भाग -४ थोडा उशीरा आला त्यसमुळे क्षमस्व ?
प्रोफाइल पिक (भाग -४ )
तिच्याशी संवाद साधून आठवडाभर झाला पण विहान च्या डोक्यातला तो विषय काही जात नव्हता शिवाय विषय इतका नाजूक होता की तो रोहीत सोडून आणखी कुठे बोलूही शकत नव्हता.
हिच्या प्रोफाईलवर तिचा डीपी कसा? या प्रश्नाचे सगळे अंदाज लावून झाले होते.
शिवाय कमाल ही होती की विशाखा म्हणाली \"हा माझाच फोटो आहे.\" हे कितपत सत्य होतं आणि त्यातली गंमत किंवा विनोदबुद्धी कुठपर्यंत होती हे देखील दोघांना कळेना.
" तिचा आणि हिचा नक्की काहीतरी संबंध आहे त्याशिवाय मला दोघींमध्ये साम्य जाणवलं का?" असं दहा वेळा रोहित ला विचारून अन सांगून झालं होतं.
विहानच्या चेहऱ्यावरती सरळ सरळ या गोष्टीचा ताण दिसून येत होता .
पण घडून गेलेल्या गोष्टींचे टेन्शन किती घेणार शिवाय तो आता भूतकाळाविषयी काहीही करू शकत नव्हता.
दहा दिवसांनंतर जेव्हा त्याला हे सगळं असह्य झालं, तेव्हा त्यांने पुन्हा एकदा प्रोफाइल पिक पाहिला तो वासवीचाच , वेगळा पण जुना फोटो होता. या साईड पोज मधे विशाखा व वासवी मधे कमालीचे साम्य होते.
विहान ने न राहवून हा मेसेज टाकला "विशाखा जी, खरं सांगाल का, डीपी ला फोटो कोणाचा?
किंवा. . . किंवा त्यांना तुम्ही ओळखता का? जर ओळखत असाल तर त्यांचा काही पत्ता तुमच्याकडे आहे का?"
"???" विशाखा.
"प्लीज कळवा, मी आतुरतेने वाट पाहतोय!"
"गुगल वरून घेतलाय फोटो? का? तुम्ही ओळखता का यांना?" विशाखा.
"म्हणजे. . . ? हो ओळखत होतो पण आता संपर्कात नाही."
"सांगाल कोण आहे?" तीच उलट.
"तुम्ही खरं सांगा ना विशाखा जी, फोटो कुठुन मिळाला?"
दुसऱ्या दिवशी सकाळी विशाखा चा मेसेज आला "विहान सर सगळच कसं मेसेंजर वरती विचारावं वाटतं तुम्हाला?"
" म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता? बोला ना !"
"बोलण्यासारखं खुप आहे पण तुम्हाला वेळ काढावा लागेल."
या उत्तराने विहान आणखीनच गोंधळून गेला.
संध्याकाळपर्यंत या मेसेजला काय उत्तर द्यावे हा विचार करत राहिला.
रात्री जेवण झाल्यावर तो आज सहजच टीव्हीचे चॅनल पुढे-मागे करत बसला होता .
अचानक एका ठिकाणी- मनिषा कोईराला आमिर खानचं गाणं लागलेलं होतं.
गाणं ऐकलं आणि जीव आत पर्यंत कासावीस झाला, का कुणास ठाऊक?
पण ती दहा-बारा वर्षं खालची अगतिकता पुन्हा निर्माण झाली.
ते गाणं होतं "चाहा है तुझको चाहूंगा हरदम ,
मरके भी दिल से ये प्यार ना होगा कम!
तेरी याद जो आती है ,
मेरे आँसू बहते है
अपना ये मिलन होगा
हरपल ये कहतें हैं!
त्या गाण्याच्या शब्दांमध्ये विहान वाहवत गेला, जणूकाही त्याचीच कथा तिथे येत होती.
"मन" हा सिनेमा त्याच्यासाठी खूप खास होता.
म्हणजे त्या दोघांसाठी . . त्याने आणि वासवीने पाहिलेला शेवटचा चित्रपट!
सिनेमाहून परतताना गमतीत ती म्हणाली पण होती "या सिनेमात कसं एक वर्ष न भेटता ते दोघे ठरवून भेटतात ना आपणही तसंच करूयात का? एक वर्षांनंतर एक दिवस ठरवून घेऊ आणि त्या तारखेला तू आणि मी भेटूया . . . कुठे रे बाबा ? हो त्या डोंगरावरच्या गणपती मंदिरात भेटूयात."
त्याने त्यावेळी ते बोलणं खूपच सहज घेतलं होतं. ती कदाचित मनातून बोलत होती.
"बस कर फिल्मी!" असं म्हणून त्याने टपली मारली होती.
दुर्दैव असं झालं.
खरंच वर्षभर दोघेजण भेटले नाहीत.
त्याने वर्षभर कसा बसा काढला तिच्याविना. यादरम्यान नोकरीही लागली होती.
वर्षभरानंतर वेड्यासारखे आठवडाभर दररोज गणपती मंदिरात चकरा मारल्या पण ती चुकूनही तिथे दिसली नाही किंवा ती कुठेच दिसली नाही.
पुन्हा तर ती शोधूनही सापडली नाही.
या सगळ्या प्रकरणाचा छडा लागलाच पाहिजे.
आता ती सापडली तरी आणि नाही सापडली तरी पण तिच्याबद्दल कळायलाच हवं, असा विचार करून त्याने जी. विशाखा ला मेसेज टाकला , "मॅडम ,मला वासवी बद्दल जाणून घ्यायचं आहे कसं ते तुम्ही सांगा , किंवा ठरवा. फोनवर बोलायच आहे."
" ते प्रत्यक्षच बोलावं लागेल!"
" चालेल . .पण मला तुमच्याशी या विषयावर बोलायचं आहे."
तिने हसलेला इमोजी टाकला.
"इतकी वर्ष तुम्हाला तीची आठवण आली नाही आणि फोटो पाहिला की आठ-दहा दिवसात इतके बेचेन झालात?"
"विशाखा जी तुम्ही सांगणार आहात का?"
"पण त्यासाठी तुम्हाला इथे यावे लागेल."
"कुठे हैदराबादला?"
"कधी येऊ ते सांगा ?"
"पुढच्या विकेंडला आणि थोडा वेळ हातात ठेवूनच या!"
"ते का ? . .मी बघतो रिझर्वेशन झालं की तुम्हाला सांगतो."
विहान रोहितशी बोलला आणि त्यांचा झालेला संवाद दाखवला.
" ठीक आहे मग जाऊन ये."
"रोहित , जाऊन ये काय रे? आपण दोघांनी जायचं आहे तू देखील ओळखतोस ना, त्यामुळे मला एकट्याला पाठवू नकोस!"
"बघ ती आहे का तिथे ? शुक्रवारी रात्री जावूयात, शनिवारी आणि रविवार दोन दिवस वेळ असतो."
"ठीक आहे . कर रिजर्वेशन पण घरी काय सांगायचं?"
" विहान माझं ठीक आहे ,माझी फॅमिली दुसरीकडे आहे पण तुला मात्र काहीतरी पक्का कारण सांगावे लागेल वहीनींना "
"कारण काय द्यावे ,दुसरं काही मला सुचत नाही ऑफिसच्या सेमिनारचं कारण योग्य राहील."
त्याने लगेचच रीजर्वेशन केलं ,विहान आणि रोहित शुक्रवारी रात्री हैदराबादला जाणार , ठरलं !
विहानचं विचार चक्र जोरात फिरू लागलं.
\" ती कशी असेल? कुठे असेल ?ती भेटेल का ?फक्त तिची माहिती मिळेल? कशी असेल पूर्वीसारखीच का बदलली असेल?
आठवणी. . . फक्त आठवणीत जुने कॉलेजचे दिवस आठवतात.
शुक्रवारी तो आणि रोहित निघाले आणि शनिवारी तिथे पोहोचले.
त्याच्याकडे जी विशाखा चा फोन नंबर देखील नव्हता.
केवळ फेसबुकच्या मेसेंजर मेसेज वरती तो दोन दिवस कोणत्या अनोळखी राज्यात, नवीन शहरात वेळ काढून आला होता.
सकाळी ते दोघे हैदराबाद च्या नामपल्ली रेल्वे स्टेशनवर उतरले.
क्रमशः
©® स्वाती बालूरकर ,सखी
दिनांक २३.०७ .२०२२
दिनांक २३.०७ .२०२२
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा