Login

प्रिया आज माझी भाग ४९

Lovestory
प्रिया आज माझी भाग ४९


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


घरी आल्यावरही तिच्या डोळ्यांसमोर , मिहिका शेखरच्या खांद्यावर मान ठेवून विसावली आहे हे चित्र दिसत होते. तिचे डोके सुन्न झाले. क्षणभर ती बेडवर शून्यात विचार करून बघत राहिली. नंतर तिने स्वतःला सावरले आणि आपले कपडे बॅगेत भरले. लग्नानंतर सुमनताईंनी दिलेल्या बांगड्या तिने काढून ठेवल्या. त्यांनी दिलेल्या साड्याही तिथेच ठेवल्या. त्यासोबत एक चिठ्ठी ही लिहिली. शेखरला आणि सुमन ताईंना न कळवतात तिने जायचे ठरवले होते. कारण तिला माहिती होते सुमनताईना जर कळले तर त्या तिला घराबाहेर पडू देणार नाहीत.

दहा वाजून गेले होते. मिहिकाचे वडील अजूनही सिरीयस होते. शेखरला मात्र वेगळीच चिंता सतावत होती. अजून किती वेळ लागेल ते त्याला माहीत नव्हते आणि आपण आता या क्षणी मिहिकाबरोबर आहे हे जर प्रियाला सांगितले तर तिला वाईट वाटेल असे त्याला वाटले म्हणून त्यांने सुमनताईंना फोन केला.

"हॅलो शेखर अरे दहा वाजले फोनही केला नाहीस. तू कामात बिझी असतोस आणि आम्ही कोणी फोन केला तर तुझ्या कामात डिस्टर्ब केलं म्हणून तुला राग येतो .....मी फोन केला नाही पण आता तुझी बायको आहे तिचा तरी निदान विचार करायचा. "

"हो आई . तेच सांगायला मी फोन करत आहे ."

"मिहिकाच्या वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक आला आहे. मी तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये आहे. ते अजूनही सिरीयस आहेत. मी आता सकाळीच येईन. "

"पूर्ण दुनियेत तिचा तूच एक सख्खा आहेस का?... तुझे आता लग्न झाले आहे हेही तिला कळत नाही का?"

" आई प्लीज, आता हे सर्व बोलायचे वेळ नाही आहे.

आणखी एक मी मिहिकाबरोबर आहे हे प्रियाला कळू देऊ नकोस. "

"नशीब तेवढा तरी बायकोचा विचार करतोस. "
सुमन ताई वैतागल्या होत्या.

******

प्रिया जेवायची थांबली होती त्यामुळे तो आज येणार नाही हे सांगायला सुमनताई प्रियाच्या रुममध्ये गेल्या....त्यांची चाहूल लागताच तिने आपली बॅग वार्डरोबच्या आडोशाला ठेवली.

"प्रिया...तू जेवली नाहीस ना अजून... अगं शेखर आज रात्री येणार नाही.. त्याच्या ऑफिसमध्ये खूप काम आहे ना तो उद्या सकाळीच येणार आहे. चल तू जेवून घे पाहू."
त्या बोलताना थोड्या चाचरत होत्या.

प्रियाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले...तो मिहिकाबरोबर रात्रभर थांबणार हा विचारही तिला करवत नव्हता.

"प्रिया... अगं काय झाले?"
स्तब्ध असलेल्या प्रियाला त्यांनी किंचित हलवले.
तर तिने सरळ त्यांना मिठीच मारली.

"काय झाले बाळा?..का अशी रडतेस...तुला बरे वाटत नाही का?"

तिने स्वतःला सावरले.

"काही नाही...मावशीची आठवण येत होती. "

"उगी उगी..शांत रहा..उद्या शेखर आला ना की मग त्याला सांगते...तुम्ही दोघेही सुधाला भेटून या."

तिने मान हलविली.

****

सकाळचे सहा वाजले होते. हॉलमध्ये झोपलेल्या सुधाकरने दार खोलले.

प्रिया झोपलेली असेल , तिची झोप मोडेल म्हणून त्याने बेडरूमचा दरवाजा हळूच उघडला.

ती बेडवर नव्हती. तो बाल्कनीत गेला...तिथेही ती नव्हती...एवढ्या सकाळी आईच्या खोलीत गेली का ती?.
त्याने सुमनताईंच्या रुममध्ये जाऊन पाहिले...ती तिथेही नव्हती...किचन , हॉलची बाल्कनी...ती कुठेच नव्हती. तो पुन्हा बेडरूममध्ये गेला...

त्यादिवशी मला न सांगता ती आपल्या माहेरी गेली होती...अशीच आताही ती तिथेच गेली असावी का...पण त्या दिवशीचे मामींचे वागणे पाहून ती तिथे जाईल याची शक्यता कमीच होती. त्याने आपला टाय काढून बेडवर फेकला...आणि काहीसे आठवले म्हणून ती नेहमी तिचे कपडे ठेवायची तो वॉर्डरोब खोलला.
तिथे तिच्या साड्या होत्या..पण नेहमीचे कपडे नव्हते. त्याने वॉर्डरोब बंद केला...

"तिची बॅग बाग कुठे आहे.
ओह् गॉड बॅग दिसत नाही ."

म्हणजे प्रिया नक्कीच बाहेर गेली.

तो बेचैन झाला. त्याने तिला फोन केला....पण नंबर नॉट रिचेबल येत होता. तो बाहेर आला.

सुधाकर आपल्या अंथरुणाची घडी घालत होता.

"सुधाकर... प्रियाला पाहिलेस का ?"

"वहिनी आपल्या रुमातच असतील ना. "
सुधाकरला काहीही माहित नाही हे त्याला कळून चुकले. तो तडक सुमनताईंच्या खोलीत गेला.

"आई..."

सुमनताई उठल्या.

"शेखर तू आलास.."

"आई ,प्रिया कुठे आहे?

"रूम मध्ये नाही का ती...किचनमध्ये असेल मग. "

"नाही आई ..बाल्कनीत , वॉशरुममध्ये, किचनमध्ये सगळीकडे पाहिले मी...तिची बॅगही नाही. "

हे ऐकून त्यांना शॉक बसला...त्या ही त्यांना जमेल तेवढ्या वेगाने शेखरच्या रुममध्ये आल्या. प्रिया खरोखरच सोडून गेली होती. त्यांचे तर हातपायच गळाले. त्या धाडकन बेडवर बसल्या.

"शेखर...एवढ्या सकाळी कुठे गेली असेल पोरगी...काल मला मिठी मारून रडली तेव्हाच समजले पाहिजे होते. "

त्यांनी नकारार्थी मान हलविली.

"शेखर तिला फोन लाव..."

"नॉट रिचेबल येतोय. "

"मग सुधाला फोन लाव...तिच्या मामाना फोन लाव.. काहीही कर.... तिला शोधून आण रे. "
त्या रडवेल्या होत म्हणाल्या.

तो तिच्या मामाना फोन लावतच होता इतक्यात त्याचे लक्ष ड्रेसिंग टेबलावकडे गेले.
तिथे प्रियाच्या सोन्याच्या बांगड्या होत्या..आणि त्याखाली एक चिठ्ठी होती.

"प्रिय शेखर,
मी तुम्हाला अप्रिय असले तरी तुम्ही मला नेहमीच प्रिय आहात. आपले लग्न होऊन सहा महिने होत आले आहेत. लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुमच्याकडे जी सहा महिन्याची मुदत मागितलेली होती ती आता काही दिवसात संपेल.

शेखर मी माझा शब्द पाळलाय. इतके दिवस तुम्ही मला इथे राहायला दिलेत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
इतक्या दिवसात या घराची, आईंची...आणि तुमची खूप सवय झाली होती मला....आता ही सवय सुटेल की नाही माहित नाही..पण माझ्या इथून जाण्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेले अडथळे नक्कीच दूर होतील. आणि मी हे कोणत्याही प्रकारच्या रागाने लिहित नाही...तसे तुमच्यावर रागवायचा अधिकार मला कुठे होता...तो तर हक्काच्या माणसांवर असतो ना..माझ्या आधी तुमच्यावर मिहिकाचा अधिकार आहे...तुम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. माझ्यामुळे उगाचच तुमच्या नात्यात वितुष्ट आले होते. सहा महिन्यापूर्वी जे काही झाले ...म्हणजे आपले लग्न, माझे इथे येणे, इथे राहणे सर्व काही विसरून जा...कोणी प्रिया तुमच्या आयुष्यात आलीच नव्हती असे वागा.

आईनी दिलेल्या बांगड्या या पत्राबरोबर ठेवल्या होत्या त्या तुम्हाला मिळाल्या असतीलच...पण मंगळसूत्र तेवढे सोबत घेऊन जात आहे. तेवढीच एक ठेव माझ्याकडे असू द्या. मी ते सोबत नेले म्हणून कोणताच चुकीचा अर्थ लावू नका. मी तुमच्यावर कधीही अधिकार सांगणार नाही. वार्डरोबच्या ड्रॉवर मध्ये घटस्फोटाचे पेपर ठेवले आहेत त्याच्यावर मी सह्या केल्या आहेत.

आईंच्या सांगण्यावरून मला शोधू नका. कारण मी कुठे जात आहे हे कोणालाही माहित नाही.. ना मामांना ना मावशीला. ह्या शहरात राहिले तर जगणे असह्य होऊन जाईल.

प्रिया.

शेखरने ते पत्र वाचले आणि तो गळूनच गेला.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.