Login

पुन्हा बरसला श्रावण.. भाग ८८

पुन्हा बरसला श्रावण..
पुन्हा बरसला श्रावण भाग ८८


श्लोकचं बोलणं ऐकून विनायकचा पारा चढू लागला होता. तो काही बोलणार इतक्यात श्लोकची आई विनायककडे पाहत म्हणाली,

“दादा, प्लिज रागवू नका. ईश्वरी खरंच खूप गुणी मुलगी आहे. ज्या घरी जाईल त्या घराचं सोनं करेल हे माहीत होतं आम्हाला; पण देवाच्या मर्जीपुढे कोणाचंच काही चालत नाही हेच खरं. नाहीतर पोरीच्या वाट्याला इतकं दुःख का आलं असतं? मी एकदा दोनदा ईश्वरीला श्लोकच्या कॉलेजमध्ये पाहिलं होतं. मग श्लोककडून तिच्याबद्दल ऐकलं. त्यालाही आवडते हे समजल्यावर मला खूप आनंद झाला कारण मलाही ईश्वरी आवडली होती. त्यामुळे आता आम्ही रीतसर मागणी घालतोय. तुमची मुलगी आमच्या घरीही मुलीसारखीच राहील. तुम्ही बिनघोरपणे आम्हाला तुमची मुलगी द्या. मध्यमवर्गीय असलो तरी आमच्या घरी ईश्वरी सुखात राहील याची मी तुम्हाला खात्री देते. प्लिज नाही म्हणू नका.”

श्लोकच्या आईने विनायकसमोर हात जोडले. अनघा, माई, ईश्वरी आणि अर्पिता एकमेकींकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होते. अचानकपणे उभ्या ठाकलेल्या संकटाला पाहून ईश्वरीची भीतीने गाळण उडाली होती. श्लोक असं काहीतरी करेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

“काय करतोय हा श्लोक? बाबा उगीच त्याला नाही नाही ते बोलतील. त्याचा अपमान करतील. पण काल श्लोक काहीच बोलला नाही. मला वाटलं, हा विषय कालच संपला. कारण काल तो मला ठीक आहे असं म्हणाला होता. माझा नकार त्याला मान्य होता. मग आज काय झालं? असं कसं अचानक आपल्या आईसोबत घरी येऊन त्याने सर्वांसमोर मला लग्नासाठी मागणी घातली? तेही माझा निर्णय माहीत असताना? का असं केलंस श्लोक?”

तिने एक जळजळीत कटाक्ष श्लोकच्या दिशेने टाकला. श्लोकने एकदम ओशाळून मान खाली घातली खरी पण त्याच्या नजरेतलं तिच्याबद्दल असलेलं प्रेम तो लपवू शकला नाही.

“श्लोकच्या आई, तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही काय बोलताय ते? तुम्ही देशमुखांच्या मुलीविषयी बोलताय. तुम्ही तुमची पायरी..”

विनायकचा स्वर उग्र होऊ लागला. हे लक्षात येताच विनायकला मधेच थांबवत, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी माईने बोलायला सुरुवात केली.

“श्लोकची आई, तुम्ही आमच्या ईशूचा विचार केलात ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. आमची ईशू खरंच खूप गुणी आहे. जिथे जाईल तिथे आनंदाची दरवळच पसरवत जाईल; पण ईश्वराने इतक्या लहान वयात तिच्या नशिबी कसले भोग दिलेत बघा ना! तुम्हाला आमची ईश्वरी आवडली. तुम्ही तिचा सुन म्हणून स्वीकार करण्याचा विचार करताय ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे; पण श्लोकची आई, आमच्या देशमुख घराण्यात मुलींना दुसऱ्या लग्नाला परवानगी नाही. नवरा गेल्यानंतर त्याच्या बायकोने कायम आपल्या नवऱ्याची विधवा म्हणूनच जगायचं. तोच तिचा धर्म. आमची नमू, म्हणजे माझ्या मोठ्या मुलाची मुलगी अवघ्या पंधराव्या वर्षी विधवा झाली. शेतात नवऱ्याला सर्पदंश झाला आणि जागीच त्याने प्राण सोडला. त्याच्या माघारी नमूने संपूर्ण आयुष्य एकटीने काढलं. त्याची विधवा म्हणूनच जगतेय ती आजही. तेंव्हा आम्ही ईशूच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करणं म्हणजे….”

“पण आई, ते तुम्हाला चुकीचं वाटत नाही का? माझ्या श्लोकचे बाबा गेले तेंव्हा श्लोक अवघा दोन वर्षाचा होता आणि मी तुमच्या ईश्वरीच्याच वयाची होते; पण तेंव्हाचा काळ वेगळा होता. एकत्र कुटुंबपद्धती होती. एकत्र कुटुंबात चालून जात होतं. एकत्र कुटुंबात घरात खंडीभर माणसं असतानाही अशी स्त्री एकटीच असायची. तिलाही मानसिक आधाराची गरज असू शकते हे कोणाच्याच गावी नसायचं. आणि विधवा म्हणून कपाळी मारलेला शिक्का तो वेगळाच. किती अवहेलना सोसावी लागली! एकटीने श्लोकचं संगोपन करताना किती कसरत करावी लागली हे माझं मलाच ठाऊक! समाजात वावरताना लोकांच्या घृणास्पद नजरा, सवाष्ण बायकांचे टोमणे, पुरुषांच्या बिभीस्त नजरा सारं काही निमूटपणे सहन करण्यापलीकडे दुसरा मार्गच नव्हता. झाल्या गेल्या गोष्टींची मी उजळणी करत नाही पण आई, अनुभवावरून सांगतेय, एकटं जगणं फार कठीण असतं ओ.. ते आयुष्य मी स्वीकारलं कारण माझ्याकडे ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता; पण आता काळ बदलला आहे. आपल्या मुलांकडे जीवन जगण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुलांना ते दुःख भोगायला लागू नये इतकंच वाटतं. त्यांनी आनंदानं आणि सुखात पुढील आयुष्य घालवावं असं मला वाटतं.”

डोळ्यातून ओघळणारी आसवं पदराने टिपत श्लोकची आई म्हणाली.

“पण आम्ही देशमुख आहोत. आमच्यात मुलींनी पायरी सोडून चालत नाही. स्वतःच्या आधी त्यांना आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेचा विचार करावा लागतो. आणि तसंही तुमची आणि आमची बरोबरी.. ”

विनायक चिडून बोलत होता. त्याचं बोलणं मधेच तोडत श्लोकची आई म्हणाली,

“कुठल्या बरोबरीच्या गोष्टी करताय दादा? आपल्या आयुष्यात धर्म, जातपात, परंपरा यापेक्षाही महत्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे आपल्या मुलांचं सुख. त्यांच्या आनंदापुढे या सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. बघा दादा, मी माझ्या मुलाच्या, श्लोकच्या सुखाचा विचार केला. श्लोकला ईश्वरी आवडते आणि तिच्या भूतकाळासकट तो तिला स्वीकारायला तयार आहे मग आपण हरकत का घ्यावी? आम्ही उच्च जातीचे नाही म्हणून काय फरक पडला? आमचे विचार, आमचं राहणीमान, आमचा सुसंस्कृतपणा याला काहीच मोल नाही? दादा, आम्ही नव्या युगाच्या सोबत चालतो. जुन्या गोष्टींच्या सोबत तितक्याच आत्मीयतेने नवीन विचारांनाही स्वीकारतो. माझा मुलगा पुरोगामी विचारांचा आहे आणि त्याचा विचार मला मनापासून पटला. आता आपण मुलांच्या विचारांनी चालायला हवं. जातपात, धर्म पंथ यापलीकडे जाऊनही विचार करायला हवा ना?”

श्लोकच्या आईचा स्वर थोडा चिडल्यासारखा झाला. श्लोकने आईला खुणेनेच शांत राहण्यास खुणावलं. श्लोकच्या आईने टेबलवरच्या ग्लासातलं पाणी प्यायलं आणि विनायकच्या उत्तराची वाटू पाहू लागली. विनायकने एक जळजळीत कटाक्ष ईश्वरी आणि अनघाच्या दिशेने टाकला. अनघाच्या अंगाला भीतीने कापरं भरलं. हाताच्या मुठी आवळत तो म्हणाला,

“बघा तुमची लाडकी लेक काय गुण उधळतेय. जास्त मोकळीक दिलीय त्याचे परिणाम आहेत हे.. जरा लेकीला विचारा.. कधीपासून सुरू आहे हे? मुलगा इथे डायरेक्ट लग्नाची मागणी घालायला आला म्हणजे यांचं आधीपासूनच.. जनाची नाही निदान मनाची तर लाज बाळग म्हणावं. नवरा जाऊन किती दिवस झालेत? लगेच ही थेरं सुचताहेत. देशमुखांच्या घराण्याला..”

“काका प्लिज, तुम्ही ईशूला काही बोलू नका. मी इथे येऊन तिला मागणी घालेन हे तिला ठाऊकही नव्हतं. प्लिज, तुम्ही तिच्यावर रागवू नका.”

श्लोक ईश्वरीचा भेदरलेला चेहरा पाहून विनायकला कळवळून म्हणाला. ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.

“ईशू, काय चाललंय हे? श्लोक काय म्हणतोय? तुमचं आधीच ठरलंय का हे?”

आदित्यने जागेवरून उठून उभा राहत ईश्वरीला प्रश्न केला.

“नाही दादा, तुम्ही समजता तसं आमच्यात काही नाहीये. माझ्या मनातही कधी असा विचार आला नाही. श्लोक माझा फक्त चांगला मित्र आहे. त्यापलीकडे काही नाही. तो असं मला मागणी घालायला येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. प्लिज, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका.”

ईश्वरी काकुळतीला येऊन पोटतिडकीने सांगत होती. डोळ्यातलं तळं रितं होऊ लागलं. डोळ्यातलं पाणी पुसत ती श्लोक आणि त्याच्या आईकडे पाहून म्हणाली,

“काकू, श्लोक, मी सर्वांत आधी तुमची माफी मागते. तुम्ही चांगल्या हेतूने आला होतात. तुमचा अपमान व्हावा अशी मुळीच इच्छा नाहीये; पण काकू माझ्या मनात श्लोकबद्दल खरंच काही वेगळी भावना नाही. तो माझा फक्त मित्र आहे. श्लोक, मी तुला सांगितलं होतं, माझं स्वराजवर खूप प्रेम होतं आणि कायम राहील. मी दुसऱ्या लग्नाचा विचारही करू शकत नाही. प्लिज श्लोक, काकू सॉरी.. पण आता मला काहीच बोलायचं नाही. येते मी..”

डोळ्यातलं पाणी टिपत ईश्वरी तिच्या खोलीच्या दिशेने धावत गेली. श्लोक तिच्या धावत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला.

पुढे काय होतं? श्लोक आणि ईश्वरीच्या नात्यात विघ्न येईल का? पाहूया पुढील भागात..