Login

पुन्हा भेट

जेव्हा प्रियकर पुन्हा भेटतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा (संघ कामिनी)

शीर्षक : पुन्हा भेट

मुंबईची लोकल म्हणजे शहराचा श्वासच जणू. लाखो लोक त्यात प्रवास करत असतात, म्हणूनच तिला मुंबईची जीवनवाहिनी म्हणतात. सकाळ–संध्याकाळ धावणाऱ्या या गाड्यांमध्ये प्रत्येकाचे एक छोटे कुटुंब असते. काही जण एकत्र येऊन भजने गातात, तर कोणी वर्तमानपत्रात डोळे ठेवून, कोणी मोबाइलवर बोटे फिरवत, तर कोणी चक्क डुलकी घेत प्रवास करत असतात. प्रत्येक जण स्वतःच्या विश्वात रममाण असतो.

त्या संध्याकाळी, डोंबिवलीहून सीएसएमटीकडे जाणारी गाडी गर्दीने तुडुंब भरलेली होती. दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका तीस-पस्तीस वर्षांच्या तरुणाने हलकेच उसासा टाकला. दिवसाचा थकवा अंगात शिरला होता. त्याचे नाव ‘प्रियतोष’ होते. त्याचा हात दरवाजाच्या मधल्या लोखंडी दांड्याला घट्ट पकडलेला आणि नजर बाहेरच्या झपाट्याने मागे सरणाऱ्या दृश्यांवर रोखलेली होती.

गाडी ठाणे स्टेशनला थांबली आणि लोकलच्या दरवाजासमोर गर्दीच्या लाटा पुन्हा आल्या. दरवाजावर असणारे कोणालाही त्या तुडुंब भरलेल्या गाडीत चढण्यासाठी मज्जाव करत होते.

"अरे अंदर जगह नहीं है, क्यों दरवाजेपर लटकने के लिए आ रहे हो? पीछे का गाडी एकदम खाली आ रहा है। उसके लिए रुक जाओ।"

प्रियतोषदेखील त्यात सामील होता. कारण दरवाजावर उभे राहणाऱ्यांचे कामच ते असते. आत कितीही जागा असली तरी नवीन लोकांना आत येऊ द्यायचे नाही, मनुष्य प्रवृत्तीच म्हणा ना!


त्या लाटेतून एक बाई आत येण्याचा प्रयत्न करत होती. कोणाला तरी तिची दया आली आणि तिला आत शिरण्यास चिंचोळी जागा करून दिली. साधा पंजाबी ड्रेस, खांद्यावर बॅग, केसांमध्ये थोडी अस्ताव्यस्त गुंफलेली वेणी असाच तिचा थोडा गबाळा वेश होता. ती हातावरचे कडे सांभाळत जेमतेम आत येऊन उभी राहिली.

जनरल डब्यात एखादी स्त्री शिरल्यामुळे प्रियतोषसकट सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या; पण प्रियतोषला मात्र तिला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. मात्र तो काही आठवू शकत नव्हता.

गाडी पुन्हा धावू लागली. अचानक ती स्त्री त्याच्याकडे वळली. तिच्या डोळ्यांत थोडे आश्चर्य आणि आनंद होता. ती हळू आवाजात म्हणाली,
“प्रियतोष?”

“हो… पण… तुम्ही?” तो दचकला.


“मी… शलाका. तुला आठवत नाही का?” ती मंद हसली.

क्षणभर प्रियतोषला श्वास अडकल्यासारखे झाले. शलाका! हो, तीच कॉलेजातली त्याच्याच वर्गात असणारी त्याची मैत्रीण, इतक्या वर्षात तो विसरला होता? पण तिचा चेहरा थोडा बदलला होता. या पंधरा वर्षांत तिच्या चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या आल्या होत्या; पण डोळ्यांत तेच तेज आणि तेच नेहमीचे हास्य होते.

“अरे वा! किती वर्षांनी…” प्रियतोषचा आवाज कापरा झाला.

“हो, जवळजवळ पंधरा वर्षं होतील.” शलाका म्हणाली.

गाडीच्या खडखडाटात दोघे काही क्षण शांत उभे राहिले. इतक्या गर्दीत आणि गोंधळातही त्यांचे मन मागच्या काळात फिरू लागले.

महाविद्यालयाच्या त्या दिवसांत प्रियतोष आणि शलाका एकत्रच असायचे. अभ्यास, प्रोजेक्ट्स, नाटके, मित्रांचे ग्रुप अगदी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या जोडीचे नाव घेतले जायचे. मित्रमंडळीत अनेकदा वाटायचे, कोणी कोणी तर त्यांना चिडवायचे देखील, “तुम्ही दोघे खरंच फक्त मित्र आहात की दुसरे काही?”
तेव्हा दोघेही हसून टाळायचे; पण मनाच्या खोलवर मात्र दोघांच्याही मनात एक छोटीशी भावना अंकुरत होती, जी कधी दोघांपैकी कोणीही शब्दांत व्यक्त केली नव्हती.

महाविद्यालय संपले, प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळ्या वाटांनी चहू बाजूंनी विस्तारात गेले. प्रियतोष नोकरीसाठी मुंबईत थांबला, तर शलाका तिच्या आईवडिलांसोबत पुण्यात गेली. पुढे दोघांचा संपर्क तुटला तो कायमचाच.

“कशी आहेस?” प्रियतोषने विचारले .

“बरे चाललंय. लग्न झाले, दोन मुले आहेत. मुंबईतच राहते आता.” ती सहज बोलली.

प्रियतोषने हसत मान हलवली.

“तू?” तिने उत्सुकतेने विचारले.

“मी अजून एकटाच आहे. कामातच वेळ जातो.” त्याच्या तोंडातून काहीतरी निघाले.

दोघे काही क्षण गप्प बसले. गाडी वडाळा स्टेशन पार करत होती. दरवाजातून येणारा वारा त्यांच्या चेहऱ्यावर आदळत होता.

“तुला आठवते का...” शलाका हळू आवाजात म्हणाली, “आपण साठे महाविद्यालयाच्या प्रांगणात बसून किती स्वप्ने रंगवायचो? तुला परदेशात जायचे होते आणि मला शाळा सुरू करायची होती.”

प्रियतोष हसला.

“हो आणि तू नेहमी म्हणायचीस की आपण या मुंबईत कधी हरवलो तरी मुंबईची ही लोकल आपली भेट पुन्हा एकदा घडवून आणेल.”

शलाका हसून म्हणाली, “अरे वा! हे तुला बरोबर आठवते?”

दोघे हसले;पण डोळ्यांच्या कोपऱ्यात ओलावा लपून बसला होता.

गाडी पुढे सरकत होती आणि गर्दी हळूहळू कमी होत होती. दोघांचे संभाषण मात्र उलगडत जात होते.

“कधी वाटले नाही का मला भेटावेसे?” प्रियतोषचा प्रश्न हवेत तरंगत राहिला.

शलाका काही क्षण गप्प बसली. मग म्हणाली,

“वाटायचे… पण आयुष्य पटकन पुढे निघून गेले. तू आणि कदाचित मीही ते धाडस केले नाही. कदाचित नियतीने तसेच ठरवलेले होते.”

प्रियतोषच्या हृदयात जुने दुखणे पुन्हा जागे झाले. तो फक्त मान डोलावू शकला. त्याला तिला लग्नासाठी मागणी घालणे कधीच जमले नव्हते.

गाडी शेवटच्या टप्प्याकडे, सीएसएमटीकडे झेपावत होती. गर्दी आता विरळ झाली होती. शलाका आपली बॅग खांद्यावर व्यवस्थित करत उतरण्यासाठी तयार झाली.

“आज तुझ्याबरोबर भेट झाली ना… खूप छान वाटले.” ती म्हणाली.

“हो, मलाही.” प्रियतोषने नकळत तिच्या डोळ्यांकडे पाहिले. त्या डोळ्यांत आता दुसऱ्या कोणाची स्वप्ने, जबाबदाऱ्या भरलेल्या होत्या, तरी कदाचित त्यात अजूनही एक छोटासा कोपरा त्यांच्या भूतकाळासाठी राखून ठेवलेला वाटत होता.

सीएसएमटी स्टेशन आले. गर्दीतून उतरण्यासाठी झुंबड पुढे होत होती. शलाका त्या लाटेत सामील झाली.

शेवटचे एक स्मित करत ती म्हणाली,

“काळजी घे, प्रियतोष.”

“तूही…” तो फक्त एवढेच बोलू शकला.

ती गर्दीत हरवली. प्रियतोष अजूनही दरवाजाजवळ उभा राहून तिचे पाठमोरे रूप पाहत राहिला.

स्टेशनच्या गोंधळातही प्रियतोषच्या मनात एक वादळ दाटून आले होते. तो विचार करत होता,

’हे नाते कदाचित आयुष्यभर अपूर्णच राहणार.’

फलाटावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकलचा खडखडाट सुरूच होता; पण प्रियतोषच्या मनातली ती भेट मात्र कायमस्वरूपी कोरली गेली होती.