Login

रात पुनवेची आली भाग 19

पुनवेची रात पुन्हा आली.

रात पुनवेची आली भाग 19

मागील भागात आपण पाहिले की अमेय रात्री गायब होऊन. वाड्यात अडकला आहे . राधाच्या चिठ्ठीने उत्तर सापडले आहे . आता पाहूया पुढे .


संध्याकाळ होत आली आणि नयनाची आजी परत आली .

" सगळ्यांनी हा धागा हातावर बांधा . तिथं काय दिसलं , आईकू आलं तरी ते खरं न्हाय एवढं लक्षात ठिवा . "

सूर्य अस्ताला गेला आणि पौर्णिमेची रात्र सुरू झाली . वाड्याच्या आसपास असलेल्या झाडांवर असंख्य काजवे चमकत होते .

" अमेय , अमेय ऊठ ना . आपल्या बाळासाठी . "
कानात अनघाचा आवाज ऐकू आला आणि अमेय जागा झाला .

समोर अनघा उभी होती .

" अनघा तू इथे कशी काय आलीस ? "
त्याने एक पाऊल पुढे टाकले आणि अचानक थांबला .

" अमेय , थांबला का ? चल इथून लवकर . "
अनघा त्याला बोलावत होती .

" कोण आहेस तू ? अनघा नाहीस तू . "
अमेय थांबला आणि मोठ्याने हसत ती गायब झाली .

तिची सावली नव्हती ते पाहूनच अमेय सावध झाला होता .


शर्मन , नयना, वसुधाताई , अनघा आणि आजी सगळेजण वाड्याजवळ आले . शर्मनने टॉर्च चालू केली . वाड्याचे गंज लागलेले कुलूप तोडून पाचही जण आत आले . अनघा मोठ्याने ओरडणार इतक्यात तिला आजीने थांबवले .

" आई , आई मी इकडे आहे . "
समोरून अमेयचा आवाज आला आणि वसुधाताई धावत सुटल्या .

त्यांनी अमेयला मिठी मारताच तो दूर फेकला गेला . वसुधाताई खाली पडल्या . हातात असलेल्या धाग्याने त्यांना वाचवले होते .


" म्या सांगितलं नव्ह हित दिसलं ते समद खर न्हाय . "
आजीने वसुधाला उठवले .

" आधी तळघर शोधायला हवे . "
नयना म्हणाली .

" पाण्यात बुडून लई गार वाटतं पाटील . म्या हित तुमची वाट बघते . "
शर्मनच्या कानात कुजबुज झाली आणि तो दचकला .


अमेय उठून पुढे चालायला लागला . त्याने ठरवले आधी मुख्य दरवाजा शोधूया . त्याप्रमाणे अमेय जिना उतरून खाली आला . समोर अनघा दिसताच तो थांबला . आजी पुढे झाली . आजीने धागा पुढे केला .

" अमेय धागा हातावर बांध . "
शर्मन ओरडला .

त्याने धागा हातात धरताच अनघा त्याच्याकडे धावली .
सगळेजण तळघराच्या दिशेने निघाले . मोठ्याने हसल्याचे , ओरडायचे आणि रडल्याचे आवाज येत होते . अचानक अमेय ओढला गेला .

" ही ! ही ! ही ! पाटील धागा लगीच बांधायचा व्हता . "
अमेय आणि अनघा भेटले तेव्हा धागा हातातून निसटला होता .


अमेय ओढला जात होता आणि सगळेजण त्याच्यामागे वेड्यासारखे पळत होते . अखेरीस तळघरात अमेय थांबला . त्याचे हात आपोआप बांधले गेले आणि पाण्याचा खळखळ आवाज यायला लागला .


" नयना घाई कर . "
आजी ओरडली .

नयना सावध होतीच तिने संदूक उघडली आणि अचानक वाऱ्याच्या झोताने नयना दूर फेकली गेली . अमेयच्या गळ्याभोवती आवळण्याच्या खुणा दिसायला लागल्या .

" माग फिरा न्हाय तर याचं मुंडक तोडून टाकीन म्या . "
करकर दात वाजवत आवाज आला .


आजीने संदुकीच्या भोवती रिंगण आखले आणि नयनाने हस्तलिखित उघडले आणि आवाहन मंत्र म्हणायला सुरुवात केली . त्याबरोबर ओरडण्याचा आवाज वाढला .


" अनघा ते पैंजण रिंगणात टाक . "
आजी ओरडली .

पण तोपर्यंत शर्मन खाली पडला होता . समोर त्याची मुलगी त्याला बोलावत होती . आपल्या हातात साखळी बांधलेली बघून शर्मनने साखळी खोलली आणि पुढे पाऊल टाकणार तितक्यात तो हवेत उचलला गेला .


" खबरदार माझ्या काशीला हात लावशीला तर ."
हवेतून खाली झेप घेत दौलती म्हणाला .



" मंत्र थांबव न्हाय तर दोघांना मारून टाकीन . "

" दौलती आस करू नगा . तुम्ही आणि काशी वाड्यातून मोकळ व्हा . "
आजी म्हणाली .


" आम्हाला बुडवून मारलं . काय चूक झाली आमची ? "
दौलती चिडला .

पाणी वाढायला लागले . तितक्यात पैंजण अनघाने रिंगणात फेकले आणि दौलतीची शक्ती कमी झाली . नयनाने आवाहन मंत्र पुन्हा जपला . दोघांचे आत्मे रिंगणात कैद झाले .


" देशमुख घराण्यातील लोक तुमचे गुन्हेगार होते . पण त्याची शिक्षा चार पिढ्यांच्या लेकी बळी पडल्या . त्यांची काही चूक नसताना . तुमचाच अंश असलेल्या कळ्या बुडून गेल्या . मी तुम्हा दोघांना वचन देते की पुन्हा असा गुन्हा घडणार नाही . "

वसुधा पदर पसरून रडत होती .


" पर मामानी मला हित डांबलं न्हाई . त्यांनी मला बोलावलं नव्हतच . "

" मग कोण होता तो नराधम ? " अनघा आणि नयना एकदम म्हणाल्या .


" माझ्यावर ज्याची वाकडी नजर व्हती तो श्रीपती पाटील . म्या वाड्याकडं निघाले . दगडूबाईवर ईश्वास ठिवला . पावसात समोरच कायबी दिसत नव्हतं . तितक्यात भीमा तिथं पोचला . दौलती माझी वाट बघतोय असा निरोप त्याला द्यायचा व्हता .


पर त्याला चार माणसांनी पकडलं आणि पाटलांच्या तलवारीन त्याच्यावर वार केला . भीमान वार पायावर घेतला आन त्यो पळाला . मलाबी वाटलं मामानी त्याला मारलं .


तितक्यात इज कडाडली आन म्या डोळ मिटलं . मला पकडल्यावर संदूक उघड असा आवाज ओळखला आन मला डाव लक्षात आला .


अचानक मामा दरवाजावर आलं . कुणी माग राहायला नग म्हणून . म्या ओरडायचा लई प्रयत्न केला पर.."


" तुझे गुन्हेगार दुसरे होते मग इतक्या मुलींचा बळी का गेला ? " अनघा चिडली .


" म्या फक्त पोरींशी बोलू शकत व्हती . पोरांना सपनात दोघं दिसायचो आम्ही . पोरी मला पाण्यात बघून घाबरून मरायच्या . याची पोरगी बेसुद झाली आन म्या ठरवलं समद संपल . पर तुझ्या सपनात मला जाता आलं आन तुम्ही इथवर आला . "


" मग पाटलांच्या दुसऱ्या वाड्यात भरभराट आन ह्यो वाडा ओस का पडला ? " आजीने विचारले .


श्रीपतीन आमच्या आत्म्यांना हित कैद केलं . त्यामुळं आम्ही बाहेर गेलो न्हाय . गोरा सायेब शब्दाला जागला . त्यानं दिलेली कागदपत्र आन पैक श्रीपती घेऊन गेली . आज पुनव हाय . आमसनी मोकळ करा . "


दौलती आणि काशी यांना मुक्ती कशी मिळेल ?
देशमुखांच्या घरावरील संकट ह्या पौर्णिमेची रात्र संपवेल का ?
पाहूया अंतिम भागात .


वाचत रहा .
रात पुनवेची आली .

©® प्रशांत कुंजीर .


अष्टपैलू 2025 स्पर्धा .
सदर कथेचे लिखाण चालू आहे .

0

🎭 Series Post

View all