माधवीनी आधुनिक शेती करण्याचं ठरवलं आणि ती तशी तयारीला लागली, तिला वाटायचं आपण काहीतरी केलं पाहिजे आपलं जप्त केलेलं घर सोडवलं पाहिजे,
तशी ती बाबांजवळ बोलली,
" बाबा मी ठरवलं आपण शेती करून हळुहळू पैसा जमा करूया, आणि आपलं जप्त केलेलं घर सोडवूया....
पण पोरी एवढी रक्कम जमा व्हायला खूप वर्षे लागतील,
"बाबा, हे पाठवतील ना पैसे,"
"पोरी सहा महिने झाले त्यानी एकही पैसे पाठवलेले नाहीये"
खरंतर श्रीकांत जाऊन सहा महिने झाले, आणि या सहा महिन्यात त्यानी घरी एकही पैसा पाठवलेला नव्हता... माधवीने फोन केल्यावर आज पाठवतो, उद्या पाठवतो असं करून तो तिला टाळायचा...
माधवीला वाटलं कामाच्या घाईगडबडीत विसरत असेल, पाठवेल ....पण तसं काही होतच नव्हतं .
आज माधवी किचन मध्ये काहीतरी काम करत होती तितक्यात गावात राहणाऱ्या त्यांच्या बाजूच्या काटकर मावशी आणि काका दोघेही बाबांना भेटायला आले... बाबांच्या तब्येतीची विचारपूस करायला आले....
बोलण्या बोलण्यात त्यांना मावशीकडून असं कळलं की श्रीकांत एका बाईच्या नादी लागला... तसही त्याला नको ती व्यसनं आधीच होती, आता त्यात अजून भर पडली, हे ऐकताच माधवीच्या हातून चहाचा ट्रे खाली पडला, तिनी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की श्रीकांत अस काही करेल... ती स्तब्ध उभी होती, डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या...
आता कुठे थोडेपार सुखाचे क्षण आले होते तिच्या जीवनात ...बाबांचीही अवस्था खराब झाली...
माधवीने हंबरडा फोडून रडायला सुरुवात केली, बाबा डोक्याला हात लावून बसलेले, दोघांची अवस्था पाहावत नव्हती ....मावशीने कसंतरी दोघांना सावरलं आणि माधवीच्या फोन वरून तिच्या आई-बाबांना फोन लावला गावात त्यांचे कोणी नातेवाईक नसल्यामुळे इथे कोणीच मदत करणार नव्हतं, मावशीने लगेच फोन लावला.. फोन माधवीच्या बाबांनी उचलला ...
"अहो माधवीचे बाबा बोलताय का,? मी माधुरीची शेजारची मावशी बोलतेय तुम्ही माधुरीच्या आईला घेऊन लगेच तिकडे निघून या, माधवीची अवस्था पाहावत नाही आहे हो, ती आणि श्रीपतराव दोघांनाही धक्का बसलेला आहे, तुम्ही या लवकर बाकीचं सगळं नंतर सांगते एवढे बोलून फोन ठेवला.
आणि माधवीचं डोकं खांद्यावर घेऊन तिची सांत्वना करू लागली, तिच रडणं सुरूच होत...
संध्याकाळी आईबाबा पोहोचले... आईला बघताच माधवी ताडकन उठून आईला जाऊन बिलगली.... अश्रूंचा महापूर वाहायला लागला... माधवी बेभान, ढसाढसा रडायला लागली...
काहीच माहिती नसल्यामुळे आई बाबा थोडे भांबावले होते, काटकर मावशीने त्यांना सगळं सांगितलं,
" अहो काटकर बाई पण तुम्हाला कसं कळलं हे सगळं"
ताई, श्रीकांत राहतो ना त्या बिल्डिंगमध्ये माझा भाचा राहतो त्यांनी एक दोनदा एका मुलीला त्याच्या फ्लॅटवर पाहिलं, तो सांगत होता फोनवर ,
"पण ती कामासाठी पण आलेली असू शकते ना ताई" माधवी चे बाबा बोलले.
कामासाठी लोक दिवसा येतात रात्री येत नाही ...त्यानी रात्री तिला पाहिलं दोन-तीनदा....
"मलाही असंच वाटतं म्हणून सहा महिन्यापासून त्याने एकही पैसे पाठवले नाही, सगळे पैसे तिच्यावर खर्च करत असेल, "श्रीपतराव बोलले...
फोन वर चांगला बोलायचा पोरगा... पण काय माहीत होतं त्याच्या मनात काय आहे? श्रीपतरावाची लाजेने मान खाली गेली होती...
माधवी कडे बघून त्यांनी आपले अश्रू गिळले.....
कारण आता खरी गरज माधवीला होती...
रात्री सगळे जेवण न करताच झोपले... माधवीचा काही डोळ्याला डोळा लागला नाही. रात्रभर विचारात गढली होती..
लग्नानंतरचे एकएक क्षण तिच्या डोळ्यासमोर येऊ लागले, खरंतर आधीच्या आठवणी खूप बऱ्या नव्हत्या...
पण हळूहळू एकमेकांमध्ये प्रेम व्हायला लागलं होतं. म्हणजे तसं तो भासवत होता... आणि हिला खरं वाटतं होत... माधवीच्या मनात आपसूकच एक विचार आला, आपल्या बाबांनी हुंडा दिला नाही म्हणून तर श्रीकांत अस वागला नसेल....
हा विचार मनात येताच ती ताडकन उठली, आणि तिनी श्रीकांतला फोन केला, तोवर सकाळ झाल्यामुळे श्रीकांत उठला होता पण त्याने काही फोन उचलला नाही....
हिचे मन कावरा- बावरा होऊ लागले काय करू नी काय नाही...
मनाशी ठरवलं, मुंबई गाठायची.....
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा