Login

पुन्हा एकदा नव्याने भाग ३

Punha Ekda Nvyane
पुन्हा एकदा नव्याने भाग ३


तेवढ्यात टॅक्सीवाल्याने रेडिओ सुरू केला, आणि त्यावरील गाण्याचे ते बोल जणू विधीच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे होते.

“ना सांगताच आज हे कळे मला,
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला.

तू सांगतच आज हे कळे मला,
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला.

मग भीती कुणाची कशाला,
अरे भीती कुणाची कशाला.”

ना सांगता आज हे कळे मला.


गाण्यात हरवलेले दोघे अचानक लागलेल्या ब्रेकने भानावर आले व टॅक्सीतून उतरले. काहीच अंतरावर घर होते म्हणून पायी चालत निघाले. दोघेही काही न बोलता चालत होते.मुसळधार पाऊस आणि अंधरलेली रात्र,रस्ते सुद्धा शांततापूर्ण त्यांना साथ देत होते. मातीच्या ओल्या सुगंध दोघांनीही जणू वेड लावत होता.


दोघेही चिंब भिजलेले रस्त्याच्या एका बाजूने चालत होतो, मध्येच गडगडणारे ढग दोघांमधील शांततेला तडा घालत होते. अचानक जोरात वीज चमकली आणि विधीने भीतीने अर्पितचा हात घट्ट पकडला. तिच्या हातातील छत्री खाली गळून पडली.

विधीचा हात आपल्या हाती घेत अर्पितने अगदी जवळ खेचले. विधीने अंग चोरून घेत आपले डोळे मिटून घेतले आणि पुन्हा एकदा त्याच्या मिठीत विसावली. कितीतरी वेळ विधी अर्पितच्या उबदार बाहुत स्वतःला जणू विसरूनच गेली होती.

आकाशातून रिपरिप करत बरसणारे ते पाण्याचे टपोरे थेंब दोघांनाही चिंब करत होते. विधीने डोक्यावर पदर घेतला होता. त्याने तो पदर हळूच खाली केला. त्याखाली असलेले विधीचे भिजलेले लांब काळेभोर केस त्याने मोकळे केले.

ओल्या झालेल्या केसातून तो आपली बोटे हलकेच फिरवू लागला. आकाशातून मोती ओघळत होते, केसांवर आणि तो आपल्या हातांनी अलगद त्यांना स्पर्शून घेत होता.

गोरापान चेहरा, चाफेकळी नाक, चेरीसारखे लालेलाल ओठ, मोठे मोठे पाणीदार डोळे, लांबसडक काळेभोर केस,गालावर पडणारी खळी, नखशिखांत चिंब भिजलेले विधीचे ते सौंदर्य, त्यादिवशी तो पहिल्यांदा अनुभवत होता असे तो कधीतरी सहज बोलून गेला होता.

विधीच्या ओल्या झालेल्या केसातुन फिरणारी त्याची बोटे हलकेच तिच्या गालावर आली. चेहऱ्यावरून ओघळणारे पाण्याचे दवबिंदू त्याने हलकेच आपल्या बोटाने टिपायला सुरुवात केली. त्याच्या उबदार स्पर्शाने विधीचे अंग न अंग शहारून गेले.


आयुष्यातील पहिल्या प्रेमाचा तो गंध तिला नवीनच होता आणि ती सुद्धा त्याच्यात धुंद व्हायला तयार होती. त्या प्रेमरंगात विधी आकंठ बुडाली होती.

मात्र त्या दोघांतील शांतता भंग करू पावणारा मेघ राजा पुन्हा एकदा जोराचा कडाडला तसे त्याने पुन्हा विधीला त्याच्या मिठीत घेतले. दोन चिंब देह जणू पावसाने एकरूप केले होते. दोघेही धुंद झाले त्या मधुर वातावरणात, दोन मने त्या चिंब पावसात जणू एकरूप झाली होती.

त्याच्या छातीची वेगाने होणारी ती कंपने विधीच्या कानांना ऐकू येत होती. तिच्या हृदयाची गती सुद्धा त्याला साद देत होती. त्याचा उष्ण श्वास तिच्या मानेवर जाणवू लागला. त्याने आपले ओठ हळूच विधीच्या गालावर टेकवले. तसे विधीने पुन्हा त्याला दूर सारले.

विधी त्या नवख्या स्पर्शाने मोहरुन गेली व अर्पितचा हात सोडून पुढे जायला वळली. मात्र त्याने तिचा हात ओढत पुन्हा मागे खेचले. टपटप बरसणारे पाऊसरुपी मोत्याचे थेंब विधीच्या चेहऱ्यावर जमा होत होते आणि अर्पित आपल्या ओठांनी त्यांना टिपून घेत होता.


विधीच्या खळीदार गालांना होणारा त्याचा तो मोहक स्पर्श हवाहवासा वाटत होता. वातावरणातील बोचरा वारा त्या दोघांमधील दुरावा दूर करू बघत होता जणू विधात्याचीच ही योजना असावी.

विधीच्या जवळ येत त्याने आपले ओठ ओठावर टेकवले आणि तशी जोराची वीज कडकडली. तशी विधी भानावर आली आणि त्याला तसेच दूर लोटले. आपण काय करून बसलो याची जाणीव होऊन विधी पळतच घराच्या दिशेने धावली. घर जवळच आले होते. दारातच आई उभी होती विधीला पळत येताना पाहून तिने लगेच विचारले, “विधी, अगं अर्पित कुठे आहे?”

विधी थरथरतच बोलली, “आई.., अर्पित.., अर्पित भाऊजी..” तितक्यात मागून अर्पित बोलला, “आई अगं मी ठीक आहे, गाडी बंद पडली म्हणून उशीर झाला थोडा आणि काय तू आत तर येऊ दे आम्हांला”, असे म्हणतच आईच्या हाती त्याने औषध सोपवले.

आईने लगेच दोघांना आत घेतले. आत येताच विधी आपल्या रूम कडे धावली. आज केवढी मोठी चूक आपल्या हातून झाली याचाच विचार करत विधी अंधारात पायऱ्या चढत होती कारण पाऊसामूळे लाईट नव्हती. सगळीकडे अंधार झाला होता आई आवज देत होती. “विधी बाळा..” पण विधीचे त्याकडे लक्ष नव्हते. विधी आपल्याच विचारात हरवली होती आणि अचानक तिचा पाय घसरला.


क्रमशः

🎭 Series Post

View all