पुन्हा बरसला श्रावण..
भाग १०
वडिलांचे शब्द ऐकून अनघाला भरून आलं. ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली,
“बाबा, जा तुम्ही.. आता हेच माझं नशीब.. हेच माझं विश्व.. आईला यातलं काहीही सांगू नका. तिला सांगा, मी ठीक आहे. आणि माझ्या सासरी, माई आप्पांना काही बोलू नका. त्यांना मी सुखी आहे असंच सांगा. माझी अजिबात काळजी करू नका. बाबा, मी कधीही तुमच्या आणि माझ्या सासरच्या नावाला, इभ्रतीला धक्का लागेल असं वागले नाही आणि वागणारही नाही. जा बाबा..”
“पण अनू.. असं किती दिवस..”
बाबांचं बोलणं मध्येच अडवत अनघा म्हणाली,
“बाबा, आता पण बिन काही नाही.. जा तुम्ही..”
मोठ्या जड अंतःकरणाने साश्रुपूर्ण डोळ्यांनी विश्वासरावांनी अनघाचा निरोप घेऊन ते आपल्या गावी परतले. विश्वासरावांना एकटं आल्याचं पाहून अनघाच्या आईला आश्चर्य वाटलं.
“ अहो, हे काय? एकटेच आलात.. अनघा कुठेय?”
तिच्या नजरेला नजर न मिळवता डोळ्यातलं पाणी लपवत विश्वासराव म्हणाले,
“अहो, काय सांगायचं आता. तुमच्या लेकीचं नवऱ्यावर भारी प्रेम.. मी तिकडे कुडाळला आले तर यांच्याकडे कोण पाहिल? जेवणाचे हाल होतील ना..असं म्हणाली अनघा. जावईबापूंच्या तब्बेतीची हेळसांड होऊ नये म्हणून नाही म्हणाली ती यायला..”
अनघाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. मुलीला डोळे भरून पाहण्याचं, तिचं कोडकौतुक करण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. त्यांचं मन व्यथित झालं. डोळे पुसत त्या म्हणाल्या,
“जाऊ द्या.. दोघं नवराबायको आनंदात आहेत ना! मग झालं तर.. आपल्याला अजून काय हवंय?”
आई समजुतीच्या स्वरात म्हणाली. विश्वासरावांनी त्यांच्या बोलण्याला मान हलवून दुजोरा दिला खरा पण मन मात्र आतून पिळवटून निघालं होतं. कधी एकदा देशमुखवाड्यावर जातो आणि वसंतरावांना या प्रकाराबद्दल जाब विचारतो असं त्यांना झालं होतं. दुसऱ्याच दिवशी ते पहिली गाडी पकडून वेंगुर्ल्याला आले. डोळे सारखे झरत होते. देशमुखवाड्यात प्रवेश करताच दारातूनच त्यांनी रागात मोठ्याने आवाज दिला,
“आप्पासाहेब.. अहो आप्पासाहेब..”
वसंतराव आणि माई धावतच बाहेर आले.
“व्वा.. आप्पासाहेब व्वा.. फार मोठं तालेवार घराणं समजत होतो पण इथेतर साराच अंधार.. मोठं घर पोकळ वासा… मुलगी सुखात राहिल. चांगली माणसं आहेत म्हणून आमच्या अनघाला तुमच्या घरात दिली. पण मला कुठं माहित होतं की, मी तर एका कसायाच्या घरात, त्याच्या हातात बळी द्यायला माझी गाय दिली. सोन्यासारख्या पोरीचं वाटोळं झालं ओ..”
असं म्हणून त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. बापाचं काळीज रुदन करू लागलं.
“खबरदार विश्वासराव.. आमच्या घराण्याबद्दल एक शब्द जरी वाईट बोललात तर.. उगीच का हा आकांडतांडव माजवला आहे. काय झालंय काय एवढं?”
वसंतराव गरजले. त्यांच्या या बोलण्याने विश्वासराव अधिकच क्रोधित झाले..
“आप्पासाहेब उलट मलाच प्रश्न विचारताय? तिथे तुमचा मुलगा रोज दारू पिऊन धिंगाणा घालतोय. माझ्या अनघाला गुराढोराला मारावं तसं मारतोय. ती बिचारी घरंदाज बाई आहे म्हणून सगळं निमूटपणे सहन करतेय. दुसरी असती ना तर कधीच त्याला सोडून निघून आली असती माहेरी.. व्वा आप्पासाहेब, तुम्ही आणि तुमच्या लेकाने तर केसाने गळा कापला ओ.. माझी सोन्यासारखी पोर..”
विश्वासराव मटकन जागीच खाली बसले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मुलीच्या मायेने त्यांचा जीव आक्रोश करत होता.
“नाही.. कधीच हे शक्य नाही.. विनायक असं वागणंच शक्य नाही.. फार फार तर दोघां नवराबायकोमध्ये थोड्याफार कुरबुरी होत असतील. पण तेवढं चालायचंच.. तुम्ही उगीच छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करताय.. तुम्ही म्हणता तसं माझा मुलगा वागणं शक्यच नाही. आणि नवरा कशाला असतो बायकोचं ऐकून घ्यायला? झालं असेल थोडं फार.. मारलंही असेल. त्यात इतकं काय मोठं आभाळ कोसळलं नाही.. उगीच आवाज चढवून बोलू नका..“
वसंतराव ठामपणे म्हणाले. वसंतरावांच्या अशा बोलण्याने विश्वासराव जास्तच क्रोधित होत होते.
“आप्पासाहेब, दुसऱ्यांना ओरडण्यापेक्षा आधी स्वतःच्या मुलाला ओरडले असता, वळण लावलं असतं तर ही वेळच आली नसती. माझ्या मुलीच्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी झाली. इथे माझ्यावर ओरडण्यापेक्षा तिकडे जाऊन खात्री करून घ्या. उघड्या डोळ्यांनी आपल्या लेकाचे वाह्यात थेरं पाहून या.. बघा, घराण्याची प्रतिष्ठा किती उंचावतोय ते.. जाऊ द्या.. दगडाचं काळीज असणाऱ्यांना काय सांगणार! येतो आम्ही.. परत या वाड्यात पाऊल टाकणार नाही..”
असं म्हणून विश्वासराव देशमुखवाड्यातून रागाने बाहेर पडले. माईंनी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत. माईंच्या डोळ्यात अनघाविषयीची माया आणि काळजी दाटून आली. डोळ्यातलं तळं रितं होऊ लागलं. विश्वासरावांचं बोलणं वसंतरावांच्या जिव्हारी लागलं होतं. आपला मुलगा वाईट व्यसनाच्या आहारी गेला ही गोष्ट त्यांना मान्यच नव्हती. त्यांनी लगेच विनायकच्या मित्रांना बोलवून घेतंलं आणि साऱ्या गोष्टींची विचारणा केली. वसंतरावांच्या समोर विनायकचं सत्य बाहेर पडलं. आईवडिलांना भेटण्यासाठी नुकताच मुंबईवरून गावी आलेल्या, विनायकच्या घराजवळ राहणाऱ्या विनायकच्या मित्राने विनायकची सर्व कहाणी सांगितली. वसंतराव खूप रागाने थरथरत होते. आपला मुलगा सुनबाई अनघाला त्रास देतोय यापेक्षा तो देशमुख घराण्याच्या नावाला कलंकित करतोय ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती. आपल्या बायकोला मारणं, शिवीगाळ करणं यात त्यांना काहीही गैर वाटत नव्हतं पण देशमुख घराण्याच्या प्रतिमेला धक्का लागता कामा नये हेच त्यांचं ब्रीदवाक्य होतं. वसंतराव रागाने ते इकडून तिकडे फेऱ्या घालू लागले. माईंना काय करावं ते समजेना. माई घाबरतच त्यांच्याजवळ आल्या. त्यांना समजावू लागल्या.
“अहो, तुम्ही असे त्रागा करून घेऊ नका.. सगळं ठीक होईल. वाटल्यास आपण मुंबईला जाऊन स्वतः खात्री करून घेऊ..”
“हे सगळं तुमच्या लाडामुळे घडलंय. म्हणूनच मी त्याला इथून बाहेर पाठवत नव्हतो पण तुमच्या लाडक्या लेकाने अट्टहास करून मुंबईत रोजीरोटी मिळवण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही त्याला त्या गोष्टीसाठी मदत केलीत. बघा आता काय घडतंय? मुलगा देशमुख घराण्याला पार बुडवायला निघालाय..”
वसंतराव तावातावाने माईंना बोलत होते. माई निमूटपणे ऐकून घेत होत्या. विनायकच्या एकंदरीत वागण्याने माई अतिशय दुःखी झाल्या होत्या. वसंतरावांनी मुंबईला जाऊन या सर्व प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला.
इकडे विश्वासरावांच्या येण्याने विनायकला अनघाला त्रास देण्यासाठी अजून एक कारण मिळालं होतं.
“घरच्यांना माझ्याविषयी चहाड्या करते. माझ्याविरुद्ध भडकवते.”
असं काहींबाही बरळत राहायचा. रोज दारु पिऊन येणं तिला मारहाण करणं, शिवीगाळ करणं अनघाला हळूहळू सवयीचं झालं होतं. पोटातल्या बाळाचा विचार करून ती सगळं सोसत राहायची. कधी कधी तिलाच प्रश्न पडायचा.
“का इतकं सगळं सहन करतेय मी? बाबा माहेरी घेऊन जायला आलेले तेंव्हा का गेले नाही मी? का सोडून देत नाही मी असल्या नवऱ्याला?”
मग तिचेच मन तिला सांगायचं,
“नाही कधीच नाही.. मी त्यांना कधीच सोडून जाणार नाही. नवऱ्याला सोडून गेले तर लोकं म्हणतील वाईट चालीची होती.. पळून गेली.. नवऱ्याने तिला टाकून दिलं. मग मी काय करू? लोकांची तोंडं कशी बंद करू? हा उंबरठा मी कधीच ओलांडणार नाही. अगदी जीव गेला तरी आणि या इथे जीव गेलाच तर सौभाग्यवती म्हणून मरेन..लोकं सुलक्षणी म्हणतील. संस्कारी होती.. नाहीतर लोकं विचित्र बडबड करतील. मग ते मला कसं सहन होईल?”
असे बरेच विचार तिच्या मनात यायचे. लोक निंदेला घाबरून घेतलेल्या तिच्या या निर्णयाने अनघा खरंतर जगायचं विसरून गेली होती.
दिवस सरत होते. कल्याणीने तिसऱ्या महिन्यातच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अनघाचं नाव दाखल केलं. रुटीन चेकअपच्या वेळीस कल्याणी अनघासोबत हॉस्पिटलमध्ये जायची. तिचं खाणंपिणं पथ्यपाणी सारं आवडीनं करायची. आता अनघाला नववा महिना लागला होता. तिचे दिवस भरत आले होते. आणि एक दिवस अनघाने एक गोंडस मुलाला जन्म दिला. गोरापान, कुरळे केस, टपोरे डोळे,इवलीशी नाजूक बोटं, नाजूक डोळे. अनघाने त्या इवल्याशा जीवाला अलगद जवळ घेतलं. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते.
विनायकला मुलगा झाला. देशमुख घराण्याला वारस मिळाला म्हणून विनायक खूप आनंदात होता. मोठ्या थाटामाटात अगदी बॅंडबाजा लावून जल्लोषात नवीन बाळाचं स्वागत करण्यात आलं. वसंतरावांना, माईंना ही आनंदाची बातमी दिली. त्यांनाही खूप आनंद झाला होता. त्यांच्या मनात आता विनायक मार्गी लागेल अश्या वेड्या आशेने जन्म घेतला. वसंतरावांनी देशमुख घराण्याला वंशाला दिवा मिळाला म्हणून साऱ्या गावाला साखर वाटली होती. बारश्याच्या दिवशी विनायकने त्याच्या कंपनीतल्या कामगार मित्रांना, शेजारच्या लोकांना आमंत्रणं दिली होती. वसंतराव आणि माई आपल्या नातवाला भेटण्यासाठी मुंबईला आले. बारश्यासाठी आलेल्या पाहुण्यांची विनायक आणि अनघाने त्यांच्या परीने जमेल तशी उत्तम सोय केली होती. विनायकचे मित्र सहकुटुंब सहपरिवार आले होते. एकच खोली असल्याने काही पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था कल्याणीच्या घरी केली. अनघाने बाळाला माईकडे दिलं आणि ती पाहुण्यांचा पाहुणचार करत होती. सर्वजण अनघा आणि विनायकने केलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनाचं कौतुक करत होते. विनायकचे मित्र त्याचं गुणगान गात होते. शिवाय विनायकचे ज्यांच्याशी घरोब्याचे संबंध होते त्या त्याच्या मित्रांच्या बायकाही विनायकबद्दल कौतुकाने सांगत होत्या. कंपनीमधला विनायकचा मित्र अशोक म्हणाला,
“वहिनी, तुम्हाला सांगतो.. आमच्या संपूर्ण कंपनीत इन्यासारखा चांगला माणूस नाय बघा. इन्या सर्वांचा बेस्ट यार.. आपल्या कामात अतिशय हुशार, प्रामाणिकपणे आपलं कामं चोख पार पाडणार.. सर्वांच्या अडचणीत मदतीला धावून येणार.. सर्वांची काळजी घेणार.. आमच्या साहेबांचाही इन्यावर खूप विश्वास.. कोणतंही काम त्यालाच सांगणार.. इतका चांगला आमचा मित्र फक्त दारूच्या व्यसनामुळे वाया जातोय याचंच वाईट वाटतंय. दारू पोटात गेली की त्याच्यातला हैवान जागा होतो आणि तो माती खातो. बाकी तो एक नंबर माणूस आहे. त्या व्यसनामुळे तो असा वागतोय. दारूचं व्यसन तेवढं सुटलं पाहिजे.”
आपल्या नवऱ्याचं कौतुक ऐकून अनघाला मनातून खूप आनंद झाला होता. ती त्यांच्याकडे पाहत स्मित हास्य करत म्हणाली,
“अगदी खरंय भावोजी, पण आता सगळं चांगलं होईल बघा. बाळाच्या येण्याने ते नक्की बदलतील. त्यांना त्यांची जबाबदारी समजेल मग दारूचं व्यसनही कमी होईल. बघाच तुम्ही.. परत तुम्हीच मला सांगाल की हे किती बदलले आहेत.”
अशोकने तिच्या बोलण्यावर आनंदाने मान डोलावली.
“नक्की होईल.. का नाही होणार? सर्व तुमच्या मनासारखं होईल वहिनी.. विनायक नक्की सुधारेल.”
मध्येच कल्याणीच्या नवऱ्याने प्रशांतने चहाचा कप पुढे पाहुण्यांच्या हातात देत हसत म्हटलं. थोड्याच वेळात माईंनी बाळाला पाळण्यात टाकलं आणि विनायकच्या थोरल्या बहिणीने बाळाच्या कानात हळूच त्याचं नाव सांगितलं. मुलाचं मोठ्या हौशेने “आदित्य” नाव ठेवण्यात आलं. पाहुण्यांच्या पंगती उठल्या. विनायकने मित्रांना जंगी पार्टी दिली. फुल्ल दारू पिऊन कल्ला करण्यात आला. बारश्यात चिक्कार पैसा खर्च करण्यात आला.
‘आदित्य’ अनघाच्या आयुष्यात आनंदाची, सुखाची बरसात बनून आला. त्याच्या येण्यानं तिचं अवघं आयुष्य बदलून गेलं.
पुढे काय होतं? अनघाच्या आयुष्यात अजून काय घडणार आहे? पाहूया पुढील भागात.
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा