Login

।। पुर्णाहुती भाग २।।

Purnahuti Part 2
।। पुर्णाहुती (भाग २)...©® समीर खान।।

देशमुख घराण्याचा एकुलता एक वारसदार. हे घराणं थेट राजपरिवाराशी संबंधित होते व अजूनही संबंध टिकवून होते. तरीही समीरने स्वकर्तृत्वावर अधिकारीपदापर्यंत मजल मारली होती. हुशार, ज्ञानी, तडफदार तसंच काहीसं अलिप्त व्यक्तिमत्व असलेल्या समीरला ही जागा केवळ याच एका कारणामुळे आवडली होती. त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असणारा निवांतपणा, राजेशाही वातावरणासोबतच ईथे मोजकेच फ्लॅट असल्याने भविष्यातही काही अडचण येणार नव्हती. त्याचप्रमाणे या जागेविषयी त्याला लहानपणापासूनच विशेष जिव्हाळा होता. गुढ आकर्षण होते जे नकळत त्यास येथे त्याला खेचून आणण्यात यशस्वी झाले होते.

लहानपणीचा तो प्रसंग त्याच्या मनःपटलावर कोरला गेलेला होता. लपाछपी खेळणारा लहानगा समीर. त्याच्या आजोबांच्या मोठ्या वाड्यात धावत धावत तो कधी त्या बंद खोलीत कसा आला त्यालाच समजलं नाही. दरवाजा बंद असला तरी खिडकीच्या तुटलेल्या गजाच्या फटीतून तो आत आलेला. कुबट, अंधारलेलं वातावरण. बरीचशी पुस्तक, झुंबरं, मोठमोठे कपाटं आणि आतल्याबाजूला कुठेतरी असणारी ती तस्बिर. त्यावरचा कपडा त्याने अलगद ओढून काढला आणि फडफडत काहीतरी तिथून उडत खिडकिच्या दिशेनं गेलेलं. जोरात किंकाळी मारत हा तिथेच बेशुद्ध पडला. शुद्ध हरपताना त्याने पाहिलेली ती तस्बिर. तटबंदीच्या आत असणार्‍या दोन सुंदर एकमेकांची प्रतिकृती असणार्‍या त्या हवेल्यांचं ते सुंदर चित्र. त्यानंतर कितीतरी दिवस चाललेले उपचार आणि त्या वाड्यातून त्याच्या बाबांनी दुसरीकडे हलवलेलं त्यांचं बिऱ्हाड.

गॅलरीत ऊभा समीर काॅफीचे घोट घेत गॅलरीत असलेल्या आरामदायी खुर्चीवर रेलून बसत तेथून स्पष्ट दिसणारी छोटी हवेली निरखत होता आणि या आठवणींमध्ये गढून गेला होता. हेच चित्र होतं का ते? त्यांचा तो वाडा या घटनेनंतर लगेचच त्याच्या वडिलांनी विकला होता. याबाबत बऱ्याचदा विचारूनही त्यांनी कधीच काहीही सांगितलं नव्हतं.काळ पुढे सरकत राहिला तरी या घटना समीरच्या मनावर कोरल्या गेल्या. याच आवडीमुळे त्याने पुरातत्व सर्वेक्षण सारखा क्लिष्ट करिअर निवडला आणि तो यशस्वी देखील झाला.

कायदेशीर सोपस्कारांसाठी जेव्हा ही फाईल त्याच्या टेबलावर आली तेव्हा त्याला धक्काच बसला. कितीतरी वर्षांपुर्वी लहानपणी पाहिलेलं तेच चित्र त्याच्या समोर होतं. आणखीही काही जुनी छायाचित्रे यासोबत जोडली गेली होती. प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी काहीही हरकत तशी नव्हतीच कारण ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली मालमत्ता असली तरी ती खाजगी मालमत्ता होती आणि हा प्रकल्प पूर्ण करताना तिथल्या कुठल्याही वास्तूची तोडफोड होणार नव्हतीच तसं प्रतिज्ञापत्र ही सादर केलं गेलं होतं. प्रकरण या खात्याच्या परवानगी शिवाय अडू नये यासाठी मोठं प्रलोभनही समीरला दाखवलं गेलं होतं. समीर मात्र प्रामाणिक आणि ईमानदार होता. पैशांचा लोभी नव्हताच. अशीही पैशाला त्याला कमी नव्हतीच. त्याला या जागेचं असणारं आकर्षण तिथलं सर्वेक्षण करताना आणखीनच बळावलं.मात्र सोबत इतरही अधिकारी असल्याने त्याला जास्त खोलात जाता आलं नाही. प्रकल्पाला मंजुरी देताना त्याने एक विचित्र अट ठेवली. तिथली एक सदनिका विकत घेण्याची. बिल्डरही चक्रावला. मंजुरीसाठी इतकी मोठी रक्कम त्याला आॅफर करूनही हा माणूस ती न घेता स्वतःच पुर्ण रक्कम देउन ही सदनिका विकत घेतोय याचंही त्याला आश्चर्य वाटलं. आनंदाने त्याने ही अट स्विकारली आणि समीर तिथे राहण्यासाठी आला. एकटाच. त्याचे वडील वारले होते. आई गावाकडे , तर हा अविवाहित.

🎭 Series Post

View all