Login

रात पुनवेची आली भाग 10

एकात एक गुंतलेली रहस्य कशी उलगडतील ?
रात पुनवेची आली भाग 10
मागील भागात आपण पाहिले की
शेरगाव धरणात जाणार होते . सरकारी अधिकारी प्रस्ताव देऊन गेले . गावाच्या प्रथेप्रमाणे देवीला कौल लावून निर्णय होणार होता . आता पाहूया पुढे .


" आक्का , यायचं का आमी आत ? "
म्हातारबा दादाचा आवाज ऐकला आणि कासूबाई पळतच बाहेर आली .

गेले कितीतरी वर्ष तिने भावाला पाहिले नव्हते . पाटलाची लेक गावातल्या गरीब घरात वडिलांनी दिली . हा निर्णय यांना आवडला नव्हता आणि आपल्या नवऱ्याशी भावाचे वागणे पाहून नंतर कासूबाई माहेरी गेलीच नव्हती .

आज तिने आणि नवऱ्याने कष्टाने सगळे काही मिळवले होते . दोन देखण्या मुली , दोन मुलगे , घरदार सगळे होते . नव्हते फक्त माहेर .

" दादा , जिती असताना तू दिसला आई काळूबाई पावली मला . " तिने भावाला घरात बोलावले .


" आक्का , देवीला कौल लावायचा ठरलं हाय , पर मला गाव सोडून जायचं पटत न्हाय बघ . "


" दादा , आर आई काय कौल दिल तसं व्हईल . "

" आक्का , कौल माझ्याच बाजून यायला पायजे . "
" म्हणजी ? "

" त्वा कौल लावू नग . राणी मुरळी कौल लावलं . "

" न्हाय जमायचं दादा , आर देवीच्या कामात लबाडी करू व्हय ? "

" लबाडी नग करू आक्का , फक्त त्वा जाऊ नग त्या दिवशी . " कासूबाई गप्प झाली .

" आक्का , येवढं आईक माझं . "

" दादा , दोन दिसांनी देवळात ये सांच्या पारी . "
म्हातारबा पाटील तिथून बाहेर पडले .



काशी इतक्या जवळून दिसल्यावर दौलती वेडावला होता . आजपर्यंत अनेक सुंदर स्त्रिया त्याच्या आयुष्यात आल्या पण काशीची गोष्टच वेगळी होती . तिचे उष्ण श्वास , तिच्या अंगाचा तो ओलेता स्पर्श सगळेकाही आठवून दौलती आपोआप नदीकडे चालू लागला .

" आव पाटील कुठं निगाला? " सखुने विचारले .

" तुला का पंचाईत ? " दौलती गुरकला .

" आत्ता , म्या आपलं काळजीनं इचारल . " ती लाडिक बोलत जवळ आली .

" सखू , बाजूला व्हय . " तिला हाताने बाजूला ढकलले आणि तो चालू लागला .


" आता दुसरी कुणी गावली वाटतं ? " तिने परत वाट अडवली .

" त्याची तुला चिंता नग . " तिला बाजूला करून तो झपझप पावल टाकीत निघाला .

सखू अपमान गिळत तशीच पुढे चालू लागली . तिच्या मनात सुडाच्या ज्वाला पेटत होत्या .


" काशी , चल बया . हित पाटील लोकं आल्यात . "
रखमा म्हणाली .

" नदी कुणी ईकत घितली न्हाय रखमे ." काशी म्हणाली .

" म्या चालले . तुला याच असल तर ये . " रखमा घाईने सगळे आवरून निघाली .

" गावातल्या पोरींना म्या वाघ वाटतो का काय ? " दौलती मिशीवर पीळ देत म्हणाला .


" व्हय तर वाघ असाच वाघिणीला यकटी सोडून जातो मजा मारून . "
काशी पटकन बोलून गेली .

" काशे , खबरदार . " दौलती चिडला .

" हा , म्या तुमची लग्नाची बाईल नव्ह . काय खोटं हाय ह्यात . किती बायांनी नदी जवळ केली . "
काशी रागाने कपडे उचलून निघाली .


" थांब , काशी . तुझ्यासाठी पाटीलकी सोडून दिलं . पर मला तू पायजे . "

" पाटील उलटं नात कुणाला पचायचं न्हाई . "

" म्या हाय नव्ह . तुला आवडत न्हाई का आमी ." दौलतीने थेटच विचारले .


" पाटील आगीशी खेळ नग . माजी वाट सोडा . "
काशी पुढे निघाली आणि तिचा पाय घसरला .


दौलतीने तिला पकडले . त्याच्या मर्दानी बाहुत काशी पुन्हा एकदा शहारली .

" पाटील सोडा मला . "
असे तिचे ओठ म्हणत असले तरी तिचे शरीर ते मानत नव्हते .


" सोडलं , आजवर नकार देणारी सुंदरा उचलून नेली . पण काशी तू आमाला लगीन करून पायजे ."
दौलती दूर होत म्हणाला .


काशी झपझप पावले टाकत निघाली . पुढच्या वळणावर रखमा उभीच होती .

" रखमे , घरी न्हाय गेलीस ." काशी चिडली .

" अगं तुझी वाट बघत थांबले . " रखमा म्हणाली .


" मगाशी एकटी सोडून आली तवा नाय वाटली माजी काळजी . "

" म्या तुला म्हणलं व्हत चल म्हणून . पर तुला दवलती आवडला हाय ना . "

" रखमे हळू , कुणी आईकल म्हणजी ? "

" काशे आईक माझं , हा नाद धरू नग . "

" मंग काय करू ? कसल्याबी बाप्याचा हात धरू . सरीचा नवरा बागीतला ना तू . जोडा शोबतोय का ? "

" काशे , जवानी चार दिस असती . त्यापायी वाटोळ झालं किती जणांचं . पाटलाचा नाद नग धरू . "

" तुझं पटतंय मला . पर मन न्हाय ताब्यात रहात . सामदिकड दिसत राहतो त्यांचा चेहरा . "
दोघी मैत्रिणी गप्पा मारत निघाल्या .



त्यांचे बोलणे चोरून ऐकणारा दौलती मनात खुश होऊन निघाला . तितक्यात नदीच्या बाजूने जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू यायला लागला .


दौलती तसाच पळत निघाला . पाठोपाठ काशी आणि रखमा देखील निघाल्या . आजुबाजूच्या रानात कामे करणारी माणसे डोहाच्या दिशेने पळत निघाली .

" अय धोंडू कशापायी वरडतो ? " दौलती पळत आला .

तसे धोंडूने घाबरून पाण्याकडे बोट दाखवले . पाण्यात एक मृत स्त्री तरंगत होती .

" पाटील बोराची फास लाऊन बाहिर काढू . "
तिचा मृतदेह बाहेर काढला आणि सगळे स्तब्ध झाले .


म्हातारबा पाटलांच्या धाकट्या भावाची सून नर्मदा होती .

" नर्मदा वैनी ? " दौलती मागे सरला .


दोनच दिवसांपूर्वी नर्मदा माहेरी गेली होती . तिचा नवरा तिला स्वतः सोडायला गेलेला . मुऱ्हाळी नसूनही वहिनी माहेरी चालल्या म्हणून दौलतीने हटकले होते दोघांना .



नर्मदाच्या अंगावर असलेले दागिने गायब होते . कोणीतरी पाटलांच्या सुनेचा खून केला होता .

" दौलती पाटील शिपायात वर्दी द्याची काय ? "

" अय थांब जरा . पाटलांच्या घरात आमी बघून घिऊ . "

" पाटील , पंच मंडळी बोलवा . समद्या गावाला ज्यो न्याव त्योच हित असायला पायजे . "

गर्दीत तीनचार जण म्हणाले .

" आधी हे मढ उचला . गावात जाऊन वर्दी द्या . हिच्या माह्यारी सांगावा धाडा . "


दौलती भराभर सूचना देत असला तरी त्याचे मन एका अशुभ शंकेने ग्रासले होते .


नर्मदेच्या खुनाचा काय परिणाम होईल ?
कासूबाई कौल लावेल का ?
काशी आणि दौलती लग्न करतील ?

वाचत रहा .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर

अष्टपैलू 2025 स्पर्धा

सदर कथेचे लिखाण चालू आहे .
0

🎭 Series Post

View all