Login

पुन्हा उमललेले स्वप्न

सासू सुनेच्या नात्यावर लिहलेली ही कथा.
शीर्षक : पुन्हा उमललेले स्वप्न



सकाळचा सूर्य नुकताच अंगणात पसरत होता. घरातलं वातावरण प्रसन्न होतं. लग्नाला फक्त काही दिवस झाले होते, आणि घरात अजूनही नवा उत्साह होता. चहाचा सुवास संपूर्ण घरभर पसरला होता. सुमित्राबाई स्वयंपाकघरात काही काम करत होत्या. त्याच वेळी त्यांनी हळू आवाजात हाक मारली —

“मेघना! ये बाळा, थोडा वेळ माझ्या जवळ बस ना!”

नव्याने आलेली सून मेघना पटकन हसत म्हणाली —
“हो आई !”

ती आपलं ओंजळभर हास्य घेऊन सुमित्राबाईंच्या जवळ आली आणि आदराने त्यांच्या शेजारी बसली.

“बाळा,” सुमित्राबाई म्हणाल्या—
“आतापर्यंत सगळं गप्पांमध्ये,हसण्यामध्ये गेलं, पण आता खरी परिक्षा सुरू होते. घर सांभाळायचं म्हणजे फक्त काम नाही — सगळ्यांच्या मनाला ओळखून घेणं हाही त्याचा भाग असतो.”

मेघना शांतपणे ऐकत होती.

“घरात आलेली नवी सून सगळ्यांच्या अपेक्षांना पूर्ण उतरावी. म्हणून आज मी तुला सगळ्यांच्या — तुझे सासरे, केतन, आणि मनू — यांच्याबद्दल सांगते. त्यांना काय आवडतं, काय नाही, हे जाणून घेतलंस तर तुला सोपं जाईल.”

सुमित्राबाई एक-एक करून सगळ्यांच्या सवयी सांगत गेल्या — कोणाला नाश्त्यात काय आवडतं, कोणाला आवाजाची चिड, कोणाला सकाळचं वाचनप्रिय असतं... आणि मेघना अत्यंत लक्षपूर्वक सगळं ऐकत होती.

काही वेळाने सुमित्राबाईंचं बोलणं थांबलं.

मेघना प्रेमाने म्हणाली —
“आई , तुम्ही सगळ्यांचं सांगितलंत, पण तुमचं काय? तुमच्या आवडी-निवडी सांगायच्या राहिल्या ना?”

सुमित्राबाई क्षणभर थांबल्या. त्यांच्या ओठांवर हसू आलं, पण डोळ्यांत एक हलकी झिणझिणी दिसली.
“माझ्या आवडी-निवडी?” त्या मंद आवाजात म्हणाल्या.
“बाळा, ज्या दिवसापासून या घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवलाय, त्या दिवसापासून माझ्या आवडी कुठेतरी हरवून गेल्या. सगळ्यांच्या आवडी जपण्यात माझ्या आवडीचा मागही राहिला नाही...”

मेघना आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली.
“असं का आई ? तुमचं मन नाही लागत का आता काही करण्यात?”

सुमित्राबाई हलकेच सुस्कारा टाकत म्हणाल्या —
“बाळा, या घरात सूनबाईच्या आवडी-निवडींना कोण विचारतं? तिचं काम असतं सगळ्यांच्या आवडींनुसार वागणं. तिची स्वतःची स्वप्नं, तिच्या आवडी — त्या हळूहळू हरवतात... आणि कधीतरी ती स्वतःही विसरते की तिच्या मनालाही काही हवं होतं.”

त्यांच्या आवाजात दडपलेली वेदना होती.

मेघनाचं मन हेलावलं. ती पुढे झुकत म्हणाली —
“मग मला सांगा ना आई,मला सुद्धा असंच करावं लागेल का? मला तर कूकिंग क्लास सुरू करायचा आहे. खूप दिवसांपासून इच्छा आहे.”

सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं.
“नाही ग बाळा, तुझ्यासोबत असं होऊ देणार नाही मी. मी माझ्या इच्छा दफन केल्या, पण तू नाही करायच्या. हा माझा शब्द आहे तुला. तुझा क्लास तू सुरू कर.”

मेघनाने त्यांच्या हातावर आपले हात ठेवले — “खरंच आई?”

“हो, माझं आशीर्वाद तुझ्यासोबत आहे.”

काही दिवसांत मेघनाने कुकिंग क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण घरात सगळ्यांना हे पसंत नव्हतं.

“घरात काही कमी आहे का? क्लास सुरू करून काय साध्य होणार?” केतन म्हणाला.
“लोकं काय म्हणतील?” मनूनेही मुद्दा काढला.

पण सुमित्राबाई ठाम होत्या —
“ती जे करतेय ते चुकीचं नाही. प्रत्येकाला आपली ओळख निर्माण करण्याचा हक्क आहे.”

घरातल्या विरोधातही सुमित्राबाई ढाल बनून उभ्या राहिल्या.

मेघनाचा क्लास हळूहळू चालू लागला. परिसरातील बायकाही येऊ लागल्या. तिला खूप आनंद होत होता. ती दरवेळी सुमित्राबाईंना म्हणायची —
“आई,तुम्ही नसतात तर माझं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं.”

सुमित्राबाई हलकं हसत म्हणायच्या —
“तुझं हक्काचं स्वप्न आहे ग, त्यासाठी तुला कुणाचंही परवानगी लागायचं कारण नाही.”

पण रात्री सगळे झोपल्यावर सुमित्राबाई अनेकदा शांतपणे आपल्या कपाटाकडे बघत बसायच्या. काहीतरी आत दडलेलं होतं — एक अपूर्ण अध्याय.



एक दिवस...

मेघना सुमित्राबाईंच्या कपाटातून साडी काढत होती. अचानक वरच्या शेल्फवरून एक फाइल खाली पडली.
तिने सहज ती उघडली... आणि थबकली.

“अरे वा!” तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले.
“संगीत विद्यापीठाची पोस्ट-ग्रॅज्युएशन डिग्री? आणि हे सगळे सर्टिफिकेट्स... पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस, संगीत स्पर्धा, मंचावर गायन...”

तिच्या डोळ्यांत आश्चर्य आणि अभिमान चमकला.

“आई इतक्या टॅलेंटेड! आणि आम्हाला कधीच सांगितलं नाही!”

ती धावत खाली आली.
“आई ! बघा ना, हे काय आहे? तुम्ही तर अप्रतिम आहात!”

सुमित्राबाई चकित झाल्या.
“हे... हे तुला कुठे मिळालं?” त्यांनी थरथरत्या हातांनी फाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला.

“अहो थांबा ना आई..मी फक्त बघत होते. पण तुम्ही एवढं का घाबरता?”

“काही नाही बाळा...”

“नाही आई,आता नाही चालणार. जर तुम्ही मला तुमची मुलगी समजता, तर मला खरं सगळं सांगायलाच हवं.”

सुमित्राबाई काही क्षण शांत राहिल्या. मग डोळ्यांतून अश्रू गळायला लागले.
“ठीक आहे बाळा... सांगते.”

त्यांनी दूरवर पाहिलं, आणि त्यांच्या आठवणी मागे वळल्या...



तरुण सुमित्राबाई त्या वेळी नवविवाहित होत्या. त्यांचं मन संगीताच्या तालात नाचायचं. पदवी घेतल्यानंतर त्यांनी विद्यापीठातून संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. गाणं म्हणजे त्यांचं श्वास होतं.

एका संध्याकाळी त्यांनी धाडस करून सासूबाई केसरीबाई आणि नवरा महेंद्र यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

“सासूबाई, मला विचारायचं होतं... मी संगीताचं शिक्षण घेतलं आहे, म्हणून एखाद्या शाळेत नोकरी करावी असं वाटतं.”

केसरीबाईंचा चेहरा कठोर झाला.
“सुनबाई , आता घर संभाळ. हीच तुझी खरी नोकरी आहे.”

“पण सासूबाई,” सुमित्राबाई गहिवरून म्हणाल्या, “नोकरी नाही केली तरी चालेल, पण घरातच मी कोचिंग क्लास घेईन. काही मुलींना शिकवेन...”

“थांब!” केसरीबाईंचा आवाज चढला.
“माहेरच्या इच्छा माहेरातच ठेवल्या पाहिजेत. इथे आमच्या घराचं नाव आहे. समाज काय म्हणेल? बहू गाणं शिकवते म्हणे? नाही जमणार! आणि परत या विषयावर बोललीस तर चांगलं होणार नाही!”

तेवढ्यात महेंद्र आत आले.
“बस एवढं पुरे आहे. घरात शांतता ठेव. आम्हाला लोकांच्या बोलण्याचं कारण नको.”

त्या दिवसानंतर सुमित्राने एक शब्दही काढला नाही.
त्या रात्री त्यांनी आपल्या सर्व प्रमाणपत्रं, डिग्री आणि संगीताची वही — सगळं एका फाइलमध्ये भरलं आणि कपाटाच्या मागच्या बाजूला ठेवून दिलं.
आणि त्याच क्षणी त्यांच्या मनातली सूरमाला थांबली.



वर्तमानात परत...

“आणि मग बाळा,” सुमित्रा म्हणाल्या, “त्या दिवसानंतर मी कधी गाण्याचा विचारही केला नाही. पण जेव्हा तुझ्यात तशीच आवड पाहिली. मीं विचार केलं परत एका सुनेचं स्वप्न हरवणार नाहीं. "


रात्री मेघनानीं केतनला सगळं सांगितलं. केतन म्हणाला —" काय?? आईला आम्ही कधी गातांना पहिलाच नाहीं.आम्हाला हे सगळं माहितीच नव्हता."
मेघना म्हणाली — " केतन आपण आता त्यांचे स्वप्न पूर्ण करूया."

दोघं काहीतरी ठरवून झोपले.


घरात एक खोली रिकामी होती. तिकडे सगळं जुना सामान ठेवलं होतं. ती खोली दोघांनी मिळून स्वच्छ केली. सगळं नीट करून खोलीला नवीन रुप दिलं.

एक दिवशी सकाळी मेघना सुमित्राबाईंचा हात ओढत त्यांना खाली घेऊन आली. त्यांना त्या खोलीत नेलं.
एकीकडे हारमोनियम, एकीकडे कडे पेटी ठेवली होती.सगळीकडे भिंतीवर संगीतकारांचे फोटो लावले गेले होते.छोट्याशा मंदिरात सरस्वती मातेची मूर्ती ठेवली होती.

केतन आणि मेघना खूप खुश होते.

मेघना म्हणाली —" आई, आता तुमचा हे स्वप्नं पूर्ण करायची वेळ आली आहे.आपण दोघी मिळून ‘संगीत आणि स्वाद’ नावाने क्लास सुरू करूया — मी स्वयंपाक शिकवेन, आणि तुम्ही संगीत. एकत्र येऊन स्त्रियांना दोन्ही कला शिकवूया.”

सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू आले.ते अश्रू आनंदाचे होते.

" पण तुमचे बाबा......" सुमित्राबाई म्हणाल्या.

तेवढ्यात महेंद्रही तिकडे आले आणि म्हणाले —"मला माफ कर सुमित्रा, माझा खूप चुकला. मीं कधीच विचार केला नाहीं. आईंनी जे सांगितलं तेच तुला करायला लावले. पण आता नाहीं. मला मेघनानीं माझ्या चुकीची जाणीव करून दिली.
आता मीं तुझ्यासोबत उभा आहे.तू तुझे स्वप्नं पूर्ण कर."


काही महिन्यांत त्यांच्या उपक्रमाने परिसरात नाव कमावलं.
“संगीत आणि स्वाद” हे केंद्र स्त्रियांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक बनलं. मेघना ज्या स्वयंपाकात नवलाई आणत होती, त्याच वेळी सुमित्राबाईंचा आवाज त्या घरात पुन्हा झंकारत होता.

संध्याकाळी जेव्हा वर्ग संपायचा, तेव्हा दोघीही अंगणात बसून चहाचा कप घेत असत.
सुमित्रा हलकेच म्हणायच्या —
“बघ बाळा, मी विचारही केला नव्हता की माझे सूर परत जागे होतील.”

मेघना हसत म्हणायची —
“आई , सूर कुठे हरवतात? फक्त कुणीतरी त्यांना पुन्हा ऐकून घ्यायला लागतं.”


असंच एक दिवशी संध्याकाळी त्या दोघी निवांत बोलत होत्या.
सुमित्राबाई म्हणाले -"मेघना तू मला परत स्वप्न जगणं शिकवलं. "
त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ओठांवर हसू.
“आज माझ्या हरवलेल्या सूरमालेचं एकेक मणी पुन्हा जोडला गेलाय,” त्या म्हणाल्या.

मेघना त्यांच्या शेजारी बसली, त्यांचा हात हातात घेत म्हणाली —
“आई , तुमचे सूर आता कधीही हरवणार नाहीत.”

अंगणात मंद वारा वहात होता. कुठूनतरी स्वरांचा आवाज आला —
सुमित्राबाई हलकेच गुणगुणल्या,
“जीवन हे गाणं आहे बाळा... फक्त आपल्याला ते ओळखायचं असतं.”

आणि त्या क्षणी, घरभर एक अदृश्य संगीत झंकारलं —
जणू दडपलेली सुरावट पुन्हा जगायला लागली होती.



स्त्रीचं अस्तित्व केवळ घरापुरतं मर्यादित नाही. तिच्या आत दडलेली कला आणि स्वप्नं हेच तिचं खरं आयुष्य आहे.
0