Login

प्रिया आज माझी भाग ५१

Lovestory
प्रिया आज माझी भाग ५१


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


समीर कडून प्रियाबद्दल काही माहिती मिळेलच या आशेवर शेखर होता आणि त्याची आशा खरी ठरली. समीरचा फोन आला.

"हॅलो शेखर, मला माहित नाही ही माहिती तुझ्यासाठी उपयोगी आहे की नाही ... पण.."

"प्रियाबद्दल आहे का?"

"हा...तसेच काहीसे..."

"मग सांग लवकर. "

"प्रियाचा मित्र अश्विन सध्या नागपूरमध्ये आहे. त्याने इथून मुंबई ऑफिसमधून आपली ट्रान्स्फर त्याच्या नाशिक ब्रांचमध्ये करून घेतली आहे. "

"तुला त्याच्या ऑफिसचा पत्ता माहित आहे का?"

"पत्ता आहे माझ्याकडे पण अश्विनच्या ज्या मित्राने हे सांगितले त्याने हेंही सांगितले की सध्या या पत्त्यावर त्यांचे जे ऑफिस आहे तिथे रिनोवेशन चालू आहे त्यामुळे तात्पुरते ते ऑफिस कुठे दुसरीकडे शिफ्ट झाले आहे आणि तिथला पत्ता त्याच्याकडे नाही. पण अश्विनचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझ्याकडे. पण मला वाटते तू त्याला कॉल केला तर प्रिया त्याच्याबरोबर आहे हे तो कधीच सांगणार नाही...असे कदाचित प्रियाने त्याला सांगून ठेवले असेल...तेंव्हा तू प्रत्यक्ष
नाशिकला गेलास तर तिथे गेल्यावर तुला समजेल."

"हो मलाही तेच वाटते. तिच्यासाठी नाशिकच काय जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जायला मी तयार आहे. "

प्रिया भेटण्याच्या आशा त्याच्या मनात पुन्हा पल्लवित झाल्या.

समीरने त्याच्या फोनवर अश्विनच्या कंपनीचा ॲड्रेस आणि अश्विनचा नंबर पाठवला.

"विल्सन टेक्नॉलॉजी "
हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते...त्याच्या फारच जवळच्या माणसाने त्याच्याजवळ या नावाचा उल्लेख केल्यासारखे त्याला वाटले..पण नेमके कोण ते त्याला आठवत नव्हते.

समीरचा फोन येऊन गेल्यापासून त्याला खूपच सकारात्मक वाटत होते. त्याने लॅपटॉप बंद केला आणि आपल्या चेअरवर तो विसावला.

इतक्यात त्याचा फोन वाजला. मिहिकाचा फोन होता.
एरवी त्याने तिचा कॉल घेतला नसता पण आज तो खूप चांगल्या मूडमध्ये होता म्हणून त्याने तो कॉल उचलला.

"हॅलो शेखर.... "

"बोल." तो कोरड्या आवाजात म्हणाला.

"ओह् बेबी तू माझा फोन उचललास तिथेच मला पॉझिटिव्ह वाईब्स आल्या.
इतके दिवस मला वाटत होते की तू खरोखरच मला विसरलास... बट आय वॉज राँग..."

त्याने फोनकडे चमत्कारिक नजरेने पाहिले.

'हिला काय झाले?'

"तुझे पप्पा आता कसे आहेत?" त्याने फॉर्मलिटी म्हणून विचारले...

"एकदम फाईन...कालच डॉक्टरांनी त्यांना ऑल क्लिअर सांगितले आहे..त्याच्या मेंदूतली गाठही विरघळली आहे. आणि बरे झाल्या झाल्या ते बेस्ट डॅड आहेत हे त्यांनी सिद्ध केले. "

"म्हणजे?"

"अरे इतके दिवस तू माझ्याशी तुटक वागत होतास त्यामुळे माझी ही नाराजी मी त्यांना सांगितली."

"मग काय?"
त्याच्या कपाळावर आठ्या आल्या.

"मग काय...आय एम हॅप्पी नाव ...शेखर...मला सर्व समजले आहे ...तू तुझ्या वाइफ ला डिव्होर्स दिला आहेस. आणि फायनली ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली आहे..."

"मिहिका...तुला हे कोणी सांगितले?"
खरेतर त्याला खूप राग आला होता पण त्याने आपला राग कंट्रोल करीत तिला विचारले.

"माझ्या सोर्सेस ने...माझ्या पप्पांच्या खास माणसांनी मला हे सांगितले...
पप्पांना जसे बरे वाटले तसे त्यांनी आपल्या माणसाना कामाला लावले ....आणि यू नो व्हॉट...त्यांनी एका दिवसात ही इन्फॉर्मेशन दिली. मी तर त्यांना सांगितले होते की...तू जर तिला डिव्होर्स दिला नाहीस तर तुझ्या त्या गावंढळ बायकोला सरळ किडनॅप करून कुठेतरी ठेवायचे...पण तशी वेळच आली नाही. "

तिचे वाक्य पूर्ण होईपर्यंत त्याचा जीव टांगणीला लागला होता. पण प्रियाचा गायब होण्याचा आणि मिहिकाच्या कारस्थानाचा काहीही संबंध नाही, हे जेव्हा त्याला समजले तेव्हा त्याला हायसे वाटले...कारण तसे जर झाले असते तर प्रियाचे आयुष्य धोक्यात आले असते कारण मिहिकाचे वडील किती पोचलेली चीज आहे हे त्याला चांगलेच ठाऊक होते.

"शेखर तू ऐकतोस ना.."

त्याची तंद्री लोपली.

"हो हो...तू बोल."

"अरे काही नाही...आपला राहुल आहे ना...त्याचा मला कॉल आला होता...त्याला मी जेव्हा सांगितले की तुझा डिव्होर्स झाला आहे तेंव्हा तो खूप खुश झाला..."

'हा राहुल असा कसा माझ्या डिव्होर्स बद्दल खुश होऊ शकतो...'
शेखरने फोनकडे शंकेने पाहिले.

मिहिका मात्र न थांबता बोलतच होती.
"त्यानं तुला आणि मला त्याच्या नाशिकच्या घरी...आय मीन बंगल्यावर बोलावले आहे...उद्याच जायचे आहे..आता तू नाही म्हणू नकोस हा.. "

"मिहिका...माझे काम असते तुला ठाऊक आहे ना.."

"बरे मग मीच जाते...पण मग पप्पा माझ्याबरोबर बॉडीगार्ड पाठवतील आणि ते मला कुठेच फिरायला देणार नाहीत...तू आलास तर त्या बॉडीगार्ड पासून माझी सुटका होईल. "

"राहुल कुठे राहतो म्हणालीस?"

"नाशिकला..."

'ओह् गॉड...ही बया तिच्या बॉडीगार्डना घेऊन नाशिकला गेली आणि तिथे तिला प्रिया दिसली तर ती तिला काही बरेवाईट तर करणार नाही ना?'

असा योगायोग होण्याचे तसे चांसेस खूप कमी होते... तरी म्हणतात ना मन चिंती ते वैरी ना चिंती असेच काहीसे शेखरचे झाले होते.

"मी..मी.. मी येतो तुझ्याबरोबर...तसे राहुलला सांग."

"ओह् बेबी... यू आर सो स्वीट..."

तिने फोन ठेवला आणि शेखरने सुटकेचा निःश्वास टाकला.


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all