Login

पुनरागमनायच

काळाशी जुळवून घेताना नात्यांच्या संदर्भात होणारे बदल आणि होणारी सुसूत्र भावनिक गुंफण
भाग-१
"रामराया रेऽऽ पांडुरंगाऽऽ" करत गुडघ्यांवर रेटा देत माई उठली. गुडघे आताशी जास्तच कुरकुरायला लागले होते तिचे. खिडकीची अर्धवट उघडलेली झडप तिनं पूर्ण उघडून सरशी केली. आज गौरी गणपती जाणार होते. आणि माईला दोन तासात आपली तयारी पूर्ण करायची होती. माईची सून, मुलगा, नातवंडं आपापल्या ब्यागा कारच्या डिकीत टाकायला चढाओढीने पळत होती. इकडे माई राघवदास लाडू, करंज्या, तळलेले मोदक, चिवडा, चटण्या, मेतकूट, वेसवार यांच्या साटल्यामोटल्या भराभर नेटकेपणाने बांधून बाजूला करत होती.. हातासरशी केलेला थोडा ताजा खवाही भरला तिनं.
"अगं किती देशील माई? पंधरा किलोच्या वरचं सामान नेताही येत नाही. आणि तिथे आता इंडियन स्टोअर्स आहेत सगळं सामान मिळतं अगं!" दुसरं वाक्य बोलताना नाही म्हटलं तरी वरदचा आवाज आपसूकच थोडा मऊ आला कारण माईने त्याच्याकडे डोळे वटारून बघितलं आणि स्पष्टीकरण दिलं.
"तुझ्यासाठी कोण देताय? तुला किती किंमत आहे ती माहितीच आहे मला. हे मी माझ्या नातवांसाठी देतेय. तेवढेच आजीच्या हातची चव जिभेवर राहिली तर भारताचा एखादा तुकडा मनात राहील. नाहीतर मग आहेच अमेरिकानू..."
हा सगळा प्रकार पाहणारी आणि मायलेकाचे शेरे ताशेरे ऐकणारी वामिका मनातल्या मनातच उद्गारली. देतात तर ह्या मुलासाठीच. कारण नातवंडांना भारतीय चवीची कितीशी सवय राहिलीय हे त्यांना कुठे ठाऊक आहे? आपलं न्यायचं सगळं. आपल्यालाही त्या निमित्ताने चांगलंचुंगलं खायला मिळतं हे तर खरं. तेवढ्यात तिच्या कानावर पडलं.
"इथे राहणारी असतात तर अगदी दर पंधरा दिवशी पोस्टाने पार्सलं पाठवली असती हो तुम्हाला खाऊची! पण आता इतक्या लांब कसं पाठवणार सारखं? तरी शक्य होईल तेवढं बघते. तिकडे पोरांना कोण ओळख करून देणार या भारतीय चवींची? गोमूत्राच्या वासाच्या म्याग्या आणि पास्ते! का कोण जाणे पण वामिकाला हे वाक्य झोंबलं. कोण ओळख करून देणार म्हणजे? मी सुद्धा तिथे यांच्या लेकाइतकीच मेहनत करते. जास्तच करते. मी सुद्धा उच्चपदस्थ आहे. तरीही सगळ्या गोष्टी बायकोने बिनपगारी फुकट करून द्याव्यात ही भारतीय नवऱ्यांची सवय काही जात नाही. त्यामुळे घरदार सगळे फ्रंट मी एकटीने सांभाळायचे. यांना हजार वेळा सांगितलं की तुम्ही तिथे आमच्याबरोबर चला आणि काय तुमच्या चवींची ओळख करून द्यायची ती नातवंडांनाच काय अख्ख्या तिथल्या इंडियन कम्युनिटीला करून द्या. पण यांचा आपला नेहमीचाच हेकटपणा! माझं काय व्हायचं ते इथेच होईल. तिकडच्या थडग्यापेक्षा इकडची लाकडं बरी! वामिका मनाशीच बडबडत होती आणि एकीकडे भराभर सामानाची आवराआवर करीत होती. आज तरी वरदचं म्हणणं माई ऐकणारेत का नाही ते त्या विघ्नहर्त्यालाच ठाऊक हा विचार तिच्या मनात येऊन गेला.
(क्रमशः)
0

🎭 Series Post

View all