Login

पुन्हा बरसला श्रावण.. भाग ९

ही कथा आहे एका ईश्वरीची.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका मुलीची.. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेल्या एका विरांगणेची.. ही कथा आहे पुन्हा बरसणाऱ्या एका श्रावणाची.. श्रावणाच्या ओढीने तळमळणाऱ्या एका विरहिणीची..

पुन्हा बरसला श्रावण..


भाग ९


अनघाच्या मागचा वनवास संपला नव्हता. विनायकचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. तो जाणूनबुजून तिला त्रास देत होता. बायकोला ताब्यात ठेवणं यातच त्याला त्याचा पुरुषार्थ वाटत होता. अनघाला तिच्या आईबाबांची, माईंची, घरातल्या लहानग्या मंडळींची खूप आठवण यायची. भरलेलं घर सोडून इथे एकटं राहून तीही कंटाळली होती. त्यात भर म्हणून विनायकचं बोलणं, टोमणे, मार सुरूच होतं. अनघाला आता ते सारं सवयीचं झालं होतं. एवढा त्रास असूनही तिने कधीही आपल्या नवऱ्याविरुद्ध तोंडातून ब्र शब्दही काढला नव्हता. आपलं दुखणं कोणासमोरही गायलं नव्हतं. सारे आपल्याच नशिबाचे भोग मानून ती सहन करत होती. 

आणि एक दिवस अनघाच्या आयुष्यात सुखाने पहिलं पाऊल टाकलं. नेहमीप्रमाणे कल्याणी सकाळची सर्व कामं उरकून भाजी आणण्यासाठी बाजारात निघाली. जाता जाता तिचं लक्ष अनघाच्या घराकडे गेलं.

“आज सूर्य डोईवर आला तरी अनघा वहिनीने दार उघडलेलं दिसत नाही. का बरं? सकाळपासून एकदाही त्या बाहेर कशा दिसल्या नाहीत? एव्हाना तर त्यांची सगळी कामं उरकलेली असतात. दोरीवर कपडेही वाळत टाकलेले दिसत नाहीत. सगळं ठीक असेल ना?”

कल्याणीच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. ती लगेच अनघाच्या घरी आली. तिने दार ठोठावलं. अनघाने दार उघडलं. समोर अनघा उभी होती. तिचा कोमेजलेला चेहरा, विस्कटलेले केस, तारठलेले डोळे पाहून कल्याणी घाबरून गेली.

“काय झालं वहिनी? अश्या काय दिसताय? बरं वाटत नाहीये का?”

तिने काळजीने विचारलं. 

“होय ओ ताई.. सकाळपासून थोडं गरगरतंय. आणि उलट्याही झाल्यात.. पित्त झालं असेल कदाचित. लिंबूपाणी घेते बरं वाटेल.”

अनघाने तिला उत्तर दिलं.

“नाही.. नाही वहिनी, असं अंगावर नका काढू. अजून जास्त त्रास होण्यापेक्षा आपण डॉक्टरकडे जाऊ. चला मी तुम्हाला घेऊन जाते.”

अनघाला बरं वाटत नव्हतं. अनघा नको नको म्हणत असताना कल्याणी जबरदस्तीने तिला सरकारी दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी अनघाला तपासलं. काही गोष्टींची चौकशी केली. काही चाचण्या केल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

“अभिनंदन मिसेस देशमुख, तुम्ही आई होणार आहात.”

डॉक्टरांचे शब्द अनघाच्या कानावर पडले आणि दुसऱ्या क्षणी तिचा चेहरा आनंदाने भरून गेला. निसर्गाने संकेत दिला होता. अनघाला मातृत्वाची चाहूल लागली. प्रेमाचं प्रतीक नसलं तरी आईपणाच्या भावनेने ती मोहरली. दुःखाच्या आभाळाला सुखाची किनार मिळावी. ग्रीष्मात पावसाची एक सर यावी अगदी तसं झालं होतं तिला. तिच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. अनघाची गोड बातमी ऐकून कल्याणीलाही खूप आनंद झाला. तिने आनंदाने अनघाला घट्ट मिठी मारली.

“वहिनी, खूप अभिनंदन हो.. आता सगळं ठीक होईल बघा. घरात बाळ आलं की विनायक दादा नक्की सुधारतील.”

कल्याणीच्या बोलण्याने अनघाच्या मनाला उभारी मिळाली.

“बाळाच्या जन्माने नक्कीच परिस्थिती बदलेल. हे नक्कीच चांगले वागू लागतील. हा त्यांचाही बाप होण्याचा प्रवास असेल त्यामुळे ते नक्कीच जबाबदारीने वागतील..”

अनघा स्वतःच्याच विचारांनी हुरळून गेली. तिच्या मनाने कौल दिला. मनाला आशेचे पंख फुटू लागले. घरी येताच तिने विनायकला ही आनंदाची बातमी सांगितली पण पुन्हा एकदा तिच्या पदरी निराशाच पडली  कारण तिचं बोलणं ऐकून घेण्यासाठी विनायक शुद्धीतच नव्हता. ना त्याला आपण बाप होणार याचा आनंद होता की ना त्याला अनघाचं कौतुक होतं. तो त्याच्याच दुनियेत रममाण होता. 

दिवस सरत होते. अनघा अजूनच छान दिसू लागली होती. देहामध्ये बदल घडत होते. गरोदरपणाचं रूप अजूनच खुलून आलं होतं. अनघाला सातवा महिना सुरू झाला होता. कल्याणी तिचे डोहाळे पूरवत होती. तिची काळजी घेत होती. कल्याणीने शेजारच्या बायकांना गोळा करून तिचं ओटीभरण केलं. त्यांना अल्पोपहार देऊन अनघाच्या डोहाळजेवणाचा आनंद तिला दिला होता. तशा विचित्र प्रतिकूल परिस्थितीतही कल्याणी तिला आनंद देण्याचा प्रयत्न करत होती.

अनघाची ही गोड बातमी देशमुखवाड्यात पोहचली. देशमुखवाड्यात आनंदाची लहर पसरली. निंबाळकरांनाही कळवण्यात आलं. विश्वासराव आपण आजोबा होणार या कल्पनेने आनंदून गेले. अनघाच्या आईला तर तिच्यासाठी काय करू काय नको असं झालं होतं. आकाश ठेंगणं झालं होतं. आपल्या लाडक्या मुलीमुळे आजी आजोबा होण्याचं सुख त्यांना लाभणार होतं. एक दिवस विश्वासराव त्यांच्या खोलीत आराम करत बसले होते. अनघाची आई खोलीत येत म्हणाली, 

“अहो, ऐकलंत का? मी काय म्हणत होते.. आता अनघाचे दिवस भरत आले असतील. आता तिला माहेरी घेऊन यायला हवं.. अहो हे तिचं पहिलं बाळंतपण आणि रितीप्रमाणे पहिलं बाळंतपण हे मुलीच्या माहेरीच व्हायला हवं. तुम्ही जा बरं.. अनघाला इकडे घेऊन या.. राहील निवांत.. इथे आली की कामाची जास्त दगदग होणार नाही आणि खरं सांगू.! मलाही तिची खूप आठवण येतेय बघा..खूप दिवस झालेत ओ, पोरीला डोळे भरून पाहून. आणि खरंतर याच दिवसात तिला तिच्या आईची, माझी जास्त गरज आहे. आईशिवाय कोण डोहाळे पुरवणार तिचे?”

अनघाच्या आजींनीही आईच्या बोलण्याला दुजोरा दिला. विश्वासरावांनाही अनघाच्या आईचं म्हणणं पटलं आणि ते म्हणाले.

“ठीक आहे.. मी उद्याच अनघाच्या सासरी जातो. आप्पासाहेब विनायकरावांच्या घरी मुंबईला येणार असतील तर त्यांनाही सोबत घेऊन जातो आणि तिला  घरी घेऊन येतो.”

दुसऱ्या दिवशी विश्वासराव देशमुखवाड्यावर आले. वसंतरावांनी, घरातल्या महिलांनी त्यांचं स्वागत केलं. माईंनी चहापाण्याची व्यवस्था केली आणि आपल्या सुनांना जेवणाचा मेनू सांगून स्वयंपाकाच्या तयारीला लागायला सांगितलं. दुपारची जेवणं झाल्यानंतर सगळेजण अंगणात गप्पा मारत बसले होते. इतक्यात विश्वासरावांनी विनायकचा विषय काढला. 

“आप्पासाहेब, आपल्या अनघाची गोड बातमी तुम्हाला कळलीच असेल. पहिलं बाळंतपण आहे आणि ते तिच्या माहेरीच व्हायला हवं. तिच्या आईची पण तीच इच्छा आहे. आपण मुंबईला जाऊन त्यांना घेऊन येऊ. तुम्ही याल का?”

वसंतरावांनी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलत चालले होते. विनायक विषयीचा त्यांच्या मनातला राग उफाळून आला.

“हे पहा विश्वासराव, त्याने आपल्या बापाच्या शब्दांचा मान ठेवला नाही. स्वतःची मर्जी चालवली. मी त्याच्या घरात पाऊलही टाकणार नाही. तुम्हाला सुनबाईंना बाळंतपणासाठी माहेरी घेऊन जायचं असेल तर खुशाल घेऊन जा.. मी तुम्हांला त्याच्या मित्रांना विचारून त्याचा पत्ता देतो पण मी येणार नाही. तुम्ही जा..”

वसंतरावांचं बोलणं ऐकून विश्वासराव शांत बसले. त्यांच्या शब्दांना इतकी धार होती की विश्वासरावांना काय बोलावं ते समजेना. वसंतरावांनी त्यांना विनायकचा मुंबईचा पत्ता दिला. थोडा वेळ गप्पा मारून विश्वासरावांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते कुडाळला त्यांच्या घरी परतले. दोन दिवसांनी विश्वासराव मुंबईला जाण्यासाठी निघाले. अनघाच्या आईने त्यांच्याकडे बरेच खाण्याचे पदार्थ, नवीन साडीचोळी दिली. विश्वासराव निघताना आई म्हणाली, 


“कधी एकदा पोरीला पाहतेय असं झालंय. लवकर जा आणि तिला सुखरूप घेऊन या..”


विश्वासरावांनी मान डोलावली आणि ते मुंबईला जाण्यासाठी एस टी स्टँडवर आले. मुंबईला जाणारी गाडी स्थानकावर लागलेलीच होती. ते गाडीत रिकाम्या सीटवर जाऊन बसले. गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. लग्नानंतर जेमतेम एकदा दोनदा अनघा माहेरी गेली होती. लाडक्या लेकीला भेटण्यास त्यांचा जीव आतुर झाला होता. कधी एकदा मुंबईला पोहचतोय आणि लेकीला डोळे भरून पाहतोय असं त्यांना झालं होतं. अखेरीस विश्वासराव मुंबईत पोहचले. नऊ दहा तासांचा पल्ला पार केल्यानंतर एस टी दादर स्थानकावर येऊन धडकली. विश्वासराव एसटीतून खाली उतरले आणि तिथून टॅक्सी करून ते वरळी कोळीवाड्यात पोहचले. जाताना रस्तात लागणारी वस्ती पाहून थोडे अस्वस्थ झाले.


“लाडाकोडात वाढलेली माझी पोर अशा वस्तीत राहतेय?”


एका पित्याच्या मनात विचार चमकून गेला. लेकीला पाहण्याची इच्छा तीव्र झाली. गल्लीत शिरताच त्यांनी तिथल्या लोकांना पत्ता दाखवून विनायकचं घर कुठे आहे हे शोधायला सुरुवात केली. नळावर पाणी भरत असलेल्या कल्याणीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांच्याजवळ येऊन तिने त्यांची चौकशी केली. विश्वासरावांनी तिला पहाताच हात जोडून नमस्कार करत हातातल्या कागदाचा तुकडा तिच्यासमोर धरला.


“ताई, एवढा पत्ता सांगता का?”


कल्याणीने कागदाच्या तुकड्यावरचा पत्ता वाचला.


“अरे हा तर विनायक भाऊंच्या घराचा पत्ता..”


कल्याणी मनातल्या मनात पुटपुटली.


“चला काका मी दाखवते तुम्हाला घर.. पण आपण कोण?”


कल्याणीने कुतूहलाने विचारलं.


“मी माझ्या लेकीला भेटायला आलोय. माझी लेक आणि जावई या पत्तावर राहतात.”


“अरे व्वा! म्हणजे तुम्ही अनघा वहिनींचे बाबा..”


ती आनंदून म्हणाली. विश्वासरावांनी होकारार्थी मान हलवली. कल्याणी त्यांना घेऊन अनघाच्या घरी आली. दार वाजवताच अनघाने दार उघडलं. दारात बाबांना पाहून तिला आश्चर्यमिश्रित आनंद झाला.


“बाबा तुम्ही?”


अनघा दारातच त्यांच्या गळ्यात पडली. इतक्या दिवसांनी एकमेकांना समोर पाहून दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. असाच शांततेत थोडा वेळ गेला. कोणीच काही बोलत नव्हतं. डोळ्यातल्या आसवांनी बरंच काही बोलून घेतलं होतं.

“वहिनींनू, काकांना आत तरी येऊ द्या.. की दारातच उभे राहणार आहात?”

कल्याणीच्या शब्दांनी अनघा भानावर आली. डोळे पुसत अनघाने वडिलांना आत बोलावलं. अनघा त्यांना वाकून नमस्कार करू लागताच त्यांनी तिला अडवलं.

“ राहू दे पोरी, वाकू नको बाय..”

अनघाने वडिलांना खाटेवर बसायला सांगितलं. विश्वासरावांनी खोलीत चौफेर नजर फिरवली.

“एवढ्याशा खोलीत माझी पोर कशी राहते?”

त्यांच्या मनात प्रश्न आला. अनघा मात्र आपल्या संसाराच्या गंमतीजमती सांगण्यात हरवून गेली होती. तिचा बाबांपासून आपलं दुःख लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू होता. विश्वासरावांना काही क्षणातच ही गोष्ट ध्यानात आली होती. तरीही ते शांत होते. चहापाणी झालं. अनघाने आई, आजी यांची चौकशी केली. विश्वासरावांनी तिच्या आईने दिलेले पदार्थ अनघाला दिले. ते पाहून आनंदाने अनघाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. दोघांच्या गप्पा सुरू होत्या इतक्यात विनायक नेहमी सारखाच दारूच्या नशेत धडपडत घरी आला. त्याला त्या अवस्थेत पाहून विश्वासरावांना मोठा धक्का बसला. लेकीच्या मायेपोटी रागाने त्यांच्या डोळ्यात पाणी दाटू लागलं.


“जावईबापू, काय ही अवस्था करून घेतलीय तुम्ही?”

विनायक काही बोलण्याच्या शुद्धीतच नव्हता. विश्वासरावांनी त्याला अनघाला माहेरी घेऊन जाण्याबद्दल विचारलं. तेंव्हा नशेच्या अवस्थेतच तो रागात त्यांना म्हणाला,

“घेऊन जायचं असेल तर कायमचंच घेऊन जा, परत पाठवू नका”

विनायकचे शब्द त्यांच्या जिव्हारी लागले हॊते. अनघाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. विश्वासराव विनायकला अनघाला माहेरी पाठवून देण्यासाठी विनवणी करू लागले पण तो त्यांचं ऐकायला तयार नव्हता. तो इतका संतापला होता की रागाच्या भरात तो काहीही बरळत होता.

“कशी जातेस ते बघतोच. जीव घेतो तुझा.”

कोपऱ्यात पडलेली कपडे वाळत घालण्याची काठी हातात उचलून झोकांड्या घेत तो म्हणाला. तो अनघावर काठी उचलणार इतक्यात विश्वासराव त्यांच्यामध्ये पडले. त्यांनी विनायकला अडवलं. दोघांचाही आवाज चढला. त्यांचा आवाज इतका वाढला की तो ऐकून कल्याणी आणि प्रशांत धावतच घरी आले. प्रशांत विनायकला समजावत होता. त्याने त्याला कसंबसं समजावून त्याच्या घरी घेऊन आला. विश्वासरावांना झालेल्या प्रकारावर विश्वासच बसत नव्हता. विनायकमध्ये इतका विचित्र झालेला बदल पाहून ते हैराण झाले. भरल्या गळ्याने ते अनघाला म्हणाले.


“पोरी, आता मी तुला एक क्षणही राहू देणार नाही. भर तुझी बॅग आणि चल आपल्या घरी कुडाळला.. मी माझ्या पोरीला असं दुःखात टाकून नाही जाऊ शकत. मला माझी मुलगी जड नाही. मी समर्थ आहे माझ्या पोरीला आयुष्याभर सांभाळायला. चल पोरी..”


पुढे काय होतं? अनघा कोणता निर्णय घेईल? अनघा सगळं सोडून आपल्या वडिलांबरोबर माहेरी निघून जाईल का? पाहूया पुढील भागात..


क्रमशः

©निशा थोरे (अनुप्रिया)


0

🎭 Series Post

View all