Login

प्रिया आज माझी भाग ४७

Lovestory
प्रिया आज माझी भाग ४७

डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


अश्विन आधीपासूनच तिची वाट पाहत उभा होता. त्याला पाहताच तिचा चेहरा खुलला. तिच्या लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी ती दोघं भेटली होती....अश्विनच्या मनात जरी तिच्याविषयी प्रेमभावना होत्या तरी त्याचे मन साफ होते. तो आजही तिच्याशी पूर्वीच्याच मैत्रीने बोलत होता. कारण तिचे शेखरवर किती प्रेम होते हे त्याला चांगलेच ठाऊक होते...आणि आताही तिने त्याला तिच्या लग्नाची कहाणी , शेखरने तिच्याकडे मागितलेला डिव्होर्स... याबाबत त्याला सांगितले तेंव्हा तो ही तिच्यासाठी उदास झाला.

"यासाठीच मी नोकरी शोधत आहे. "

"मी कालच माझ्या दोन तीन मित्रांना सांगून ठेवले होते.. त्यातल्या एकाने रोशनने आज फोनही केला होता. त्याचे मामा नाशिकला बँकेत मॅनेजर आहेत.... त्यांच्या ब्रांच मध्ये अकाउंटंट ची पोस्ट खाली आहे."

"आशू, आपली रागिणी तिथेच राहते ना?"

"हो. मी गेलो आहे तिच्याकडे. तिच्या घरापासून जवळच आहे ती बँक म्हणून तुला न विचारताच मी रोशनला तुझा बायोडाटा दिला. अँड गेस व्हॉट त्यांनी रिप्लाय सुद्धा दिला. लगेचच जॉइन व्हायला सांगितले आहे. "..

"काय लगेचच. "

इतक्या लवकर शेखरला सोडून असे अचानक जायचे या विचाराने ती अस्वस्थ झाली.

"शेखर बरोबर अजून काही दिवस राहता आले असते...तसे सहा महिने पूर्ण व्हायला अजून थोडे दिवस बाकी होते. "
त्याच्याबरोबर राहण्याची लालसा तिच्या मनात अजून बाकी होती.

"पियू."
तिला विचारात हरवलेली पाहून त्याने तिला आवाज दिला.

"तू ठीक आहेस ना?"

"हो. पण एवढ्या लगेच ..म्हणजे उद्या...ती पुढे काही बोलणार इतक्यात तिची नजर समोर गेली. समोर सिग्नल लागल्यामुळे एक लांबसडक शोफर कार थांबली होती. तिच्या पारदर्शक खिडकीतून तिने जे काही पाहिले त्याने ती जागेवरच थिजली. त्याच्या मागच्या सीटवर मिहिका शेखरच्या खांद्यांवर डोके ठेवून बसली होती.
तिने समोरचे दृश्य पाहिले आणि तिचा कंठ दाटून आला. शेखरच्या बाबतीत तिच्या मनात प्रेमाचा कोवळा किरण झळाळला होता तो त्या संध्याकाळच्या संधिप्रकाशात ध्वस्त झाला. सिग्नल सुटल्यावर कार पुढे निघून गेली.

"पियू...काय झाले? त्या कारमध्ये कोण होते ? अश्विन विचारले.

तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ती एखाद्या पुतळ्याप्रमाणे कार गेली त्या दिशेकडे पाहत राहिली.



तू नाहीस रे माझा
तरी तुझीच लालसा
लोभवीते मना ध्याना
छबी तुझीच राजसा

नको जाऊ रे तू असा
नको जाऊ दूर दूर
तुला बघण्याची वाटे
मनी सदा हुरहूर

मी नाही न तुझे प्रेम
किती समजावू मना
तरी हृदय जपते
प्रीतवेलीच्या त्या खुणा

खोटे खोटे सर्व खोटे
जे वाटले सत्य होते
फुल तुझ्या आवडीचे
मी नव्हे दुजे ते होते

तुझ्या सोबतीचे क्षण
माझ्या जगण्याचे कारण
कधी करशील का रे
मला चुकून स्मरण?

********

मला माहित आहे पुढे काय होईल याची तुम्हाला उत्सुकता आहे. हा भाग छोटा आहे पण उद्यापर्यंत पुढचा भाग पोस्ट करेन.




क्रमशः

टीप: आतापर्यंत या कथेत आलेल्या तुम्ही वाचलेल्या सर्व
कविता, चारोळ्या आणि वर दिलेली कविता प्रसंगानुरूप मी स्वतः लिहिलेल्या आहेत.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.