Login

पुढील स्थानक... मृत्यू...! | भाग १

जाणून घेऊया मुंबई लोकल मधील रात्री उशिरा दोन मैत्रिणींचा मृत्यूचा प्रवास...!
पुढील स्थानक...मृत्यू...!

( सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून ह्या कथेचा कोणत्याही जीवित व्यक्ती किंवा कोणते ही स्थळ किंवा घटनांशी काही संबंध नाही. त्यामुळे ही केवळ मनोरंजन म्हणून वाचावी.)

भाग १

चर्चगेट रेल्वे स्थानक रात्री १ वाजून ४८ मिनिटे.

" शीतल, चल लवकर. ही ट्रेन सुटली तर रात्रभर इथे प्लॅटफॉर्मवर राहावं लागेल."
सलोनी ट्रेनच्या मध्यभागी असलेल्या महिलाविशेष डब्यात चढत म्हणाली.

" हो गं, चल ना आणखीन पुढे जाऊया. विरारला ही ट्रेन एक नंबर प्लॅटफॉर्मवर लागेल. मग, तेवढाच पुढे चालत जायचा त्रास वाचेल आपला."
सलोनी ट्रेनमध्ये चढून शीतलला म्हणाली.

" नको गं, ट्रेन सुटायला फक्त दोनच मिनिटे बाकी आहेत. उगाच ट्रेन निघाली तर वाट लागेल. उतरून चालू थोडं त्यात काय? चल बसू आधी, खूप थकायला झालंय."
इतकं बोलून शीतल एका शेवटच्या सीटवर जाऊन बसली आणि सलोनी तिच्या समोर जाऊन बसली.

दोघीही खिडकी जवळ बसल्या. त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन पाच बायका त्यांच्या डब्यात आधी पासून बसल्या होत्या. आज कोणास ठाऊक का, तो मधला डब्बा असेल म्हणून की, काय त्यांना त्या डब्यात पोलिस निरीक्षक दिसले नाही. पण, थकल्यामुळे आणि एकमेकींची सोबत असल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशाही दोघी लहानाच्या मोठ्या मुंबईत झालेल्या होत्या त्यामुळे कोणाला कशी वागणूक द्यायची हे त्यांना चांगलंच माहीत होतं. त्यांना ह्याची सवयच होती.

बरोबर दोन मिनिटांनी त्यांची ट्रेन तिथून निघाली. सीटवर बसून त्यांनी दोघींनी आधी पाणी पिऊन घेतलं.

" नाही यार, इतक्या उशीर पर्यंत थांबायला नाही जमत. मी सांगणार आहे सरांना घरचे ओरडतात म्हणून. रात्रीचा ट्रेनचा प्रवास नको वाटतो."
शीतल सलोनीला म्हणाली.

" हो ना यार, त्यांना समजायला हवे. पण खरं तर त्यांची पण काय चूक आपण आधी जाऊन फिरलो त्यात तो माणूस लेट भेटला म्हणून उशीर झाला. मुद्दाम थोडीच केलं आपण. रोज रोज थोडीच यावं लागणार आहे इथे. आजचा एकच दिवस, पुढे काळजी घेऊ. बाकीच्या बायका पण आहेत की, पोहोचू आपण लगेच विरारला. तू टेन्शन नको घेऊस घरचे काही नाही बोलणार. ऑफिसच काम होतं म्हणून सांगू."
सलोनी तिची समजूत काढत म्हणाली.

त्या दोघींचं ऑफीस अंधेरीला होते. पण, आज एका क्लायंटला भेटायचं म्हणून त्यानं चर्चगेटला जावं लागलं होतं. क्लायंट उशिरा भेटणार म्हणून त्यांनी तिथे फिरून घेतलं आणि मग त्यांना भेटून निघायला उशीरच झाला.

ट्रेन एक एक स्थानक घेत पुढे जात होती. त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालूच होत्या. त्यांच्या सोबत ट्रेनमध्ये आलेल्या त्या बायका एक एक करून ट्रेन मधून उतरू लागल्या.

बघता बघता अंधेरीला त्यांच्या डब्बा रिकामी झाला. पुढे बोरिवलीला कोणीच चढले नाही. बोरिवली जाऊन दहिसर आले आणि तिथे त्यांच्यापासून लांब असलेल्या गेट मधून एक बाई चढलेली शीतलला दिसली. सलोनी त्या बाजूला पाठ करून बसल्यामुळे तिला ती दिसली नाही.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all