#लघुकथास्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून जर नाव, स्थळ, प्रसंग अथवा जीवित - मृत्यूशी काही साम्य आढल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
शीर्षक:- पुन्हा नव्याने
"आज तुला जावून एक वर्ष झाले. खरे तर असे वाटतच नाही की तू माझ्यासोबत नाहीस. नातेवाईकांनी मला काही दिवस त्यांच्या घरी राहायला बोलावले होते पण मी नाही गेले. कारण तिथे गेले ना पुन्हा तुझा अपघात कसा झाला आणि तुझी एक महिन्याची जगण्याची झुंज कशी असफल ठरली हेच सारखे बोलून दाखवले असते. ते मला नको होते. आता कुठे तू असशील तिथे तू सुखात असशील असेच मी मानते." समोर हसरा चेहरा असणारा त्याच्या फोटोफ्रेमकडे पाहून ती बोलत होती.
सरस्वतीचा हा आता दिनक्रम झाला होता. सकाळी उठायचे आणि त्याच्यासोबत बोलत राहायचे. सरस्वती आणि योगेंद्र ह्यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मागच्या वर्षी रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने त्याला उडवल्याने तो भीषण अपघातात जख्मी झाला होता. खूप वेळाने त्याला काही व्यक्तींनी मदत करून एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते.
जसे सरस्वतीला समजले तसे ती पळतच हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्याची शुध्द हरपली होती आणि त्याच्यावर तातडीने डोक्याला मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या संमतीपत्रावर सही करतांना तिचे डोळे भरून आले होते आणि हात थरथर कापत होता. त्याला काही होणार नाही असे आश्वस्त करणारे परिचारिकेचे शब्द तिला धीर देवून गेले होते.
थोड्या वेळात तो शुद्धीवर येईल असे सांगण्यात आले पण तो पंधरा दिवस झाले तरी शुद्धीवर आलाच नाही. तिने किती मंदिरांच्या पायऱ्या चढून उतरल्या असतील आणि कित्येक वेळा देवाला उपवास करून जीवनदानासाठी साकडे घातले असेल ह्याचे मोजमाप नव्हते.
शस्त्रक्रियेनंतर तो कोमात जावून अखेर एका महिन्यातच त्याची प्राणज्योत मावळली होती. दुःखाचा डोंगर कोसळला होता तिच्यावर आणि ती आपल्या आयुष्यात त्याच्यानंतर पुढे काय करायचे असे म्हणून सुन्न होऊन गेली होती.
काही दिवस नातेवाईक दिवसकार्य होईपर्यंत थांबले होते नंतर ते आपल्या कामासाठी निघून गेले. त्याचे आई-वडील पंधरा वर्षांपूर्वीच वारले होते. तिने त्याच्यासोबत पळून जावून लग्न केल्याने माहेरच्यांनी आमचा काही संबंध नाही म्हणून तिच्याशी सर्व संपर्क तोडला होता.
तिच्या आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींनी तिला आधार दिला होता. ती काम करत होती तेही काही दिवसांत तिने सोडून दिले होते.
ईशा, सरस्वतीची मैत्रीण भेटायला आली होती.
"कशी आहेस सरू?" मैत्रिणीने विचारले.
"ठीक आहे." ती एव्हढेच बोलली.
"मला वाटते तू आयुष्यात पुढे जावावे." ईशा म्हणाली.
"काय करू पुढे जावून?" ती उदास चेहऱ्याने म्हणाली.
"तू आता पाळणाघर चालवत आहेस ते ठीक आहे पण तू दुसऱ्या लग्नाचा विचार करावा असे मला वाटते." आपल्या मैत्रिणीचे जीवन एकाच जागी थांबून आहे म्हणून ती काळजीने म्हणाली.
"मी तुला आधी पण सांगितले आहे की योगेंद्र शिवाय माझ्या मनात दुसरे कोणी नव्हते आणि नसणार. आता मला पुन्हा लग्न करायचे नाही. माझे त्याच्यावर प्रेम होते आणि माझ्या नावासमोर मी दुसरे कोणाचेही नाव लावू शकत नाही. जे आहे ते मी स्वीकारले आहे." सरस्वती म्हणाली.
"असे एकटीने आयुष्य कसे काढशील? तुला काही लोक सोडून कोणीच पुढे काही झाले तर सोबतीला नसणार. तुझे माहेर आणि सासर दोन्ही असून नसल्यासारखे आहे. प्रत्येकजण पुढे जातो मग तू तिथेच का थांबली आहेस? तू दुसरे लग्न केलेस म्हणजे योगेंद्रवर प्रेम नव्हते असे नाही. तू पुन्हा विचार करावा असे मला वाटते." तिची मैत्रीण म्हणाली.
"बरं, मी पुढच्या आठवड्यात एका नाटकाला जाणार आहे. आज तिकिटे बुक करून ठेवते. तू येणार का?" सरस्वतीने विचारले.
"नाही गं, माझ्या नवऱ्याने आधीच गावी जाण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मला जमणार नाही." ती म्हणाली.
"हरकत नाही. मी माझे तिकीट काढते. मी आणि योगेंद्र गेलो होतो एकदा हे नाटक पाहायला तेव्हा मला नाटक काय असते हे समजले. त्यांना चित्रपट पाहण्यापेक्षा नाटक खूप आवडायचे." ती हसत म्हणाली.
थोडा वेळ गप्पा मारून तिची मैत्रीण घरी निघून गेली.
स्वतःसाठी जेवण बनवून तिने रेडिओवर गाणी ऐकत आपले रात्रीचे जेवण केले.
दुसऱ्या दिवशी पाळणाघरात लहान लहान मुले आली होती. काहींचे आई-वडील दोघे काम करायचे म्हणून ते सरस्वतीच्या पाळणाघरात ठेवून जात. लहान खेळणी आणि खाण्याच्या वस्तू तिने ह्या मुलांसाठी ठेवल्या होत्या. आई नसूनही तिने एका आईसारखी माया सर्व मुलांवर करत होती. मुलांनाही तिचं आवडायची आणि घरी जाताना काही मुले तर चक्क रडायची कारण त्यांना सरू काकूसोबत राहायला आवडायचे.
दिवसामागून दिवस जात होते. सरस्वतीने काही सामाजिक कामात स्वत:ला झोकून दिले होते. पाळणाघर सांभाळून ती हे सर्व करत होती. नवऱ्याची पेन्शन येत होती आणि ती जास्त खर्च करत नसल्याने तिला जास्त काही पैसे लागत नसायचे.
योगेंद्रच्या नावाने तिने एक संस्था उभारायचे ठरवले होते. त्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम बनवता येईल ह्याचे मार्गदर्शन करण्यात येत होते. आधी मिळालेला कमी प्रतिसाद ह्याने खचून न जाता तिने पुढे ते कार्य चालू ठेवले आणि नंतर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला.
एकदा एका एनजीओमध्ये काम करत असताना तिला एक लहान बाळ त्यांच्या अनाथालयामध्ये दाखल झाल्याचे समजले कारण ते बाळ खूप वेळ झाले रडायचे थांबत नव्हते.
"ताई, काय झाले?" रडणाऱ्या बाळाला पाहून तिने विचारले.
"खूप वेळ झाले तो रडतच आहे. त्यात त्याला ताप पण आहे. डॉक्टरांनी त्याला तपासून झाले पण थंडीत रात्रभर कोणीतरी कचरापेटीजवळ सोडून गेले होते म्हणून त्याला कितीही काही केले तरी शांत होत नाहीये. लोक कसे असतात ना काहींना मुले लवकर होत नाहीत आणि ज्यांच्या नशिबात मुले असतात त्यांना ती झाल्यावर नकोशी होतात आणि रस्त्यावर सोडून देतात." त्या ताई म्हणाल्या.
"तुम्ही माझ्याकडे देता का त्याला." त्या काही दिवसाच्या मुलाला हातात घेण्यासाठी ती हात पुढे करत म्हणाली.
त्यांनीही तिला त्या लहान बाळाला तिच्याकडे दिले. थोडावेळ रडून सरस्वतीने त्याला अलवार हाताने थोपटत अंगाई गीत बोलायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य! ते बाळ शांत होऊन तिच्या कुशीत झोपून गेले.
काहीवेळा नंतर त्या ताई येवून त्याला पाळण्यात झोपण्यासाठी घेवून गेल्या.
सरस्वती घरी आली. आज तिला खूप एकटे वाटत होते. असे नव्हते की आधी तिला तसे काही वाटत नव्हते पण तिने स्वतःला वेगवेगळ्या कामात गुंतवून ठेवले होते त्यामुळे एकांतात बसल्यावर वाईट विचार येणार नाहीत ह्यासाठी ती प्रयत्न करायची.
"योगेंद्र, तुम्हाला माहीत आहे. आज एक बाळ आश्रमात आणले होते. खूप रडत होते आणि काही केल्या ते थांबायचे नाव घेत नव्हते पण जसे मी त्याला माझ्या कुशीत घेवून थोपटले ना तो शांत झाला आणि झोपला. त्याच्या आईला काहीच कसे वाटले नाही त्या गोंडस बाळाला असे एकटे सोडून द्यायला." त्याच्या फोटो समोर येवून ती म्हणाली.
रात्रीचे दोन वाजले होते आणि सरस्वतीचा फोन वाजला आणि फोन वरचे ऐकून ताबडतोब ती पळतच घराच्या बाहेर पडली.
"काय झाले?" पळत आल्याने मोठा श्वास घेत ती म्हणाली.
"हा पुन्हा रडायला लागला आणि त्यामुळे त्याची तब्येत अजून बिघडली." तिथे एक डॉक्टर होते ते म्हणाले.
तिने त्याला जवळ घेतले आणि डॉक्टरांनी काही खबरदारी घ्यायला सांगून ते निघून गेले.
रात्रभर ती जागी राहिली आणि ते लबाड बाळ आपल्या आईच्या कुशीत झोपावे तसेच सरस्वतीच्या कुशीत शांत झोपून तिचे एक बोट त्याच्या एका हातात पकडून झोपले होते.
रात्र सरली आणि सकाळी पुन्हा डॉक्टर येवून त्याला पाहून गेले तेव्हा बाळ आता ठीक असल्याचे सांगितले त्याबरोबर तिथल्या सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
सरस्वतीला आता पुन्हा त्याला त्यांना सुपूर्त करताना आपले काळीज काढून देतो असे झाले होते. त्यामुळे तिला वाईट वाटत होते.
सरस्वती दुःखी मनाने घरी परतली पण आज तिच्या डोक्यात काही वेगळेच विचार चालू होते.
पाळणाघरात मुलांना सांभाळत होती आणि मुले आईबाबांसह जाताना पाहून तिला आनंद होत होता कारण आई आणि वडिलांचे दोघांचे स्थान हे कोणीच घेवू शकत नाही. तिनेही योगेंद्र बरोबर आपल्या बाळाची स्वप्ने पाहिली होती. पुन्हा ते घर खाली वाटत होते आणि शांतता तिला जीवघेणी वाटत होती.
"नमस्कार मॅडम,मला एक महिन्यापूर्वी इथे आलेल्या बाळाला दत्तक घ्यायचे आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल?" सरस्वती अनाथाश्रमाच्या मुख्य अधिकारी होत्या त्यांच्या केबिनमध्ये बसून बोलत होती.
"सरस्वती ताई, तुमचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठ लोकांना देवू त्यानंतर काही प्रक्रिया आहे त्यातून जावे लागेल त्यानंतरच मंजूरी मिळाल्यावर तुम्हाला बाळाला दत्तक घेता येईल की नाही ते सांगता येईल. तुम्हाला त्यासाठी वाट पाहावी लागेल." त्यांनी सरस्वतीला सर्व समजून सांगितले.
सरस्वती दररोज त्या बाळाला पाहायला यायची आणि मंदिरात जावून त्या बाळाला आईचे सुख देण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची.
काही महिन्यानंतर,
"ते बघ तुझे बाबा आहेत." समोर योगेंद्रचा फोटो दाखवून ती म्हणाली.
ते बाळ खळखळून हसून तिला जणू हो म्हणून प्रतिसाद देत होते.
"योगेंद्र, पाहा आपले बाळ किती खळखळून हसत आहे." ती जणू तो बाजूला आहे असेच समजून बोलत होती.
अथक प्रयत्नांनी सरस्वतीला त्या लहान बाळाला दत्तक घेता आले. योगेंद्र नंतर तिने दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही आणि तिचा एकाकीपणा त्या छोट्या मुलाची आई बनून नकळतपणे संपुष्टात आला होता. योगेंद्रला ती विसरू शकत नव्हती आणि दुसरे लग्न करून त्या व्यक्तीवर प्रेम न करता अन्याय करणे तिला पटत नव्हते. पुन्हा नव्याने जीवनाची सुरूवात तिने केली आणि ते छोटेसे बाळ तिचा जीव की प्राण झाले होते तसेच योगेंद्रच्या आठवणी सोबत घेवून ती जगत होती.
समाप्त.
© विद्या कुंभार.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा