Login

रात पुनवेची आली भाग 20 अंतिम

एक अध्याय समाप्त
रात पुनवेची आली भाग 20 अंतिम .


मागील भागात आपण पाहिले की नयनाने आवाहन मंत्र जपून दौलती आणि काशीच्या आत्म्याला कैद केले . सगळे सत्य समजल्यावर आता दोघांना मुक्ती द्यायला नयना सज्ज झाली . आता पाहूया पुढे .


" नयना , आता घाई कर . "
अनघा ओरडली .

इतक्यात वसंत आत आला . त्याच्यासोबत आणखी एकजण होता .


" थोरल्या पाटलांच्या घरात जन्मले तुम्ही . साले भिकारी झाले तरी मान तुमचा . आम्ही इथे गावात गडगंज श्रीमंत झालो तरी आम्हाला तो मान नाहीच . "
तो ओरडला .

" वसंत , हा माणूस कोण ? "

" ताई , पहिल्यांदा तुम्हाला घेऊन यायचे काम आले तेव्हा याने पाचपट पैसे दिले . फक्त माहिती द्यायचे . "

" मी सांगतो . श्रीपती पाटलांची पाचवी पिढी . तुम्हाला आणि ह्या आत्म्यांना एकदम संपवणार . लोकांना वाटेल म्हातारबा पाटलांनी सख्ख्या मुलाला आणि बहिणीच्या पोराला मारले आणि म्हणून त्यांच्या भूताने सगळ्यांना मारले . "

नयनावर पिस्तूल रोखत तो ओरडला .


" वसंत ते पुस्तक इकडे आण . आधी ह्या भुताना मुक्त करू ." वसंत पुस्तक घेऊन आला .

त्याने पाने पाहिली . पाने संपूर्ण कोरी . त्यावर काहीच लिहिलेले नव्हते .

" ह्यावर लिहिलेले आपल्याला दिसत नाही तर . नयना ह्यातून मंत्र म्हण नाहीतर तुझ्या आजीला गोळी घालीन . "

नयनाने पुस्तक घेतले आणि तीनवेळा मंत्र म्हणताच दोन ज्वाला रिंगणातून बाहेर गेल्या .


" चला सगळे एका रांगेत उभे रहा . वसंत यांना रांगेत उभे कर . "

" रंगा आस करू नको . ही पोर पोटूशी हाय . परत ह्या गावात यायचं न्हाई ते . "
आजी हात जोडत होती .


" म्हातारे , तुझ्याकडे एवढी विद्या असताना तू खितपत पडली . मी रंगा आहे . चला उभे रहा सगळे . "
वसंत पाठमोरा उभा होता .


" वसंत चल मागे फिर . "
इतक्यात वसंताची मान फिरली आणि वसंताचा हात त्याच्या गळ्यावर होता .

" वसंत हरामखोर , सोड मला . "


" कोण वसंत ? म्या दौलती पाटील . आम्हाला मुक्ती देणार व्हता नव्ह ? "
समोरून आवाज आला .

रंगाने रागाने नयनाकडे पाहिले .

" मूर्ख माणसा , तुला काय वाटलं हुशारी फक्त तुझ्याकडे आहे . "

इतक्यात दौलतीने रंगाची मान पिरगळली आणि दुसऱ्या क्षणी त्याचे श्वास थांबले . दौलती वसंताचे शरीर सोडून गेला . वसंत थरथर कापत कोपऱ्यात उभा होता .


" पोरी , आता आमाला मोकळं कर . "

" हो , पण त्याआधी तुमची राहिलेली इच्छा पूर्ण करायची आहे . "

नयनाने आपल्यासोबत आणलेल्या बॅगेतून शालू , मंगळसूत्र आणि मुंडावळ्या काढल्या .

" आत्म्याच्या रूपात तुमचे लग्न नाही लावू शकत . परंतु ह्या वस्तू तुमच्या सोबत जाण्याने तुमची इच्छा काही अंशी पूर्ण होईल . "
नयनाने सगळ्या वस्तू रिंगणात ठेवल्या .

दौलती आणि काशीच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी नयना मंत्र म्हणू लागली आणि थोड्याच वेळात दोन तेजस्वी ज्वाला आकाशात झेपावल्या .


" अनघा सगळ्यांना बाहेर घेऊन चला . तळघराच्या कोपऱ्यात आणखी दोन पेट्या आहेत . त्या सोबत घ्या . "
नयना बाहेर जाण्याची घाई करत होती .

" नयना , त्या पेट्यात काय आहे ? "

" आधी वाड्यातून बाहेर व्हा ."
नयना जवळजवळ ओरडली .

सगळेजण वाड्यातून बाहेर पडले . अचानक वीज कडाडली आणि वाड्याने पेट घेतला .


आजीच्या घरी पोहोचल्यावर अमेय आणि शर्मन दोघांनी त्या छोट्या पेट्या खाली ठेवल्या .

" नयना ह्या पेट्या कसल्या आहेत ? "

" ह्यात दौलती पाटलांनी जमवलेले सोने आहे . ज्यावर वारस म्हणून तुमचा हक्क आहे . "

" नयना तू देखील आत्याच्या बाजूने वारस आहेस . "
अनघा म्हणाली .

" ताई , मला माझा वारसा मिळाला . "

" नयना , आता तुझ्या पुण्यातील शिक्षणाची जबाबदारी आमची . इथून पुढे तू आमच्यासोबत राहणार . "
वसुधाने तिला जवळ घेत सांगितले .


" शिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र गावी परत येणार . "
नयना हसून म्हणाली .


" नयना तुझ्या मैत्रिणी कुठेय ? मागच्या दोन दिवस त्या दिसत नाहीत . "

" काळजी करू नको अनघाताई . त्या दोघींना मी पुण्याला परत पाठवले होते . "
बोलणे चालू असताना शर्मनचा फोन वाजला .

" शर्मन , इट्स अ मॅजिक . शी इज कॉन्शियस . " पलीकडून त्याची बायको ओरडली .



" अनघा , आपण ह्या पेटीत सापडलेले दागिने सरकार जमा करू . आलेल्या पैशांतून गावात काही सोयी सुविधा करू . " अमेय म्हणाला .

" अगदी बरोबर दादा . तसेच करू . "

" चला आता झोपा . उद्या देवी गावाची प्रदक्षिणा घालणार . जुन्या गावाची प्रदक्षिणा घालताना पालखीत तांदळा आम्ही घालतो आन पालखी देशमुख उचलतात . "
आजीने सांगितले .


एक मोठे संकट संपले होते . दोन प्रेमी जीव अनेक वर्षे अडकून पडले होते . त्यांना मुक्ती मिळाली होती . सगळेजण शांतपणे झोपी गेले . सकाळी सगळे जागे झाल्यावर आवरायची लगबग सुरू झाली .


" अनघा , नयनाच्या पणजीच लुगडं आणि दागिने माझ्याकडं हाय . आज किती वर्षांनी पाटलांच्या घरातली सवाष्ण देवीची वटी भरणार . "
अनघाने दागिने घेतले . आत जाऊन तयार होऊ लागली .



नऊवार पैठणी , केसांचा अंबाडा , नाकात मोत्याची नथ , कपाळावर कुंकू , हातात सोन्याच्या पाटल्या . साक्षात लक्ष्मी भासत होती अनघा . देवीची पूजा करून सगळे पुण्याकडे निघाले .


एक वर्षानंतर शेरगावची यात्रा पुन्हा भरली होती . शर्मन सहकुटुंब भारतात आला होता . दागिन्यांचे पैसे आणि ह्या दोघा भावांनी केलेली मदत ह्यातून गावात शाळा , देवीच्या मंदिरात भक्तनिवास बांधण्यात आला होता .


आज पौर्णिमेची पालखी सजवण्यात देशमुख पाटलांचे वारस पुन्हा सहभागी झाले होते . म्हातारबा पाटलांनी गुन्हा केला नाही हे त्यांच्या वारसांना समजले होते . इथून पुढे पौर्णिमेची रात्र समृद्धीचे आणि सुखाचे चांदणे घेऊन येणार होती . नयना आपल्याला लाभलेला प्राचीन वारसा अभ्यासत होती . एक अध्याय संपला होता .



सदर कथा मनोरंजन हाच हेतू समोर ठेवून वाचावी ही विनंती .

©® प्रशांत कुंजीर .

अष्टपैलू 2025 स्पर्धा .
0

🎭 Series Post

View all