Login

प्रिया आज माझी भाग ४५

Lovestory
प्रिया आज माझी भाग ४५


डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


तिच्यासमोर आता मोठे आव्हान होते .... सुधामावशीची साथ नव्हती.....राहायला घर नव्हतेच तसे.....आणि त्यासाठी लवकरात लवकर तिला स्वतःसाठी नोकरी शोधायची होती. शेखरपासून शक्य होईल तितके दूर रहायचे होते.

मिहिकाचा फोन येऊन गेल्यापासून तिचे मन सैरभैर झाले होते.... काय करावे सुचत नव्हते...ती जर असाच विचार करीत राहिली तर मग ती स्वतःसाठी जॉब कसा शोधणार होती? तिने मन घट्ट केले व तिच्या मित्राला अश्विनला फोन लावला.

थोडे अश्विन विषयी.

अश्विन आणि प्रिया एकाच शाळेत होते. पण त्यांचे वर्ग वेगळे होते. त्याला ती अगदी शाळेपासून आवडायची. तेंव्हा त्यांची फक्त तोंडओळख होती. कॉलेजमध्ये असताना ते एकाच वर्गात आले आणि आधी माहित असल्यामुळे त्यांची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. तो तिचा सिक्रेट लवर होता. पण त्याने तिला हे कधीही सांगितले नाही. तिची मैत्री गमावण्याची भीती होती.

मामी रागावल्या, काही बोलल्या तर ती ते त्याच्याजवळ बोलून मन मोकळे करायची. कधी कधी रडायची सुद्धा मग तो काहीतरी विनोद करून तिला हसवायचा. तिच्या आयुष्यातली प्रत्येक घडामोड त्याला ठाऊक असायची.

कॉलेज झाल्यानंतर त्यानेच त्याच्या ऑफिसमध्ये तिला नोकरीला लावले. तात्पुरती जरी असली तरी त्या निमित्ताने का होईना ती त्याच्या जवळ असेल आणि तो त्याच्या मनातले भाव तिच्याजवळ व्यक्त करेल असे त्याला वाटले. पण जेव्हा त्याने तिला मनातले सांगायचे ठरवले तेंव्हाच तिने शेखरचा फोटो त्याला दाखवला. तो तिला पाहताक्षणीच आवडला होता हे जेव्हा ती त्याला म्हणाली तेंव्हा त्याने त्याच्या डोळ्यांत आलेले अश्रू तिच्यापासून लपवले. त्याचे स्थळ आल्यापासून ती खूप खुश असायची म्हणून तिच्यासाठी तो ही खुश होता. तिच्या आयुष्यातला एक देवदूत होता तो. तिच्या आयुष्यात त्याला अनन्य साधारण महत्त्व होते . तो तिला पियू अशी हाक मारायचा आणि ती त्याला आशू.

"हॅलो आशू ."

"इतक्या दिवसांनी तुझा आवाज ऐकून फार बरे वाटले. कशी आहेस तू..."

"ठीकच आहे म्हणायचे. "

"आर यू ओके? काही काळजी करण्यासारखे नाही ना.."
तो चिंतित झाला.

"नाही रे...ते मी तुला नंतर भेटल्यावर सांगेनच...पण पहिला माझ्यासाठी कुठेतरी जॉब शोध. "

"तू जॉब करणार आहेस? "

"असे का विचारतोस? लग्न झाल्यावर मुली आपले करिअर सुरू ठेवतातच ना."

" तुझा नवरा टॉप वन आयटी कंपनीमध्ये वन ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे. तुला गरजच काय असे वाटले म्हणून म्हटले... डोन्ट फिल बॅड."

"तुझ्या बोलण्याचे मला याआधी कधी वाईट वाटले नाही आणि या पुढेही वाटणार नाही.... म्हणूनंतर माझ्या लो टाइम मध्ये मला तुझी आठवण येते. "

"पीयु, काही झालेय का?"

"मी लवकरात लवकर जॉब शोधला नाही ना तर नक्कीच काहीतरी होईल. " कुठेतरी हरवत ती म्हणाली.

"पियू, नक्कीच काहीतरी असे झालेय जे मला जाणून घेणे गरजेचे आहे. मी तिथे येऊ का... तुझा नवरा तुझ्याशी नीट वागतो ना... आय निड टू नो. "

"अरे तू असा इतका पॅनिक नको होऊस... असे काहीही झाले नाही.... शेखर माझ्याशी खूप चांगले वागतात...
पण तरीही मला जॉब शोधायचा आहे. त्याचे कारण मी असे फोनवर नाही सांगू शकत ...प्रत्यक्ष भेटशील तेंव्हा सांगेन..."

"उद्या भेटशील?"

" हो....येताना माझे एक्सपीरिएन्स लेटर पण घेऊन ये. "

"हो. माझ्याकडेच आहे ते ...मला वाटले होते त्याची गरज तुला लागणार नाही. "
त्याच्या आवाजात खंत होती.

"तुझे ऑफिस सुटले की ऑफिस जवळच्या बसस्टॉपवर उद्या संध्याकाळी मला भेट ."

"बस स्टॉपवर कशाला ? आपण एखाद्या हॉटेलमध्ये भेटू ."

"नको रे...तितका वेळ नाही माझ्याकडे...तू बसस्टॉपवर भेट..."

तिने फोन ठेवला.
रूमचा दरवाजा वाजला.

"ये मनिषा."

"वहिनी तुम्हाला आई बोलावत आहेत. "

प्रियाने घड्याळात पाहिले सहा वाजत आले होते... आता कुठल्याही क्षणाला शेखर येईल...आजपासूनच त्याच्यापासून थोडे अलिप्त रहायला लागले पाहिजे.

मनिषा जातच होती इतक्यात प्रियाने तिला थांबवले.

"मनिषा, आता शेखर येतील तेव्हा त्यांच्यासाठी कॉफी बनव."

"आणि तुम्ही?
... तसे नाही म्हणजे साहेबाना तुमच्या हातची कॉफी आवडते ना. "

"त्यांनी हळू हळू ती सवय मोडली पाहिजे. "

प्रिया म्हणाली आणि सुमनताईंच्या रुमच्या दिशेने निघून गेली मनीषा तिच्याकडे चमत्कारिकरित्या पाहू लागली.

"वहिनींना काय झाले ?"ती पुटपुटली.


******


संध्याकाळी शेखर आला...प्रियाने लगेचच समोर यावे नेहमीप्रमाणे त्याची आवडती कॉफी आणावी...त्याच्याजवळ घुटमळावे...जे ती नेहमीच करायची याची अपेक्षा त्याला होती. पण आज घरी असूनही ती त्याच्यासमोर आली नाही. ती बेडरूममध्येही नव्हती.

तो बाहेर आला.

"मनिषा, प्रिया कुठे आहे?"

"वहिनी आईंच्या रुममध्येच आहेत. "

शेखर त्याच्या आईच्या रूमबाहेर गेला. दरवाजा बंद होता. आत त्या दोघी खूप हसून गप्पा मारत होत्या. सुधामावशी बद्दलच गप्पा होत्या कारण मधूनच सुमन यांच्या तोंडातून सुधा असा उल्लेख येत होता. तोही मंद हसला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला.

आज त्याला काम होते म्हणून तो जिमला गेला नाही. लॅपटॉपवर आपले काम करीत बसला. संध्याकाळचे आठ वाजले तरी ती बेडरूमच्या आत आली नव्हती. आता मात्र त्याची सहनशक्ती संपली होती.

तिला बोलवायला तो बाहेर जाणारच होता इतक्यात ती रुममध्ये आली. ती आली ती न बोलताच ड्रॉवर मध्ये काहीतरी शोधू लागली....त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत.

"प्रिया.."

"प्रिया. "

ती ऐकत नाही असे पाहून त्याने तिच्याजवळ येऊन सरळ तिचा हातच पकडला व तिला स्वतःजवळ खेचले.

"काय चालवलेस?"
त्याने आर्तपणे विचारले.

"कुठे काय..."
ती त्याच्यापासून नजर चोरत होती.

"मग माझ्याकडे दुर्लक्ष का करीत आहेस?"

"असे कधी केले मी?"

"मग मी आल्यावर बाहेर का नाही आलीस?"

"मनिषाला सांगितले होते तुम्ही आल्यावर कॉफी द्यायला."

"ओह्...तू मला का टाळत आहेस हे सांगायचे नाही तुला ना?"

"तुमचा गैरसमज झालाय काहीतरी."

"माझा गैरसमज झालाय?"
त्याने पुन्हा तिला जवळ ओढले. तो तिच्याकडे उत्कटपणे पाहू लागला.
आता याक्षणी त्याला वाटले तिचा चेहरा ताब्यात घेऊन एक डीप किस करावे आणि तिला मिठीत घेऊन सांगावेसे वाटले की आय लव्ह यू...पण तिच्या निबर वागण्यामुळे तसे करायला त्याचा पुरुषी अहंकार त्याला रोखत होता. त्याने तिला सोडले आणि तो बाहेर निघून गेला.

ती मात्र पाठमोऱ्या जाणाऱ्या त्याच्या छबीकडे डोळे भरून पाहू लागली...तसे वागायला भागही त्यानेच पाडले होते ना... मिहिकाचे बोलणे तिच्या कानावर घणाचे घाव घालीत होते.

रात्री जेवण झाल्यावर

शेखर टेन्शन मध्ये असला की सिगारेट ओढायला जात असे. आताही तो खाली गेला होता. ती कपडे बदलून आत आली. आणि आपल्या जागेवर जाऊन पडली. डोळ्यासमोर तो आणि मिहिका एकत्र हातात हात घालून बोलत आहेत ..डान्स करीत आहेत... हे चित्र येत होते...
पुन्हा तिचे डोळे भरले...तिने दोघांमध्ये लोडचे पार्टीशन ठेवले आणि ती विरुद्ध बाजूला कुस करून झोपली.

'मनापासून स्वीकारले नाहीस परके ही समजले नाहीस
तुझे माझे नाते म्हटले तर जन्मोजन्मीचे म्हटले तर क्षणभराचे'

तिच्या मिटलेल्या पापण्यांतून दोन अश्रूथेंब गळाले.


क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.