आम्हाला होतात वेदना
तश्या तुलाही होतात का रे?
दुःखाच्या भरल्या घागरी की
डोळ्यातून झरतात का रे?
तूही जागतोस का रे लेकरं तुझी निजेस्तोवर?
तूही हिंडतोस का रे आईचा पकडुन पदर..
तुझ्याकडेही होतो का रे आठवणींचा पाऊस?
तूही रीता रीता होतोस का रे जेव्हा मनी उठतं काहूर?
तू कोणाला रे दोष देतोस?
जेव्हा मनाजोगत घडतं नाही!!
नशीब तर म्हणे तूच लिहितोस,
का तू पण या भोगतून सुटतं नाहीस??
मोठेपणाचे तोटे तुलाही होतात का रे?
तिकडे हिमालयात, नाही तर क्षिरसागरात,
तुझे आपले, डोळे पुसायला येतात का रे?
तुझी ध्यान साधना खरंच काही करते का रे?
तुझ्या मनीचे दंद्व मिटल्या डोळी धरते का रे?
की जगतोस बापडा एकटाच,
नुस्त सुख दुःख वाटत राहतोस ...
निराकार, निर्विकार नदीसारखा अंताकडे वाहत राहतोस??
भेटलास जर कधी तर डोळ्यात
एकदा झाकिन म्हणते ..
साऱ्या जगाच्या पालनकर्त्याला
एकदा आधार देईन म्हणते....
हर्षदा सचिन गावंड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा