Login

रात पुनवेची आली भाग 16

काशी आणि दौलती एकत्र येतील का ?
रात पुनवेची आली भाग 16

मागील भागात आपण पाहिले दौलती लग्न करायला नकार देतो . सखू म्हातारबा पाटलांना काही गोष्टी सांगते . दौलती काशीसोबत पळून जायचे ठरवतो . आता पाहूया पुढे.


सखुचे बोलणे आठवून म्हातारबा पाटलांना राग येत होता . आजपर्यंत त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा . आज त्यांच्या लाडक्या दौलती आज त्यांचा शब्द धुडकावून लावत होता . यामागचे कारण एक मुलगी असल्याने त्यांना काहीही करून तिचा शोध घ्यायचा होता .


याबाबत कोणावरही विश्वास न ठेवता स्वतः शोध घ्यायचा असे ठरवून म्हातारबा रात्रीची वाट बघत होते .


आईने सरळ दिलेला इशारा ऐकला आणि काशी घाबरली . आता लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक होते . आतुरतेने रात्रीची वाट काशी पहात होती . सूर्य अस्ताला गेला आणि गाव अंधारात बुडाले . काशी हळूच मागच्या दारातून बाहेर पडली .


दौलती रानातून नेहमी भेटायच्या जागेवर आला . थोड्याच वेळात काशी येताना दिसली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले .

" काशी , आता काही दिवसांनी हे समद पाण्याखाली जाणार . "

" व्हय , हे वडाच झाड , नदीच्या काठावर हे छोट मंदिर सगळ जाणार . "
काशीने उत्तर दिले .

" आपल्याला गाव सोडायला लागलं काशी . "
दौलती तिचा हात धरून म्हणाला .

" व्हय , पर आता नाही . आता आपून पळून गेलो तर आपल्याला पकडायला समदी तुटून पडत्याल . "

" आबा आमच लगीन लावायच म्हणत्यात . "

" त्यासनी सा महिन थांबवा . गाव पाण्याखाली जाताना आपून पळून जायचं . "

" काशी , तुझी साथ कधीच सोडणार न्हाय . "
दौलतीने काशीला मिठीत घेतले .


लांबून बोलणे ऐकू येत नव्हते . थोड्या वेळाने काशी जायला निघाली . ती जवळून जाताना म्हातारबा पाटलांनी तिला पाहिले आणि त्यांना प्रचंड राग आला . त्यांनी तिला धडा शिकवायचा असे ठरवले .


ते दोघे निघून गेले आणि पाटील निघाले .

" पाटील थांबा . सबुरीन घ्या ."
सखू मागून पुढे झाली .

" तू ? तुझ्याकडन शिकायची गरज न्हाय . काशीला नाहीशी करून टाकतो . "

" काशी गायब झाल्यावर दौलती गप बसल व्हय ? काळ येळ बघून डाव साधा . "

सखू विचारांचा भुंगा सोडून निघून गेली .


त्यानंतर धरणाचे काम वेगाने सुरू झाले . माती , दगड फोडणे , त्याची वाहतूक अशी कामे वेगाने सुरू झाली . पहिला टप्पा पावसाळा यायच्या आधीच पूर्ण करायचा होता . विल्यम जातीने लक्ष ठेवून होता . काशी त्याला भेटून पुढची व्यवस्था करत होती . दौलती देखील पैसे आणि इतर व्यवस्था करण्यात व्यस्त होता .


" राधा , आम्ही ठरवलं तसं व्हईल नव्ह ? "
दौलतीने विचारले .

" व्हय , पर सावध रहा . गावात बांडगुळ कमी न्हाईत . "

" व्हय , आबा ह्यात यायला नग . त्यांना आधी समजल तर ? "

" धाकल पाटील काशी आणि तुम्ही भेटताना जपून . कोण पाठलाग करत न्हाय ना ? हे बघूनच भेटा . "

" व्हय , समदी काळजी घेतो आम्ही . "
राधाचा निरोप घेऊन दौलती निघाला .


थोडे दूर गेल्यावर अचानक कोणीतरी त्याचा हात धरला .

" कोण हाय ? "
दौलती गरजला .

" आता , ह्यो नाजूक हात सगळ्या अंगावरन फिरला हाय पाटील . "
सखू पुढे झाली .

" हात सोड . "
तिला बाजूला ढकलून दौलती निघून गेला .


सखू मात्र सुडाच्या आगीत जळत होती .



काहीही करून एक रात्र दौलती माझा व्हायला हवा . ह्या विचाराने तिला झपाटले होते . काशी त्याच्या आयुष्यात आल्याने त्याने आपल्याला झिडकारून टाकले हेच सखुला मान्य होत नव्हते .


" काशे आटीप लवकर . कापड धुवायला जायचं हाय . "
झामा ओरडली .

" व्हय , ही काय आलेच . रखमाला संग घ्यायचं हाय ."
कपडे गाठोड्यात बांधत काशी म्हणाली .

रखमा आणि धाकटी बहीण यांना घेऊन काशी नदीकडे निघाली .

" अय रखमा , झामा , काशी थांबा की . "
सखू पळत आली .

" ही नटवी कशाला हाक मारती ? "
रखमा चिडली .

" सोबत नसलं कुणी जायला . "

काशीने उत्तर दिले .

" हिला ? गावातून लई सोबती हाय तिचं . "
तोपर्यंत सखू पोहोचली .

चौघी दोहाजवळ आल्या . लवकर आल्याने डोहाजवळ ह्या चौघी होत्या फक्त .


कपडे धुवत असताना साडी विसळण्यासाठी काशी थोडीशी आत उतरली . ती एका दगडावर उभी होती . सखुने दगडावर एका बाजूने जोरात धक्का दिला आणि काशी पाण्यात पडली . डोहात पुढे भोवरा होता . काशी पट्टीची पोहणारी असूनही भोवरा कापत बाहेर येणे सोपे नव्हते .


आता काही काशी वाचणार नाही असे वाटत असताना कोणीतरी धपकन पाण्यात उडी मारली .


भीमा काशीला बाहेर घेऊन आला .

" जरा जपून काम करा . नाहीतर मराल ."
भीमा रागाने बोलून निघून गेला .


दौलतीने त्याला काशीच्या आसपास राहायला सांगितल्याने आज काशीचा जीव वाचला होता .


इकडे दूर पठारावर लोकांना शेतीसाठी जमीन वाटप सरकारकडून झाली होती . पांढरी आणि काळी अशी आखणी होऊन घरे बांधण्याची लगबग सुरू झाली .


नवीन गावठाण वेगाने आकाराला येत होते . पावसाळा तोंडावर आल्याने आता कधीही गाव सोडून जायच्या तयारीत गावकरी होते . अजून पंधरा दिवसात पाऊस सुरू होईल अशी शक्यता असताना त्या दिवशी संध्याकाळी पाऊस सुरू झाला .


अवकाळी असेल असे दुर्लक्ष केलेला पाऊस उघडायचे नाव घेईना . डोंगरातून पाण्याचे लोट वाहायला लागले .


चार दिवस झाले तरी पाऊस चालूच होता . धरणात पाणी साठायला सुरुवात झाली . ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांनी तातडीने गावकऱ्यांना गाव सोडायच्या सूचना दिल्या .


शक्य होईल तेवढे सामान सोबत घेऊन लगेच गाव सोडायची तयारी सुरू करा अशी सूचना आली . कासू आक्काने देवीला अभिषेक केला आणि मंदिराचे दरवाजे बंद केले . मूर्ती अचल असल्याने सोबत नेता येणे शक्य नव्हते .


दौलती आणि काशी दोघांनी ओळखले हीच ती वेळ . काशीने सगळी तयारी केली . आता नेहमीच्या जागेवर भेटायचे ठरले .


काशी आणि दौलती एकत्र येतील का ?
ह्या प्रेमातून काही वेगळे संकट निर्माण होईल का ?

वाचत रहा .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर

अष्टपैलू 2025 स्पर्धा .
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
0

🎭 Series Post

View all