महाराणी ताराबाई
भाग २
भाग २
©® सौ.हेमा पाटील.
महाराणी ताराबाई यांचे चरित्र आपण समजून घेत आहोत. गेल्या भागात आपण महाराणी ताराबाई यांच्याबाबत माहिती घेतली. राजाराम महाराज यांचे निधन झाले. त्यांच्या राण्या विधवा झाल्या. आता तिथून पुढे...
राजाराम महाराज यांचा मृत्यू झाल्याने मोगल सैन्यात आनंदीआनंद झाला. आता या मराठा साम्राज्याला कुणीच वाली नाही. आपण आता हे साम्राज्य सहजपणे आपल्या ताब्यात घेऊ शकतो अशा आनंदात सगळे होते. परंतु ताराबाई राणी साहेबांनी आपले पती निधनाचे दुःख दूर सारून आपल्या पुत्राला मराठ्यांच्या गादीवर बसवले. मराठा राज्याच्या राज्यकारभाराची व लढाईच्या मोहीमांची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. मराठा सैन्याला नेतृत्वाची कमतरता जाणवू दिली नाही. यासोबतच मोगली सैन्याशी धैर्याने मुकाबला करुन त्यांना जेरीला आणले. यावेळी ताराबाईंचे युद्धकौशल्य व नेतृत्वगुण लक्षात येते. पुढील आठ वर्षांत ताराबाई राणीसाहेबांनी औरंगजेबाच्या प्रचंड सेनादलाशी अपुऱ्या साधनसामुग्रीसह आणि अपुऱ्या सैन्यबळासह जो लढा दिला तो लढा केवळ शिवरायांच्या सूनेला शोभणारा होता. अवघ्या पंचवीस वर्षांची ही राणी ज्या धडाडीने मोहिमांचे युद्धभूमीवरील संचलन करायची, तसेच सैन्याचे नेतृत्व करायची ते पहाता तिच्या शौर्यापुढे नतमस्तक व्हावे असेच वाटते. त्यामुळे तिचे नेतृत्व हिंदुस्थानातील तमाम मराठ्यांनी व महाराष्ट्रातील सर्व जाती जमातींनी मान्य करुन हिंदवी स्वराज्य वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावल्याचे दिसून येते.
इतिहास संशोधक रिसायतकार सरदेसाई ताराबाई यांच्याबद्दल म्हणतात,
"ताराबाई हुशार आणि आग्रही होती. स्वतः राज्यकारभार करण्याची तिला हौस होती. आपला थोरला सुपुत्र थोरल्या शिवाजीसारखाच पराक्रमी निघेल, निदान आपण त्याला स्वप्रयत्नाने तसा बनवू अशी तिला धमक वाटत होती. तिचा स्वभाव इतका आग्रही होता की, माघार घेणे म्हणजे काय? हे तिला माहीत नव्हते."

मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात मराठा लष्कराचे नेतृत्व करुन प्रतिस्पर्धी असलेल्या प्रचंड मोगली सत्तेशी संघर्ष करणे हे सोपे काम नव्हते. शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी राजे व राजाराम महाराज हे मराठ्यांचे दोन छत्रपती मोगल सत्तेशी संघर्ष करतानाच मृत्यू पावले.असे असताना ताराबाई महाराणीने बाई असून मोगली सत्तेशी संघर्ष करुन औऱंगजेबाला मराठा भूमीत कायमची चिरनिद्रा दिली. मराठ्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या औरंगजेबाला परत उत्तरेकडे जाता आले नाही हेच ताराराणीच्या यशाचे फडकलेले निशाण नाही का?
महाराणी ताराबाई यांनी युद्धाचे रणांगण फक्त मराठा साम्राज्यापुरतेच न ठेवता संपूर्ण हिंदुस्थानात पसरवले. या लढाया अत्यंत जलदगतीने व विद्युत वेगाने करण्याचे एक नवीनच युद्धतंत्र राणीने आखले. मराठ्यांचे सैन्य सर्वशक्तिनिशी एखाद्या वादळी झंझावातासारखे मोगली सैन्यावर अचानकपणे तुटून पडत असे. शत्रूपक्षामध्ये घबराट व भीतीचे वातावरण निर्माण करुन त्यांचे मनोधैर्य नाहीसे करत असे. त्यांना दूरवर पळवून त्यांचा पाठलाग करुन पराभव करणे हे या युद्धतंत्राचे मुख्य सूत्र होते. शिवराय जसे गनिमी काव्याने मोगलांशी लढत तसेच ताराराणीने हे अनोखे तंत्र अवलंबले होते. यामुळे औरंगजेब जेरीस आला होता. त्यावेळचे त्याचे हे वक्तव्य आहे,
"हे मराठे कोठून येतात, कोठे जातात, काय खातात कळत नाही. दुष्ट जमात. वादळासारखे पाठीशी लागतात. विजेप्रमाणे कडाडून कोसळतात. कुठे आहेत आणि कुठे नाहीत हेच समजत नाही." अशा पद्धतीने मराठ्यांचा मागोवा घेणे औरंगजेबाला ही जमत नव्हते.

ताराबाई या शिवरायांच्या सुनबाई असून हंबीरराव मोहिते यांचे रक्त त्यांच्या धमन्यात वहात होते. त्या स्वतः सैनिकी वेशात रात्री अपरात्री मराठ्यांच्या सैनिकी तळावर उपस्थित असत. एका तळावरुन दुसऱ्या तळावर, एका किल्ल्यावरुन दुसऱ्या किल्ल्यावर फिरत राहून त्या सैनिकांमध्ये उत्साह निर्माण करत असत. आपल्या सेनेबरोबर युद्धाला जाताना त्या उन्हातान्हाची पर्वा करत नसत. अनेकदा सैन्याचे तळ पडलेले असताना उघड्या मैदानात महिला सैनिकांसमवेत राणीचा मुक्कामाचा तंबू पडलेला असे. युद्धाच्या सर्व आघाड्यांवर त्यांचे नेतृत्व जाणवत असे. मराठ्यांच्या सेनापतींना व अधिकाऱ्यांना युद्धाची आघाडी रुंद करण्याबद्दल समक्ष युद्ध क्षेत्रावर उपस्थित राहून त्या सूचना देत असत. त्यांचे युद्धाचे निर्णय इतके अचूक असत की, मराठा सैन्य हमखास विजयी होत असे. त्यांना उपजतच सैनिकी नेतृत्व करण्याचे गुण लाभले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखी अलौकिक युद्धकला व अतुलनीय मुत्सद्दीपणा यांचा ताराबाईच्या ठिकाणी संगम झालेला होता. मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या या राणीला ही ईश्वरी देणगी होती असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. नाही तर एवढ्या कमी वयात इतके शौर्य व मुत्सद्दीपणा अंगी बाणवणे एका महिलेसाठी तर अशक्यच वाटते. जिजामाता यांनी शिकवण देऊन शिवबाला घडवले, पण ताराऊ बाईसाहेबांनी प्रत्यक्षात तलवार हाती घेऊन व राजकारणात लक्ष घालून मराठ्यांचे साम्राज्य राखले.
औऱंगजेबाच्या लक्षात आले की, या मराठ्यांच्या राणीला जिंकणे आपल्याला शक्य नाही. बादशहाने आपली हयात मोहिमा करणे व किल्ले घेणे यात घालवली. ताराराणीच्या विरोधात तो शेवटपर्यंत लढला. माळव्याची नाकेबंदी करून बादशहाची संपूर्ण रसद आणि खजिना गारद करुन ताराबाईंनी बादशहाच्या नाकी नऊ आणले.
मोगलांना गारद करण्यासोबतच दिग्विजय करण्यासाठी त्यांनी मराठ्यांचे सैन्य दक्षिणेकडे पसरवले होते. साम्राज्यविस्तार हाही ताराराणीचा हेतू होता.
औरंगजेब हा जगाच्या इतिहासातील महान सेनानी म्हणून ओळखला जातो. अशा या जगप्रसिद्ध सेनानीस ताराबाईंनी हैराण केले. ताराराणीच्या युद्धतंत्रामुळे मोगली सत्ता खिळखिळी होऊन विनाशाच्या मार्गावर येऊन थांबली. पुढील सात वर्षांत बादशहाचा पूर्ण पराभव करून आपले नेतृत्व औरंगजेबापेक्षा थोर आहे हे राणीने सिद्ध केले. पंचविशीतील एक विधवा राणी काय करणार आहे अशा भ्रमात असणाऱ्या औरंगजेबाला व त्याच्या यवनी सत्तेला या मराठ्यांच्या राणीने आपल्या असामान्य कर्तुत्वाने पाणी पाजले. मोगली सत्ता खिळखिळी करुन ठेवत हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. यातूनच ताराराणीचा अतुलनीय पराक्रम दिसून येतो.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा