Login

पुनरागमनायच- भाग-३

माई पुढे आता काय करायचं ठरवणार? जाणार का मुलांकडे?
भाग ३


घरात हलकल्लोळ उडाला. नशिबाने नीरद आणि नयन कुटुंबासहित हजर होते. वरदला अचानक येणं अशक्य होतं. त्यामुळे शेवटी नीरदनेच आप्पांचं सगळं उत्तरकार्य पार पाडलं. माईंची तर असून नसल्यासारखी अवस्था होती. दहा बारा दिवस त्या निपचित पडून होत्या. नवरा गेल्याचं दुःख सुद्धा जेवढं नसेल तेवढं जास्त दुःख त्यांना वरद येऊ न शकल्याचं होतं. थोरल्या मुलावर जास्त जीव असणं हे स्वाभाविक जरी असलं तरीही धाकटीला ते स्पष्ट जाणवलं होतं. आब राखून ती नवऱ्याला एकटं गाठून बोलली.

"नीरद इथे आपण सगळं करूनही आठवण मात्र दादांचीच निघतेय. आपणही कुणीतरी आहोत की नाही? नाही म्हणजे त्या दुःखात आहेत. वाईट आपल्यालाही वाटतंय. पण..."

"नीरजा अगं तिने आमच्यात भेदभाव नाही केला कधी. दादा लांब आहे. आम्ही दोघं यावेळी जवळच आहोत. आधार वाटतो हवासा यावेळी. चूक आहे का त्यात?"

"आधार हवासा वाटतो मान्यच आहे. पण म्हणून माणसानं पक्षपाती का व्हावं? मला सगळं कळतं. दादा आणि वामिकावहिनी येतात तेव्हा किती ती कौतुकं? आपणही लांब रहातो. महाराष्ट्राबाहेरच असतो. कधीतरीच येतो. यांना खूपवेळा बेंगळुरूला नेतो आग्रहाने...."

"नीरजा...."
नीरदचा स्वर चढला आणि नीरजाने रागाने हात झटकले आणि ती कामाला लागली. छोट्या विद्युतने हाक मारल्यावर ती सगळं विसरून "ओ ले राजा" करत धावली..ते सगळं पहाणाऱ्या नयनच्या मनात आलं की स्वतःच्या मुलांविषयी काय वाटतं ते नीरजावहिनीला कळतंय पण वळत नाही. असो. आपण माहेरवाशीण. यात जास्त पडायचं नाही असं तिने स्वतःला बजावलं. पण माईची समजूत काढली पाहिजे एकदा. सुनांच्या मनात एकदा अढी पडली की कुटुंब मोडणं अटळ असतं हे मनाशी घोळवीत ती जेवणाचं ताट घेऊन माईच्या खोलीत गेली.
"आई ऊठ गं. थोडं खाऊन घे ना. अगं आप्पांना काय वाटलं असतं गं तुला अशी उपाशी पोटी राहिलेली बघून?" या प्रश्नासरशी माई गदगदून रडायला लागली. आपल्या आईचा तो अस्ताव्यस्त कसातरी अवतार बघून नयनलाही भडभडून आलं. आजवर टापटिपीने शिस्तीत राहणाऱ्या सुरेख माई म्हणजे अगदी आदर्श भारतीय स्त्री होत्या. वैधव्य किती त्रासदायक ठरतं. तिच्या मनात आलं. कसंबसं समजावून माईला चार घास भरवण्यात ती यशस्वी झाली.
आप्पांचं सगळं झाल्यावर आता महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे माईचं काय? नीरद, नीरजा नयन आणि जावईबापू योगेशनेही पुष्कळ समजावलं माईंना. पण माई कुणाकडेच जायला तयार झाली नाही. माईंची लाडकी चार नातवंडंही तिच्याभोवती जमली. छोट्या विद्युत आणि पृथाने माईला आपल्यासोबत हिमाचलमध्ये न्यायचा हट्ट केला. तर रीता आणि वैशाखचं म्हणणं आजी आपल्यासोबत बेंगळुरूला येऊदेत असं होतं. नातवंडांपुढे माई हरत आली होती. भरल्या गळ्याने ती एवढंच म्हणू शकली की
"सोन्यानो इतके दिवस आजोबा माझ्यासोबत होते तेव्हा आम्ही येत होतो. आता घराला कुलूप घातलं तर तुम्ही आल्यावर तुमचं स्वागत कोण करील? तुम्हाला छान छान खाऊ हवा. चुलीशी बसायला हवं. बागेत फिरायला हवं तर हे राखलं पाहिजे ना? मी इथेच राहत्ये. तुम्हीच येत जा अधनंमधनं. म्हणजे मला म्हातारीला सोबत. अगदी होईनासं झालं की यायचीच आहे मग ही म्हातारी सेवा करून घ्यायला!"
हसतहसत माई म्हणाली. नातवंडांच्या घोळक्यात हसणारी माई बघून सर्वांनाच बरं वाटलं. जड मनाने माईला घरातच सोडून सगळीजणं निघाली आणि वरदचा फोन आला.
(क्रमशः)
0

🎭 Series Post

View all