अष्टभुजा असलेली, तांडव नृत्य करणारी ती गणेश प्रतिमा होती. हे पाहताच त्याच्या कानामागून घामाचा ओघळ थेट त्याच्या मानेपर्यंत आला. रूमालाने त्याने तो टिपला. ASI अधिकारी असला तरी धर्माने तो ब्राम्हण होता. देवभोळा नसला तरी लहानपणापासून आजोबांपासून चालत आलेल्या अनेक गूढ गोष्टींचा त्याचा अभ्यास दांडगा होता. तांडव गणेश म्हणजे तांत्रिक पुजाविधीतील सर्वात जहाल दैवत. जारण मारण सारखी विधी आणि या विधीत असणारी भयंकर अनुष्ठाने. पेशवाईच्या रघुनाथरावांनी या गणेशाची स्थापना केली होती हा ईतिहास होता. कोत्रकर नावाच्या मांत्रिकास कर्नाटकहून बोलावून ही मुर्ती तिची स्थापना, अनुष्ठानं त्यांनी शिकून घेतली होती. नारायणरावांचा खुन झाला तेव्हाही ते याच उग्रदेवतेचे अनुष्ठान करत होते. त्यानंतर होत गेलल्या नाट्यमय घडामोडी पाहता तंत्रविद्येतला हा भाग खूप भयंकर फळं देणारा आहे हे समीर जाणून होता. या गणेशाची ही तस्बिर इथे सापडली म्हणजे नक्कीच अशीच मुर्तीही इथे सापडायला हवी कारण ही पुजा मांडतांना या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात हे ही तो जाणून होता. मात्र अशा प्रकारची मूर्ती थेट रघुनाथरावांकडून हस्ते परहस्ते होत कांचीपुरम च्या शंकर मठात पोहोचली होती.मठात असणारी मूर्ती ही मूळ मूर्तीची प्रतिकृती होती. ही मूर्ती तिथल्याच म्युझियम मध्ये ठेवली गेली होती. प्रतिकृती मूर्ती जर म्युझियम मध्ये असेल तर मूळ मुर्ती जर इथे सापडली तर आपल्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी उपलब्धी ठरेल हा विचार करून समीर मनोमन आनंदला. मात्र पुढच्याच क्षणी आनंदाची जागा भितीने घेतली. त्याच्या वडिलांनी याबाबतीत सांगितलेली बरीच माहिती त्याला आठवली. असंही अंधार पडायला सुरूवात झाली होती. समीरच्या डोळयासमोरही अंधार दाटून आला आणि तो तिथेच कोसळला. मोठमोठे ढोल, डमरू बडविण्याचा आवाज त्या मूर्छित अवस्थेतही त्यास येत होता. भूकंप यावा तशी तिथली जमीन हादरत होती. अक्राळविक्राळ हत्तींचे कळप एकत्रच दौडावे तसा भास त्याला त्या ही अवस्थेत होत होता. दुसर्या दिवशी त्याचे डोळे उघडले ते थेट हाॅस्पिटलमध्येच. वाॅर्डबाहेर थांबलेली, डोळ्यांना पदर लावलेली समीरची आई, ASI चे वरिष्ठ अधिकारी लोकं, त्याचा Dsp मित्र, तिथले स्थानिक कलेक्टर आणि चिंतातूर अवस्थेत असणारा तो सफारीतील इसम,त्या प्रकल्पाचा मुख्य बांधकाम व्यावसायिक या सर्वांना पाहून प्रकरण खूप गंभीर झालंय हे समीरने ओळखले. समीर त्या जीवघेण्या प्रसंगातून वाचला असला तरी शेजारीच पडलेल्या वर्तमानपत्रातील बातमीने त्याचे लक्ष वेधून घेतले.
"ASI चा अधिकारी समीर देशमुख छोट्या हवेलीत अत्यावस्थ अवस्थेत सापडला. तिथे तांडव गणेश ची प्रतिमा सापडल्याने शहरात हाहाकार . थेट पेशवेकालीन ही वास्तू वादाच्या भोवर्यात. "
समीरने असं काही होईल हा विचारच केला नव्हता. आईसोबत आलेल्या बाबामहाराजांना पाहून त्याला खूप हायसे वाटले. बाबामहाराज, समीरचे सख्खे मोठे काका. गुरूतुल्य व्यक्तिमत्व. कुठल्याही अंधश्रद्धेला न मानताही गूढ गोष्टींचा सखोल ज्ञान असणारे. पॅरानाॅर्मल एक्सपर्ट. भारतातच नव्हे तर परदेशात ही या क्षेत्रात नाव कमावलेले बाबामहाराज. त्या ही पेक्षा समीरशी असणारं त्यांचं मैत्रीचं नातं हे समीरसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत आलेलं होतं. समीरने त्यांना भेटण्याची इच्छा प्रकट केली. ते आत आले आणि दोघांचा वार्तालाप सुरू झाला. दोघांची जवळपास तासभर चर्चा चालली. अॅडमिट असूनही आणि डाॅक्टरांनी या चर्चेला नकार देउनही ही चर्चा करणं आवश्यक होतं म्हणून तर परदेशातून इतक्या लांब भारतात ते आपल्या लाडक्या समीरसाठी आले होते. चर्चा पुर्ण होताच बाबामहाराज सर्वांना सोबत घेऊन तडक छोट्या हवेलीवर आले. नवीन बांधलेल्या वास्तूचीही त्यांनी बारकाईने पाहणी केली. समीर रहात असलेल्या सदनिकेतही काही सापडतंय का ते पाहिलं. शोधाशोध करताना त्यांना ती छायाचित्रे सापडली जी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी समीरकडे आली होती. समीरने ती सर्व छायाचित्रे सोबत घरी आणली होती. ही छायाचित्रे पाहताच भितीने त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. असंही छोटी हवेली पाहताना त्यांना आलेली शंका ही छायाचित्रे पाहताच खरी ठरली होती.त्यांच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग तरळून गेला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा