कशी नशिबाला आली, वेशीबाहेरची आळी
खेळ मांडला दैवाने, त्यात चुकली पाळी !
गर्भार देहाचा भार, कशी सोसेल ही वस्ती !
खोडेल कोंब कोणीतरी, मनी सारखी ही धास्ती
या कुंठित पोटुशीचे, कोण पुरवेल डोहाळे ?
अर्धांगिनी असते तर, झाले असते सोहळे
डोहाळ जेवणाची ओटी, कुठे आमच्या भाळी !
माहेरचे आंदण कुठले, अशी फाटकी झोळी |१|
कशी नशिबाला आली...
अवैध ठरते कूस माझी, का तर मी कलावंतीण
कोडकौतुक झाले असते, जर असते मी कुलीन
मातृत्वाची आस मनी, प्रत्येक स्त्रीची अभिलाषा
पण गणिकेच्या नशिबी, होते त्याचीही दुर्दशा
कोण पुरवणार इच्छा, स्वप्ने आसवात गाळी
रोज रातीला नव्याने, जुने कौमार्य जाळी |२|
कशी नशिबाला आली...
महिन्यागणिक वाढे, घोर आमच्या जीवाचा
वाढवावे कसे पोर , माथी कलंक वस्तीचा
झाला मुलगा करेल ,सौदा दलाल बनून
झाली मुलगी जगेल , देह बाजारी विकून
सटवाई लेख कसा , त्यांच्या लिहेल कपाळी ?
कोण ऐकवेल त्यांना, गर्भसंस्कारच्या ओळी |३|
कशी नशिबाला आली...
माज सारा पौरुषत्वाचा , का टाकता या देहावर?
फिरवून जाता मग तोंड, जबाबदारी आल्यावर ,
पापी कसा हो गर्भ माझा? देवाचेच तेही देणे
साजरे कराल का आमच्याही,आईपणाचे हे लेणे?
सन्मान आमचा कुठवर, तुडवणार पायदळी?
चिखलातले हे कमळ, कधी चढवणार राऊळी? |४|
कशी नशिबाला आली....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा