Login

रात पुनवेची आली भाग 8

रहस्य उलगडायला सुरुवात झाली आहे .
रात पुनवेची आली भाग 8


मागील भागात आपण पाहिले की सगळेजण शेरगाव येथे जायला निघाले . आता पाहूया पुढे .


टेकडी ओलांडून गाडीने वळण घेतले आणि पुनर्वसित शेरगाव गावाची वेस दिसू लागली . आजही गावपण जपणारी कौलारू घरे . धरणाच्या बाजूला काही हॉटेल्स तसेच पर्यटन केंद्रे होती .


" देशमुख कुटुंबाचा नव्या गावात देखील वाडा होता . " नयना पटकन म्हणाली .

" हो , नवीन लग्न झाल्यावर यांनी मला एकदा गाव दाखवायला आणले तेव्हा ती जागा दाखवली होती . तो नांदता वाडा पुढील पंधरा वीस वर्षात ओस पडला आणि पुढे पडून गेल्याचे यांनी सांगितले होते . "
वसुधा ताईंनी आणखी माहिती सांगितली .


" गावातील एक मोठे कुटुंब असे गायब झाले स्ट्रेन्ज . " अमेय पटकन बोलून गेला .

" ती पहा जुन्या गावातील घरे आणि मंदिर . "
दूर नदीच्या पात्राकडे बोट दाखवत नयना म्हणाली .

" अमेय , राहण्याची सोय इकडेच हॉटेलात करु आपण ."
अनघा आणि शर्मन दोघांनी सुचवले .

" ताई , आजीचे घर मोठे आहे . आपण सहज राहू . "
नयना म्हणाली .

" आपण आधी आजीला भेटू आणि मग ठरवू ."
अमेयने सुचवले .

हे बोलणे चालू असेपर्यंत गाड्या गावातून पुढे नयनाच्या आजीच्या घरी पोहोचल्या होत्या .


नयनाच्या आजीचे कौलारू घर , त्यापुढे असलेले मोठे अंगण . समोरच तुळशीवृंदावन पाहूनच अनघा खुश झाली . गाडीचा आवाज ऐकून आजी बाहेर आली .


" सोमा , अरे पावन आलं . सामान उचल त्याचं . "
आजीने आवाज देताच पंधरा सोळा वर्षांचा चुणचुणीत सोमा पुढे झाला .

त्याला अमेयने थांबवले .


" आजी , नयना आणि तिच्या मैत्रिणी इथे राहतील आम्ही आमची सोय करतो . "
अमेय असे म्हणताच आजी पुढे झाली .

" ज्या देशमुख वाड्यात कधी कुणी जेवल्याबिगार गेल नाय त्यांचा लेक आणि सून हॉटेलात राहणार ? सोमा सामान उचल . ताई आत या . "
आजीने जवळजवळ हुकूम सोडला .


बाहेरून जुने दिसणारे घर आतून छान आधुनिक होते . बैठकीची मोठी खोली , त्याच्या आत दोन खोल्या आणि शेवटी स्वयंपाकघर .

" नयना , इतक मोठं घर असताना पुण्यात कशाला राहते ? " स्मिता पटकन म्हणाली .

तितक्यात आजीने त्यांना सामान लावून बाहेर बोलावले .


" ह्यो नारबा देशमुखांचा ना ? "
आजीने शर्मनकडे बघत विचारले .

" तुम्हाला कसं माहित ? "
शर्मन म्हणाला .
" दाखवते सगळ . आता समद सांगायला लागणार हाय . थोडा आराम करा . "
आजीने सांगितले आणि आजी स्वयंपाकाच्या तयारीला गेली .

नयना आणि अनघा दोघींना घेऊन वसुधा आजीच्या मदतीला आत गेली .


" शर्मन , हे स्वप्न इथे येऊन थांबेल का ? आपण धोका पत्करत नाही ना ? "

" धोका आहेच अमेय . पण हे चक्र थांबले पाहिजे . आपल्या घराण्यात जन्माला येणारी मुलगी कधी ना कधी पाण्यातच मृत्यू पावते . हे नक्कीच सामान्य नाही . "

" हो , मला पहिल्यांदाच स्वप्नात काशी आणि दौलती अशी दोन नावे समजली . नक्कीच ही नावे आपल्याला रहस्य सोडवायला उपयोगी पडतील . "

" हो , अमेय पण आपल्या घराण्यात बाकीचे कोणीच शिल्लक नसेल का ? सात आठ भावांच्या ह्या कुटुंबातून आपणच आहोत का ? "

" शर्मन , याचे उत्तर आजीला माहित असेलच . "

गप्पा रंगत असताना जेवायला यायचा आवाज आला . मस्त गावरान जेवणावर ताव मारून सगळे खुश झाले .

सगळी आवरा आवर झाल्यावर आजीने नयनाला सांगितले , " नयना , बोलाव आता समद्याना . "


नयनाने सर्वांना बोलावले . आजीने एक जुनी ट्रंक काढली आणि त्यात अगदी पिवळा पडलेला एक फोटो समोर ठेवला .


" देशमुख वाड्यात असलेल आठ भाऊ आणि त्यांच कुटुंब . " आजी म्हणाली .


" अच्छा , म्हणून तुम्ही मला ओळखले तर . " शर्मन म्हणाला .


" आजी , हा फोटो तुमच्याकड कसा ? " वसुधा ताईंनी विचारले .


" ह्या फोटोत एक पोरगी दिसते . ती देशमुख पाटलांच्या बहिणीची मुलगी . माझी पणजी . "
आजीने उत्तर दिले .



" पण आजी , मग हे कुटुंब नाहीसे कसे झाले ? " अनघा म्हणाली .


" काशीचा शाप भोवला पोरी . देशमुखांनी केलेलं पाप पुढच्या पिढीला भोगायला लागलं . "

" तुम्हीच म्हणाला देशमुख चांगले होते . काशी कोण आहे आजी ? " शर्मन म्हणाला .


" काशी , माझ्या आजीची बहिण . आता इथून पुढं काशी आणि दौलती दोघांची गोष्ट तुम्ही नीट ऐका . त्यातच तुमच्या सवालाचे जबाब हाय .


तर आता असणार गाव चार मैल आत व्हत . बाजारच गाव म्हणून शेरगाव खाऊन पिऊन सुखी . गावच पाटील म्हातारबा देशमुख आणि त्यांची बायको सरसाबाई दोघ लई करतुकीच .


म्हातारबा पाटलांची बहीण कासूबाई गावातच दिलेली . कासूबाई देवीची भगत व्हती . तिच्या शब्दाला पण मान व्हता गावात . कासूबाईला दोन मुली . थोरली काशी आन धाकटी झामी .


काशी लई देखणी . गोरीपान , दाट काळ केस , डोळ भोकरावानी टपोर . काशी मोठी व्हायला लागली आन दौलती देशमुख तिच्या भवती घुटमळायला लागला .



काशीला त्याच जवळ असण आवडायला लागलं . मामाचा पोरगा असल्यान कुणी संशय घेतला न्हाय . पण आपल्यात आत्याला पोरगी देत्यात मामाला नाही . त्यामुळं काशी आपल्या मनाला आवर घालायची .


एक दिवस काशी धुण धुवायला नदीवर गेली . डोहाच्या अलीकड काशी धुण धुवायला बसली . पलीकडे पोर अंघोळी करत होती . अचानक काशीचा पाय सटकला आणि धपकन ती पाण्यात पडली .


नदीत असलेल्या भोवऱ्याकडे ती ओढली जाऊ लागली . आता आपला शेवट आला अस समजून काशी आई काळूबाईचा धावा करू लागली .


अचानक एका भक्कम पुरुषी हाताने तिच्या कमरेला वेढा घातला आणि किनाऱ्याकडे जाऊ लागला . दौलती... काशी पुटपुटली .


ओल्या अंगाची काशी आणि उघड्या छातीने तिला उचलून बाहेर घेऊन आलेला तरणाबांड दौलती .


निसर्ग आपलं काम बराबर करत होता . काशीच गरम श्वास त्याला छातीवर जाणवत व्हत . त्याने काशीला खाली ठेवलं .


" वाईच जपून , भवरा हाय नदीत . "

" व्हय , पर तुमी हाय की मला बाहेर काढायला . "
" असं , तुला बाहिर काढलं पण म्या मातर बुडालो . "

दौलती दूर जाताना तिच्या कानात हळूच बोलून गेला . काशी त्याच्याकडे एकटक बघत कितीतरी वेळ तिथेच उभी होती . "



काय होईल ह्या प्रेमाचा शेवट ?
काशी स्वतःला थांबवू शकेल ?
वाचत रहा .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा .
सदर कथेचे लिखाण चालू आहे .