Login

रात पुनवेची आली भाग 17

एका सुखद प्रेमाचा अंत
रात पुनवेची आली भाग 17


मागील भागात आपण पाहिले की सखू काशीला मारायचा प्रयत्न करते . म्हातारबा पाटील शांत राहून योजना आखत असतात .. अशातच पाऊस लवकरच सुरू झाल्याने गाव सोडून जायची वेळ येते . आता पाहूया पुढे .


" काशी , कुठं निघाली एवढ्या पावसात ? "
झामा तिला थांबवत म्हणाली .
" रखमाकड जाऊन येते . "
" काशी , खरं सांग ? "
" व्हय , ही गेले आन आले . तवर गाठुडी बांधायला घे . "
काशी घराबाहेर पडली .


धो धो पाऊस पडत होता . तिची पाऊले नेहमीच्या वाटेने पडत होती . आज आपण आणि दौलती कायमचे एक होणार . विचार करूनच काशीला शांत वाटत होते .

" काशी , अय काशे थांब . "
मागून पाटलांच्या घरात काम करणारी दगडाबाई पळत आली .

" काय मावशे ? कशाला हाक मारली . "

" तुला धाकल्या पाटलांनी वाड्याच्या माग बोलावल हाय . "

" मावशे तुला निरोप कसा काय दिला त्यांनी ? "

" आता हाय का ? हित बोलत बसू नग . "
दगडाबाई निघून गेली आणि काशीने मार्ग बदलला .


दौलती डोहाजवळ वाट बघत होता . पाणी वाढत होते . वडाच्या झाडा पर्यंत पाणी पोचणार होते . अजूनही काशी आली नव्हती . दूरवरून भीमा पळत येताना दिसला . त्याच्या पायातून रक्ताची धार लागली होती .

" भीमा , काय झालं ? कुणाची एवढी हिंमत ? "

" पाटील येळ घालवू नगा . काशीला वाचवा . वाड्याच्या मागच्या बाजूला पोचा . "

" आधी तुला गावात नेतो ."

" तेवढा येळ न्हाई . म्या जाईल . "

दौलती उभ्या पावसात धावत निघाला . गावात पाणी भरायला सुरुवात झाली होती . भीमा आपला जखमी पाय घेऊन घराकडे निघाला .


" झामा आटीप पोरी . बैलगाड्या भरल्या हाय . काशी कुठं गेली ? "
वडिलांनी तो प्रश्न विचारलाच .

" आक्का व्हय ? हित रखमाकड गेली हाय . "

" जा तिला बोलावून आण . आपल्याला निघायचं हाय . "


कासू आक्काने देवघरात असलेले देव व्यवस्थित बांधले आणि बाहेर आली . काशी घरात नाही हे कळताच तिच्या काळजाचा ठेका चुकला . तितक्यात झामा पळतच आली .

" आक्की न्हाय तिथं . "

" धनी सामान घ्या . आता काशी आन तिचं नशीब . "
कासू आक्काने दोघांना बाहेर काढले .



भर पावसात वाड्याच्या मागच्या बाजूला काशी उभी होती . पाण्याचा आवाज वाढत होता . वाडा उंचावर असला तरी पौर्णिमेच्या चांदण्यात चमकणारे पाणी दिसत होते . अचानक वीज कडाडली आणि काशीने घाबरून डोळे मिटले . तिथेच घात झाला .


एक भक्कम पुरुषी हात तिच्या तोंडावर होता . दुसऱ्या क्षणी काशीचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत तिला वाड्याच्या तळघरात फेकण्यात आले . तोंड बांधल्याने तिला ओरडता येत नव्हते . अचानक चार जण आत आले .

" संदूक उघडा . " काशीने आवाज ओळखला .


मोठ्या संदुकीत तिला टाकण्यात आले . संदुकीच्या समोरच्या छिद्रातून आता दिसत होता फक्त काळोख आणि ऐकू येत होता खळखळ वाहणारा पाण्याचा आवाज .



दौलती वाड्याच्या मागे पोहोचला . तोपर्यंत पाणी वाड्याच्या अंगणात आले होते .

" पाटील कुणाची वाट बघता . "
सखू क्रूर हसत समोर उभी राहिली .

" सखू , काशी कुठाय ? " त्याने सखुचा गळा पकडला .


" पाटील वाडा लई मोठा हाय . मला मारत बसाल आन तिकड....."
सखुला सोडले आणि दौलती आत शिरला .


सखू हसली आणि तिने अलगद मागच्या दाराला कुलूप घातले . पुढच्या दाराने म्हातारबा बाहेर पडले . डोहाजवळ थांबलेला दौलती त्यांना गाठायचा होता .


" आबा , अर्ध गाव पाण्यात बुडल . दौलती तिथं नसणार . " म्हातारबा पाटलांना थोरल्या लेकाने समजावून बाहेर काढले .


सगळे गावकरी सामान , जनावर आणि कुटुंब घेऊन गावातून बाहेर पडले होते . कासू आक्का दिसेल त्याला पोर दिसली का विचारत होती .


काशी ! काशी ! मोठ्याने हाक मारत चालत होती . धो धो पावसात डोळ्यातील पाणी कोणालाच दिसत नव्हते .

" आई , आक्का मामाच्या वाड्यात गेली असली तर ? "
झामा अचानक बोलून गेली .


" न्हाय , तिकड जायची न्हाईत दोघ . "
वडील असे म्हणाले आणि झामा नवलाने बघू लागली .


" तिला तिच्या पसंतीचा जोडीदार पायजे व्हता . काय वाईट केलं व्हत तिनं ? "


म्हातारबा पाटील पळतच सगळीकडे फिरत होते .


" भीमा अय भीमा थांब . "
लंगडत चालणारा भीमा थांबला .


" दुसरा पाय मोडायचा इचार हाय का आता ? "
भीमा गुरकला .


" भीमा , थोरल्या पाटलांना उलट बोलतोस व्हय ? "
भीमाचा बाप चिडला .


" व्हय , बोलणार . आईका पाटील , ज्या वाड्यात काशीला कोंडून आला तिथंच तुमचा दौलती तिला शोधायला गेला हाय . "



म्हातारबा पाटील मटकन खाली बसले . भयंकर शक्यतेची जाणीव होताच आपण काय करून बसलो त्यांच्या लक्षात आले . इकडे वाड्यात दौलती वेड्यासारखे काशीच्या नावाने हाक मारत फिरत होता .


सगळ्या खोल्या फिरून झाल्या आणि अचानक एक आठवण येताच दौलतीच्या अंगावर काटा आला . तळघराच्या दिशेने दौलती धावत निघाला . तोपर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले होते . अचानक पायाला काहीतरी अडकले दौलती खाली वाकला .

काशीच्या पायातला पैंजणांचा जोड . तळघराला असलेले कुलूप पाहून दौलतीने काशी ! असा मोठ्याने हंबरडा फोडला .


खिडकीतून संदूक स्पष्ट दिसत होती . अर्धी संदूक पाण्यात बुडाली होती . दौलती जागेवरच खिळून उभा राहिला . पाणी वेगाने वाढत राहिले . संदूक बुडाली आणि दौलती खिडकीतून बघत तसाच उभा राहिला .


पाण्याचा प्रवाह वाढत चालला होता . हळूहळू पाणी गळ्यापर्यंत आले . काही क्षणात दौलतीच्या डोळ्यातील पाणी आणि पुराचे पाणी एकच झाले . प्रेमाची एक कहाणी अधुरीच बुडून गेली होती . पौर्णिमेच्या प्रकाशात एक काळोखी अंत झाला होता .



म्हातारबा पाटलांनी दौलती असा मोठ्याने हंबरडा फोडला . वाड्याचे वरचे टोक पाण्यात बुडाले . आता फक्त काळूबाईच्या मंदिराच्या कळसावर असणारा झेंडा दिसत होता .


कासूबाई आणि म्हातारबा पाटील सुन्न होऊन वाढत जाणाऱ्या पाण्याकडे बघत होते . इकडे गावाच्या पाणंद वाटेतून सखू धावत होती . गावाबाहेर जाणारी वाट तिला सापडत नव्हती . घसरून चिखलात पडून पुन्हा उठून पाण्यापासून दूर पळणारी सखू पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचत होती .


आपण केलेल्या पापाची शिक्षा आई काळूबाई आपल्याला देत आहे सखुने ओळखले . मागून येणारा पाण्याचा लोंढा पाहून सखू जागेवर थांबली आणि पाणी वाढतच गेले .



नयनाच्या आजीने बोलणे थांबवले . अमेय , अनघा , वसुधा आणि नयना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते .


" याचा अर्थ काशीचे शरीर तिथेच आहे . त्या संदुकीत . " शर्मन म्हणाला .

" येस , आपल्याला तिला आणि दौलतीला मुक्ती द्यायला हवी . " अनघा म्हणाली .

" पोरी , ते इतके सोप न्हाई . आपल्याला फसवल म्हणून तिचा आत्मा. चार पिढ्या सूड घेतोय . "
आजी म्हणाली .

" यावर काहीतरी उपाय असला पाहिजे आजी . " अमेय म्हणाला .

" व्हय , ह्या पुस्तकात उपाय सापडलं . चला जेऊन घ्या . परवा पौर्णिमा हाय . उद्या पहाट देवीच्या अंघुळीला जायचं हाय ."



काशी आणि दौलती दोघांच्या आत्म्याला कशी शांतता मिळेल ?
पुनवेची वाट पाहणारी काशी शांत होईल का ?


वाचत रहा .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर .


अष्टपैलू 2025 स्पर्धा .
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
0

🎭 Series Post

View all