भाग २
दोन तीन तासात सगळी तयारी पूर्ण झाली. सगळ्या ब्यागा खाऊसकट जागी लावल्या गेल्या. गणपती आजच पोचवून वरदला निघायचं होतं. आज दहा वर्षांनी त्याला गणपतीला यायला फावलं होतं. धाकटा नीरद बेंगळुरूला होता. माईचे म्हणजे आपल्या कथानायिका सुनयना साने यांचे दोन मुलगे. वरद आणि नीरद. आणि एक मुलगी नयना. लग्नानंतर पाच वर्षं नवससायास करून आणि शेवटी घरच्या गणपतीला कौल लावून कौतुकाचा थोरला वरद झाला आणि माईचा जीव सुपाएवढा झाला. मग मात्र पाठोपाठ दोन वर्षांत नीरद आणि पुढच्या तीन वर्षांत नयना. माईचं सुख ओसंडून वाहत होतं. सुहासराव आणि माई घरातले मोठे. माई लग्न होऊन घरात आली तेव्हा घरात सासू सासरे आणि सुहासरावांपेक्षा धाकटे तीन भाऊ होते. त्या घरात मुलगी नाही म्हणून की काय त्यांनी वहिनी म्हणण्याऐवजी सुनयनाला माई अशीच हाक मारायला सुरुवात केली. आणि मग ती अख्ख्या गावाची माईवैनी झाली. पुढे पुढे तर अगदी सुहासराव सुद्धा त्यांचा उल्लेख 'अहो माई' असा करीत. सुहासराव ऊर्फ आप्पांची गावातलीच नोकरी आणि जोडीला नारळाची बाग, भातशेती, गुरढोरं सगळं गडगंज होतं. त्यामुळे कष्ट करावे लागले तरी वैभव मात्र भरपूर येत होतं. माईही हौसेने गावातल्या शाळेत शिकवायला जाऊ लागली. बाकीचे भाऊ हळूहळू वेगळे झाले. सासूसासऱ्यांनी समाधानाने डोळे मिटले.
काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. आप्पा माईंची तिन्ही मुलं गुणी निघाली. वरदने पहिल्यापासूनच परदेशी स्थायिक व्हायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे त्याने पंचविशीच्या आतच अमेरिका गाठली. सुरवातीला खूप कॉन्टॅक्ट ठेवायचा तो. माईंनी वरमाय म्हणून मिरवण्याची स्वप्न पहायला सुरुवातही केली होती. अत्युच्च शिक्षण घेऊन परदेशी गेलेला गावातला तो पहिलाच मुलगा. त्यामुळे स्थळांची रांग लागली होती. पण पुढच्या वर्षी तो येतानाच पाहुणे म्हणून घेऊन आला तो एका मुलीला आणि तिच्या कुटुंबाला. उत्तर भारतीय वामिका शर्मा आणि तिचं ते उच्चभ्रू कुटुंब! वडिलांचा मुंबईतच व्यवसाय असल्यामुळे मुलगी तिथेच वाढलेली आणि आता अमेरिकेत वरदच्याच कंपनीत जॉब करणारी. ती मराठी व्यवस्थित बोलणारी होती हीच काय ती जमेची बाजू. त्याच्या लग्नात खूप हौस करू म्हणणाऱ्या माई हिरमुसूनच गेल्या एकदम. तुटक वागत राहिल्या. ती मंडळी आली कधी, लग्न ठरलं कधी आणि झालं कधी याचं त्यांना भानच नव्हतं. आप्पा विचारत राहिले,
"अहो, त्यांच्यात खूप द्यायची पद्धत आहे. सगळ्यांचे डोळे दिपतील असा खर्च केलाय त्यांनी. कुणीही केला नसता एवढा मानपान केला तुमचा. आणि फक्त तुमचाच नव्हे तर सगळ्या कुटुंबाचा. चारी भाऊ, भावजया, पुतणे सगळ्यांचं यथायोग्य केलं. तुम्हाला आणखी काय हवं? तसंही आपल्याला काय कमी आहे तर तुम्हाला काही उणं वाटावं?"
"माझं काही म्हणणंच नाही हो. पण आईवडिलांना विचारायची काही पद्धत असते की नाही? सगळं ठरवून झाल्यानंतर नुसता देखावा करण्यासाठी यायचं. तिकडून एवढे फोन होतात. तर फोनवर तरी बोलू शकला असता की नाही? आणि एवढीच जर भीती वाटत होती बोलायची तर परस्पर इथे सगळ्यांना घेऊन येताना नाही वाटली भीती?"
नाही म्हटलं तरी नवराबायकोचे वाद झालेच. त्यात लग्न झाल्या झाल्या लगेचच वरद अमेरिकेला गेला. नंतर नंतर त्याचं येणं लांबू लागलं. नात झाल्याचं,मग नातू झाल्याचंही माईला लांबूनच कळलं. नंतर फोटो आले. मग गावात बरं नेटवर्क आलं तसे माईआप्पांकडे स्मार्टफोन्सही आले. आप्पा हुशार होते. त्यांनी चातुर्याने नातं सांभाळलं. माईंची समजूत काढली. आणि नातवंडं पाहून त्यांचा रागही निवळला. तोपर्यंत दुसऱ्या नीरदचंही लव्ह मॅरेज झालं आणि त्याने कर्नाटकात असताना तिथलीच मुलगी केली. हा दुसरा धक्का होता. पण एव्हाना माई तयार झाल्या होत्या. नयनला तर त्यांनी स्पष्ट विचारूनच तिचं लग्न ठरवलं होतं. पण तिने आईबाबांच्या पसंतीनेच लग्न केलं. तिचे यजमान मिलिटरीमन असल्याने हल्ली तिच्या भेटीही कमीच होत. मग वर्षांतून एकदा तिन्ही भावंडं एकत्र येत. वरद नसला तरी नीरद आणि नयन कुटुंबासहित येत. घराचं गोकुळ होऊन जायचं. त्यात आप्पा माई समाधानी होते. अशाच एका कौटुंबिक सोहळ्याच्या एका रात्री आप्पा झोपले ते दुसऱ्या दिवशी उठलेच नाहीत.
(क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा