Login

महाराणी ताराबाई भाग १

Rani Tarabai's Life
महाराणी ताराबाई
भाग १

©® सौ.हेमा पाटील.

कोल्हापूरला गेले की महाराणी ताराराणी यांचा घोड्यावर स्वार झालेला पुतळा पहायला मिळतो. हातातील तलवार नभाकडे उंचावून पाठीवर ढाल बांधलेली व घोड्याचे पुढचे दोन पाय हवेत उंचावलेले. असा तो पुतळा पाहिला की कुणाच्याही मनात वीररस जागृत होतो. करवीरच्य गादीची स्थापना ताराराणी यांनी केली होती.

कोण होत्या या ताराबाई? असा प्रश्न विचारला तर कोल्हापूरकरच काय तर सातारकरही तुमच्याकडे रागाने कटाक्ष टाकतील. शिवाजी महाराज यांची सून, राजाराम महाराज यांची पत्नी आणि हंबीरराव मोहिते यांची कन्या, एवढी त्यांची ओळख सुद्धा अपुरी आहे. शिवरायांसारखीच साहसी आणि प्रतापी असणारी ही त्यांची सून त्यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती.

तुजला प्रसन्न झाली | पातशाही हाती आली |
जयलक्ष्मी माळ घाली | शिवाजीस आदरे ||
दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
जाणार तुम्ही आजिसाची | आज्ञा आली शंकराची |
सर्व सेना दिल्लीशाची | अंतकास वोपली ||
मानहानी दिल्लींद्राची | सभा हासणे इंद्राची |
आणि काल कवींद्राची | सर्व चिंता हारली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी क्रुद्ध झाली |
प्रलयाची वेळ आली | मुगल हो सांभाळा ||
वसे रत्न सिंहासनी | भोसल्यांच्या शिरोमणी |
शिवराज चिंतामणी | दीनमणि उदये ||
महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या कवी कविंद्र गोविंद यांनी ताराऊसाहेबांचे केलेले हे वर्णन ताराराणी यांच्या पराक्रमाची झलक दाखवते.

बालपणीच माहेरी घोडेस्वारी, युद्धकला याचे धडे त्यांना मिळाले होते. सोयराबाई यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला तेव्हा त्या आठ वर्षांच्या होत्या. संभाजी महाराज यांना मुघलांनी संगमेश्वर येथे कैद केले. त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आता मराठा साम्राज्य रसातळाला जाईल या आनंदात औरंगजेब आणि मुघल सैन्य होते.
संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई यांनी राजाराम महाराज यांना राज्याभिषेक केला व मराठा साम्राज्याचे नवीन छत्रपती म्हणून त्यांना गादीवर बसवले.
रायगडाला जेव्हा मुघलांनी वेढा दिला तेव्हा राजाराम महाराज, ताराबाई , राजसबाई, यांना येसुबाईंनी गुप्तपणे बाहेर काढले. मुघल वेढ्यातून निसटून ते तेथून बाहेर पडले व जिंजीच्या किल्ल्यावर पोहोचले.
राजाराम महाराजांची थोरली पत्नी जानकीबाई या येसुबाईंसोबत रायगडावर राहिल्या. रायगड जेव्हा मोगलांच्या ताब्यात गेला तेव्हा येसुबाई, जानकीबाई व संभाजी राजे यांचे पुत्र शाहूमहाराज मोगलांच्या कैदेत गेले. त्यामुळे ताराराणी यांना राजाराम महाराजांच्या महाराणीचे पद मिळाले. ते त्यांनी सार्थकी लावले.

राजाराम महाराजांनी राज्याचा कारभार पहाण्यासाठी ताराराणींच्या नेतृत्वाखाली रामचंद्र अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण अशा मुत्सद्दी लोकांचे एक मंडळ स्थापन केले होते. स्वराज्याचा राज्यकारभार चालवणे, मोगली सैन्याशी संघर्ष करणे, आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशाचे रक्षण करणे या गोष्टी या मंडळाकडे सोपवलेल्या होत्या.

राजाराम महाराज यांनी कर्नाटकात जिंजी येथे मराठ्यांची राजधानी स्थापन केली होती. त्यानंतर त्यांनी ताराबाई व राजसबाई या आपल्या राण्यांना गुप्तपणे जिंजी येथे आणले होते.
जिंजीच्या किल्ल्याभोवती औरंगजेबाने आपला सेनापती झुल्फिकारखान यास सेनेसह पाठवून वेढा घातला होता. सात वर्षे किल्ल्याभोवती हा वेढा होता.
खरं तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे साम्राज्य खिळखिळे झाले असा मोगलांचा समज झाला होता. राजाराम महाराज यांनी औरंगजेब व त्यांच्या सैन्याला जेरीला आणून मराठ्यांच्या शौर्याचे पाणी पाजले होते. यावेळी महाराणी ताराबाई यांनी आपल्या बौद्धिक चातुर्याचा ठसा जिंजीच्या दरबारात उठवला होता. राजाराम महाराज हयात असतानाच ताराबाईंनी आपल्या प्रशासकीय व लष्करी डावपेचांचे कौशल्य दाखवून दिले होते.

मोगलांच्या गोटाचा प्रमुख इतिहासकार काफीखान हा ताराराणी बद्दल गौरवाने खालील उद्गार काढतो.
" ताराबाई ही राजाराम महाराजांची थोरली पत्नी होय. ती बुद्धीमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार य बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक होता."
कालांतराने जिंजीचा किल्ला ताब्यात आल्याने औरंगजेब खुशीने बेहोश झाला. परंतु राजाराम महाराज आपल्या कुटुंबियांसोबत निसटले हे समजल्यावर त्याची निराशा झाली. संभाजी महाराज यांच्या वधानंतर मराठा साम्राज्य विनासायास आपल्या ताब्यात येईल असे स्वप्न पहाणाऱ्या औरंगजेबाच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम राजाराम महाराज यांनी केले. त्यांच्या या कार्यात त्यांना ताराराणींची समर्थ साथ होती.
जिंजी नंतर राजाराम महाराज यांनी सातारा येथे आपली राजधानी स्थापन केली.
पहिली शिवरायांच्या हस्ते स्थापन झालेली रायगडावरील राजधानी, त्यानंतर जिंजी येथील राजधानी या दोन्ही राजधान्या मोगलांनी ताब्यात घेतल्याने सातारच्या राजधानीची स्थापना केली गेली.

इ.स. १६९५ पासून औरंगजेब भिमा नदीच्या काठावर तळ ठोकून बसला होता. मराठ्यांच्या विरोधात एवढ्या मोठ्या मोहिमा आखून सुद्धा मराठ्यांवर विजय मिळवता येत नाही ही चिंता त्याला सतावत होती. मराठ्यांचे गड, किल्ले जिंकल्या शिवाय मराठे शरण येणार नाहीत हे त्याने ओळखले. त्यामुळे त्याने मराठ्यांचे गड, किल्ले ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली. साताऱ्याच्या किल्ल्याला मोगलांनी वेढा देण्यापूर्वीच ताराबाई आपल्या पुत्रासह विशाळगड येथे पोहोचल्या होत्या . इकडे सातारचा किल्ला वाचवण्यासाठी रणसंग्राम सुरू होता, अन् तिकडे मोगली मुलुखात मोहीमेवर असलेल्या राजाराम महाराजांची प्रकृती बिघडली. त्यामुळे ते सिंहगडावर आले. २ मार्च १७०० रोजी त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यावेळी ते अवघे तीस वर्षांचे होते. ताराराणी चे वय होते अवघे पंचवीस वर्षे...
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
अष्टपैलू लेखक स्पर्धा -२०२५
0

🎭 Series Post

View all