Login

आर ए सी तिकीट (भाग -३)

Travelling Experience Of A Lady
आर ए सी तिकीट

(भाग - ३)

©® स्वाती बाळूरकर देशपांडे, सखी


“बर . .आलोक सर ,मघाशी संस्कृत म्हणालात तर ते कुठे शिकवलं तुम्ही ?”

“अहो शाळेत नाही. लॉकडाऊन मध्ये संस्कृत शिकवण्याचे ऑनलाइन ट्युशन घ्यायचो मी, तीन ते चार बॅचेस. मग आता घेतो पण ज्यांना आवड आहे , केवळ त्यांच्यासाठी. पण लोकांना ते फुकट शिकवलं तरीही रेगुलर करत नाहीत त्याचा मला त्रास होतो.”


तिने आश्चर्याने पाहिलं. तिच्या शहरात किती डिमांड आहे संस्कृत शिक्षकांची. आणि हे काय?

“आलोकजी, फुकट का म्हणून? फी घ्यायची व्यवस्थित.”

“ हे पहा , मी जे पण ज्ञान आत्मसात केले ते त्या ईश्वराने मला बुध्दी आणि ग्रहणशक्ती दिलेली आहे म्हणून ! त्याचा मी व्यापार कसा करू?” किती निरागसता.


“अहो, हे खूपच वेगळं आहे तुमचं! कमाल आहे बुवा, व्यापार करू नका पण पोटाला काय खाणार ? ते सांगा?’ तिने चिंतेने विचारलं.

“हा हा ! अगदी माझ्या बायकोचा डायलॉग बोललात पहा. ती असंच म्हणायची. लॉकडाऊन मध्ये किमान दोन वेळच्या पोळ्या बनवू शकेल एवढे तरी कमवा , मग समाज सेवा करा आणि मला मात्र शिकवण्याचा खूप नाद. प्रचंड वाईट वेळ होती , लॉकडाऊन मध्ये सगळे लोक घरी होते . श्रध्देने संस्कृत बोलायला शिकवलं मी लोकांना. फी विचारायचे तर मी म्हणायचो, तुमची मर्जी असेल तर पाठवा नाहीतर असू द्या.”

“अहो, हो. असं म्हटल्यावरती फीस कोण देणार? न मागता द्यायला हे काय सतयुग आहे की काय?” ती आश्चर्यात पडली.

“ नाही तारा जी ,त्यातले काही लोक आहेत जे मला गुरु म्हणतात , मी शिकवलं आणि महिनाभरात विद्यार्थी संस्कृत बोलला नाही हे शक्यच नाही. गुरुदक्षिणा म्हणून ते पाठवायचे .तेवढ्या दोन वेळेच पोट ईश्वर भरतो. जगवलं त्याने आम्हाला”

“ आलोक जी नुसतं पोट भरून चालत नाही. लेकरं बाळ आहेत की नाही तुम्हाला?”

“आहे न, एक मुलगी आहे, फार गोड आहे. तर आमच्या जास्त गरजा नाहीत . मी तसं तयार केला आहे कुटुंबाला . अगदी कमी गरजा. मुलगी सुद्धा कधी हट्ट करत नाही. “

“सध्या कुठे? म्हणजे काय करताय ?”

“सध्या तर बेरोजगार आहे. नोकरीसाठीच फिरतो आहे .त्यासाठीच तुमच्या शहरात आलो होतो .”

“ अरे व्वा...आज इथे म्हणजे नेमकं कुठे?”

आणि मग त्याने त्याचं नाव आणि कुठल्या शाळेने त्याला बोलावलं वगैरे सगळं सांगितलं . इंटरव्ह्यू बद्दल बोलला.

मग तिने त्याला पगार विचारली.

एक मिनिट स्तब्ध झाली व ती म्हणाली की,”आलोक जी मी विचारायला नाही पाहिजे. . असे अनोळखी पुरुष माणसाला पण एक आत्मीयता वाटली म्हणून विचारलं . . . की इतकं लांब स्वतःच राज्य सोडून कुटुंबासोबत तुम्ही येणार , किमान तुम्हाला तितकं मानधन तर मिळालच पाहिजे. . तर हा सल्ला तुम्हाला लागू पडतो की नाही माहित नाही पण. . . “
“म्हणजे ?”
“जी शाळा तुम्ही सांगताहात ती मालदार पार्टी आहे. . तुम्हाला त्यांनी लुबाडू नये म्हणून कळकळीने म्हणाले. . !”

त्याचे भाव बदलले होते.

“तारा जी. . इतकी सुंदर मानवतेची भावना विकसित करून पुन्हा परका, अनोळखी आणि स्त्री पुरुष शब्द वापरू नका. तुम्ही आत्मीयता म्हणताय न , मला तर तुम्ही इतक्या जवळच्या वाटताय की ‘ मैं तो आपको गले लगा लुंगा. इतने अपने हो आप . . समंदर मे दो तिनके मिले हो जैसे. . . मैं आत्मा में स्त्री पुरूष भेद भी नहीं मानता. मुझे वो भावना तो छूकर भी नहीं जाती.” आता मला असं का वाटते की माझ्या जवळच्या कुठल्यातरी हरवलेल्या माणसाला, एका अंशाला भेटलो. आप तो सॅलरी की बात लेकर अटक गई!”
त्याच्या डोळ्यात चमकणारे ते अश्रू का तिला दैवी वाटले माहित नाही.
तिने त्याला शहरातली सगळी माहिती दिली. कुणाला भेटायचे, कितीपर्यंत पगार मागू शकतो, इथे राहण्याचा किती खर्च होईल वगैरे सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या.

तो आज्ञाधारक मुलाप्रमाणे ऐकत होता.

त्याला तिचं म्हणणं पटलं होतं. ज्ञान फुकट द्यायचं नाही, हे बजावलं .
तो खूप कृतकृत्य झाल्यासारखा पहात होता.
त्याने श्रध्देने हात जोडले, तिने देखील जोडले.

“पता नहीं फिर कब मिलेंगे?” ती पुटपुटली.

त्याने स्वतः चे हाताने लिहिलेलं कार्ड दिलं आणि म्हणाला , “मैं आपका नंबर नहीं मांगुंगा, ईश्वर ने चाहा तो फिर मुलाकात होगी! आपको कभी मन में लगे तो बात कर लेना , कोई मुश्किल हो, बुलाओगे तो जरूर आऊँगा.”

“जी अवश्य !” तिने कार्ड पर्समध्ये ठेवले.

निजामाबाद स्टेशन जवळ आलं होतं. सगळे प्रवासी गाढ झोपलेले होते. तिथ पर्यंत प्रवास कसा झाला कळालं नाही.

त्याने त्याची बॅग आवरली. पाठीला लावली आणि म्हणाला, “ ताराजी आप बडी तेजस्वी व्यक्तित्व की धनी हैं, जीवन में हक के लिए लड लेना, कभी हार नहीं मानना!”

“आलोक सर, अपना खयाल रखना !” तिचे डोळे का कुणास ठाऊक पण पाणावले.

“अपनी आत्मा के एक तुकडे से दूर जा रहा हूँ ऐसे लग रहा है. . आप अनुमति दे तो क्या मैं आपको एक बार गले से लगा सकता हुं!” त्याने बाहू पसारले.

कुठल्या शक्तीने कोण जाणे पण तारा ने त्याला मिठी मारली.

इतका प्रेमाचा, ममतेचा, मायेचा स्पर्श. . माणुसकीचं आलिंगन अगदी लिंगभेद विसरून. त्यात मित्रत्व, पितृत्व की भातृत्व काय होतं? कळालं नाही.

ती बाजूला झाली, त्याने धन्यवाद म्हणून तिच्या चरणांना स्पर्श केला.

तो पटकन स्टेशनवर उतरला.

ती खिडकीतून पहात राहिली.

तो चालत गेला. पुढे जाऊन वळून पाहिलं.

गाडी सुटली आणि तिने बाय म्हणून हात हलवला, त्यानेही.

बस्स!

तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. पुन्हा कधीच संपर्क किंवा भेट होणार नाही हे कळत होतं कारण तिने त्याला नंबर दिला नव्हता.

अशीही नाती आणि माणसं असतात हे आज कळालं होतं.

आर ए सी तिकीट आणि हा अनुभव नेहमी लक्षात राहील.

आता ती निवांत त्या बर्थवर झोपली.

तीन तासात, सकाळी हैदराबादला पोचणार होती.

समाप्त

©® स्वाती बाळूरकर देशपांडे, सखी
दिनांक - २५.०१.२५

अष्टपैलू लेखन स्पर्धा
(कथेचे सर्व हक्क लेखिके अधीन आहेत.)
कथा कशी वाटली नक्की कळवा.