Login

पुन्हा एकदा कधीतरी..

स्टेटस कधीही बदलू शकतो.

पुन्हा एकदा कधीतरी..


“ हा , चला ऑफिसला जाऊदे. ” असं ड्रायव्हरला सांगत तो कारमध्ये बसला. तो कारमध्ये बसताक्षणी पी.ए. देसायांचा फोन आला. त्याने लगेच फोन उचलला.
“ गुड मॉर्निंग देसाई . आजच्या काय अपडेट्स ? ”
“ गुड मॉर्निंग सर.. सर , आज दुपारी १२ वाजता जेके फूड इंडस्ट्रीचे अय्यर यांच्यासोबत आपली मिटिंग आहे.. त्यानंतर २ वाजता आपल्याला अलिबागच्या आपल्या ब्रॅंचमध्ये व्हिझीटला जायचंय. बस. आज एवढंच श्येड्युल आहे. ”
“ ओके. फाइन. मी परफेक्ट २० मिनिटात पोहचतोय ऑफिसला. “
“ ओके डन सर. “ असं बोलून फोन कट झाला. त्यानं ड्रायव्हरला एसी बंद करायला सांगितला. कारची काच त्याने खाली केली. २० मिनिटांच्या छोट्याशा प्रवासाचा तो आनंद लुटत होता. सूर्याची किरणं त्यांच्या चेहऱ्याशी खेळत होती. वारा त्याच्या केसांशी खेळत होता आणि कार एका सिग्नल ला थांबली. त्याने हातावरचं घड्याळ बघितलं.. ९:४७ वाजले होते. रस्त्याला ट्राफीक होतं आणि अशा वेळी ड्रायव्हरने एक गाणं लावलं.. “ के दिल अभी भरा नहीं.. “ त्याच्या आवडत्या गाण्यापैकी एक गाणं. तो गाणं गुणगुणू लागला. सहजच त्याची नजर अवतीभवती फिरू लागली.. आणि त्याचं लक्ष्य बसस्टॉपकडे गेलं.. गाणं गुणगुणणं बंद झालं. तो जरासा अस्वस्थ झाला. ती त्याच्याकडेच बघत होती कदाचित खूप वेळ. हा कारमध्ये बसून तिला पाहत होता. दोघांची नजरानजर झाली होती. दोघांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. ८ वर्षात सगळं काही बदललं होतं दोघांचं आयुष्य. सुटाबुटात कारमध्ये बसलेला तो.. तिला पाहून अवघडून गेला.. ती एकटक त्याला पाहत होती. एकमेकांना दूरून पाहत ते भूतकाळात रमून गेले.
जोशी बेडेकर कॉलेजमध्ये दोघं शिकत होते. मैत्रीच्या पलीकडे दुसरं कोणतंही नातं त्यांच्यात नव्हतंच. त्याला ती मनापासून आवडत होती. तिला मात्र एखादा श्रीमंत मुलगा हवा होता. तो दिसला फार काही चांगला नव्हताच. ती मात्र कॉजलेजची क्रश होती. लेक्चर सुरू असताना तो लपून छपून तिलाच बघायचा , कॉलेजमध्ये सतत तिच्या मागेपुढे करायचा.. तो मात्र तिच्यासाठी एक मित्र होता. प्रेम कसं व्यक्त करायचं हे त्याला ठाऊक नव्हतं. जर मनातलं तिच्यासमोर ओठांवर आलं तर ती आपल्याशी बोलेल का ? हिच भीती त्याला वाटत होती. रात्रं दिवस ती त्याच्या स्वप्नात यायची.ती एवढी टापटीप राहते.. फॅशनेबल कपडे घालते तर आपणही थोडंफार तिच्यासारखं राहायला हवं.‌ आपणही फॅशनेबल रहायला हवं. त्यासाठी नवीन कपडे हवेत. यासाठी त्याने आई वडीलांकडे हट्ट सुरू केला.
“ आई , मला नवीन कपडे घ्यायचेत. ”
स्वयंपाकघरात पोळ्या लाटणाऱ्या आईने पोळी लाटणं थांबवलं. बाबा देवघरात पूजा करत होते.
“ काय ? अरे , आत्ता ४ महिन्यांपूर्वी घेतले ना कपडे ? ” आईने आश्चर्याने विचारलं‌.
“ हो पण आता ते फिट होतात. ”
“ तेव्हाच सांगत होते , फीट कपडे घेऊ नको .. ढोबळ कपडे घेतले असतेस तर चांगले ३-४ वर्ष टिकले असते. ते काही नाही.. कपडे उसपून देते.. जा घालून..” आई चिडून म्हणाली.
“ उसपलेले कपडे मला नाही आवडत. ”
“ बाबांचे कपडे घाल.. “
“ त्यात मी मोठा वाटतो. ”
“ नवीन कपडे नाही हा मिळायचे. उगाच खर्च नाही करायचा. घरभाडं द्यायचंय , लाईट बील भरायचंय , दूधाचे पैसे भरायचेत. ते फ्रिज रिपेअर करायचंय , सिलेंडर संपत आलाय आणि बाबांचा पगार दोन महिने झाला नाहीये. आता तूच सांग, नवीन कपडे आत्ताच घेणं गरजेचं आहे का ? थोडे दिवस अॅडजेस्ट कर ना. ” आई समजावणीच्या स्वरात म्हणाली.
“ आता कॉलेज संपायला २ महिनेच राहीलेत. पुढल्या महिन्यात सेन्डऑफ आणि मग परिक्षा. त्यापेक्षा नकोच कपडे. ” असं म्हणून तो कॉलेजकडे रवाना झाला.
आपण तिची बरोबरी करू शकतो का ? सतत पडणारा प्रश्न. तिला इम्प्रेस कसं करायचं याचा विचार करत २ महिने उलटून गेले. कॉलेजचा शेवटचा पेपर आला. शेवटचा दिवस. पुन्हा कधी एकमेकांना भेटू हे काही कळत नव्हतं. आज तिला गाठून मनातलं सांगायचं असं त्याने मनाशी पक्कं ठरवलं.
पेपर लिहून झाल्यावर तो वर्गाबाहेर आला. पेपर ची वेळ संपायला १० मिनिटं शिल्लक असताना तो तिची वाट पाहत कॉलेजच्या पार्किंग एरियात तिच्या स्कूटीपाशी जाऊन थांबला. तिच्याशी कसं बोलावं याची मनातल्या मनात तयारी करत होता. पेपर संपला.. सर्व विद्यार्थी खूप खूष झाले. सेलिब्रेशन सुरू झालं.. काही उड्या मारत आपापल्या घरी गेले. पेपर संपून अर्धा तास उलटून गेल्यानंतरही ती आली नसल्याने तो बेचैन झाला. खूप वेळ वाट पाहिल्यावर मैत्रीणी सोबत ती स्कूटीपाशी आली. त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले.
“ हाय.. ” मोठ्या हिंमतीने तो म्हणाला.
“ hii.. “ ती म्हणाली.
“ कसे गेले पेपर ? ” त्याने बोलायला सुरुवात केली.
“ मस्त. ” असं म्हणून ती स्कूटीवर बसली. स्कूटी स्टार्ट करणार इतक्यात त्याने तिला अडवलं.
“ ऐक ना , तुझ्याशी जरा बोलायचंय. ”
“ हा बोल ना.. ”
“ इथे नाही. कॅन्टीन मध्ये जाऊन बोलूया का ? आपण दोघच ? ”
“ ओके. ” स्कूटी बंद करून दोघे कॅन्टीन मध्ये आले. कॅन्टीन वाल्या काकांना दोन कटिंग ची ऑर्डर देऊन दोघे टेबलावर बसले. कॅन्टीन मध्ये गर्दी नव्हतीच.
“ हं बोल.. काय बोलायचं होतं ? ” – तिने उत्सुकतेने विचारलं.
“ मी जरा स्पष्ट बोलणारे. प्लीज वाईट वाटून नको घेऊ हा. ”
“ एवढं काय बोलायचंय की जे ऐकल्यावर मला वाईट वाटेल ? ”
एक दिर्घ श्वास घेऊन त्याने बोलायला सुरुवात केली, “ एफवाय ला असताना एकांकिकेमुळे आपली ओळख झाली मग मैत्री.. गेल्या तीन चार वर्षांत मी कसा तुझ्यात गुंतून गेलोय कळत नाहीये मला. तुझे विचार , तुझी स्वप्नं वेडं करतात मला. कळत नकळत मी तुझ्या प्रेमात पडलोय गं. माझ्या सुखात दु:खात तू सोबत हवी आहेस असं वाटतंय. तुझ्या आयुष्याचा मला एक महत्त्वाचा भाग व्हायचंय. तुझ्या सोबत मला आयुष्य जगायचंय. साथ देशील माझी ? लग्न करशील माझ्याशी ? ” तो न घाबरता स्पष्टपणे बोलून मोकळा झाला. ती अस्वस्थ झाली. दोघं एकमेकांना पाहत शांतपणे बसली. एव्हाना काका टेबलावर चहा ठेवून गेले होते.
“ तू हवा तेवढा वेळ घे.. नो प्रोब्लेम. तुझं जे उत्तर असेल ते मान्य असेल मला. ” तो विचार करून म्हणाला. काय बोलावं हेच तिला सुचेनासं झालं. ती निशब्द झाली.
“ हे बघ , मी जे सांगतीये ते नीट ऐक.. आता तू वाईट वाटून नको घेऊ. आपलं नाही रे जमू शकत. फ्रॅन्कली स्पीकिंग.. तुझं आणि माझं स्टेटस वेगळं आहे. आयुष्य जगण्यासाठी आपल्या साथीदाराची साथ हवी असतेच पण त्यासोबत पैसा लागतोच ना.. अॅडजेस्टमेंट मला कधी जमली नाही आणि जमणार नाही.. हे जग आता पैशानेच चालतं. तू दुसरी बघ.. तू चांगला मुलगा आहेस पण माझ्या लेवलचा नाहीयेस. सॉरी . ” ती हे सगळं त्याच्या तोंडावर बोलून मोकळी झाली.
“ मी खूप मेहनत घेऊन कमवेन पैसा. प्रॉमिस करतो. ” दुखावलेला तो म्हणाला.
“ हे बघ , ह्या मेहनतीला वेळ खूप लागतो. ह्या मेहनतीच्या काळात खूप अॅडजेस्टमेंट करावी लागते. ते नाही जमू शकत मला . ” तिने बॅगमधून पैसे काढले आणि टेबलावर ठेवले. “ हे चहाचे पैसे.. निघते मी. आणि एक .. माझा एक चांगला मित्र म्हणूनच राहा आयुष्यात. ”
“ अगं चहाचे पैसे देण्याएवढे का होईना पैसे असतात तेवढे. मी देतो पैसे. तू ठेव हे पैसे.”
“ स्वाभिमानी पण आहे मी. आधीच दुखावलं तुला हे सगळं बोलून.. अजून नाही दुखवायचं . निघते मी. ”
तिच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता हे त्याला कळून चुकलं. हिला विसरून जाणं शक्य नाही.. हिची आठवण स्वस्थ बसू देणार नाही. असं मनाशी बोलून तिच्या पाठोपाठ तो देखील कॅन्टीन मधून निघून गेला.. दोन विरुद्ध दिशेने दोघे निघून गेले आयुष्यभरासाठी.
अल्पावधीतच ह्याने एक स्वतः चा गृह उद्योग सुरू केला. प्रचंड यश त्याला मिळालं. हुशारी , मेहनतीमुळे त्याला धन दौलत लाभली. चाळीत राहणारा तो आता ३ बीएचके मध्ये राहू लागला. मित्रांकडून मध्यंतरीच्या काळात त्याला तिच्याविषयी कळलं. एका सीईओ सोबत तिचं लग्न झालं खरं पण तिच्या नवऱ्याने फ्रॉड केला. कंपनी डबघाईस आली. तिचं आयुष्य उध्वस्त झालं. नवऱ्याचं करिअर बरबाद झालं आणि ती , तिचा नवरा वन बीएचके मध्ये राहू लागले. परिस्थितीमुळे अॅडजेस्टमेंट करणं ती शिकली. चार पैसे जास्त मिळवण्यासाठी एका खाजगी बॅंकेत नोकरी करू लागली.
परिस्थिती बदलली. काही वर्षांपूर्वी वडीलांच्या कारमधून फिरणारी ती आता बसची वाट पाहत बसस्टॉपवर होती आणि काही वर्षांपूर्वी बसमधून फिरणारा तो कारमध्ये बसून तिला पाहत होता. “ स्टेटस कधीही बदलू शकतो. ” तो मनाशीच म्हणाला. तिला अशा अवस्थेत पाहून वाईट वाटत होतं. आपल्या स्टेटस चा नाही म्हणून आपण ह्याला नाकारलं ह्या गोष्टीचा तिला पश्चात्ताप होत होता. दोघांचेही डोळे पाणावले. बोलण्यासारखं काही नव्हतंच. त्या वळणावर सोडून गेलेली ती आता नव्या रूपात उभी होती. सिग्नल ग्रीन झाला. कार तिथून निघून गेली. कारमधून मान बाहेर काढून ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिला पाहत होता. ती देखील बसस्टॉपवरून नजर जाईल तिथपर्यंत त्याच्या कारकडे पाहत होती पुन्हा एकदा कधीतरी असंच एकमेकांना दुरूनच पाहण्यासाठी.

समाप्त
लेखक – पूर्णानंद मेहेंदळे
SWA membership no. 51440
Contact no.7507734527