Login

सजा

१९६४/६५ सालची गोष्ट आहे......

१९६४/६५ सालची गोष्ट आहे . मारवाडी लोक स्टेनलेस स्टीलच्या भांड्याची भिशी चालवीत . दुकानात ट्रान्झिस्टर्स , रेडिओ व इतर ही काही वस्तू होत्या. काही विशिष्ट मासिक रक्कम वर्षभर भरून वर्षाच्या शेवटी काही स्टेनलेस स्टीलची भांडी मिळत असंत. आम्ही पण पैसे भरले होते. बहुतेक पंधरा रुपये महिना होते. मला वाटतं एक दोन वर्ष भिशी ठीक चालली.नंतर एक दिवस काय झालं कळलं नाही. बऱ्याच लोकांना सांगितल्याप्रमाणे भांडी मिळेनाशी झाली. त्या दिवशी सकाळी "आम्हाला भांडी दे ,नाहीतर पैसे परत दे," असं म्हणू लागले असावेत. मग काय लोक मारवाड्यांच्या दुकानातली मिळतील ती भांडी घेऊन घराकडे धावत सुटलेले दिसले. विचारल्यावर समजलं की मारवाड्याने पैसेही परत दिले नाहीत आणि भांडीही द्यायला नकार दिला . नक्की कारण मात्र समजलं नाही. आई म्हणाली, " जाऊन द्या परत असे पैसे गुंतवायचे नाहीत. आणि आपण भांडी पळवून आणण्याचीही गरज नाही. पैसेच गेल्येत ना . नशीब तर कोणी घेऊन गेलं नाही ना. ! "

तेव्हा आम्ही चाळीत राहातं होतो. आमच्या शेजारीच एक सुधा व नरेश नावाचं जोडपं राहातं होतं. त्यांना संजय नावाचा सात आठ वर्षाचा मुलगा होता. तो रविवार होता. त्या दिवशी सुधा, नरेशला सुट्टी असल्याने आरामात उठून काम करीत होती. नरेशही (तिचा नवरा) आदल्या दिवशी मित्राकडे राहायला गेला होता.तो नऊ वाजून गेले तरी आला नव्हता. सात आठ वर्षाचा संजू तेवढा घरात होता. रस्त्यावरचा आरडाओरडा आणि लोकांची पळापळ पाहून त्याने मम्मीला ओरडून सांगितलं," मम्मी भांडी घेऊन माणसं पळतायत बघ. मम्मी मी पण जाऊ बघायला ? " तिने खिडकी बाहेर न पाहता ," तुझा अभ्यास झालाय का ? " संजूने कुरकुर केली. ते ऐकून ती म्हणाली ," गेटजवळून बघ. रस्त्यावर जाऊ नकोस हं " असा इशारा द्यायला ही ती विसरली नाही. तो आहे त्या कपड्यांवर घरातून बाहेर पडला. त्यात त्याला त्याचा मित्र अनिल चार पाच स्टीलची ताटं घेऊन आलैला दिसला. त्याने संजूला दुकान कुठे आहे ते सांगितलं. मागचा पुढचा विचार न करता संजू मग धावत गर्दीतून वाट काढत निघाला. कसातरी दुकानाजवळ आला आणि खेचाखेची चाललेल्या गर्दीत तो घुसला. त्याने हातात येईल ती वस्तू ओढून घेतली. तो होता ट्रान्झिटर. तो घेऊन तो धावतच घरी आला. दारातूनच पुऱ्या तळत असलेल्या सुधाला तो ट्रान्झिस्टर दाखवीत ओरडला. " मम्मी मम्मी हे बघ काय आणलंय ते. " तिने मान तिरकी करून पाहिलं. आणि ती ओरडली व थट्टेने म्हणाली, " अरे एवढी धडपड करुन ट्रानझिस्टरच आणलास ? रेडिओ तरी आणायचास ना !" असं म्हंटल्यावर संजू बाहेर पडत आणतो म्हणाला ते तिने ऐकलंच नाही.संजू पुन्हा धावत सुटला. तो परत जाईल याची तिला कल्पनाही आली नाही.ती तिच्या कामात मग्न होती. अजूनही नरेश आलाच नव्हता. तिला तो मित्राकडे का गेलाय हे माहीत होतं. पत्ते खेळणं आणि पिण्याचा कार्यक्रम होता,जे तिला आवडत नव्हतं.असे कार्यक्रम आजकाल नियमित होऊ लागले होते. खरंतर त्यांचं काल रात्री भांडणंच झालं होतं. शेवटी तिने मोठ्या मुश्किलीने त्याला सकाळी लवकर येण्याच्या अटींवर परवानगी दिली होती.

तिचं काम संपत आलं होतं. बराच वेळ झाला. तासभर झाल्यावर तिचं कामही संपलं. मग मात्र तिला संजू बाहेर गेलाय हे जाणवलं. ती घाबरून रस्त्यावर आली. त्याला हाका मारीत सैरावैरा धाऊ लागली. नाक्याजवळ फार मोठी गर्दी तिला दिसली. गर्दी फार असल्याने तिला एकदम पुढे जाता येईना. तरीही ती दुकानाजवळ जाऊ लागली. पोलीस गर्दी पांगवताना दिसले. लोकांची गर्दी आता कमी होऊ लागली.लोकांना बाजूला करून ती गर्दीत शिरली. काही लोकांनी तिला अडवीत म्हंटले," अहो, बाई कुठे जाताय ? अपघात झालेला दिसत नाही का ? काय आईवडील असतात. मुलांना कशाला पाठवायचं एवढ्या गर्दीत ? " पण तिने त्यांना न जुमानता मान पुढे करून पाहिलं.एका मोठ्या ट्रकखाली संजू आला होता , एका बाजूला त्याच्या हातातला ट्रान्झिस्टर् पडला होता . रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजूला पाहून ती पुढे झाली . आणि त्याला मिठी मारुन मोठ मोठ्याने रडू लागली. " अरे बाळा, का गेलास रे. " तिचा बांध फुटला होता. मग तिला आपण केलेली चूक लक्षात आली. आपण नको ती थट्टा का केली, नाहीतर असं काही घडलंच नसतं.असं तिला वाटू लागलं. पश्चात्तापाने काय बोलावं ते सुचेना. पोलीसांनी ट्क ड्रायव्हला ताब्यात घेतलं होतं. पोलीस सारखे विचारीत होते. " तुमचाच मुलगा आहे ना ? का एवढ्या लहान मुलाला पाठवलंत . असे तुम्ही बेजबाबदार पणे वागता आणि नावं पोलीसांना ठेवता. तुमची पण भिशी होती का ?...." ते इतरही बरंच बोलत होते. पण तिला पोलिसांना काय उत्तर द्यावं तेच सुचेना.तिच्या समोरची गर्दी आता तिच्या भोवतीच फिरत असल्याचा भास तिला झाला. तिला पोलिसांचे आणि इतर आवाजही खूप लांबून आल्यासारखे वाटत होते.ती तिथेच संजूचा मृतदेह कवटाळून रस्त्यावर बसली. नेमका त्याच वेळी घरी निघालेला नरेशही गर्दी कसली आहे,ते पाहायला आला होता. सुधाला पाहून तो पुढे झाला. तिलाच काय तो स्वतःलाही समजावू शकत नव्हता.दुपार उतरु लागली.दोघांनाही पोलिसांनी कसेतरी भानावर आणले आणि पुढील उपचार पूर्ण करण्यासाठी ते पोलिस ठाण्यात घेऊन गेले.पोलिसांनी मात्र खूपच तत्परता दाखवली. तेही चांगलेच सावरलेले दिसले. काही चाळकरीही सोबत होते. मग सुधा आणि नरेश ,संजूचा मृतदेह घेऊन घरी आले. संध्याकाळ होत होती......

सुधाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तिचं थट्टेतलं बोलणं संजूला खरं वाटल्याने हे सगळं घडलं होतं. पण ती खाली मान घालून बसलेल्या नरेशला सांगू शकली नाही. नरेश रडत रडतच तिला म्हणाला," काय ग आपलं नशीब,एवढा गोड मुलगा हातचा गेला.तू त्याला जाऊन द्यायला नको होतंस सुधा. ". खरंतर तिने त्याला गेट जवळूनच बघ असं सांगितलं होतं. पण तिने काम सोडून त्याच्या सोबत जायला हवं होतं. याची तिला फार भयावह जाणीव झाली..... पण आता ती नरेशलाही सांगू शकत नव्हती. रडत रडतच सुधा म्हणाली, " नशिबाला दोष देऊ नका. मी जबाबदार आहे या सगळ्याला. " मग तिनी दबलेल्या आवाजात सगळं सांगितलं. तेव्हा मात्र नरेश चिडून म्हणाला," आज पासून मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, हीच तुझी शिक्षा ."
चाळीतल्या सगळ्यांनी मिळून संजूचे अंत्यसंस्कार केले. आज सुधा हयात नाही. ती पश्चात्ताप आणि नरेशचे मौन यामुळेच पुढच्या सहा सात महिन्यातच गेली.....

नरेशने अतिनिराशेने दोनतीन वर्षातच चाळ सोडली.त्याची खाण्यापिण्याची आणि जगण्याची आंसच नष्ट झाली. तरीही काही दिवस चाळीतल्या लोकांनी त्याला सांभाळून घेतलं. पण त्यांच्या काळजी घेण्यालाही मर्यादा होत्या. मध्यंतरी त्याचा एक जबलपूरचा भाऊ आला . तो काही महिने राहिला. मात्र नरेश ने त्याच्याबरोबर जायला नकार दिला....
अखेरीस नरेश एक दिवस कुणालाही न सांगताच निघून गेला.

(संपूर्ण)

अरूण कोर्डे
१०४ ऑलिव्हिया सोसायटी
उन्नती गार्डन