Login

पूर्ण प्रेम भाग ५ अंतिम ( जलद कथालेखन )

पूर्ण प्रेम

भाग 5

ठाण्यात मैत्रेयीची कार पोचली होती.

मन सैरभैर होत होतं. ते प्रेम ,क्षण आजही जाणवत होते तिला.
तिला कळलं होतं की त्याचे पुढचे आयुष्य खूप धकाधकीचे होते.
ते जाणूनच त्याला , आपल्याला तिथेच थांबवून विचारण्याची बुद्धीही झाली नाही.
तो त्याच्या कुटुंबाच्या चिंतेच्या गर्तेत नखशिखांत अडकला होता.त्यासाठी वेळ जावा लागणार होता.
आपणच त्याला तो सल्ला दिला होता. वेळ सावरून घेण्याचा. वेळ घ्यायचाही आणि वेळ द्यायचाही.

आणि आता वेळ निघून गेली होती.

सगळं स्वच्छ झालं होतं.

तिचं अयशस्वी लग्न.
तिच्या नवऱ्याचा चडचिडा स्वभाव.
ते नवऱ्याचे तिला नेहमी एकटे टाकणे.
ह्या गोष्टींनी तिला त्याची नेहमी आठवण यायची.
जे इतक्या वर्षात नाही मिळालं ते तिने त्या चारपाच तासात त्याच्याकडून भरभरून घेतलं होतं.
त्याचे नाव , त्याचे गाव सगळं सगळं ह्या वर्षांत प्रबोधनातून पुसलं गेलं होतं.
त्याचा चेहरा पुसला गेला होता पण प्रेमळ नजर कधीतरी विजेसारखी मस्तिष्कात चमकून जाई.
वासनेच्या आगीतून भाजून निघाल्यानंतर त्याचा चंदनस्पर्ष तिला हर्ष देऊन जाई.

तो चंदन होता तिच्यासाठी तिच्या दुखऱ्या जखमा शांत करायचा.तिची काळजी घ्यायचा. आजारी पडण्यात पण सुगंधाची ,प्रेमाची लयलूट करणारा चंदन.अगदी जशी त्या चार तासात केली होती त्याने.

ती अजूनही त्याला आठवणीतले चंदन म्हणत होती.
तिला त्याच्या हाताशी आपल्या हाताशी मिळत्या जुळत्या रेषाही कळल्या होत्या पण वय छोटे असल्यामुळे ते ठाम सांगू शकत नव्हती ती.


शेवटी तो चकवाच होता प्रारब्धाचा.ते क्षण ती पकडू शकली नाही.


पण चंदनाचा सुगंध आणि शीतलता तिच्या प्रारब्धात दृढ होत होती.जसे जसे वर्ष उलटत होती ती त्याच्या अधिकाधिक प्रेमात पडत होती.



अजून पुढे ... सर , प्रीती म्हणाली
मलयजने अश्रू पुसले.
"पुढे तेच जे तिने सांगितले ,तेच झाले.


मी भराभर वेळ पाळत गेलो.
तिने सांगितले होते तुम्ही कुठल्याच पाशात अडकू नका अगदी कुटुंबातील लोकांच्याही नाही.अगदी आईच्याही नाही.प्रेयसीच्याही नाही.तुमचे सहा महिने सांभाळून घ्या.

त्या सहा महिन्यात मला खूप लोकांना विरोध करत पुढे जावे लागले पण मी गेलो. कुठेच लक्ष दिले नाही अगदी ती निघून गेली, बुद्धीतून निघून गेली

तोपर्यंत ...धावत राहिलो.

सगळं व्यवस्थित झालेय आता.
फक्त ती नाही जवळ.पण मनात भरभरून आहे.
तो फक्त प्रवास नव्हता गं चारपाच तासांचा.ते तर आमचे सहजीवन होते.
माझ्या खांद्यावर उशी म्हणून झोपी गेलेली ती.
मला अजूनही जाणवते.माझ्या हातच्या रेषांवर जादुई हात फिरवणारी मला सगळं  ठीक होईल असं म्हणणारी मला अजूनही त्या रेषेतली सरस्वती भासते.

एक गोष्ट माहितीये मला फार वर्षांनी जाणवली.

तिला मी बसस्टॉप पासून म्हणजे ईस्ट पासून वेस्ट पर्यन्त चालून घेऊन गेलो.कारण मी माझ्याच तंद्रीत होतो. ती म्हणत होती मी इथूनच ऑटो घेते ही काय ऑटो ...
तुम्ही मला फक्त हा पत्ता कुठून जवळ पडेल ते सांगा कारण सूर्यास्त झालाय आणि मला प्लॅटफॉर्म कळत नाही.चालवतपण नाहीये.
जाऊद्या पैसे गेले तर गेले.ती थकली होती.

पण मी काही माघार घेतली नाही...

मी तिला जिथून ईस्टपासून वेस्टला जातात त्या पायऱ्यांपाशी घेऊनच गेलो.आणि तिला सांगितले की इथून चढून वर जा वेस्टला तेच वेस्ट आहे.

 जर मी माझाच हट्ट चालवला नसता तर ती पत्ता मला दाखवत होती.तो पत्ता मला कळला असता.

पण मी भानावरच नव्हतो.

चारपाच तास जीची एवढी काळजी घेतली तिला चढणीवर सोडण्याची बुध्दी मला कशी झाली ह्याचं मला अजूनही नवल वाटतं.
कदाचित मी जे टाळलं ते तिला आयुष्याच्या चढणीवर तर नाही ना  घेऊन गेलं!
तीही किती निरागसपणे माझं ऐकून एवढया अशक्तपणात चढून गेली.तेच तेच मनात खात असतं.

सगळं माहीत असूनही तीने माझं ऐकलं.

मला नेहमी वाटतं की माझ्या ह्या यशात तिचेही त्याग आहेत.
ती गेली वेस्टला आणि सूर्यास्त झाला होता.

आणि मी कायम पूर्वेला तिची वाट पाहतो कधी उगवतो कधी शोधत पश्चिमेला येतो.
ती माझा दिवस आहे तीच मित्र आहे.

 "पण मग तुम्ही भेटणार कधी ,कसे?", प्रीती म्हणाली

 तसे पाहिले तर नाहीच कारण त्या क्षणांची छाया बाकी आहे पण काया हरविली आहे.
आता मध्ये इतका काळ लोटलाय तर ...
मला ती कशी दिसते ते एवढे आठवत नाही पण जर ओळखायचं असेल एकमेकांना तर ती भेट पुन्हा घडावी लागेल.

पुन्हा एकमेकांना ओळखून घेऊ.
पण त्यावेळी मी चुकणार नाही पक्के ठरवलंय मी.
आमचं प्रेम ते कधीच अपूर्ण नसणार...
ती जिथे असेल त्या चढणीवर मी कायम तिला सोबत करणार माझ्या प्रेमाच्या सूर्याला शीतलता देणार.मला खात्री आहे ज्या प्रेमाने प्रारब्धात जराही ढवळाढवळाढवळ न करता एकमेकांसाठी सोबत केली. ते प्रेम अपूर्ण ठरलं नाही कुठेच ...
ते तर पूर्ण झालं...
पूर्ण प्रेम ; पूर्ण सोबत मग ते चार तास असो वा चार जन्म...
जेंव्हा जेंव्हा भेटणार एकमेकांना पूर्ण प्रेम देणार.
ती मला पूर्ण करते ; मी तिला पूर्ण करतो .
आम्ही एकमेकांवर अजूनही पूर्ण प्रेम करतो.

मैत्रेयीने घरीं पोचल्या पोचल्या गाणे लावले , मग्न होऊन जाण्यासाठी ; चंदन अनुभवण्यासाठी मलयजच्या आठवणीसाठी.प्रेम पूर्ण करण्यासाठी...

मेरा दिल कहे कहीं ये न हो
नहीं ये न हो नहीं ये न हो
किसी रोज़ तुझसे बिछड़ के मैं
तुझे ढूँढती फिरूँ दर-ब-दर
मेरे हमसफ़र...

ठाणे वेस्ट कडून ठाणे ईस्टकडे प्रेमाचा सूर्य प्रवास करत होता.

©®पूनम तावडे लोखंडे
गीत साभार : आनंद बक्षी