पुन्हा मुलगीच झाली ??

This is a social awareness post



मागच्या दोन्ही वेळेस मुलीच झाल्या, आता ह्या वेळी तरी मुलगा होऊ दे ग, जवळ जवळ प्रत्येक नातलगाने आणि मैत्रिणीने बजावलं होतं. 'ती' काहीच बोलली नाही. मुलगा झाला म्हणजे तुमची म्हातारपणाची सोय होईल, शिवाय वंशाला दिवा हवाच. 'ती' काहीच बोलली नाही.
अरेरे.. तिसऱ्यांदा मुलगी ?
अरेरे... तिसरी पण मुलगीच का ?
आता ह्या जोडप्याचं कसं होणार? ही काळजी 'ते' दोघं सोडले तर प्रत्येक नातलागला लागली होती. 'ती' आणि 'तो' काहीच बोलले नाहीत..
आता आधीच्या दोघींचं बारसं झालं आहे थाटात करून, तिसरीचं नका करू, काही गरज नाहीये, नुसतं पाळण्यात टाकून नाव ठेवा घरच्या घरी.. पुन्हा नातलग आणि मैत्रिणींचे सल्ले.. आता मात्र त्यांनी उत्तर दिलं, अहो, आमच्या घरात 2 बारशी झालीत पण ह्या तिसरीची तर पहिलीच वेळ न बारश्याची, आम्ही थाटातच करणार.
बारसं थाटात तर केलंच, पण तिघी मुलींना उत्तम शिक्षण देऊन, स्वतःच्या पायावर उभं करून, स्वतःचे विचार करण्याचे स्वातंत्र्य देऊन, आपल्या विचारांशी प्रामाणिक राहायला शिकवून सगळ्यांची तोंडं बंद केली त्यांनी.

असे माझे आई बाबा.. अगदी मी कॉलेज ला असे पर्यंत स्मरणात आहे, ' मुलगा नाही का तुम्हाला? अरेरे .. '
हे वाक्य त्यांच्या बाबतीत अनेकदा उच्चारलं गेलं. 'ते दोघे' ह्यावर काही उत्तर द्यायचे नाहीत. मी अनेकदा त्यांच्यावर चिडायचे, का तुम्ही गप बसता म्हणून, ह्यावर 'ते' म्हणायचे, अगं , ज्याला समजून घेण्याची इच्छा असेल तोच ऐकेल, नसेलच समजून घ्यायचं तर उगाच आपण का बोलून आपला किल्ला लढवत राहायचा? वेळ आली की उत्तरं आपोआप मिळतील त्यांना.

आई आजारी होती दीड वर्ष, जाण्या आधी हॉस्पिटल मध्ये मला म्हंटली, 'ज्या नातलगांनी आम्हाला नेहेमीच 'तुमचं म्हातारपणी मुलगा नाही त्या मुळे अवघडच आहे, हे सुनावलं होतं, त्यांना मला अभिमानाने सांगावेसे वाटते, की मुली होत्या म्हणूनच मी आजारपण सहन करू शकले, त्या होत्या म्हणूनच माझी इतकी काळजी घेतली गेली, अगदी उश्या-पायाशी सेवा करत हजार होत्या माझ्या तिघी मुली. तुमची मुलं, तुमच्या आजारपणात फिरकली पण नाहीत तुमच्या घरी, काळजी घेणं तर जाऊच द्या, पण आपुलकीने साधी तुमची चौकशी सुद्धा करत नाहीत म्हणून रडतात आता माझ्या कडे येऊन.

इतक्या आजारपणात पण तिला हे आठवलं, ह्या वरून कल्पनाच केलेली बरी की त्यांना मुलगा नाही म्हणून पूर्वी किती टोमणे आणि चेष्टा सहन करावी लागलीे असेल त्याचे.

आता मात्र बाबांना कोणी मुलगा नाही का म्हंटलं तर ते गप नाही बसत, म्हणतात, 3 मुली आणि 3 जावई आहे की, कशाला हवा होता मुलगा ??