मागील भागात आपण पाहिले की अखिल आणि निमिषाचा प्रेमविवाह झाला आहे. लग्नानंतर अखिलला निमिषाने कोणत्याही पुरूषाशी बोललेले आवडत नाही. बघू आता काय होते ते त्यांच्या आयुष्यात..
" हे काय आणले आहेस?" हातात भरपूर सामान घेऊन दरवाजात उभे असलेल्या अखिलला पाहून निमिषा जवळजवळ ओरडलीच.
" आत तर येऊ दे.." घरी येताना झालेल्या वादविवादानंतर खरेतर अखिलशी बोलायचे नाही असेच निमिषाने ठरवले होते. पण अनपेक्षितपणे तोंडातून शब्द निघून गेले होते.
" जास्त काही नाही." सोफ्यावर बसत अखिल म्हणाला. काही न बोलताच निमिषा स्वयंपाकघरात पाणी आणायला गेली. ती वळणार तोच पाठून मिठी पडली..
" बोलणार नाहीस का माझ्याशी?" अखिलने तिच्या केसांचा वास घेत विचारले.
" अखिल प्लिज.. मी खरंच चिडले आहे तुझ्यावर.." निमिषाने बोलायचा प्रयत्न केला. अखिल तिला पुढे बोलू न देता तसेच उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला. आपला राग वितळत चालला आहे हे निमिषाला जाणवले. पण ती ही आता तयार होती त्याच्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजण्यासाठी..
" माझा राग कसा घालवायचा हे तुला चांगले माहित आहे." अखिलच्या मिठीत विसावत निमिषा कुरकुरली.
" हो का?? खरी गंमत तर बाहेर आहे."
" काय?"
" तू आवरून बाहेर ये.. दाखवतो.." निमिषा कपडे करून बाहेर आली. तोपर्यंत अखिलने सगळे गिफ्ट्स उघडून ठेवले होते. निमिषा बघतच बसली. तिच्या आवडत्या रंगाचे, तिला आवडतील असे खूप छान छान ड्रेस होते.
" हे काय?"
" ठरव. तुला ते जास्त आवडले की हे?" अखिलने तिच्यासमोर एक बॉक्स ठेवला.
" आता हे काय?" निमिषाने आश्चर्याने विचारले.
" उघड ना.." निमिषाने तो बॉक्स उघडला. त्यामध्ये तिला आवडणार्या लेखक, लेखिकांची पुस्तके होती. तिच्या डोळ्यात पाणी आले. नक्की कोणता अखिल खरा? तिला कोणाशीही बोलू न देणारा की तिच्या छोट्या छोट्या आवडी निवडी लक्षात ठेवून त्या पुरवणारा.. तिला काहीच सुचेना.. तो बॉक्स खाली ठेवून ती त्याच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली.
" काय झाले? हे आवडले नाही का?" त्याने घाबरून विचारले.
" खूप आवडले.. पण हे सगळे करण्यासाठी भांडणे गरजेचे होते का?"
" मी कुठे भांडलो तुझ्याशी? तूच आरडाओरडा करत होतीस."
" हे बघ अखिल, आपल्या लग्नाच्या आधीपासूनच मी आपल्या ऑफिसमध्ये काम करते. त्यांना ओळखते, त्यांच्याशी बोलते. आपले लग्न झाले म्हणून मी त्यांच्याशी नाते तोडू तर शकत नाही ना? तुला समजते आहे का मला काय म्हणायचे आहे ते?" निमिषा अखिलला समजावत म्हणाली.
" तुझे बरोबर आहे. पण मी तुला असं दुसर्या कोणाही सोबत हसता बोलताना नाही पाहू शकत." अखिल नाराज होत म्हणाला.
" तुला ही सवय बदलायला लागेल.. कारण मी कामाला जाणार. तिथे दहाजण असणार. तुला असे म्हणायचे असेल की तिथे मी फक्त तुझ्याशीच बोलणार तर तसे होणार नाही. थोडे समजून घे ना."
" हो.. करतो प्रयत्न.." अखिल विचार करत म्हणाला. निमिषा उठून आत जायला निघाली.
" तू कुठे चाललीस?"
" जेवायचे नाही का? काहीतरी स्वयंपाकपाण्याचे बघते ना."
" अंहं.. आज तू कुठेच जायचे नाहीस. फक्त तू आणि मी. मी येतानाच तुझ्या आवडत्या हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन आलो आहे. आता तू फक्त माझ्याजवळ बस. आपण दोघे मिळून अंदाज अपना अपना पाहू.."
" पण तुला तर तो कॉमेडी पिक्चर आवडत नाही ना.."
" हो नाही आवडत.. पण तुझ्यासाठी काहिही.." दोघे पिक्चर बघत बसले. निमिषा प्रत्येक जोकवर खळखळून हसत होती. त्याचवेळेस अखिल कसल्यातरी विचारात गुंतला होता. दोघेही छान जेवले. मेनूही सगळाच निमिषाच्या आवडीचा होता. हे सगळे बघून तिच्या मनात विचार आलाच. "अखिल जर माझ्यासाठी एवढे सगळे करतो आहे तर मी त्याच्यासाठी इतर पुरूषांशी बोलणे नाही का थांबवू शकत?"
निमिषाचा हा निर्णय योग्य असेल का? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा