Login

पुनर्विवाह..

आगळी वेगळी प्रेम कथा
स्वामिनी तिचं ऑफीस सुटल्यावर एकटीच कॉफी शॉप मध्ये आली होती. कित्येक दिवस मनात चाललेला विचारांचा गुंता तिला आज सोडवायचाच होता. दिनेशला दिलेले वचन तिने प्राणपणाने जपले होते, त्याच्या कॅन्सरच्या शेवटच्या आजारपणात कायम आईंची काळजी घेईन असं तिने वचन दिलं नि आजतागायत जपलं होतं. तरीही परवा अमितने लग्नासाठी विचारताच त्याला नाही म्हणणं तिला जड जात होतं. स्वामिनी विचारात हरवली होती...का होतंय असं? मी गुंतले अमितमध्ये तर दिनेशच्या आईंकडे कोण पाहणार?आणि हे माझं द्वंद्व न सांगता अमितला कसं कळतं ? माझ्या मनात होकार आहे पण आईंमुळे नकार देत आहे मी हे कसं ओळखलं त्याने? किती विचार करतो माझा...अर्धांगवायूने विकलांग सासूला सोडणं तिला शक्यच नव्हतं कारण तिच्या दिनेशला अनाथ आश्रमातून आणून त्यांनी सांभाळलं होतं नि आता त्यांना वृद्धाश्रमात ठेऊन लग्न करणं तिला शक्यच नव्हतं. आताही याच विचारात समोरची कॉफी थंड होऊन गेली होती. तितक्यात तिला शोधत अमित येताना दिसला. आपण आधीच्या सासूला सोडू शकत नाही हे कालच स्पष्टसांगितलं होतं तिने त्याला. त्याने आल्या आल्या म्हटलं,
'ज्या व्यक्तीचा इतका विचार करतेयस ना तिच्या सकट तुला स्वीकारायला तयार आहे मी आणि माझी आई सुद्धा!'आश्चर्याने डोळे मोठे करून ती पहातच राहिली त्याच्याकडे...कसं शक्य आहे? स्वतःच्या मुलाने विधवेशी लग्न करणं आणि ते ही तिला तिच्या आधीच्या सासू सकट स्वीकारण्याची तयारी असणं, कसं शक्य आहे? तो म्हणाला, आश्चर्य वाटतंय ना? पण माझी आई म्हणाली..'जी मुलगी आपल्या नवऱ्याच्या आईचा स्वतःच्या सुखापेक्षा जास्त विचार करते ती उद्या तुझ्या लग्नानंतर माझाही करेलच. आणिक परीक्षा ती कोणती घ्यायची?' आणि हे ऐकताच नकळत स्वामिनीनेही होणाऱ्या सासूला पाहण्या आधीच पसंत केले नि अमितची अमिता होऊन गेली.