Login

पूर्ण प्रेम भाग ४ ( जलद कथालेखन)

पूर्ण प्रेम

भाग ४


पुढे सांगा ना सर , मलाही ...!

मलयज त्याच्या जुन्या घरात आलेला आणि प्रीतीच्या आग्रहाखातर तीला मैत्रेयी बद्दल सांगत होता.

आठवणींच्या पावसात त्याला आता चिंब भिजायचं होतं. त्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्या आठवणी  त्याला नेहमीच नवी उभारी द्यायच्या.
तो आठवणींचे मोती प्रीती समोर ओवत होता.


मेरे हमसफर ,मेरे हमसफर 

गाणं संपतच आलं आणि मैत्रेयीला जाग आली.
अशक्त शरीराला आधार फक्त जाणवत होता.उशी जाणवली क्षणभर , तिला वाटलं क्षणभर असेच पडून रहावे पण पण...
दुसऱ्याच क्षणी ती सावरली. मलयजपण सावरला.
उशी होताना त्याच्या खांद्याने तिला ईतर कुठेही स्पर्श होऊ नये आणि तिची झोप व्हावी म्हणून जी खबरदारी घेतली होती त्यामुळे आखडलेले त्याचे शरीर.
"थँक्स" एवढं बोलून गोड हसत ती अजून बाजूला सरकली.


पुढले स्टेशन आलें होते. आणि मलयज खाली निघून गेला.मैत्रेयी अजूनही अशक्तच वाटत होती.
सकाळी घाईत काहीतरी पर्समध्ये टाकलेले आहे का ? म्हणून बघत होती पण पुन्हा त्रास आठवून तिने काहीही खायला नको अजून तीन तास आहेत पोचायला जवळजवळ म्हणून तसेच पर्स ठेवून बसून राहिली.


खाली गेलेला मलयज आला.

दोन टॅबलेट आणि ग्लुकोनडी तिला देत...

तो : हे घे , ही औषधें तीन दिवस तरी घे घरी आणि ही आता घे , काही खाऊनच पण...

ती : पण हे...मी हे असे तुमच्याकडून म्हणजे ...ह्याचे पैसे...

तो: नक्की मी फी घेतो पण आधी तू घे ते.

तरीही ती ते औषधे हातात घेऊन विचारात होती की..

तो: घे तू औषधे , इकडे कुठे प्लास्टिक पिशवी नाही मिळणार आता.

असं म्हणत हसला तो तिच्याकडे बघून.
मैत्रेयी पण ओशाळली आणि हसली.
दोन हसरे चेहरे एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत होते. न्याहाळण्याचा प्रयत्न करत होते.
दुसऱ्याच क्षणी त्याच्यातील डॉकटर जागा झाला.


"सकाळी काहीं खाल्ले नाही ना ,जे होते ते निघाले
आता काहीतरी खाऊन औषधं घे."

मैत्रेयीने काही खायला काढू म्हणून पर्समध्ये हात घातला तितक्यात भाजीपोळीचा डबा तिच्या समोर धरत...

तो : तू हे खा , मी  माझ्यासाठी आणलं आहे खालून...
बाहेरच्या खाण्याने अजून जळजळ होईल.
असं म्हणत त्याने बाहेरचा वडापाव खाल्ला देखील.

मैत्रेयी त्याच्या काळजीवाहू स्वभावाने अगदी भारावली होती. तो पाठीला रेलून आता निपचित बसला होता.
कुठली तरी चिंतारेषा त्याच्या भाळी चमकली होती.

ती : तुम्ही पुण्याला
तो : नाही इकडे आत्या असते.
ती : कुठले डॉक्टर...

ती पुढाकार घेत होती पण त्याच्या चेहऱ्यावर आताशा उद्विग्नता दिसत होती. कुठलीतरी गोष्ट त्याला छळत होती.

तो: इंटर्नशिप करतोय अजून काही झालो नाही.
हे बोलतांनाचे भाव मैत्रीने अचूक टिपले.

"थँक्स तुम्ही मला खूप मदत केली. मी जर एकटे असते तर ..."

तो: काही नाही ,कुणीतरी केलीच असती मदत जर मी नसतो.

पुन्हा एक तुटक उत्तर मिळाले आणि मैत्रेयी शांत झाली.

पण त्याचे असे वागणे रुचत नव्हते मैत्रेयीला.
काहीतरी करु या म्हणून पुन्हा थोडा वेळ शांत बसली.
मैत्रेयीच ना ती सौंदर्य आणि सहृदयता ह्याची मिश्रण.
त्याचं ते असं अचानक किनारा गाठणं सहन होत नव्हतं तिला. आपल्याला एवढं सांभाळून घेतलं.
आणि आता स्वतः कोषात जातोय.

"डॉ तुमचे वय आत्ता सव्हीस आहे. मध्ये कधीतरी
तुम्ही निराश किंवा आजारी झाला आहात.
तुम्ही खोल विचार करतात आणि स्वतःला त्रास करून घेतात."

मैत्रेयी पटकन बोलून गेली.


तिचे ते वाक्य ऐकून मलयज चमकून तिच्याकडे क्षणभर पहात राहिला व नंतर हसत म्हणाला,

"बरं नाही वाटतये का अजून?"

मैत्रेयी हसली ,

" नाही नाही , खरं खरं सांगतेय असेच आहे ना ! "


तो : सॉर्ट ऑफ यस ...

ती: तुम्ही थोरले असाल घरातले. नुकतीच एक निराशादायक घटना घडलीये तुमच्या आयुष्यात...
तुमचे आई बाबा ...

तो पटकम उत्तरला , " बाबा गेले गेल्यावर्षी "

ती: ओह ...

थोडा वेळ शांतता.

तो:  पण तुम्ही हे...

ती: ते इतका वेळ तुमच्या हाताकडे लक्ष जाऊन जाऊन , समजलं

तो : ओह , हस्तरेषा एक्सपर्ट ?

ती: नाही हो छंद आहे माझा.

तो: पण भरपूर अचूक सांगितलं तुम्ही.

ती : मी एक्सपर्ट नाहीं आहे पण काही गोष्टी येतात मला बघायला. अजून सांगू ?
तो: बरं सांगा पण फिस घ्यावी लागेल.
ती फक्त हसली.
पुढला वेळ ती कित्येक गोष्टी त्याला सांगत गेली
आणि तो विश्वासाने तिचे ते सगळं सगळं ऐकून घेत होता.

माझं कुटुंब कधीं स्थिर होईल? सांगू शकते का?

म्हणजे लग्न का ?

तो म्हणाला सगळंच , माझे करियर , घर , भाऊ लहान.

ती: लग्नाचे आणि करियरचे मी सांगू शकते पण भावंडे , आई वडील त्यासाठी तुम्हाला त्यांचेही हात जोडून आणावे लागतील.

दोघात हास्य पसरले होते.

"लग्न म्हणजे हे इथे पंडित लावतात ते लग्न नाही दिसत हातात.", ती हसली आणि पुन्हा त्याच्या हाताला स्पर्श करत त्याची विवाह रेषा बघू लागली.
आणि ती क्षणभर त्याच्या डोळ्यात बघतच राहिली.

"काय झालं?", तो म्हणाला.

नाही ,काही नाही , तुमचं लग्न म्हणजे आता तुमचे सॉरी डोन्ट माईंड आता अश्यातच सुरू झाले आहे.आणि एकमेव अफेयर असणार आहे.

ते ऐकून तो सुखावलाही आणि म्हणाला ,"हे चुकलं तुमचं , माझं काहीही नाही आणि असणारही नाही
तेवढी उसंत नाही आयुष्यात. असो ते महत्वाचे नाहीये.मला सांगा ,स्ट्रगल कधीं संपेल माझं"

ती : हे सहा महिने , पुढले सहा महिने खुप चॅलेंज येतील.

त्याने हात मागे घेतले.

" म्हणजे आहेच आहे तर..." तो म्हणाला.

" पण एवढं सांगितलं त्याचे काही उपाय पण असतील ना ? "


तिनें पुन्हा त्याचे हात उघडून बघण्यास सुरुवात केली.

"तुमचं सगळं ठीक होईल , जेंव्हा तुम्ही न डगमगता वेळेला सामोरे जाणार. तुम्ही प्रत्येकवेळी वेळ चुकतात मग चकवा लागतो.
वेळ सांभाळून घेतलीं तर बरेच नुकसान  टळते.
एक अद्वितीय प्रेम तुमच्या नशिबात आहे म्हटल्यावर भविष्य पण अद्वितीय असणार आहे.
फक्त कशात अडकून पडू नका. फक्त फ़क्त करत जा.
सगळं ठीक होईल , मी सांगते."

क्षणभर ती जे बोलत होती , ते तो ऐकत बसला होता. तिच्या त्या स्पर्शात आणि शब्दांत कमालीची ताकद होती. ती शांतता , ती ताकद घट्ट पकडावी वाटली त्याला.

त्याच्या हातातल्या तिच्या हाताला हातात  घ्यावे वाटले त्याला  पण चटकन काढून घेतला.
... तो मखमली स्पर्श सर्व दुःख दूर करणारा होता असे क्षणात वाटून गेले आता.

तो मंत्रमुग्ध होऊन तिचे सारे शब्द साठवत होता.
पहात होता ती आपल्यापेक्षा किती लहान आहे पण किती सकारात्मक आहे. ही म्हणजे साक्षात सरस्वती वाटत होती.

ठाणे आले होते.
तिला हात देऊन उतरवून तो चालू लागला आणि तीही चालू लागली होती.

त्याने तिला बॅगेसाठी विचारले पण ती नाही म्हणाली.
पाच तासातला एकमेकांचा सहवास आता सुटत होता.
ती वेस्टला जाणार होती आणि तो ईस्टला.

...आणि आज आठ वर्षांनी ती आणि तो आठवणीतून वर्तमानात वेस्टला आले होते.

©®पूनम तावडे लोखंडे