Login

पुढील स्थानक... मृत्यू...! | भाग २

जाणून घेऊया मुंबई लोकल मधील रात्री उशिरा दोन मैत्रिणींचा मृत्यूचा प्रवास...!
भाग २

त्या बाईने सफेद साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते. दुरून तिला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. पण, त्यांच्या शिवाय आणखीन कोणी तरी त्यांच्या सोबत त्या डब्यात आहे हे समजल्यावर तिला थोडे बरे वाटले.

" पुढील स्थानक मीरा रोड."
ट्रेनमध्ये ही घोषणा झाली आणि ट्रेन दहिसरच्या प्लॅटफॉर्म वरून पुढे सरकली.

शीतल सलोनी सोबत गप्पा मारत असताना अधून मधून त्या बाईकडे बघत होती. ती त्यांच्याकडे पाठ करून बसली  असल्यामुळे शीतलला तिला नीट बघता येत नव्हते.

मग तिच्यावरून नजर हटवून शीतल खिडकीतून बाहेर बघू लागली. बाहेर सर्वत्र कुट्ट अंधार पसरला होता. त्या भागात पश्चिमेच्या बाजूला काहीच वस्ती नसल्यामुळे तिथे सर्वत्र संपूर्ण अंधार पसरला होता. आता त्यांना हळू हळू वातावरणात गारवा जाणवू लागला. गारवा इतका वाढला की, शीतलने खिडकी बंद करून घेतली आणि तिने एक नजर पुन्हा त्या बाईकडे पाहिले आणि ती जोरात किंचाळली. ती किंचाळताच अचानक ट्रेन मधील light गेली आणि त्यांची ट्रेन जागीच थांबली.

शीतल अचानक इतक्या जोरात किंचाळ्यामुळे सलोनी देखील घाबरली. ती घाबरून तिला काय झाल्याचं विचारू लागली. आधीच लाईट गेल्यामुळे ती गोंधळली होती. काय करावे तिला समजत नव्हते.

" त... ती... बघते आपल्याकडे. सलोनी ती घेऊन जाईल आपल्याला चल इथून, उठ लवकर."
शीतल सलोनीला घाबरत म्हणाली.

" कोण ती? कोणाबद्दल बोलतेस तू? शीतल एक माझं. आपल्या शिवाय कोणी नाही ह्या डब्यात. तुला भास होत आहे. तू बस खाली आधी."
सलोनी तिची समजूत काढत म्हणाली.

शीतल उठून तिथून अंधारात निघायला लागली. तेव्हा अचानक ट्रेनची लाईट लागली आणि तिचे पाय जागीच थिजले. ती स्तब्ध होऊन भीतीदायक नजरेने समोर पाहू लागली. तिला तशी बघून सलोनी देखील, ती नक्की कुठे आणि काय पाहत आहे हे बघण्यासाठी हळू हळू मागे फिरली. मागे फिरून ती भीतीने दचकून मागे झाली.

आता तिला देखील ती बाई दिसत होती. ती आता आणखीन पुढे आली होती आता ती त्यांच्या जवळच्या गेट जवळ उभी होती. ती त्या दोघींकडे रागीट लाल भडक डोळ्यांनी एकटक बघत होती. वाऱ्याने तिचे मोकळे केस उडत होते.

कोणी काही बोलणार करणार इतक्यात पुन्हा एकदा ट्रेनची लाईट गेली आणि ह्यावेळेस त्या दोघीही जोरात किंचाळून एकमेकांना मिठी मारून तश्याच घाबरून रडत सीटवर बसल्या.

पुढच्या काहीक क्षणात पुन्हा ट्रेनची लाईट आली तेव्हा त्यांनी समोर बघितले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती बाई आठवताना अगदी त्यांच्या समोरच्या सीटवर बसलेली दिसली.

समोर बसून ती त्यांच्याकडे रागाने बघत घुरघुरू लागली. त्या दोघींना भीतीने आता काहीच सुचत नव्हते. त्या तिच्याकडे त्यांना सोडण्यासाठी रडत रडत हात जोडून विनवण्या करू लागल्या. तेव्हाच त्यांना ट्रेनमध्ये पुन्हा एक घोषणा ऐकू आली.

" पुढील स्थानक... मृत्यू... शेवटचे स्थानक मृत्यू..."

आणि पुन्हा ट्रेनची लाईट गेली आणि त्या किर्र... काळोखात त्या दोघींच्या किंचाळ्या घुमल्या. शेवटी ती ट्रेन विरारला प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाऊन थांबली. पण त्या डब्यातून कोणीच खाली उतरले नाहीत.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all