Login

प्रिया आज माझी भाग ६४

Love story
प्रिया आज माझी भाग ६४

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

प्रिया हॉलमध्ये कुठेच दिसत नव्हती...अश्विन, राहुल ,रागिणी सर्वजण तिला शोधू लागले.
शेखर थोडाही वेळ न दवडता बाहेर आला.
तिथे मिहिकाचा बॉडीगार्ड डॅनियल आणखीन ड्रायव्हर दिलीप एकमेकांशी गप्पा मारत होते.

शेखरने जाऊन डॅनियल ची कॉलर पकडली .

"प्रियाला कुठे ठेवलेस सांग ?"

डॅनियल आणखीन दिलीप शेखरचचे हे रूप पाहून घाबरले.

"सर आम्हाला खरंच माहिती नाही. "

"तुम्ही खोटे बोलू नका नाहीतर गाठ माझ्याशी आहे. खरे काय ते सांगा. प्रिया कुठे आहे ?"

"नाही सर. आम्ही आमच्या रोजी रोटी ची कसम घेऊन सांगतो आम्हाला नाही माहित आणि असले घाणेरडे काम आम्ही नाही करणार. "
दिलीप म्हणाला.

त्यांच्या खरेपणावर शेखरचा विश्वास बसला.
पण प्रिया कुठे गेली? तिला कोणी नेले? त्याला काहीच कळत नव्हते.

"इथून तुम्ही तिला जाताना पाहिले का? किंवा कोणी तिला किडनॅप करून नेताना पाहिले का ?"

"नाही सर. आम्ही केव्हापासून इथे गेटजवळच उभे आहोत इथून कोणीच गेले नाही. "

शेखर ने विचार केला आणि तो लागलीच रिसेप्शनिस्टकडे धावत गेला.

"इथून बाहेर जायला दुसरा गेट आहे का?"

"हो सर. मागून आहे ."

"मला मागच्या गेटचे सीसीटीव्ही फुटेज पहायचे आहे."

रिसेप्शन ने त्याला एका रूममध्ये नेले तिथे त्यांनी मॉनिटरवर सीसीटीव्ही फुटेज चेक केले.

त्यात दिसून आले की दोन माणसे प्रियाचे तोंड दाबून तिला गाडीत भरून नेत आहेत.

"ही माणसे... ह्यांना तुम्ही कधी आधी पाहिले होते का ?"

"सर मी इथला लोकल नाहीये. मी दोनच दिवसापूर्वी जॉईन झालो. पण इथल्या माणसांना विचारून आपण माहिती काढू शकतो."

रिसेप्शनिस्टने तिथे काम करत असलेल्या एक दोन जणांना बोलवून घेतले आणि त्यांनी सीसीटीव्ही मध्ये नीट निरखून पाहिले आणि ते लगेच म्हणाले,

"मन्या आणि अली आहे...पुढे टपरी चाळीत राहतात. "

"लई बेकार माणसे आहेत ही..."

"तुम्ही दोघे मला रस्ता दाखवाल."
शेखरने विचारले.

"साहेब आम्ही लांबून दाखवू पुढचे तुम्ही पाहून घ्या...त्यांच्याकडे खूप डेंजर हत्यारे असतात. "

"मला तिथपर्यंत रस्ता दाखवा प्लीज. "
शेखर कासावीस झाला होता.

राहुल ,अश्विन , डॅनियल आणि दीपक सुद्धा तिथे आले .
त्यांच्यामागून रागिणी आली.

"साहेब आम्ही सुद्धा तुमच्या सोबतीने येतो. "
डॅनियल म्हणाला तसे शेखरने मान हलवून स्वीकृती दिली.

"आशू पोलिसांना कॉल कर."
रागिणी रडत म्हणाली.

"हो करतो..."

राहुल शेखर आणि अश्विन आणि स्टाफची दोन माणसे शेखरच्या कारमध्ये बसले आणि डॅनियल दीपक मिहिकाची कार घेऊन त्यांच्यामागोमाग निघाले.

"साहेब...आता पाचच मिनिटानी डावीकडे गेलात की त्यांचा ठिकाणा सापडेल..बाजूला एक पानाची टपरी आहे...त्याच्या बाजूला त्यांचा अड्डा आहे.
पण आम्ही आता इथे उतरतो."

स्टाफची दोन्ही माणसे तिथे उतरली आणि शेखरने कार पुढे नेली.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना पानाची टपरी दिसली...शेखरने त्यांच्या मागेच कार थांबवली आणि धावतच निघाला. त्याच्या मागून राहुल , अश्विन, डॅनियल आणि दीपक त्या गुंडाच्या अड्ड्याजवळ आले.


शेखरने ताकदीने दारावर लाथ मारली...तसे आत असणारे चार गुंड त्यांच्या समोर आले....राहुल आणि शेखर ब्लॅक बेल्ट असल्यामुळे त्यांना गुंडांशी दोन हात करणे सोपे गेले. डॅनियलनेही त्यांचा चांगलाच समाचार घेतला...दीपक आणि अश्र्विनने आपल्या परीने हातात येईल त्या वस्तुने...कधी खुर्चीने, तर कधी लाकडी फळीने त्यांच्यावर हमला केला.


गुंडाना मारताना खोलीत मागे निपचित पडलेल्या प्रियावर शेखरचे लक्ष जात होते आणि तो अजून त्वेषाने त्यांना मारत होता...पण मध्येच त्याचे लक्ष जेव्हा प्रियाकडे गेले तेव्हा एका गुंडाने शेखरच्या अंगावर चाकू उचलला...अश्विनचे लक्ष गेले आणि त्याने शेखरला बाजूला ढकलले दुर्दैवाने चाकूचा वार त्याच्या डाव्या दंडावर झाला.


तो गुंड अश्विनवर अजून वार करणार होता पण तेवढ्यात शेखरने त्याच्या डोक्यात बाजूला असलेला टेबल आदळला आणि तो गुंड मूर्च्छित होऊन खाली पडला.
दुसऱ्या एकाला राहुल आणि डॅनियलने पकडले हे पाहून इतर दोन गुंड तिथून पळाले.


शेखर प्रिया जवळ गेला .

"प्रिया... ए प्रिया...डोळे उघड..."
तो कापऱ्या आवाजात म्हणाला.

"साहेब...त्यांना बहुतेक क्लोरोफॉर्म दिलाय...आपण त्यांना घेऊन जाऊया."
डॅनियल म्हणाला.

शेखरने तिला उचलले पण त्याआधी अश्विनच्या भळभळ वाहणाऱ्या जखमेवर त्याने आपला रुमाल बांधला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
अश्विन बद्दल त्याने किती चुकीचा समज केला होता... आज त्याच्यामुळेच शेखरचे प्राण वाचले होते.

सायरन वाजवत पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी डॅनियलने ज्या गुंडाला पकडले होते त्या गुंडाला ताब्यात घेतले.
****

सर्वजण पुन्हा रिसोर्टवर आले.
शेखरने प्रियाला रुममध्ये नेले आणि बेडवर झोपवले. रागिणी तिच्याजवळ थांबली होती.

अश्विन जख्मी असल्यामुळे शेखर आणि राहुलने त्याला बाजूच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

पकडलेल्या गुंडाच्या जबानीवरून पोलिस मिहिकाला ताब्यान घेण्यासाठी रिसॉर्टवर आले. पण शेखरने तिच्याविरुद्ध कंप्लेंट देण्यास साफ नकार दिला.

"शेखर...अरे आपण वेळेत गेलो नसतो तर त्यांनी प्रियाला मारले असते...आणि ते हिच्यामुळे..."
राहुल चिडला होता.

"हिच्यावर दया आली म्हणून नाही पण हिच्यामुळे डॅनियल आणि दिपकवर फुकट नामुष्की ओढवेल म्हणून मला तक्रार द्यायची नाही..."
शेखर म्हणाला.
मिहिका झिंगलेल्या अवस्थेत त्याला पाहत होती.

"डॅनियल आणि दीपक ही जेव्हा केव्हा शुद्धीत येईल तेव्हा हिला ताबडतोब इथून घेऊन जा. "
तिच्याकडे रागाने पाहत शेखर म्हणाला.

***

प्रियाला हळू हळू शुद्ध येत होती.
शेखर तिच्या बाजूलाच बसला होता

"शेखर.."

"शेखर...मी तुमचे जेवण इथे पाठवून देत आहे तुम्ही जेवून घ्या. "

राहुलने रागिणीला निघण्याचा इशारा केला तशी ती तिथून गेली राहुलने दार लावून घेतले.

"शेखर..."
डोळे बंद करून मान हलवित त्रासिकपणे तळमळत ती शेखरलाच आवाज देत होती.

त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला.

"मी आहे प्रिया... तुझ्याजवळच आहे...डोळे उघड. "

तिने डोळे उघडले....समोर त्याला पाहून ती उठून बसली..

"शेखर...ते गुंड...."
ती घाबरली होती..तो तिच्या जवळ सरकला तशी ती त्याला बिलगली.



क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all