पुन्हा एकदा…….
आज ती नेहमी पेक्षा खुपच घाईत होती. कारणचं तस होतं. आज तब्बल चार वर्षांनी आपली कला, आपलं नृत्य सगळ्यांसमोर सादर करणार होती ती. इतरांना ती चारचं वर्ष वाटत होती, पण तिच्यासाठी तो काळ खुपच मोठा होता.
मध्येच ईंजिनीअरिंग करत असल्याने तिने कथ्थक करण थांबवल होतं. पण आता मनमुरादपणे तिला ते अनुभवायच होतं. त्यात सामावुन जायचं होतं.
महिनाभर आधीच आपल्या गुरुंकडे तिने जायला सुरुवात केली होती. महिनाभरच सराव झाला होता. पण उत्साह आणि हवा असलेला आत्मविश्वास ठासून भरलेला...
आज तिच्यासाठी ती एक स्पर्धा नव्हती, तर खुप काळ मनात साचलेल्या कलेची उधळण होती. तिच्यासाठी कथ्थक आपल्या जीवनाचा एक भागचं होता.
घड्याळाच्या काट्यावर ९ चे टोल पडले. लगबगीने ती तयारी करायला निघाली. आईच्या आवडीच्या काठच्या साडीचा तिने घागरा शिवला होता. आईचा फोनही येऊन गेला. अगदी प्रत्येक गोष्टींची चौकशी आणि काळजी करणारा...बरोबर १० वाजता ती तयार झाली. तिची बहीण जरी लहान असली तरी तिनेही तिला तयारी करायला खुप मदत केली.अगदी गजऱ्यापासुन ते मेक-अप पर्यंत..कारण घरापासून दुर नोकरी, शिकणानिमित्त बाहेर राहणाऱ्या दोघींना एकमेकींचीच साथ होती..
तिची सर्व तयारी झाली तशी थेट ती माझ्याकडे आली. वाकून मला नमस्कार केला. रोजच्याप्रमाणेच गोड हसली. मला मनातून खंत वाटत होती.- ‘मी त्यांची एक मैत्रीण, शेजारीण असुन शिवाय त्यांच्यात वयाने मोठी असुनही आजारपणामुळे तिच्या मदतीला येवु शकले नाही.’ मी असं म्हटल्यावर ती नेहमी प्रमाणे लाघवी हसून लगेचचं म्हणाली..-"अहो असुदेत हो काकु!," "बर मला सांगा मी कशी दिसतेय?" मी म्हटलं, "छान !!". तिने लाडातच हसुन ‘Thank you!’ म्हटलं. आणि मग आपला ब्लॉक लॉक केला आणि ती निघाली...
तिची बहीण इतर सामान घेवुन पुढे गेली. अन् ती आपला घागरा सावरत पायऱ्या उतरत जात होती. चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या संमिश्र भावनांनी… मी तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने बघतचं राहीले. अन् मला नकळत ओळी सुचल्या.
“सखी चालली जणु चालली
सुहासिनी माहेरी…..
उधळाया साठलेल्या प्रेमाची
शिदोरी…....!!!"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा