो बोलतेय...आपण कोण?"

"मिहिका...तुला शेखरने आमच्या दोघांबद्दल सांगितले असेलच ना."

"हो. "

"तुला त्यासाठीच फोन केला.....लग्नाच्या रात्रीच शेखरने तुला डिव्होर्सचे पेपर दिले होते हे त्यानेच सांगितले आहे मला.....तुझे सहा महिने पुरे होत आले आहेत. लवकरात लवकर शेखरचे घर सोड..आमचे दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यादिवशी आमचे लग्न होणार होते...पण मला कामानिमित्त बाहेर जावे लागले म्हणून आयत्यावेळेस तुला संधी मिळाली. तो तुझ्याशी चांगला वागत असेल म्हणून उगाच कसलाही गैरसमज करून घेऊ नकोस ... तुझ्यासारख्या बिचाऱ्या दिसणाऱ्या लोकांवर त्याला नेहमीच दया येते...म्हणून चुकूनही समजू नकोस की त्याला तू आवडू लागली आहेस....स्वतःचा चेहरा कधी आरशात पाहिला आहेस... तुझ्यापेक्षा माझ्या घरची कामवाली बरी दिसते....
एखाद्याने दुसऱ्यांदा वळून पाहावे इतकेही तु डिसर्व करत नाहीस...मी तुला एकदाच पाहिले आहे...तरीही तू कशी दिसतेस हे माझ्या लक्षातही नाही.

त्याने तुला अजूनपर्यंत हातही लावला नसेल मला खात्री आहे ....कारण त्याचे माझ्यावर प्रेम आहे ...त्याने तुझ्याबरोबर लग्न जरी केले असेल तरी माझे आणि त्याचे नवराबायकोसारखे संबंध कधीपासूनचे आहेत. आम्ही एकाच कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलच्या एकाच रुममध्ये राहत होतो...आमच्यात सर्व झालेय. "

"बस... बस बस..."

तिला असह्य झाले आणि फोन बंद करून तिने बेडवर फेकला आणि ती हमसून हमसून रडू लागली.

*******
क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all