Login

रात पुनवेची आली भाग 6

रहस्य हळूहळू उलगडत आहे .
रात पुनवेची आली भाग 6

मागील भागात आपण पाहिले की अनघा आणि वसुधाताई कशाबशा वाचतात . तिथून आल्यावर अनघाला पैंजण सापडते . तदुसऱ्या दिवशी नयना त्यांच्या घरी पोहोचते . आता पाहूया पुढे .


" वॉव , ताई मस्तच आहे घर . बाग पण सुंदर आहे . "
नयना स्वतः शी गिरकी घेत म्हणाली .

वसुधाने तिला आत नेले . तुझ्या मैत्रिणी आल्यावर वरच्या खोल्या दाखवते . तोपर्यंत फ्रेश होऊन घे. नयना आत फ्रेश व्हायला गेली . दोन तास रस्त्यावर चालल्याने तिला आता तोंडावर गार पाणी घेतल्याने बरे वाटत होते .

तिने टॉवेल काढला आणि खिडकीत ठेवला . छान फ्रेश होऊन टॉवेल घेऊन बाहेर आली .

" अगं सुकायला घाल टॉवेल . "
वसुधाताई म्हणाल्या .

" नको ,आता वर गेल्यावर घालते . "
नयना टॉवेल बॅगेत ठेवत म्हणाली .

तोपर्यंत अनघा छान कॉफी घेऊन आली .

" नयना , शेरगाव तुझे गाव आहे ना ? "
अनघाने विचारले .

" हो , माझ्या आजीचे गाव आहे . आईची आई . मला तिनेच लहानाचे मोठे केले . आता पुण्यात जॉब करतेय . लवकरच आजीला आणेल . "
गप्पा चालू असताना मैत्रिणी पोचल्या .

अनघाने त्यांना खोल्या दाखवल्या आणि परत आली .


" आई , उद्या शर्मन भेटणार आहे . काय सांगायचं असेल त्याला ? "

" कदाचित हीच स्वप्न त्यालाही पडत असावीत का ? "

" हो मलाही तसेच वाटते . उद्या तो भेटल्यावर कळेल .
अमेय यायच्या आत आपण त्याला भेटून येऊ . "

"हो , त्याला भेटून काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आपल्याला . " अनघा आणि वसुधाताई गप्पा मारून झोपायला गेल्या .

" ताई , ताई दार उघड . "
दरवाजा वाजत असल्याचा आवाज ऐकून अनघा जागी झाली .

रात्रीचा एक वाजला होता . तिने हॉलमध्ये येऊन लाईट लावली . बाहेर नयना उभी होती . अनघाने वसुधाताईंना उठवले .

" नयना काय झाले ? इतक्या रात्री खाली आलीस ? "

" ताई , तुम्ही माझ्यासोबत वर या . "
अनघा आणि वसुधाताई दोघी खाली कुलूप लावून तिच्यासोबत आल्या .

त्यांची एक मैत्रीण संपूर्ण केस मोकळे सोडून पाठमोरी उभी होती .

" आलीस , तुझीच वाट बघत व्हते म्या ."
ती गरकन मागे वळली .

तिचे डोळे बघताच वसुधाताई अनघाला घेऊन मागे सरकल्या .

" माजा दवलती आन मला मारून काय मिळालं ? आस सोडणार न्हाय काशी ."

असे म्हणून तिने पैंजण हातात धरले आणि खाली कोसळली .

वसुधाताई म्हणाल्या , " नयना तिघी खाली चला . पैंजण इथेच ठेव . "
दोघींनी स्मिताला धरले आणि खाली आल्या .

" काकू , हा काय प्रकार आहे ? "
अंजना घाबरली होती .

" नयना ते पैंजण कुठे मिळाले ? "
अनघाने विचारले .

"माझ्या टॉवेलमध्ये अडकून आलेले . स्मिताला ते सापडले . आपण ते परत देऊया असे म्हणेपर्यंत तिने ते पायात घातले आणि मग हा प्रकार घडला . "
नयना घाबरली होती .


" अनघा हा प्रकार सामान्य नाही . आपण ते पैंजण पुन्हा जिथे सापडले तिथे नेऊन टाकू . "
वसुधाताई म्हणाल्या .

" कुठे सापडले हे पैंजण ? "
अंजना आणि नयना एकदम म्हणाल्या .

" वाड्यात सापडले . माझ्या पायाला लागलेला चिखल साफ केल्यावर पैंजण सापडले . "
अनघाने उत्तर दिले .

" आजीला सांगावे लागेल . ती यावर काही उपाय सांगेल . " नयना म्हणाली .

" तोपर्यंत सगळ्यांनी त्या पैंजणापासून दूर रहा . "
वसुधाताई समजावत होत्या .

स्मिता थोड्या वेळाने शुद्धीत आली . आपल्यासोबत काय घडले तिला आठवत नव्हते . तिनही मुलींनी आजची रात्र इथेच झोपायचे असे वसुधाने सांगितले . पहाटे उशिरा सगळ्यांचा डोळा लागला .


सकाळी जरा उशिराच जाग आली .

" ताई , आम्ही आवरून ऑफिसला जातोय . "
नयनाने अनघाला सांगितले .

तिनही मुली गेल्यावर अनघाने शर्मनला फोन केला आणि भेटायचे ठिकाण ठरवले .


शर्मनने फक्त भारताबद्दल ऐकले होते . आज पहिल्यांदा तो भारतात आला होता . गेल्या दोन पिढ्या अमेरिकेत असला तरी त्याला मराठी बोलता येत होते . दुरूनच त्याने वसुधा आणि अनघा दोघींना ओळखले .

" शर्मन , थेट मुद्दा विचारते केवळ एका हस्तलिखितात वाचून तुम्ही इतक्या लांब आम्हाला भेटायला आलात ? "
अनघाने थेट विचारले .


" नाही , फक्त तितकेच कारण नाही . मला लहान असल्यापासून एक बाई पाण्यात बुडून मरताना दिसते . माझी बहीण , आत्या दोघीही पाण्यात बुडून वारल्या .
हे सगळे काहीतरी अतर्क्य असल्याचे मला नेहमी वाटायचे पण वडील मला काहिच सांगत नव्हते . ते गेल्यावर मला यातून बराच उलगडा झाला ." शर्मन थांबला .


" आश्चर्य आहे . असेच स्वप्न माझ्या मुलाला पडते . आता ते अनघाला देखील पडत आहे . "
वसुधाताई म्हणाल्या .

" अनघा प्रेग्नंट आहे का ? " शर्मन म्हणाला .

" तुम्ही कसे ओळखले ? " अनघा जवळजवळ ओरडली .


" जेनी प्रेग्नंट राहिली आणि तिला काशी दिसायला लागली . त्यानंतर नऊ महिने ते अनुभव येतच होते . अनघा माझी मुलगी समुद्रात बुडाल्याने गेले दोन महिने कोमात आहे . ह्या सगळ्याचा नक्कीच शेरगावशी संबंध आहे . " त्याने उत्तर दिले .



" शर्मन आम्ही गावी जाऊन आलोय . धरणात बुडालेला गाव आता दिसतो आहे . आपल्याला ह्याच दिवसात सगळे शोधावे लागेल . "
वसुधा ताईंनी उत्तर दिले .


" हो , मी गुगलवर वाचले की पुढील पंधरा दिवसात तिथे यात्रा आहे . मला वाटते आपण तिथे जाऊन रहावे ." अनघा म्हणाली .


" माझाही तोच विचार आहे . परंतु डॉक्टर अमेय तयार होतील का ? "

" त्याला आम्ही दोघी समजावू . तू कुठे उतरला आहेस ? " वसुधाने विचारले .

" इथेच एका हॉटेलात . " शर्मन म्हणाला .


" उद्या संध्याकाळी जेवायला ये . तिथेच आपण बोलू . " दोघी त्याची भेट घेऊन बाहेर पडल्या .


" आजे , तुझ्या नातीचा फोन आहे . "
शेजारचा मुलगा त्याच्या आईचा फोन घेऊन आला .

" नयना काय झालं अचानक फोन केला ? " तिने आजीला सगळी हकीकत सांगितली .


" नयना नीट आईक , ते पैंजण लाल फडक्यात बांध आन देवघरात ठेव . नयना आता तुला सगळं सांगायची वेळ आली . पर त्या समद्या लोकांना हित आन .. सोबत त्या दोन पोरींना पण घेऊन ये . "
आजीने सगळे समजावले .


अनघा आणि वसुधाताई तसेच अंजना आणि नयना एकाच वेळी आल्या . दरवाजा उघडा बघून चौघी धावत आल्या आणि समोरचे दृश्य बघून जागेवरच थांबल्या . कोणाच्याही तोंडून शब्द फुटेना .


काय पाहिले असेल चौघींनी ?

वाचत रहा
रात पुनवेची आली
©® प्रशांत कुंजीर

अष्टपैलू 2025 स्पर्धा
सदर कथेचे लेखन सुरू आहे .

0

🎭 Series Post

View all