भाग ३
त्यांना यायला बराच उशीर झाला म्हणून त्यांच्या घरचे  त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्या फोन उचलत नव्हत्या. त्यांनी रात्रीच त्यांचा शोध सुरू केला. शेवटी पहाट होण्याआधी त्यांनी पोलिसात जाऊन त्या हरवल्याची तक्रार दाखल केली. 
पोलिसांनी त्यांचं शोध कार्य सुरू केलं. त्यांनी त्या दोन्ही मुलींचे फोन ट्रॅक केले. त्यांना त्यांच्या फोनचा सिग्नल मीरा रोड पश्चिम भागातून येत होता.
पोलिसांची टीम लगेचच त्या सिग्नलच्या दिशेने जाऊ लागले. ते मीरा रोड स्थानकावरून ओसाड असलेल्या जमिनीवर त्यांच्या फोनच्या सिग्नलचा दिशेने जाऊ लागले. 
थोडं अंतर पार केल्यावर त्यांना वाटेत एक खराब चिखलाचे डबके लागले. त्यात त्यांना काही तरी तरंगताना दिसले. त्यांनी लगेच त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना त्या डबक्यात दोन प्रेतं असल्याचे समजले. त्यांनी ते बाहेर काढल्यावर समजले की, ते दोन मुलांचे प्रेतं होते. 
अजून तरी त्यांना त्या दोघी सापडल्या नव्हत्या. पण, ते दोन प्रेतं बघून पोलिसांसोबत असलेले त्या दोघींच्या घरचे घाबरून गेले. त्यांना त्या दोघींचा फोनचा सिग्नल तिथेच आणखीन पुढे दाखवत होता. त्यांच्या सोबत दोन पोलिसांचे कुत्रे देखील होते. ते वास घेत सगळ्यांच्या पुढे पुढे धावत होते. 
पुढे जाऊन ते एका झाडी जवळ जाऊन जोरजोरात भुंकू लागले. सगळे धावतच त्या झाडी जवळ गेले आणि त्यांनी त्या मागे पाहिले तर तिथे त्या दोघी त्यांना बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या सापडल्या. 
त्यांनी त्या दोघींना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्या शुद्धीवर आल्या. पण त्यांना शुद्धीवर आणताना तिथे त्या भागात सगळ्यांना कसला तरी कुबट वास येत असल्याचं जाणवू लागलं. आणि मग त्यांना दिसलं की, त्यांच्या सोबत असलेले कुत्रे त्या झाडीत आणखीन आत एका ठिकाणी जाऊन जोरजोरात भुंकत होते. 
पोलिसांची टीम धावतच तिथे गेली आणि तिथे पोहोचून तर थक्क झाले. तिथे त्यांना एका बाईचे प्रेत विचित्र अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी लगेच ते झाकले आणि त्यांची पुढील कारवाही सुरू केली. 
त्या दोघींना सगळे हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. त्यांना बरं वाटल्यावर पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. त्यांच्या कडून त्यांना समजले की, काही दिवसांपूर्वी त्या दोघी अश्याच ट्रेन मधून रात्री उशिरा प्रवास करत असताना त्यांना दिसले की, दहिसरला ती बाई ट्रेनमध्ये चढली तिच्या मागून दोन मुलं देखील चढले. मग ट्रेन सुरू झाल्यावर ते तिच्या सोबत जबरदस्ती करू लागले. त्यातील एकाने तिच्या डोक्यावर जोराचा वार केल्यामुळे ती बेशुद्ध पडली.
मग त्यांनी ट्रेनची चैन ओढून ट्रेन थांबवली आणि ते तिला ह्याच ठिकाणी घेऊन उतरले. जाताना त्यांनी त्या दोघींना धमकी देऊन गप्पं राहायला सांगितलं. त्या दोघी भीती पोटी गप्पं राहिल्या. त्यांच्या मनात असून देखील त्या काही करू नाही शकल्या कारण त्यांच्याकडे धार धार शस्त्र होते. 
पण शेवटी तिनेच परत येऊन तिचा बदला घेतला. पण तरी मृत शरीरावर अंत्यसंस्कार न झाल्यामुळे तिने ह्या दोघींची मदत घेतली. तिला खरं तर त्या दोघींना देखील मारायचे होते पण शेवटी तिला त्यांच्यावर दया आली. ती देखील एक स्त्रीच होती. तिला त्यांच्या मनातील भीती समजली होती. त्या दोघा मुलांना मारून तिचा बदला पूर्ण झाला होता. पण ह्या दोघींचा वापर करून तिने तिचा स्वतःचा आणि तिच्या सोबत झालेल्या अत्याचाराचा शोध करून दिला. 
तिचे ह्या जगात कोणीच नव्हते. ती एकटी बाई कमवून खात होती. शेवटी आपल्या चुकीचा पश्चाताप म्हणून शीतल आणि सलोनीने तिच्यावर अंत्यसंस्कार करून तिची माफी मागून तिला मुक्ती मिळवून दिली. 
त्या घटनेत त्या दोघींची चुक नसताना सुद्धा त्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागला म्हणून जाताना त्या बाईने देखील फक्त त्या दोघींनाच दिसून तिने त्यांची माफी मागितली.
समाप्त.
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा