Login

पुरेसा वेळ

Story Of married Couple
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

लघुकथा फेरी

संघ - सोनल शिंदे

©®नम्रता जांभवडेकर

विषय - पुरेसा वेळ

"अनु, निघतो ग मी." अविनाश लगबगीने लॅपटॉप बॅग खांद्याला अडकवत म्हणाला.

"हे काय, एवढं तयार होऊन कुठे चाललास तू?" स्वयंपाक घरात नाश्ता बनवणाऱ्या अनुश्रीने बाहेर येतं विचारलं.

"कुठे चाललोय म्हणजे? रोज कुठे जातो मी.. अर्थात ऑफीसला चाललोय." अविनाश नेहमीप्रमाणे म्हणाला.

"अवि, तू काही विसरतोयस का?" अनुश्रीने आशेने विचारलं.

"रूमाल घेतला, पाकीट घेतलं, बाईकची चावी घेतली, मोबाईल घेतला. नाही ग, सगळ्या वस्तू घेतल्यात मी." सगळे खिसे चाचपून झाल्यावर अविनाश निरागसपणे म्हणाला.

"अवि, वस्तूंबद्दल बोलतं नाहीय मी." अनुश्री

"मग कशाबद्दल बोलतेयस आणि हो, जे काही बोलायचंय ते पटकन बोल. मला ऑफीसला जायचंय." अविनाश हातातल्या घड्याळाकडे बघत म्हणाला.

"अवि, आज नको ना जाऊ ऑफीसला." अनुश्री त्याच्या गळ्यात हात गुंफत लाडिक स्वरात म्हणाली.

"ते सोडून बाकी काहीही बोल. मला आज ऑफीसला जावचं लागेल; कारण आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे." अविनाश स्वतःच्या गळ्यातले तिचे हात बाजूला सारत म्हणाला.

"मी महत्त्वाची नाहीय का तुझ्यासाठी?" स्वर जरी रागीट असला तरी विचारताना डोळे हलके पाणावले तिचे.

"तू आहेसच ग. पण सध्या तरी मीटिंग महत्त्वाची आहे." तो तिच्या नाकाला पिंच करत म्हणाला.

तसं तिने चिडतच त्याचा हात बाजूला सारला.

"मीटिंग.. मीटिंग.. दुसर सुचत काय तुला मीटिंगशिवाय." अनुश्री चिडत म्हणाली.

"अनु, काय झालंय तुला आज? एवढी चिडतेयस का तू." अविनाश.

"तेचं तर! माझं फक्त चिडणं दिसतं तुला पण मी का चिडते हे नाही दिसतं." अनुश्री.

"बरं, सांग मला तू का चिडली आहेस माझ्यावर?" अविनाशने हाताची घडी घालतं शांतपणे विचारलं.

"तू खरचं विसरलायस की, मुद्दाम माझ्यासमोर नाटक करतोयस." अनुश्री डोळे बारीक करून त्याच्याकडे बघू लागली.

"मी काही विसरलोय का?" अविनाश आठवायचा प्रयत्न करू लागला.

"अवि, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीय हा." आता मात्र अनुश्री चिडली.

"अगं, पण खरचं मला काही आठवतं नाहीय. काही आहे का आज?" अविनाश मोबाईलमध्ये बघू लागला.

"ठिक आहे. नाही आठवतं आहे ना तुला, मग मी सांगते म्हणून नको जाऊस आज ऑफीसला. कॅन्सल कर तुझी मीटिंग." अनुश्री त्याच्या खांद्यावरची लॅपटॉप बॅग काढत म्हणाली.

"अनु, असं नाही करता येणार. आजची मीटिंग स्केड्युल आहे. ती अशी अचानक कॅन्सल नाही करता येणार. क्लाएंटवर बॅड इंप्रेशन पडतं. शिवाय क्लाएंट नाराज होतात ती गोष्ट वेगळी. क्लाएंटला नाराज करून नाही चालणार." अविनाशने पुन्हा बॅग खांद्याला लावली.

"बायको नाराज असली तरी चालेल. हो ना?" अनुश्री.

"अनु, काय तू टिपिकल बायकोसारखी बोलतेस ग." अविनाश काहीसा चिडत म्हणाला.

"अवि, मी टिपिकल बायकोसारखी बोलतेय. मग मला सांग, लग्न झाल्यापासून कितीवेळा ह्या टिपिकल बायकोचं ऐकून ऑफीसला सुट्टी घेतलीस आठव जरा. बाकीच्या दिवसांच ठिक आहे रे. पण रविवारी सुद्धा प्रेझेंटेशनच काम करत दिवसभर बेडरूममध्ये बसून असतोस तू." अनुश्री

"हो, असतो बसून. मग! अनु एवढं कामं, एवढे कष्ट कोणासाठी घेतोय मी? आपल्यासाठीच ना आणि हे सगळं तुला माहिती असूनही तू असं म्हणतेस. ग्रेट!" अविनाशचा स्वर कातर झाला.

"अवि, तू जे काही करतोस ते आपल्याच भविष्यासाठी आणि सुखासाठी हे माहितीये मला. पण त्यासाठी फक्त पैसाच गरजेचा नसतो. नवरा बायकोने एकमेकांना पुरेसा वेळही द्यायला हवा. तू दिवसभर माझ्या बरोबर घरात बसून रहा असं नाही म्हणत मी. पण किमान एखाद्या दिवशी घरी लवकर आलास, तर संध्याकाळचा चहा आपण दोघं सोबत घेऊच शकतो ना. एखादा रविवार फक्त तू आणि मी दिवसभर दोघच कधी नाटक तर कधी सिनेमाला जाऊ शकतो ना पण तेही शक्य होतं नाही. एरवी मी तुला तुझ्या कामावरून कधी टोकते का रे नाही ना. मग आज ऑफीसला नको जाऊ हे सांगण्यामागे काहीतरी कारण असेल असं नाही वाटत तुला."अनुश्री त्याला समजावत म्हणाली.

"काय कारण आहे सांग मला. मगाचपासून एकच गाऱ्हाणं ऐकतोय मी. आज ऑफीसला सुट्टी घे. आज ऑफीसला जाऊ नकोस. आधीच उशीर होतोय ऑफीसला जायला आणि तू काही धड सांगत सुद्धा नाहीयेस. एवढं काय आहे आज?" अविनाश ओरडला अनुश्रीवर. त्याच्या ओरडण्याने अनुश्री एक क्षण दचकलीच!

"ठिक आहे. ऑफीसला जायला उशीर होतोय ना तुला. डबा आणते." गालावर ओघळणारे अश्रू पुसत अनुश्री किचनमध्ये गेली

"ह्याच्यात तुझ्या आवडीचा साजूक तुपातला गोडाचा शिरा आहे. माहितीये, तू फिटनेस वर भर देतोयस म्हणूनच खालच्या डब्यात सॅलड दिलंय." अनुश्री बोलतच बाहेर आली पण तोपर्यंत अविनाश इयर पॉड कानाला लावत फोनवर बोलत बाहेर निघूनही गेलेला.

तशी ती सोफ्यावर येऊन बसली आणि आपण काय बोललो ह्याचा विचार करू लागली.

*****

अविनाशच प्रेझेंटेशन देऊन पूर्ण झालं. क्लाएंटला प्रेझेंटेशन खूप आवडलं आणि त्यांनी डील ह्यांच्याच कंपनीला दिली. तसं अविनाशच्या बॉसने त्याचं कौतुक केलं आणि अविनाश केबिनमध्ये येऊन बसला. आता कुठे त्याला रिलॅक्स वाटतं होतं. तेवढ्यात, त्याची नजर त्याच्या डेस्कवर असलेल्या त्याच्या आणि अनुश्रीच्या फोटोफ्रेमकडे गेली.

'आज सकाळी मी खूपचं रूडली बोललो का अनुशी..' अविनाशने मनात म्हणतच मोबाईल हातात घेतला. तसं त्याला सगळ्यांचे विशेसचे मॅसेजेस आणि स्टेटस दिसले. तसं त्याचं लक्ष आजच्या तारखेकडे गेलं.

'ओहह.. शीट हे कसं विसरू शकतो मी. अच्छा म्हणजे आज सकाळी ह्याचं कारणासाठी अनु मला घरी थांबायला सांगत होती आणि मी मात्र उगीच तिच्यावर चिडलो.' अविनाशला आता स्वत:चाच राग येतं होता.

"विष यू हॅप्पी वेडिंग ऍनिवर्सरी बायको!" अविनाश फोटोतल्या अनुश्रीवर ओठ टेकवत म्हणाला. आता मात्र त्याला कधी एकदा अनुश्रीला भेटून सॉरी म्हणतो असं झालं. तसं तो लॅपटॉप बॅग घेऊन केबिनबाहेर आला आणि थेट बॉसच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची परवानगी घेऊन बाहेर पडला.

*******

'मी खूप जास्त बोलले का अविला?' बसल्या बसल्या अनुश्री विचार करत होती.

'निदान आजच्या दिवशी तरी त्याने घरी थांबावं ही अपेक्षा करणं चुकलं का माझं?'अनुश्रीच दुसर मन.

'तो सुद्धा तुझ्याचसाठी एवढे कष्ट घेतोय ना.' अनुश्रीच पहिलं मन.

'पण मी कुठे म्हणतेय, रोज लवकर घरी ये फक्त आजच्याच दिवस घरी थांब म्हटलं ना.' अनुश्रीच दुसर मन.

'आज त्याची महत्त्वाची मीटिंग होती नाहीतर माझा शब्द खाली नाही पडू देतं तो.' अनुश्री द्विधा मनःस्थितीत अडकली होती.

"शी.. आज त्याची एवढी महत्त्वाची मीटिंग आणि मी साधं त्याला बेस्ट लक विश पण नाही केलं. जाऊदे, आज घरी आल्यावर त्याला छान सरप्राईज देते." असं म्हणत अनुश्री कामाला लागली पण तेवढ्यात तिला मळमळलं आणि ती बाथरूममध्ये धावली.

*****

अविनाशने बाईक चहाच्या टपरीवर ऊभी केली.

"काका, एक कप चहा द्याना. " सकाळी काही न खाता पिता बाहेर पडल्यामुळे त्याचं डोक दुखायला लागलेलं. त्याने चहा घेतला आणि पैसे देऊन तिथल्याच एका बाकड्यावर बसून चहा पिऊ लागला.

शेजारीच पान टपरी होती. तिथे एक आजोबा आले आणि त्यांनी दुकान दाराकडे एक सिगारेट मागितली आणि पैसे दिले पण पण पाकीट झोळीत ठेवताना  नेमक त्यांचं पाकीट खाली पडलं. जे अविनाशने पाहिलं पण तोपर्यंत सिगारेट घेऊन आजोबा निघून गेलेले. अविनाशचा चहा पिऊन झाला तसं त्याने लगबगीने पाकीट उचललं. पाकिटाच्या अवस्थेवरून पाकीट खूप जुन वाटतं होतं पण त्यांनी ते इतकी वर्षे जपून ठेवलं म्हणजे नक्की काहीतरी खास असणार हा विचार करून तअविनाश आजोबांना हाका मारत त्यांच्या मागे जाऊ लागला. साधारण पंधरा वीस मिनिटानंतर आजोबा त्याच्या दृष्टीस पडले तेही एका बागेत पण त्यांच्या हालचालींवरून ते काहीतरी शोधत असल्यासारखे वाटतं होते. तसं अविनाश त्यांच्या जवळ गेला.

"आजोबा, तुम्ही काही शोधताय का?' अविनाशने असं विचारताच आजोबांनी त्रासिक नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा शोधू लागले.

"आजोबा, मी तुम्हाला विचारतोय काही शोधताय का?" अविनाशने आता त्यांच्या अगदी जवळ जातं विचारलं.

"हो, शोधतोय.. तुम्हाला काही अडचण?" आजोबांनी तिरसटपणे विचारलं.

"हो; कारण तुम्ही जे शोधताय ते माझ्याकडे आहे." अविनाश त्यांना हातातलं पाकीट दाखवत म्हणाला.

तसं आजोबांना कुठलीतरी अनमोल गवसल्याचा आनंद झाला. त्यांनी दुसऱ्याक्षणी अविनाशच्या हातातून ते पाकीट खेचून घेतलं आणि हृदयाशी घट्ट धरलं. डोळे पाणावलेले त्यांचे.

"मी तुझा खूप खूप आभारी आहे." काही क्षण गेल्यावर आजोबा भानावर आले आणि त्यांनी अविनाशचे आभार मानले.

"अहो, आजोबा आभार कसले मानताय. तुमचं पाकीट चहाच्या टपरीजवळ पडलेलं मला वाटलं काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून द्यायला आलो. त्यासाठी आभार मानण्याची गरज नाहीये. मी एवढी मोठी कामगिरी बजावली नाहीय." अविनाश हसत म्हणाला

"मोठीच कामगिरी बजावली आहेस तू. ह्या पाकिटाची अवस्था पाहता हे दुसऱ्या कोणाच्या हाती पडलं असतं तर त्या व्यक्तीने क्षणाचाही विचार न करता ह्यातले पैसै काढून हे पाकीट कचऱ्याच्या डब्यात टाकलं असतं. पैश्यांच एवढं काही नाही रे पण ह्यात एक माझी अनमोल गोष्ट आहे. ती जर हरवली असती तर कदाचित मीही कायमचा हरवलो असतो." आजोबा एकटक एका दिशेला बघत बोलले. अविनाशला त्यांचं बोलणं विचित्र वाटलं पण तो त्यांना काही विचारणार तेवढ्यात, त्याचा फोन वाजला. त्याच्या मित्राचा फोन आलेला शुभेच्छा देण्यासाठी. काहीवेळ बोलून त्याने फोन ठेवला.

"वाढदिवस आहे का आज तुझा?" आजोबांनी विचारलं.

"वाढदिवस आहे पण माझा नाही. माझ्या लग्नाचा. म्हणजे आज आमची फर्स्ट वेडिंग ऍनिवर्सरी आहे." अविनाश आनंदाने म्हणाला.

"अरे व्वा! अभिनंदन आणि शुभेच्छा. मग आज लग्नाचा वाढदिवस असताना तू कामावर गेलेलास का?" आजोबांनी त्याच्या कपड्यांकडे बघत विचारलं.

"हो, आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती म्हणून जावं लागलं." अविनाश म्हणाला.

"आणि म्हणून बायको तुझ्यावर चिडली आहे हो ना?" आजोबांनी काहीसं हसत विचारलं.

"तुम्हाला कसं कळलं?" अविनाश आश्चर्याने विचारलं.

"कधीकाळी मी सुद्धा नवरा होतो रे. त्यामुळे कळलं मला." आजोबा हसत म्हणाले.

तसं अविनाशने हसतच केसातून हात फिरवला.

"मगाशी मित्राशी बोलताना तुझ्या चेहऱ्यावर बायको तुझ्यावर चिडली आहे ह्याची नाराजी स्पष्ट दिसली मला." आजोबा म्हणाले.

"खरतर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, हे मी विसरलो होतो मीटिंगच्या टेन्शनमध्ये. त्यात अनु सारखी आज सुट्टी घे.. सुट्टी घे.. म्हणून मागे लागली मग मीही चिडून बोललो जरा ज्याच आता मला खूप वाईट वाटतंय. पण तिलाही कळायला हवं ना हे मी आमच्या भविष्यासाठीच तर करतोय ना." अविनाश पोटतिडकीने बोलला.

"भविष्यासाठी कष्ट घेताना वर्तमानातले क्षण वाया तर जाणार नाही ना, ह्याचीही काळजी घेतली पाहिजे." आजोबा म्हणाले.

"म्हणजे? नेमक काय म्हणायचय तुम्हाला आजोबा?" अविनाशला आजोबांच्या बोलण्याचा संदर्भ न लागल्याने त्याने विचारलं.

"हा तरूण पणाचा मी आणि माझी बायको. लग्नानंतर आम्ही महाबळेश्वरला फिरायला गेलेलो तेव्हा काढलेला." पाकिटातला ब्लॅक अँड व्हाईट मधला एक फोटो दाखवत आजोबा म्हणाले.

"आम्ही अगदी चार चौघांसारखेच नवरा बायको. त्यातल्या त्यात मी जरा चिडका, तर ती एकदम शांत. लग्नानंतर आमच्यात जास्त भांडण झाली असतील तर ती माझ्या चिडक्या स्वभावामुळेच आणि सिगारेट पिण्यामुळे. आमचं एकत्र कुटुंब. मी सगळ्यात मोठा आणि मला तीन भावंडं! एक भाऊ आणि दोन बहिणी. वडील एका कंपनीत कामाला जायचे पण अचानक ती कंपनी बंद पडली. माझं लग्न झालं, तेव्हा माझा धाकटा भाऊ नुकताच नोकरीला लागलेला तर बहिणी शिकत होत्या. त्यामुळे आपसूकच घरची आर्थिक जबाबदारी माझ्यावर आली. नवीन लग्न झालेलं असताना ही मला खूप म्हणायची, आपण नाटकाला जाऊ. फार फार तर फेरी मारायला जाऊ पण कधी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे, तर कधी कामाच्या थकव्यामुळे आज नको उद्या असं म्हणत मी नेहमीचं तिला नकार दिला. आधी आधी ती नाराज व्हायची पण नंतर नंतर तिलाही माझ्या नकाराची सवय झाली. पुढे वर्षभरातच आम्ही आईबाबा झालो." आजोबा आनंदी चेहऱ्याने म्हणाले. नकळत अविनाशच्या चेहऱ्यावरही हसू उमललं

"मग ती मुलांचं करण्यात गुंतली आणि मी कामात. पुढे बाबा निवर्तले. त्यामुळे आईने घरच्या जबाबदाऱ्यामधून अंग काढून घेतलं आणि आपसूकच सगळी जबाबदारी हिच्यावर आली. सगळ्या लहान भावंडांच्या लग्नात हिने एकटीने एकहाती कामं केली. तेव्हा तिचं खूप कौतुक वाटलेलं पण ते व्यक्त करायलाही मला पुरेसा वेळ मिळाला नाही. वयोमानामुळे आई गेली. दरम्यानच्या काळात मुलं मोठी होतं गेली. त्यांच्या शिक्षणाचा, खाण्या पिण्याचा खर्च भागवण्यासाठी मीही स्वतःला कामात गुंतवून घेतलं; कारण विश्वास होता घरचं सांभाळायला ती आहे. पुढे मुलं शिक्षणासाठी बाहेर गावी गेली आणि मीही रिटायर्ड झालो. तेव्हाही वाटलं, आता हिच्याशी मनमोकळे पणाने संवाद साधावा. हे आता वय आहे का व्यक्त व्हायचं! हा विचार मनात डोकावला आणि मनात आलेलं ओठांवरच राहील." बोलतांना आजोबांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तसं अविनाशने त्यांना धीर दिला.

"यशवकाश मुलांची लग्न झाली आणि ती आपापल्या संसाराला लागली. त्या रात्री ठरवलं, कोणी काहीही म्हणो. उद्या आपण हिला घेऊन राणीच्या बागेत हातात हात घालून मनसोक्त फिरायचं पण नेमक त्याचं रात्री मला हिच्या अंगात कणकण जाणवली. तसं मी घाबरलो. ह्यावेळी मुलांना फोन करू शकत नव्हतो. मी रात्रभर हिच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत राहिलो अन् ती मात्र माझा एक हात घेऊन एकटक माझ्याकडे पाहत होती. मी तिला म्हणत होतो, उद्या सकाळी मी लवकरच डॉक्टरांना बोलवेन. त्यावर मात्र ती हलकेच हसली. मला कधी एकदा सकाळ होते आणि डॉक्टर येतायत असं झालेल. मध्यरात्री कधीतरी माझा डोळा लागला आणि मी तिच्या डोक्याला डोकं लावून झोपी गेलो. सकाळी लवकरच मी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तिला तपासलं आणि एक नजर माझ्याकडे पाहून फक्त नकारार्थी मान हलवली. माझ्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता. मी तिच्याजवळ जाऊन तिच्या अंगाला हात लावला. तिच अंग थंडगार पडलं होतं. तसा मी विजेचा करंट लागल्यासारखा मागे झालो. मध्यरात्रीच जीव सोडलाय त्यांनी. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच मला काही सुचेनासे झालं. साधं भाजी मार्केटला भाजी आणायला जातेवेळी मला सांगून जाणारी ही मला काहीचं न सांगता खूप खूप दूर निघून गेलेली कधीही न परतण्यासाठी." बोलता बोलता आजोबा रडू लागले. अविनाशचे डोळे सुद्धा पाणावले. ह्यावेळी काय बोलावं त्याला काहीचं सुचत नव्हतं. अविनाश फक्त आजोबांच्या पाठीवरून हात फिरवत राहिला.

काही क्षण गेल्यावर आजोबा शांत झाले.

"म्हणून सांगतोय काम होतच राहतात पण गेलेले क्षण आणि गेलेली व्यक्ती परत येतं नाही कधीचं! म्हणून आहे तो क्षण एकमेकांच्या सोबतीने आनंदात जगा." आजोबा अविनाशच्या गालावरून हात फिरवत म्हणाले

तसं अविनाश होकारार्थी मान हलवत त्यांच्या पाया पडला

"सुखी रहा. जा आता, ती वाट पाहत असेल घरी आणि तुम्हां दोघांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" आजोबा हसत म्हणाले

"थँक्यू आजोबा." अविनाश आजोबांना मिठी मारत म्हणाला आणि बॅग घेऊन तिथून निघाला.

तसं आजोबांनी सिगारेट पेटवली.

"आजोबा, जरी आजी आता नसल्या तरी त्यांचं तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे आणि त्यांना आवडेल का तुम्ही सिगारेट प्यायलेलं?" अविनाश म्हणाला आणि दुसऱ्याचं क्षणी आजोबांनी सिगारेट पायाच्या चपलेत विझवली तसं अविनाश गालात हसला आणि घरी यायला निघाला.

*****

अविनाश घरी आला तेव्हा त्याला घरात काळोख दिसला. तसं त्याने लाईटस लावले.

"हॅप्पी वेडिंग ऍनिवर्सरी!" समोर साडी नेसलेली अनुश्री ऊभी होती तेही हातात केक घेऊन.

तसं अविनाशने बॅग सोफ्यावर टाकली आणि पटकन अनुश्रीला मिठीत घेतलं.

"आय एम सॉरी!" अविनाश कातर स्वरात म्हणाला.

"इट्स ओके. केक कट करूया." अनुश्री म्हणाली तसं दोघांनी मिळून केक कट केला आणि एकमेकांना भरवला.

"माझं गिफ्ट?" अविनाश

तसं अनुश्रीने त्याच्या हातात एक बॉक्स दिला. अविनाशने तो बॉक्स उघडला. आतमध्ये प्रेग्नेंसी किट होती. ज्यावर दोन गुलाबी रेषा उमटल्या होत्या.

"खरचं!" अविनाशसाठी हा सुखद धक्का होता. त्यावर अनुश्रीने आनंदाने होकारार्थी मान हलवली.

"माझं गिफ्ट?" अनुश्री.

"ह्यापुढचा प्रत्येक रविवार आणि सुट्टीचा प्रत्येक दिवस फक्त तुझाच. नो वर्क फ्रॉम होम." अविनाश म्हणाला. तसं अनुश्री आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. तर अविनाशने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि मनोमन त्या आजोबांचे आभार मानले.