Login

प्रिया आज माझी भाग ४८

Lovestory
प्रिया आज माझी भाग ४८


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


"अश्विन, माझ्या व्हाट्सअपवर रागिणीचा ॲड्रेस आणि बँकेचा ॲड्रेस पाठव मी उद्या लगेच निघते. "

"पियू...तो शेखर होता का?"

"हो."

प्रियाने आपल्या डोळ्यांतून ओघळलेले थेंब आपल्या उलट्या हाताने पुसले.

"मी येते."

"पियू...मी तुला सोडतो."

"नको रे...आता मला पुढे एकटी तर राहायचे आहे ...कुठूनतरी सुरुवात करायचीच आहे ना...मग इथून करते."
ती विषण्ण हसली.

******

कधी कधी सर्व काही चांगले होणार अशा आशेवर माणूस काहीतरी करायचा विचार करतो आणि घडते भलतेच..शेखरच्या बाबतीतही नेमके तेच झाले. ऑफिस सुटल्यावर तो प्रियाला भेटण्यासाठी....तिच्यासमोर ते डिव्होर्स पेपर्स फाडण्यासाठी लवकर येणार होता. तिला खुश करण्यासाठी नेमके काय करावे हे त्याला सुचत नव्हते...मग त्याला आठवले त्याचा कॉलेज फ्रेंड समीर...ज्याला ती समीरदादा म्हणायची...तो तिला फार पूर्वीपासून ओळखत होता. कदाचित तो काहीतरी मदत करू शकेल असे त्याला वाटले म्हणून शेखर त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला.


"फायनली तू एक चांगला डिसिजन घेत आहेस... आय ॲम सो हॅप्पी फॉर यू. पण शेखर...मला वाटते तू प्रियाबरोबर संसारात पुढे जाण्याआधी मिहिकाशी असलेले संबंध पूर्णपणे तोडून टाकावे...तिला सर्व क्लिअर सांग...कारण,
कालच मला राहुल (शेखर , मिहिका आणि समीरचा कॉलेज फ्रेंड) सांगत होता की , त्याला मिहिकाने सांगितले की तू तुझ्या बायकोला सोडणार आहेस आणि लवकरच तू तिच्याशी लग्न करणार आहेस. "


"नो वे...मी तर हे तिच्याशी क्लिअर केलेले आहे की आता प्रिया माझी बायको आहे.
तुला सांगू शेखर ....मी मिहिकावर वेड्यासारखे प्रेम करायचो...म्हणजे ते प्रेम होते की आकर्षण माहित नाही..पण त्यावेळेस प्रेमच वाटायचं ते...इतकी ब्युटीफूल मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे याचा अभिमान वाटायचा मला...पण तिचे खरे रूप मला नंतर समजले...तिचे माझ्यावर जर खरे प्रेम असते ना तर ती आमच्या लग्नाच्या दिवशी आपले करिअर करण्यासाठी निघून गेली नसती तो दिवस किती महत्त्वाचा होता...तिला इतकेही समजू नये.

खरेतर ती दुसऱ्यांना काही महत्त्व देतच नाही.....तिला आवडते तसे दुसऱ्यांनी वागले पाहिजे....

त्याउलट प्रिया....अरे रस्त्यावरच्या लहान मुलाबद्दल सुद्धा तिच्या मनात कणव आहे...तिच्यातला हा स्पार्क मला पहिल्या भेटीत जाणवला पण त्यावेळेस मिहिकाच्या प्रेमाची पट्टी माझ्या डोळ्यावर चढली होती ना.

खूप चांगली आहे रे ती...माझ्यावर तिचा खूप जीव आहे आणि माझाही तिच्यावर तितकाच जीव जडलाय..."


"तिच्यासारख्या गुणी मुलीवर तुझा जीव जडला त्यात काही नवीन नाही. तुझ्यासारखाच एक मुलगा तिच्यावर जीव ओवाळून टाकायचा..तिला सोडून अख्ख्या कॉलेजला माहित होते...पण तिला जर समजले तर ती त्याच्याशी असलेली मैत्री तोडून टाकेल अशी भीती त्याला वाटायची म्हणून त्याने तिला कधीच सांगितले नाही. "

शेखर अस्वस्थ झाला. त्याच्या चेहऱ्यावरून ते साफ दिसत होते..

"त्याचे नाव अश्विन आहे ना..."

"हो..तुला कसे माहित? "

"तिच्या तोंडून ऐकले होते. ".

"बट शेखर त्यावरून तिच्यावर डाऊट घेऊ नकोस हा... शी इज अ प्युअर सोल..."

"म्हणूनच ना...अरे खूप इनोसंट आहे रे ती...कोणीही तिच्या प्रेमात पडेल.,..मीच मूर्ख होतो...जे मला इतक्या उशीरा अक्कल आली. आजपर्यंत खूप सहन केले आहे तिने...लहानपणी आईवडील गेले... मामा मामींकडून कधी प्रेम मिळाले नाही...माझ्याकडून सुद्धा उपेक्षाच मिळाली..पण आता यापुढे मला तिला सुखात ठेवायचे आहे."

"मित्रा... यू आर लकी टू हॅव हर. "
समीरने त्याची पाठ थोपटली.

"जा जा आता वेळ घालवू नकोस ....जे आहे ते सांग तिला.

""तेच तर समजत नाही...काय सांगू...."

"आपल्याच बायकोला प्रपोज करणारा तू पहिला माणूस असशील. "

शेखर हसला.

"हो प्रपोज करायचे आहे तिला...अग्निसमोर फेरे घेताना जी वचने दिली ती अगदी खरी खुरी आहेत हे तिला पटवून द्यायचे आहे...माझ्यावर विश्वास ठेवेल ना ती?
...हल्ली खूप लांब लांब राहते रे. तिच्यासाठी काय करू म्हणजे ती खुश होईल ते सांग ना... सोन्यामोत्याचा हार की डायमंड नेकलेस ...एखादा महागडा फोन...काय गिफ्ट देऊ तिला?"

"फक्त एक गुलाबाचे फूल दे...आणि तुझे तिच्यावर प्रेम आहे हे सांग......खुश होईल ती. "

"बस इतकेच. "

"हो इतकेच आणि ती राजी असेल तर...पुढे तुला ठीक वाटेल ते ..."
मोठ्याने हसत समीर म्हणाला तसे शेखरने मस्करीत त्याला मारण्यासाठी मूठ पुढे केली इतक्यात त्याचा फोन वाजला.

"मिहिकाचा फोन आहे."

"अरे घे...आणि तिला आताच क्लिअरकट सांग."

शेखरने फोन उचलला व स्पीकरवर ठेवला.

"हॅलो शेखर... पप्पा... पप्पांना पॅरालीसीसचा अटॅक आला आहे. ते काहीच बोलत नाहीत रे..."

मिहिका रडत होती.

"मिहिका... ही विल बी फाईन... डोन्ट क्राय."

"शे ...खर म..ला का...हीच सु..च..त.
नाही..."

ती हुंदके घेत अजून रडू लागली.

"तू आता कुठे आहेस...त्यांना कुठल्या हॉस्पीटल मध्ये ऍडमिट केलेय? ,"

"कलावती हॉस्पिटल...मी तिथेच चाललेय. "

"ओके मी येतो तिथे..."

"मी तुझ्या ऑफिसच्या इथे तुला पीक करते... प्लीज फॉर गॉड सेक माझ्याबरोबर येशील का?..मला खूप भीती वाटतेय.."

"मी आता ऑफिसमध्ये नाही...समीरकडे आलो आहे. "

"ओके देन मी समीरच्या बिल्डिंगच्या इथे कार घेऊन येते..कलावती हॉस्पीटल तिथून फार लांब नाही. "

"नको मिहिका..."
शेखर तिला थांबवणार होता इतक्यात समीरने त्याचा खांदा दाबला आणि डोळे बंद करीत मानवर खाली करीत त्याला तिच्याबरोबर जाण्याचा इशारा केला.

"आय थिंक... यू शुड गिव हर सम टाइम...आता ती स्ट्रेस मध्ये आहे.... तू तिच्या सोबत असायला पाहिजे."

शेखरलाही ते पटले आणि नैतिकदृष्ट्या ते बरोबरही होते.

साधारण पंधरा मिनिटात ती तिथे तिची पर्सनल कार घेऊन आली होती. शेखरला पाहताच तिला दुःख अनावर झाले होते. ती अजूनच रडायला लागली.

कार मुख्य रस्त्यावर आली आणि सिग्नलपाशी थांबली. शेखर तिचे सांत्वन करीत होता आणि नेमके त्याच वेळी प्रियाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. तिने जे डोळ्याने पाहिले त्यावर विश्वास ठेवला....कारण तिच्या मते ते अजूनही रिलेशनशिप मध्ये होते ना.

जे नुकसान व्हायचे होते ते झाले होते.

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all